आज वसंत पंचमी. माघ
शुक्ल पंचमी. मदनाची जन्म तिथी. वैवाहिक जीवन आनंदाचं आणि सुख समाधानाचं व्हावं
म्हणून आज त्याची पुजा केली जाते. तो आज रतीसह पृथ्वीवर भ्रमंती करायला येत असतो.
आजचा दिवस म्हणजे ऋतू बदलाचा दिवस. पानझडीतून आलेली मरगळ दूर
करून सृष्टी एक नवं रुप घेत असते. तसं ते रुप नित्य नवंच असतं. या रुपालाच खरं तर
नमन केलं पाहिजे. रोजच्या रोज उगवणारा सुर्य तोच असला तरी रोजच्या उषेचे रंग
वेगळे, पालवीचे पालटत जाणारे रंग; आकार वेगळे, पक्षाची भरारी वेगळी आणि त्याने
दिलेली तानसुद्धा नवोन्मेषी. हे सृष्टीचं रुप पालटणारी शक्ती, तीच पुजनीय. तीच
वंदनीय, पण तिकडे पहायला आपणाला वेळ तर हवा किंवा वेळ खुप असला तरी थोडं बाहेर
डोकावून पहायची तसदी तरी घेतली पाहिजे.
रोजच्या रोज उमलणारी फुलं तीच असली तरी त्यांचं उमलणं किती आल्हादकारी असतं. ते उमलणं एकदा पाहिलं म्हणजे झालं, पुन्हा पुन्हा तेच काय पहायचं
असं कधी होतं का? हेच चिरंतन आहे. त्याचा उत्साह आज पुन्हा एकदा नव्याने सुरू होत
आहे. रंगांची नवी उधळण पुन्हा एकदा होत आहे, होवू घातली आहे. बघा या छायाचित्रातलं
आकाश काल असं होतं. आज तेच आकश अगदी वेगळं होतं. हाच सृष्टीचा नियम आहे. ते क्षण
धरून ठेवता येणारच नाहीत आणि म्हणूनच नित्य नव्याने येणार्या क्षणाचा उत्सव केला पाहिजे. आज वसंत पंचमीच्या
दिवशी बाहेर तो सुरूही झाला आहे. जरा बघाना रंगोत्सव सुरू झाला आहे. .