
मुंबई बाहेर दोन दिवस जायचं म्हटलं तर दादरा नगर हवेली हे
ठिकाण उत्तम आहे. मुंबईपासून सिल्वास १८० कि.मी. एवध्या अंतरावर आहे आणि वापी
किंवा भिलाड रेल्वे स्टेशन पर्यंत ट्रेनने जावून पुढे जाण्यासाठी रिक्षाचा वापर
करता येतो. वापी शहर आणि औद्योगिक भाग मागे पडल्यावर सुरू होणारी गावं आपल्याला
सहलीला आल्याचा आनंद द्यायला लागतात. एक सुंदरशी कमान ओलांडून आपण दादरा नगर
हवेलीत प्रवेश करतो आणि पुढे दमणगंगा नदी आपल्याला दर्शन देते. आता आम्ही गेलो
तेव्हा एप्रिल महिना असूनही नदीला बर्य़ापैकी पाणी होतं. वाटेत ते पाणी अडवणारा
बंधारा लागला तरी पुढे नदीपात्रात पाण्याचा सुकाळ होता. अख्या दादरा नगर हवेलीत ही
दमणगंगा वाहत जाते. गुजरात राज्याच्या सीमेलगत दुधनी येथे प्रवेश केल्यानंतर
समुद्राला लागेपर्यंत अनेक ठिकाणी या नदीवर बंधारे बांधले आहेत.

सिल्वास हे दादरा नगर हवेलीचं प्रशासकीय मुख्यालय नेटकं
आहे. केंद्रशासीत प्रदेश असल्याने राजकीय बजबजपुरीचा अभाव असल्याने असेल रस्ते,
नदी नाले, झाकलेली गटारं, बगीचा सगळीकडे प्रशासनाचा दरारा दिसत होता.
महाराष्ट्रातल्या शहरात असतात तसे गल्लीतले दादा-भाई आणि त्यांचा रस्त्यावर
उतूजाणारा उपद्रव इथे पहायला मिळाला नाही आणि एका समंजस समाजात आपण वावरत आहोत असं
प्रथमच वाटलं. बाहेरून आला आहे म्हणून लुटा अशी शहरी अरेरावी नाही आणि फसवणं तर
नाहीच नाही. इथली माणसं ‘माणसं’ वाटली.


आमच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळच असलेलं स्वामीनारायण
मंदीर आणि त्याचा परीसर मनाला आल्हाद देणारा होता. या दिवसात नकोशी करणारी गर्मी
नव्हती आणि पहाटेच्या गारवार्यासोबत पुर्वेला उगवणारा सुर्यनारायण आणि समोर
मनोहारी दिसणारं स्वामीनारायण मंदीर या मुळे इथे आल्याचं सार्थक झालं. मंदीराच्या
हिरवळीवर गडबड करणारे पक्षी, चिमण्या आपल्या अल्लड चाळ्यांनी लक्ष वेधून घेत
होत्या. मंदीर आहे म्हणून भल्यापहाटे बोंबलणारा कर्णा इथे नव्हता पण आपली
नित्यनेमाची कामं सुरू करण्याआधी सेवा करणारे सेवेकरी मात्र इथे दिसत होते. मंदीराचा
परीसर तेच तर झाडून स्वच्छ करीत होते. रेखिव नक्षीकाम असणारं हे मंदीर पर्यटकांचं
आकर्षण ठरलं आहे. पोशाखी दिखावा नसला तरी इथल्या व्यवस्थापनात एक अंगभूत शिस्त
दिसत होती.
 |
मोहाचं झाड |
सिल्वासहून दुधनीकडे जाणारा रस्ता बहूतांश आदीवासी
पाड्यांमधून जातो. उत्तमस्थितीत असलेल्या या रस्त्यावरून प्रवास करायला मजा येते. सिल्वासहून
जवळच असलेल्या डिअर पार्क मध्ये हरणांनी चागलं दर्शन दिलं. दोन वेळा नीलगायही
दिसली. पानझडीच्या या जंगलात झाडं उघडी बोडकी असली तरी त्याला एक स्वत:चं असं
सौदर्य होतं. जवळच्याच लायनसफारीतही एकच सिहं आहे. या दोन्ही ठिकाणी जंगलातून
फेरफटका मारण्याचा आनंद मिळतो. पावसाळ्याच्या दिवसात तिथे गेल्यास हिरवंगार जंगल
आणि झुळझुळणारं पाणी पहायला नक्कीच मजा येईल. पुढे मधूबन धरणाचा फुगवटा लागतो. एका
बाजूला जंगल, टेकड्या आणि दुसरीकडे नीळंशार पाणी बघत प्रवास करता करता अचानक मोहाची
बरीच झाडं पहायला मिळाली. मोहाची फुलं बहराला येण्याचा हा हंगाम होता आणि
ठिकठिकाणी आदीवासी लोक ती वेचताना दिसत होते. बहराला आलेले हे वृक्ष खुलून दिसत
होते. दुधनी जलाशयाजवळ दादरा नगर हवेली पर्यटन खात्याचं रिसॉर्ट आहे.

वाटेत
वनखात्याचं फुलपाखरू उद्यान लागतं ते मुद्दाम थांबून पाहिलंच पाहिजे. त्या
उद्यानाची देखभाल उत्तम रितीने केलेली दिसत होती आणि त्या बाहेत हर तर्हेची
फुलपाखरं आणि फुलं होती. हे सर्व करून परतताना
प्रशस्थ वाणगंगा बोटींग गार्डन मध्ये बोटींगचा आनंद लुटत संध्याकाळचा वेळ आनंदात जातो.
अगोदर पोर्तूगीजांच्या अधिपत्याखाली असलेला दमण पश्चिमेला आणि
दादरा नगर हवेली पुर्वेला. हे दोन्ही प्रदेश केंद्रशाशीत आहेत. असं असलं तरी दमण
पेक्षा दादरा नगर हवेली अधिक स्वच्छ आणि सुंदर वाटलं. दमणला एकतर शेवटपर्यंत
गजबजलेला रस्ता आणि कुठल्याही बकाल शहरात वाढलेली असतात तशी बांधकामं. तिथला
समुद्र किनाराही जेमेतेम आहे. काळी वाळू आणि टपर्यांमुळे मुळचा लांबलचक आणि सरळ
असलेला हा किनारा आता बापूडवाणा वाटतो. सहज बघता आला तर ठिक पण मुद्दामहून वाट
वाकडी करून जावं असं तिथे काही नाही.
दादरा नगर हवेली हे ठिकाण मुंबई, गुजरातच्या जवळ असूनही
पर्यटन दृष्ट्या अजून दुर्लक्षीतच आहे. म्हणूनच निवांतपणे फेरफटका मारायचा असेल तर
या ठिकाणी गेलं पाहीजे.
No comments:
Post a Comment