28 March, 2012

तेजपूर



दैत्यराज बाणासुराने भगवान शंकराची उपासना करून हजार बाहूंच बळ मिळवलं होतं. त्या मुळे त्याच्याशी कुणीच युद्धाला तयार होत नसत. तो अपराजित असा झाला होता आणि त्याला आपल्या ताकदीचा अहंकार झाला होता. बरिच वर्ष त्याच्याशी कुणीच युद्ध केलं नसल्याने तो अस्वस्थ झाला होता. कुणीच त्याच्याशी युद्धाला तयार होईना तेव्हा तो शंकराला शरण गेला आणि म्हणाला हे भगवन मला युद्ध करण्याची अनिवार इच्छा होत असून माझ्याशी कुणीही युद्ध करायला तयार नाही तेव्हा आता आपण स्वत: माझ्याशी युद्धाला तयार व्हा. त्याचं हे मुर्ख पणाचं बोलणं ऎकून भगवान शंकराला खुप राग आला. पण बाणासुर त्याचा भक्त असल्याने त्याने राग आवरत त्याला सांगितलं की अरे मुर्खा तुझा अहंकार मातीत मिळवणारा या आधीच जन्माला आला आहे. तुझ्या महाला वरचा द्वज जेव्हा खाले पडेल तेव्हा समज की तुझा शत्रू जवळ आला आहे.
 
बाणासुराची उषा नावाची मुलगी होती. एका रात्री तिच्या स्वपनात एक राजबिंडा तरूण आला आणि ती त्याचं सौंदर्य पाहून मोहीत झाली. स्वप्नातून जाग आल्यावरही ती त्याला विसरू शकत नव्हती. ती त्याच्या आठवणी ने बेचैन व्हायला लागली. तीला उदास पाहून तीची हुशार मैत्रिण चित्रलेखा तीच्या जवळ आली. उषेने आपली व्यथा तीला सांगताच चित्रलेखानी आपल्या मायावी सामर्थ्याने त्याचा पुतळा बनवला. उषेने त्याला लगेच ओळखले. आता मी याच्या शिवाय राहू शकत नाही असा ती आलाप करू लागली. तो श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध होता. चित्रलेखा द्वारकेला गेली आणि झोपलेल्या अनिरुद्धाला पलंगासहीत घेवून आली. जेव्हा अनिरुद्ध झोपेतून जागा झाला तेव्हा त्याने आपल्याजवळ एका रुपवतीला पाहिलं. उषा त्याला सामोरी गेली आणि म्हणाली की ती त्याच्याशी विवाह करू इच्छीते. अनिरुद्धही मोहित झाला होता, तो तिच्या बरोबर तिच्याच महालात वास्तव्य करू लागला. बाहेर पहारेकर्‍यांना याची चाहूल लागली. त्यांनी बाणासुराला सुचीत केलं. बाणासुर महालाच्या बाहेर आला आणि त्याला आपल्या माहाला वरचा ध्वज खाली आलेला दिसला. आपला शत्रूच उषेच्या महालात लपून बसला असल्याची त्याला खात्री पटली आणि तो शस्त्रासह उषेच्या महालात गेला. अनिरुद्धाला पाहाताच त्याला क्रोध अनावर झाला. लागलीच त्याने अनिरुद्धाला युद्धासाठी ललकारले. अनिरुद्धाने लोखंडाचा अजस्त्र खांब उचकटून फिरवला आणि बाणासुराच्या अंगरक्षकांना ठार केलं. बाणासुर आणि अनिरुद्धामध्ये घनघोर युद्ध झालं पण कुणीच हरेना शेवटी बाणासुराने अनिरुद्धाला नागपाशाने बांधून टाकलं आणि बंदी बनवलं.
 
इकडे द्वारकेत अनिरुद्धाची शोधाशोध सुरू झाली, एवढ्यात देवर्षी नारद तेथे पोहोचले आणि त्यानी अनिरुद्धाचा ठावठिकाणा सांगितला. मग श्रीकृष्ण, बलराम, प्रदयुम्न, सात्यिकी, गद, सांब आदी वीर आपली चतुरंगिणी सेना घेवून शोणितपूरात पोहोचले. आपल्या राज्यावर आक्रमण झालेलं पाहून बाणासुर युद्धाला तयर झाला. भगवान शंकर आपल्या भक्ताच्या सहाय्याला कार्तिकेय, भुत, प्रेत पिशाच्य, यक्ष, राक्षसासह धावून आले. घनघोर युद्ध झालं. श्रीकृष्णाने ब्रम्हास्त्राचा प्रयोग करून शंकराची सगळी अस्त्र निकामी केली. बाणासुराचे चार हात सोडून सगळे हात तोडून टाकले. शेवटी शंकराने बाणासुराला श्रीकृष्णाला शरण जायचं आवाहन केलं. बाणासुर श्रीकृष्णाच्या पायावर लेळण घेवून त्याला शरण गेला. त्याने आपली मुलगी उषेचा विवाह अनिरुद्धाबरोबर लावून दिला.                   
 

बाणासुर नगरीत त्या युद्धात रक्ताचे पाट वाहिले म्हाणून त्याचं नाव शोणीत असं पडलं.  संकृतमधल्या शोणीतपूरचं असमीया भाषेतलं भाषांतर म्हणजेच तेजपूर. बाणासुराच्या राजधानीचा भाग म्हणजे आजचे अग्नीगढ, त्याला लागूनच चित्रलेखा गार्डन आहे. (एक चांगला कलेक्टर आला त्याने कचर्‍याचा ढिग असलेल्या या जागेवर सुंदर उद्यान उभं केलं आहे.) पच्शिम सम मधले बोडो, लखिमपूर भागातले मिसिड आपल्याला बाणासुराचे वंशज समजतात. बाणासुराला या भागात बान राजा म्हटले जाते.   
 
अग्नीगढ  आणि चित्रलेखा गार्डन शहरात असूनही तिथे गेल्यावर प्रसन्न वाटतं. दोन्ही बागांची देखभाल उत्तम रितीने केलेली आहे. तिथली स्वच्छता तर वाखाणण्याजोगी. झाडानाही भार झालेली फुलं पाहून मन हरखून जातं. तवांगच्या वाटेकडे निघताना छान मुड तयार झाला.

 

25 March, 2012

आनंदाची परिभाषा



आनंद...! जो सर्वांनाच घेता येतो, पण तो सर्व घेतात का? किंबहूना नसलेल्या दु:खाचा बाऊ करत, उसासे देत जीवन कंठणार्‍याला काय म्हणायचं? सहलीत फिरताना  उल्हासदायक हवा, सभोवती भव्य हिमालयाच्या पर्वत रांगा, खळाळत वाहाणारी सुंदर नदी, सानुल्या, गोजीर्‍या फुलांनी आच्छादलेली हिरवळ इतका छान प्रदेश न्याहाळत फिरत असताना सकाळी काही मिनीटं उशीरा मिळालेला चहा किंवा न चालणारा फ्लश  यांचंच रडगाण गात सहप्रवाशांना हैराण करायचं याला काय म्हणायचं?  यावरून एक गोष्ट आठवली.

एका रुग्णालयात दोन रुग्ण दाखल झालेले असतात. ज्या खोलीत त्यांना ठेवलेलं असतं त्या खोलीला एक खिडकी असते. खिडकी जवळ असलेल्या रुग्णाला दिवसातून फक्त एक तास अंथरूणावर बसवलं जातं. दुसरा रुग्ण मात्र चोवीस तास झोपवून ठेवलेला असतो. खिडकी जवळच्या रुग्णाला बसवल्यावर दुसरा रुग्ण त्याला बाहेर काय दिसतं असं विचारत असतो. खिडकी जवळचा त्याला रोज त्या एका तासात बाहेर दिसत असलेल्या दृश्याचं वर्णन करून सांगत असतो. बाहेर रम्य तलावाभोवती लहान मुलं खेळत आहेत. सुंदर-सुंदर फुलं फुलली आहेत, त्या भोवती फुलपाखरं रुंजी घालत आहेत. तलावाच्या पाण्यात बदकांचा जल विहार चालला आहे. निळंशार आकाश दिसत आहे आणि त्यात पक्षांची स्वछंद भरारी घेणं सुरू आहे, असं वर्णन ऎकून पडून राहिलेला सुद्धा उल्हसीत होत असे. एके दिवशी त्या खिडकी जवळच्या रुग्णाचं निधन झालं. आता त्या अंथरुणाला खिळून असणार्‍याला खिडकीजवळ हलवलं गेलं. खिडकी बाहेर काय दिसतंय त्याचं वर्णन करणारं आता तिथे कुणी नव्हतं. त्याने परिचारीकेला विचारलं. बाहेर काय चाललंय? काय दिसतंय? ती म्हणाली बाजूच्या इमारतीची भिंत सोडून अजून काहीच दिसत नाही. मग तो आधिचा रुग्ण कसलं वर्णन करत होता? परिचारीका म्हणाली तो रुग्ण आंधळा होता.

तो आंधळा असूनही दुसर्‍याला आनंद देण्यासाठी नेहमी चांगलच वर्णन करत होता. हा दृष्टीतला फरक असतो. जग जसं पहावं तसं दिसतं. ते पहायला आपल्याकडे तशी दृष्टी हवी. जे त्या आंधळ्याने पाहिलं ते डोळसांना पाहाता येईल का?   

जगातल्या ५०% टक्के लोकांना तुमच्याशी देणं घेणं नसतं, ४९% लोकांना तुमच्या दु:खामुळे मजाच वाटत असते आणि १% लोक असे असतात की जे तुमच्याबद्दल सहनभुती बाळगतात तेव्हा उसासे देत उरासफोड करण्यात काय अर्थ? सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणं म्हणतं ?         

15 March, 2012

मॉलिंयॉंग - मेघालय









मेघालय राज्यातलं मॉलिंयॉंग हे गाव  पाहाण्यासाठी शिलॉंगपासून जावून येवून 120 कि.मी. अंतर पार केलं पण ते सार्थकी लागलं . शिलॉंग सोडल्यावर थोड्याच वेळात मेघालयाच्या नावात असलेले मेघ जमिनीवर उतरलेले दिसले. चहुकडे दाटून आलं,अ पण ते बरसले नाहीत. पुढे जाताच वातावरण पुन्हा निवळलं. रस्त्याच्या दुतर्फा विविध जातीची बांबूची बनं होती. पुर्वांचलात बांबूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. मॉलिंयॉंग गाव  यायच्या आधी रिवाई या गावात जिवंत पाळामुळांपासून (Living Roots Bridge) बनलेला पुल पाहायला गेलो. निसर्गाचा अद्भुत चमत्कार असाच तो पुल आहे. पुढे मॉलिंयॉंग हे मुख्य आकर्षण होतं. आशिया खंडातलं सर्वात स्वच्छ गाव म्हणून त्याची ख्याती आहे. अवघी शे-दिडशे वस्ती असलेलं हे खासी जमातीची वस्ती असलेलं गाव खरच खुप स्वच्छ आहे. ठिकठिकाणी बांबूच्या सुंदर टोपल्या कचरा पेटी म्हणून ठेवल्या होत्या. येणार्‍या पर्यटकाला त्या दिसाव्यात अशा ठेवल्या असल्या तरी त्या टोपल्या आणि आजूबाजूचा परिसर खुपच स्वच्छ होता. व्ह्यु पॉईंट म्हणून बनवलेलं उंचच उंच मचाण हे तिथल्या लोकांच्या कल्पकतेच निशाण होतं. जंगलात असलेल्या त्या मचाणावरून सभोवतालच्या रमणीय परिसर न्याहाळण्याची सोय होती. ब्रम्हपुत्रेचं खोरं आणि पलिकडे बांगलादेशचा भाग या मचाणावरून पाहता आला.

इथे हेंरी हा तिथला रहिवाशी आमचा वाटाड्या म्हणून हसत मुखाने हजर होता. त्याने ते गाव, तिथली घरं आम्हाला दाखवून आणली. वांबूचा वापर केलेलं सुंदर घर पहाणं हा एक अनुभव होता. डोनबोक ची छोटेखानी खानावळीत रुचकर जेवणाचा आस्वाद घेतल्यावर आम्ही त्या सुंदर गावाचा निरोप घेतला.  

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates