सगळा हिमाचल प्रदेश नावाप्रमाणे हिमालयातच वसल्यामुळे तिथे सरळ रस्तेच
दुर्मिळ. वेडी-वाकडी वळणं घेत जाणारे रस्ते हेच जणू हिमाचल प्रदेशचं वैशिष्ट्य. किनौर
व्हाली तर या अवघड रस्त्यांसाठीच प्रसिद्ध आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसर्या
बाजूला उभे पर्वत अशा घाट रस्त्यामधून वाट काढतच शिमला जिल्ह्यामधून किन्नौर
जिल्ह्यात जावं लागत. शिमला जिल्ह्यात बर्यापैकी वस्ती असल्याने वाटेत सफरचंद,
चेरी, पिचच्या बागा लागतात. अवकाळी पावसाच्या मार्यापासून सफरचंदांच्या फुलांचं
रक्षण व्हाव म्हणून तिथल्या जागृत शेतकर्याने बरिचशी झाडं आच्छादलेली दिसतात.
कुठल्याही घरासमोर फुलांनी लगडलेली गुलाबाची झाडं पाहून मन प्रफूल्लीत होतं.
किन्नौर कैलाशचं अनोखं रुप (छाया: दिपकराव जाधव) |
ढाली, कुमारसैन, किंगल, खोपरी, रामपूर अशी गावं मागे टाकत जेव्हा आपण किन्नौर
जिल्ह्यात प्रवेश करतो तेव्हा आजूबाजूच्या प्रदेशातही फरक पडलेला असतो. खळाळत्या
प्रवाहासह रस्त्यात साथ करणारी सतलज नदी कधी आपलं सौम्य तर कधी रौद्र रुप दाखवत
दौडत असते. वाटेत येणारे दगड, गोटे, माती स्वत:बरोबर घेवून निघालेला तिचा प्रवाह
तेवढाच कायतो शहरातील माणसांच्या लोंढ्यासारखा वाहात असतो बाकी सगळं कसं शांत
शांत. पण याला अपवाद करतो तो वारा. सुसाट वेगाने निघालेला हा वारा तिथल्या महाकाय
प्रर्वतांनाही भिडतो. जमिनीची सारखी धुप होत असते. मे महिन्यात तिथल्या
उन्हाळ्यामुळे बर्फ वितळल्याने उघड्या झालेल्या पर्वतांवरचे दगड घोंडे या वार्यानेच
आपली जागा सोडतात आणि तिव्र उतारावरून थेट दरीत झेप घेत असतात. अशा कोसळणार्या
दगडांची गती एवढी वेगाची असते की त्याला ‘स्टोन शुटींग’ असा शब्दच प्रचलीत आहे.
अशाच एका दगडाने आमच्या गाडीवर हल्ला केला आणि पुढची काच फुटता फुटता वाचली, तरी
त्या दगडाने आपली कायमची खुण उमटवलीच.
मोकळ्या शितल हवेतल्या इथल्या पक्षी जगताने आपलं लक्ष वेधून घेतलं नाही तरच
नवल. पायी चालत जायला जर मोकळा वेळ असेल तर त्यांचं उत्तम दर्शन घडतं. नुसत्या
हिमालयीन मैनाही गुबगुबीत देखण्या दिसतात. पक्षी, फुलं, फळं या सगळ्यांचेच रंग
उठून दिसणारे. सफरचंचाची फिकट गुलाबी फुलं किती साजरी दिसतात. सगळं कसं रसरशीत.
लांबच्या प्रवासाने आळसावायला झालं तर वाहनातून उरल्यावर पाच मिनिटात पुन्हा तजेला
येतो. ही मोकळी हवा, तिथला निसर्ग, महाकाय पर्वत, पाताळात जाणार्या दर्या,
खळाळते प्रवाह आणि शुभ्र बर्फाच्छादीत शिखरं हे हिमालयाचं जगभरातील पर्यटकांना
भुलवणारं रुप न्याहाळायलाच इथे जायचं, वर्ष भराचं वारं पिऊन घेण्यासाठी.
निसर्गाच्या या अफाट कॅनव्हासवरच्या बारीकशा रेषा हिच माणसाची इथली खुण. नदी
काठावरून वरवर जाणारे रस्ते नागमोडी
वळण घेत पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणचं दर्शन देत राहातात आणि मग कधीतरी अचानक
मागचा प्रदेश दिशेनासा होतो आणि नव्या दुनियेत आपण प्रवेश करतो. एक पर्वत ओलांडून
दुसर्या पर्वताच्या उतारावर गाडी धावत असते, सुर्याचा डोंगराआडून लपंडाव सुरू
होतो आणि आजचा त्याचा दिवस आता संपणार अशी वर्दी मिळते तरी आपलं मुक्कामाचं ठिकाण
अजून दूरच असतं. हिमालयात मैलाच्या दगडाला फारसं महत्व नाहीच. आपण शहरी माणसं ते
पहात अंतराचा, वेळेचा अंदाज बांधत असतानाच एखादं असं डायव्हर्शन येतं की मती गुंग
होते. त्यावरून धावणारी वाहनं कधी थांबवायची ती ठरवणार कोण तर निसर्ग. काल्पाकडे
जाणार्या रस्त्यावर आम्हाला असंच एक डायव्हर्शन घ्यावं लागलं. चक्क २२
किलोमीटरचं. दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी एवढा दविडीप्राणायाम करावा लागला. किमान
दोन तासांचा तरी प्रवास वाढला. हा पर्यायी रस्ताच आता कायमचा होणार असं दिसत होतं.
‘सिमा सडक संघटन’ने (BRO) आपलं काम तिथे सुरू केलं होतं. ‘ब्रो’ चे मजूर आणि GREF चे
अभियंते या भागात सतत कार्यरत आहेत म्हणूनच तिथल्या जनतेला आणि आपल्यासारख्या
पर्यटकांना या भागात फिरता येतं अन्यथा पायी यात्रा करणं हा एकमेव मार्ग शिल्लक
उरला असता.
जेवढं खडतर जीवन तेवढीच किंवा त्याहून उतुंग अशी माणसाची जिद्द. पर्वत उतारावर
चार-पाच फुटाच्या पायर्याकरून तिथला शेतकरी शेती करतो ते पाहून आपण विचार करायल
उद्युक्त होतोच. दिवसभर थकवणारा प्रवास करीत मुक्कामाकडे लक्ष ठेवून जाणार्या
आम्हाला ‘किन्नौर कैलाश’चं दर्शन घडलं आणि नकळत वाहनाना विश्राम द्यावाच लागला.
मावळतीकडे निघालेला सुर्य त्या पर्वतांच्या मुकुटावर झळाळी चढवण्याचं काम घाईने
करीत होता आणि सगळ्यांनाच तो अचूक क्षण टिपायची उत्कंठा लागून राहिली होता. तो
मुकुट सोनेरी होणं न होणं नशिबावर अवलंबून असतं. शेवटी रोजचे रंग वेगळे हेच खरं.
रिकोंग पिवो असं तिबेटी नाव धारण केलेलं किन्नौर जिल्ह्याचं ठिकाण आल्यावर
काल्पा हे गाव दिसायला लागतं तरी ते अंतर सहा-सात किलोमीटर एवढं आहे. रिकोंग पिवो
हे जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी ती काही खुप मोठी बाजारपेठ नव्हे असं असलं तरी
पर्यटकांना आणि तिथल्या लोकांना रोजच्या गरजा भागवण्याएवढं सामान तिथे नक्कीच
मिळतं. दुतर्फा सफरचंदांच्या झाडांची सलामी घेत घेत जाताना काल्पा कघी आलं, खरं तर
आपण काल्पाला कधी आलो ते कळतही नाही. समोरची भिंतच असावी तसा अगदी जवळ किन्नौर कैलासचा धवल पर्वत उभा ठाकलेला
असतो आणि संधीप्रकाशातही तो उठून दिसायला लागतो. त्याच्या मागे उगवलेला चंद्र अजून
कसा वर येत नाही अशी वाट पाहत असणारे आपण कुडकुडत उभे असतो आणि थंडी किती असेल
याची पहाणी करण्यासाठी थरथरती बोटं स्मार्ट फोनवर फिरवू लागतो.
चंद्र प्रकाशातलं किन्नौर कैलासचं रुप केवळ अप्रतिम. त्याचं वर्णन करता येणार
नाही. चांदण्यात न्हावून निघालेला किन्नौर कैलास पहायचा असेल तर तिथेच गेलं
पाहिजे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री किन्नौर कैलासचं ते साजरं रुप न्याहाळायला
आम्ही त्या रात्री बराच वेळ जागे होतो,
आर्थात चंद्राच्या साक्षीने.
देव येण्याच्या प्रसंगी पारंपारीक नृत्यात दंग असलेले गावकरी |
No comments:
Post a Comment