06 April, 2014

गोवा मेरी जान


बिकिनी, बाटली आणि बे म्हणजेच गोवा असा गोव्याबाहेरच्या कित्येकांचा समज असतो. गोव्याला जाणारे सगळेच फक्त आणि फक्त याच गोष्टींचा आनंद घेतात असा समज असणार्‍यांनी गोव्याच्या ग्रामिण भागात फेरफटका मारला तर त्याला नितांत सुंदर गोव्याच्या अंतरंगाचं दर्शन खचीतच घडेल.

गेली तीस वर्षं मी याच गोव्याच्या प्रेमात पडलो आहे. बाखिबा बोरकरांचं बोरी गाव, डॉ. रामाणींचं वाडी तळावली, तांबडी सुर्लाचं मंदीर, तेरेखोल, बोंडला अभयारण्य, दुधसागर धबधबा कोकणीत सांगायचं झालं तर हा खरा ‘सुना परांत’, सोन्याचा प्रदेश. अप्रतिम समुद्र किनारे ही तर गोव्याची ओळख पण गेले दोन दिवस गोव्याच्या अंतरभागात फिरताना मन मोहून गेले. अशा सफरीत जीवाभावाची आवडती माणसं बरोबर असली की त्या सफरीचा आनंद काही औरच असतो. मांडवी एक्सप्रेसने थिवी स्टेशनला उतरलो तेव्हापासून उमाकांत भाईंनी भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल करून टाकली.

गोव्याच्या प्रसन्न हवेत कालच्या दिवसभरच्या प्रवासाचा शीण नाहीसा झाला आणि सकाळी सहालाच झोपेतून जाग आली. खमंग गोवन न्याहारीने दिवसाची सुरूवात झाली आणि मग दिवसभर पोटोबा सुखावतच राहीला. धुळेर म्हापसाहून सुरू झालेला तो प्रवास स्मरणीय झाला. म्हापसा- मोय्रा-अळदोणा मार्गे जात असताना केबलने तोलून धरलेला पुल लागला, पुढे खाडीतून बार्ज आली की फाटक उघडल्यासारखा बाजूला होणारा ब्रिज लागला. गोव्यातल्या खाणी सध्या बंद असल्याने सगळीकडे हिरवाई पसरून राहिली होती.  त्या पुला खालून वाहणारं पाणी नितळ होतं.

रस्त्याचा दुतर्फा भाजीचे वाफे नेत्रसुख देत होते आणि आंबा, फणस काजूची तोरणं बांधावी तशी झाडं स्वागताला हजर होती. एवढ्यात एक सप्तपर्णीचं झाड सामोरं आलं आणि माझी चंगळ झाली. पंधरा-वीस वर्षांपासून न खाल्लेली तोरणं (कोकणीत चुन्ना) माझ्या दृष्टीस पडली आणि मी वेडा झालो. उन्हाची तमा न बाळगता भर दुपारी मी त्या काटेरी झुडूपाला भिडलोच. अशी तोरणं काढून खाण्यातला आनंद माझ्या मुंबईवासी मुलीला समजणार नाही. शहराने आमच्या या पुढच्या पिढीचे असे कितीतरी आनंदाचे क्षण हिरावून घेतले आहेत महाराजा.  उमाकांत भाईंनी मला प्रोत्साहन देताच तिथल्याच कुमयाच्या पानांचे द्रोण करून ती तोरणं त्यात जमा केली. दोन्ही हातात द्रोण घेवून पुन्हा गाडीत बसताना मला स्वर्ग प्राप्तीचा आनंद झाला होता. या पहिल्या एक-दिड तासात माझा दिवस सार्थकी लागला होता आणि नंतरचा पुर्ण दिवस आणि त्यात केलेली चंगळ माझ्यासाठी बोनस होता. 

आज मला आधीच देव पावला होता आणि मग आम्ही तिकडे सप्तकोटेश्वराच्या देवळाला भेट दिली. महाराष्ट्राबाहेर कुठेही गेलं आणि आपले जाणते राजे शिवाजी महाराज यांनी इतिहासावर उमटवलेल्या खुणा पाहिल्या की उर भरून येतो. महाराजांनी आदेश दिला आणि या सप्तकोटेश्वराच्या मंदीराचा जिर्णोद्धार झाला ती तारीख होती 6 एप्रिल 1668. आज त्या गोष्टीला 348 वर्षं झाली. त्या जाणत्या राजाने केलेली प्रत्येक कृती आज साडेतीनशे वर्षांनंतरही दाद देण्यासारखी असते. राजांच्या आठवणीला उजाळा देता देता जवळच्याच कुळागाराकडे पावलं वळली. माड, पोफळी, त्यावर चढलेल्या मिरवेली, केळी हे पहाता पहाता जवळच्या बिमलाच्या झाडाकडे लक्ष गेलं. तुरट-आंबट चवीची झाडाच्या खोडाला लगडलेली ती बिमलं पाहून हात नकळतच तिकडे गेला. तिथल्या मालकानीही हवी तेवढी घ्या म्हणून परवानगी दिली आणि मग पडत्या फळाची .............

बिमलं
मये तलावाकडे गाडी थांबवली आणि पुन्हा एकदा पेट्रोल भरून घेतलं ते गाडीत नव्हे तर पोटात. तलावाकाठच्या बगिच्यात बसून गप्पा मारताना पाणकावळा, घार, ब्राम्हणी काईट, बदकं आपले खेळ करून दाखवतच होते. तासभर गप्पा मारून मग नार्वे गावाकडे प्रस्थान ठोकले ते मासळीच्या जेवणावर ताव मारण्यासाठी. सुग्रास जेवणाला खरी बहार आणली ती त्या चणक नावाच्या 

माशाने. गोव्याच्या  खाडीत मिळणारा हा चवदार मासा खावा तर अशा खाणावळीतच. अर्थात कोळंबी, बांगडा, दोडकारे यांचं हौतात्म्य आम्ही वाया जावू दिलं नाहीच हे वेगळं सांगायला नको.

पोटातले मासे थोडी सुस्ती आणत होते पण उमाकांत भाईंचा उत्साह ओसंडून वाहत होता. वाट वाकडी करून ते आम्हाला काजूच्या रानात घेवून गेले. यतेच्छ बोंडू खाल्ले, तिथल्या कुळागारात फेरफटका मारला आणि गोव्याची प्रसिद्ध फेणी कशी बनवतात ते पहायला गेलो. फेणीचं दुरदर्शन घेवूनच आम्ही म्हापश्याच्या प्रसिद्ध बाजारात गेलो. त्या बाजारात म्हणे आई-वडील सोडून बाकी सगळं मिळतं. खरचं तिथे यच्ययावत गोष्टींचा बाजार मांडला होता. त्या तेवढ्या गर्दीत माझ लक्ष वेधून घेतलं ते ब्रम्हवठार देवस्थानाने. त्या बाजारात तो भलामोठा पिंपळ ठामपणे उभा आहे. दगडाला देवत्व देण्या पेक्षा त्या
ब्रम्हवठार
झाडला दिल्यामुळे ते झाड वाचलं आहे. त्या ब्रम्हवठाराकडून आम्ही थेट परब्रम्हाकडे म्हणजे वागातूर  सागर किनार्‍यावर दाखल झालो. इतर किनार्‍यावर असलेली गर्दी इथे नव्हती. तिन्ही सांजेला सागर किनारी असण्यासारखं सुख नाही आणि तोंडी लावायला भेळ असली तर मजा काही औरच असतो. उजव्या बाजूला रेडी बंदर आणि डावीकडे मुरगाव बंदरात उभ्या असलेल्या बोटीवरचे दिवे आम्हाला घरी परतायची आठवण करून देत होते. एक दिवस खरच साजरा झाला होता आणि तृप्तीचा ढेकर देतच आम्ही परतलो पुन्हा जेवण्यासाठी.  







2 comments:

  1. खूप छान सर
    माझा ब्लॉग- http://shabdjhep.blogspot.in/

    ReplyDelete
  2. गोयच्या अंतरंगाचं दर्शन मस्त जमलय, पर्यटन स्थळाला समर्पित होता आलं पाहिजे हे खरंय तुमचं , शक्य तितकी शहरी सोयी, बाजारीकरण टाळून अस्सल मातीतलं पर्यटन अनुभवावं, त्याची सर कशाला नाही.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates