17 March, 2014

खिडकी



खिडकी .....! प्रकाशाची चाहूल देणारी, दिवसाची हळूवार सुरूवात करणारी, पक्षांचा किलबिलाट आणि चिमण्यांचा चिव चिवाट अंथरूणातच असताना कानांना ऎकवणारी आणि वार्‍याची मंद झुळूक अलवारपणे घेवून येणारी. घर तेच असलं तरी बाहेर नित्यनव्याने घडणारी नवलाई नजरेला दाखवणारी खिडकी.

ही खिडकी मला खुप आवडते. तशा या घराला अनेक खिडक्या आणि दारं आहेत. पण..., पण ही खिडकी मात्र सर्वांहून निराळी, मला माझ्याच जगात घेवून जाणारी, तीसर्‍या मजल्याला खाली ठेवून वर गेलेला भला थोरला गुलमोहर तिच्यातून सदानकदा डोकावत असतो. त्यालाच बिलगून असणारा आंबा सख्ख्या मित्रासारखा त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे. कितीतरी वर्षांपासूनचं सख्य असेल नाही यांचं. हे दोघे आपल्याच मस्तीत असले तरी इतरांना मात्र त्यांचा जाच नाही. त्यांचा कमरेपर्यंतच हात पोहोचणारी पोफळ, बदाम, पिंपळ, कडूनींब, माडाची झाडं तर खाली जास्वंद, पारीजात, पेरू अशी कच्ची-बच्ची आणि या सर्वांचा आधार घेत वर पर्यंत गेलेल्या वेली. शहरात क्वचीतच दिसणारं हे वैभव मला इथे मुंबईत चक्क पार्ल्यात नित्य नेमाने पाहता येतं आणि माझ्या नकळत मला रोज माझ्या गावात घेवून जातं.

या शहरात माणसांची, वाहनांची. इमारतींची गर्दी, पण या गर्दीत न दिसणारे पक्षी मात्र या झाडांवर सतत गर्दी करून असतात. खट्याळ पोपटांचा थवा सकाळीच हजर असतो. झाडांच्या ढोलीत असलेला खावू ही जणू यांचीच संपत्ती. दुसर्‍या कुणी म्हणजे कुणी तिकडे नुसतं पाहायचंही नाही. चुकून एखादा कावळा, मैना तिकडे फिरकलीच तर त्या झाडावर या फांदीवरून त्या फांदीवर त्याची पाठ धरून त्याला नकोसं करून सोडणार. सगळ्यांना हाकल्लं की हे महाशय डौलात इकडे तिकडे पाहात अंग साफ करीत बसणार. इतका वेळ मुखमार्जन करीत बसलेले हे पोपट दुसरा थवा आला रे लाला की क्षण भर थांबून भरारी घेत दूर शाळेला निघून जाणार. मगच त्या झाडावर कावळे, मैना, चिमण्या  सुखनैव संचार करायला मोकळे असतात. उन्हं जरा वर आली की कधी छोटूकले सनबर्ड आपल्या वेगळ्याच आवाजाने लक्ष वेधून घेतात, कधी हे सुंदर सनबर्ड तर कधी हळद्या, नाचण, बुलबुल, खंड्या, तांबट असे पाहूणे अचानक दर्शन देवून पुन्हा गुप्त होतात.

काल पासून एक कोकीळ आणि कोकिळॆची जोडी खिडकी बाहेरच्या आंब्यावर बसून प्रणयाराधन करायला जागा शोधताना दिसायला लागलेत. वसंताची चाहूल लागयला त्यांना कॅलेंडर पहायची जरूर भासत नसावी. पण वसंत असो की शिषीर त्या झाडांवर वास्तव्य करून असलेली आणि आपलाही वंशवेल वाढवणारी खारूताई सतत आवाज करीत जोडीदाराला साद घालत असते. कधी लहर लागली तर खिडकीतून सरळ आत येते, तिथे ठेवलेले चणे आपल्या नाजून हाताने उचलून खाते. दिवसभरात कधीही खिडकीतून डोकावून पहा ती खारूताई आपले अल्लड चाळे करीत दर्शन देत रहाते.

खिडकीत उभं राहून मावळतीचा सुर्य पहाणं आणि कोवळी उन्हं अंगावर घेणं या सारखं दुसरं सुख नाही. सदानकदा माणसांनी आणि त्यांच्या कोलाहलाने गजबजलेली मुंबई या खिडकीत उभं राहिलं की दृष्टीआड होते आणि ही खिडकी एकांताचा सुखद अनुभव देते. सकाळपासून आपल्या लीला दाखवून सुखावून सोडणारे सगळे पक्षी पुन्हा खिडकी बाहेरच्या झाडांवर गर्दी करतात. पण आताची लगबग सकाळपेक्षा वेगळी असते. आता सगळ्यांनाच घाई असते. दिवस कललेला असतो आणि खिडकी बाहेर काळोख दाटून यायला लागतो. खिडकी बंद करायची असते पण मन त्या खिडकीतच घोटाळायला लागतं. मनाची कवाडं कधीच मोकळी झालेली असतात.

कधी जोराच्या वार्‍याने खिडकी वाजते आणि पुन्हा तिकडे लक्ष जातं आता पारव्याची जोडी तिकडे घुटू.र्र्र...र्घू करीत बसलेली असते एका नव्या पाहाटेच्या प्रतिक्षेत. 

                   


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates