


निलमोहरांची रांग बघून क्षणभर इथेच थांबू म्हणणारं मन पुढच्या क्षणी दुसर्या
रंगाच्या प्रेमात पडायचं. मागचे रंग आणि
हे रंग यांची रंगपंचमी सुरू असतानाच उन्ह कलायला लागली. सुचीपर्णी वृक्षांचा दबदबा
वाढायला लागला आणि मैलांचे दगड शिमला जवळ आल्याचं खुणावू लागले. नारकांड्याला
पोहोचता पोहोचता काळोखच झाला. आवराआवर करून झोपेस्तोवर चंद्र बराच वर आला होता,
समोरच्या पहाडावर चांदण्याचा वर्षाव होत होता.
पहाटेच्या स्वच्छ हवेत सुर्य किरणांनी न्हावून निघालेल्या हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळच्या हॉटेल
हाटूमधून समोरच्या पहाडावरची फुलांनी बहरलेली सफरचंदाची झाडं लक्ष वेधत होती. सात-आठ
किलोमीटर दूर असलेल्या हाटू पीकवर जायला निघालो, कालपासून दर्य़ाखोर्यातील
धोकादायक वळणावर लिलया गाडी चालवणार्या चालकांचं कौतूक वाटतच होतं, पण आज मात्र हाटू
पीकवर जाणारा हा रस्ता त्यांची परिक्षा घेणाराच होता. जेमतेम एक गाडी जाईल अशा
रत्यावर समोरून आलेल्या वाहनाला वाट करून देताना त्यांचं कसब पाहून त्यांना सलाम
करीतच आम्ही हाटू पीक गाठलं. ११,००० फुट उंचीवर असलेल्या तिथल्या सर्वात उंच
ठिकाणी दुपारीही बर्यापैकी थंडी वाजत होती. हाटू मंदीरात प्रवेश करण्यासाठी
जेव्हा बूट काढले तेव्हा जमिनीचा बर्फासारखा स्पर्श तपमापकाची उणीव भरून काढत
होता.
हिमाचली स्थापत्यकलेचा नमुना असलेलं हाटू मंदीर, तिथला परिसर आणि सभोवार
पसरलेल्या दर्या डोंगर मनाच्या प्रसन्नतेत भर घालत होते. समोर आभाळ दाटून आलं
होतं. हिमालयात असं अचानक वातावरण बदलतं आणि क्षणार्धात फिरत्या रंगमंचाप्रमाणे
सगळ बदलून जातं. काचा वर घ्यायला लावणारा जोरदार पाऊस सूरू झाला आणि गारव्याचा
वेगळा अनुभव घेत गाडीची चाकं हॉटलकडे वळली.
![]() |
हॉटेल हाटू, नारकांडा |
![]() |
हाटू मंदीर |
No comments:
Post a Comment