कधी सांजवेळी नदीच्या किनारी
तुझे हात हातात मी घेतले
अशा रम्यवेळी वसंतातल्या ग
तुझे अंग प्रत्यांग गंधाळले
कधी सांजवेळी खगांची विमाने
तुला पाहूनीया जरा थबकती
कधी सांज वेळी लता-वेलीही त्या
तुझे गुज रानामध्ये ऎकती
कधी सांजवेळी उन्हेही पळाली
तुला पाहूनीया जरा मागूती
कधी सांजवेळी आकाश तारे
लगबगून येती तुझ्या संगती
कधी सांजवेळी नवा चंद्र आला
तुला पाहूनीया जरा हासला
आरक्त गालात तुझीया सखे ग
नवा प्रेम अंकूर मी पाहिला
अशा सांजवेळी उल्हासीता तू
तुझ्या बाहूपाशी मला घेतले
कुणाची कुणाला पडली मिठी ती
न तू पाहीले ना मी पाहिले
(माझे मित्र डॉ. दिपक रेवंडकर यांनी फेसबुकवर एक फोटो अपलोड केला आणि त्या शीर्षक दिलं ‘कधी सांजवेळी’ या वरूनच ही कविता स्फुरली.)
नरेंद्र प्रभू
१८/१२/२०१४