लडाख जितका सुंदर निसर्ग, तेव्हढाच खडतर
प्रवास. लडाखला एकदा भेट
दिली की तो प्रत्येकाच्या मनावर गारुड करतोच. १९९५ साली अशाच एका जिप्सीने
लडाख-मुंबई-लडाख असा मोटरसायकलने प्रवास करायचा संकल्प केला आणि तो तमाम
अडथळ्यांना दूर करत पूर्णही केला. त्यावर ‘लडाख... प्रवास
अजून सुरू आहे’ हे वाचकप्रिय
पुस्तकही आलं आहे. आता तो इतिहास झाला. त्या नंतर प्रिय मित्र आत्माराम परब यांनी
लडाखला १३१ वेळा स्वत: भेट दिली आणि ३५ हजारावर पर्यटकांना आजवर लडाखला नेऊन
सुखरूप परत आणलं. जाऊन आलेले पर्यटक मग त्यांचा प्रवक्ता झाला आणि हा कारवा वाढतच
चालला आहे. लडाख... प्रवास अजून सुरू आहे.
पण मंडळी, या लडाखच्या
सफरीवर निघालात की अनेक अडचणी समोर उभ्या ठाकतात. आजवर या संकटांवर यशस्वी मात
करण्यात आत्माराम परब आणि ‘टीम ईशा’ सफल झाले आहेत. मग ती २०१० ची ढग फुटी असो की काश्मिर बंदची हाक असो की
वाटेत सतत कोसळणारे कडे असोत. आम्ही पर्यटकांचं लडाख पहायचं स्वप्न सत्यात उतरवलं
आहे. या लडाखा प्रवासादरम्यान अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, राजकिय चळवळी
झाल्या, बंद-मोर्चे निघाले
पण आत्मारामनी पर्यटकांना लडाख फिरवण्याचा ‘वसा’ सोडलेला नाही.
नुकतेच कालच्या १ ऑगस्टला आम्ही लडाखला २००च्यावर पर्यटकांना लडाख दाखऊन परतलो आणि
परवा तीन तारीखचा सुर्य उगवयच्या आधी ईशा टुर्सचे ९० च्यावर पर्यटक लडाखला निघायला
सज्ज झाले असतानाच सरकारने पर्यटकांना श्रीनगर खोरं सोडण्याची विनंती केली. आमचे
चार टूर लिडर श्रीनगर विमानतळावर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असताना त्यानाच
श्रीनगर सोडण्याची वेळ आली. अशा वेळी आयत्यावेळी निर्माण झालेल्या या परिस्थितीवर
मात करण्यासाठी आणि ईशा टुर्सच्या पर्यटकांचा हिरमोड होऊ नये म्हणून स्मिता रेगे
(संचालक इशा टुर्स) यांच्या नेतृत्वाखाली ‘टीम ईशा’ कामाला
लागली आणि शब्दश: अहोरात्र काम करून या टिमने पर्यटकांना लेहला सुखरूप पोचवण्याचं
अतुलनीय काम करून दाखवलं. रात्रभर चालणारी ती धडपड मी पहात होतो आणि या टीमची
आश्वासक चाल पाहून प्रत्येक वेळी छाती अभिमानाने फुलून येत होती. सर्व पर्यटकांची
श्रीनगरची विमान तिकिटं रद्द करून लेहची नविन तिकिटं काढणं,
त्याच वेळी त्यांच्या असंख्य प्रश्नांना न थकता उत्तरं देणं,
श्रीनगरमध्ये उभी केलेली यंत्रणा लेहला हलवणं,
लेह विमानतळावर पर्यटकांचं स्वागत करणं, श्रीनगर,
सोनमर्ग, कारगिलमधल्या निवास व्यवस्थेची
करण्यात आलेली सोय स्थगीत करून लेहला आयत्यावेळी एवढ्या मोठ्याप्रमाणावर येणार्या
पर्यटकांची योग्य सोय करणं, हाय अॅल्टिट्युड
सिकनेस होऊ नये म्हणून काळजी घेणं आणि मुख्य म्हणजे हे सर्व करीत असताना होणार्या
आर्थिक नुकसानाकडे न पहाणं असं दहा दिशांनी पण निश्चित ध्येय ठेवून झटून केलेल्या
त्या कर्तुत्वाला त्रिवार सलाम.
एकीकडे हे काम सुरू असताना
आत्माराम परबांबरोबर माझा पुर्वनियोजित नाशिक दौरा ठरलेला होता. ‘लेखक
आपल्या भेटीला’ या ज्योती स्टोअर्स व श्री
शंकराचार्य न्यास, नाशिक याच्या सयुक्त
उपक्रामांतर्गत आमच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार होता. लडाख सफरीची वर उल्लेखलेली
धावपळ सुरू असतानाच मुंबई-ठाण्यात धुवांधार पावसाला सुरूवाता झाली,
आम्ही नाशिकरांच्या भेटीला जायच्या आत मुंबईचा पाऊस आम्हाला कडकडून (खरं तर
कडाडून) भेटायला आला. पण त्याची मिठी
हलकेच सोडवून आम्ही नाशिककडे रवाना झालो. कसारा घाटात कोसळलेल्या दरडी,
झोडपून काढणारा पाऊस आणि विपर्यस्त व खोट्या बातम्या देऊन अडचणीत वाढ करणारी
प्रसारमाध्यमं (मिडीया) यांचा मुकाबला करीत आत्माराम आणि मी नाशिकला कार्यक्रम
स्थळी सुखरूप पोहोचलो ते अॅड. रघुवीर वैद्य साहेबांच्या उत्तम सारथ्यामुळेच.
नाशिकला होणार्या कार्यक्रमाचं मुलाखरुपी सारथ्य करण्याआधी त्यांनी ठाणे ते नाशिक
असं सारथ्यकरून आम्हाला उपकृत केलं होतं.
आम्ही कार्यक्रम स्थळी
पोचेपर्यंत लडाखची ९० पर्यटकांना घेऊन सुरू झालेली सफर मार्गी लागत होती. गाडीत
आत्माराम परब आणि ठिकठिकाणच्या कार्यालयातून काम करणारी टिम ईशा अफाट विश्वासाने
आणि धैर्याने कार्यरत होती. स्मिता रेगे, अनिला
नाईक, गितांजली पडवळ-माने,
सुजाता जोशी, हर्षदा,
अमिता सगळीच मंडळी अहोरात्र काम करीत होती आणि तिकडे प्रत्यक्ष फिल्डवर आदित्य
जोशी, अमित खोत,
धिरज सावंत, संदीप चौगावकर हे किल्ला लढवत
होते. शिवाय लेहला पद्मा आणि आमचे तिथले चक्रधर तय्यार होतेच. ४८ तास चाललेला हा
थरार अनुभवणं हासुद्धा एक अविस्मरणीय प्रवास होता आणि तिकडे लडाख... प्रवास
अजून सुरू आहे...
मित्रहो लडाखला सर्व
व्यवहार आजही शांतपणे चालू आहेत. जम्मूमध्येही शांतता आहे,
फक्त श्रीनगर खोर्यातील पाच जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देश
विघातक शक्तींचा निपटारा करण्यासाठी ते आवश्यकही आहे. तेव्हा आपण सय्यम बाळगणं
जरूरीचं आहे. लडाखला जाणार्या पर्यटकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. लडाखला
जाणारा पर्यटकांचा ओघ कमी होण्याचं काहीच कारण नाही तेव्हा Show Must Go On . लडाख... प्रवास अजून सुरू आहे... सुरू रहाणार आहे.
चला जाऊया...!
नरेंद्र प्रभू
५ ऑगस्ट २०१९
No comments:
Post a Comment