या वर्षी थंडी चांगली पडली. इथे मुंबईत तसं प्लेझंट वातावरण आहे, त्यालाच थंडी म्हणायचा इथे प्रघात आहे. तिकडे उत्तरेत मात्र जबरदस्त थंडी आहे. त्याच्या बातम्याही आपण रोज वाचतो. श्रीनगरचं दल लेक गोठलं आहे हे ही बहुतेकाना माहित असेल. आता एवढे सगळे प्रांत थंडीने गारठून गेल्यावर लेह-लडाखची तर बातच नको. तिकडे वजा विस तपमान आहे. सगळीकडे बर्फच बर्फ. माझा मित्र आत्माराम परब या कडाक्याच्या थंडीत चार दिवसांपुर्वी लडाखला ‘व्हिंटर लडाख’ची टूर घेऊन निघाला तेव्हा माझ्या मनात थोडी धाकधुकच होती. काय होतय? कसं होतय ? असं सारखं वाटत होतं. त्यात तो लेहला उतरला तेव्हा सकाळी बाहेरचं तपमान वजा विस होतं. म्हटलं झालं कल्याण. हे लोक कशी थंडी सहन करणार? खर तर या ट्रिपवर स्मिता ग्रुप लिडर म्हणून जाणार होती. पण आयत्या वेळी आत्मारामने स्वत: जायचा निर्णय घेतला. ते ही बरोबर होतं म्हणा. लडाखला या दिवसात सगळीकडे बर्फाचच राज्य असतं. अंटार्टीका सारख्या प्रदेशात जाव तसं. सगळे रस्ते बर्फमय, नद्या गोठलेल्या. चादर ट्रेक करतात तो याच दिवसात.
काल संध्याकाळी आत्माचा फोन आला. माझ्या शरिरात एक थंड लहर येऊन गेली. तो पठ्या मात्र भलताच उत्साहात होता. काय केलं होतं त्याने? तो या हिवाळ्याच्या दिवसात चक्क पॅगॉंग लेकला जाऊन आला होता. सोबत सहलीला गेलेले सगळे लोकही होते. (हा.... आता त्याना लोक म्हणणं म्हणजे त्यांच्यावर आन्याय केल्या सारखं होणार. ते केव्हाच (किंवा तेव्हाच) आत्मामय होवून गेले असणार.) काय नजारा असेल तिथला. पॅगॉंग लेक सत्तर टक्के गोठलेला होता. हे यक्ष/ किन्नरासारखे तिथे त्या गोठलेल्या तलावावरून चालले आणि धन्य झाले. परत फिरले ते विजयी विरासारखे.
मे महिन्यापासून लडाखचा उन्हाळा सुरू होतो. तेव्हा उन्हाळ्यातही काहीवेळा पॅगॉंग लेकला जाणं शक्य होत नाही आणि या कडक हिवाळ्यात आत्मा तिथे पोहोचला म्हणजे कमालच झाली. ही बातमी जम्मू-काश्मीरच्या पर्यटन खात्याला समजली. त्यानी लगेच आत्माशी संपर्क साधला. नोहेंबर मध्ये झालेल्या ‘व्हिंटर लडाख’ प्रदर्शना विषयी आत्माने त्याना माहिती दिली. या दिवसात ट्रेकर्स मंडळीच अगदी अभावाने तिकडे जातात तर आत्मा चक्क टुरीस्ट घेऊन लडाखला पोहोचला म्हणून जम्मू-काश्मीरच्या पर्यटन खात्याने एकादिवसात हालचाल करून त्याला प्रशस्ती पत्रक बहाल केलं. विमानातून लेहला उतरणं वेगळं आणि छांगला पास (जगातला दुसरा सर्वात उंच मोटरवाहतूकीचा रस्ता) पार करून पॅगॉंग लेकला जाणं वेगळं. हे धाडस आत्माच करू जाणे. तो हिमालयावरसुद्धा स्वार झाला........ माझ्या अंगावर मुठभर मास चढलं.
आत्माचं मनापासून अभिनंदन, आत्माच्या जिद्दीपुढे हिमालयातील 'थंडी' गारटली अस म्हणालो तर वावग ठरणार नाही. अशी जिद्दी माणसंच इतिहास घडवतात....
ReplyDeleteविजयजी, नमस्कार. जिद्दी माणसंच इतिहास घडवतात हे खरच आहे. उन्हाळ्यातही ज्या वाटेने जाताना जपावं लागतं त्या ठिकाणी आत्मा या हाडं गोठवणार्या थंडीत गेला आणि मुख्य म्हणजे मजा केली.
ReplyDelete