‘नटसम्राट’ नाटक पाहिलं होतं, चित्रपट बघणार आहे, पण काल जितेंद्र जोशी,
गिरीजा ओक आणि रोहित हळदीकर(ही) यांचं ‘दोन स्पेशल’ पाहिलं आणि त्या नाटकातच हरवून
गेलो. एरवी नाटक, सिनेमे पाहताना पाठेमागे मनात काहितरी चालू असतं, पण या नाटकाने
मनाची अशी काय पकड घेतली की भान हरपून जाणं म्हणजे काय ते समजलं.
जितेंद्र जोशी
आणि गिरीजा ओक यांचा अभिनय हा ‘अभिनय’ न वाटता असं काही समोर प्रत्यक्षात घडत आहे
असं वाटत रहावं इतका तो प्रत्ययकारी होता. नट ताकदीने आपली भुमिका वठवत असतो असं म्हटलं
तर ते पेहेलवानच होते, नट भुमिका जगतो म्हणलं तर ते जगत होते.
कुठेही अतिशयोक्ती नाही, निम्न मध्यमवर्गीय पात्र असूनही विलाप नाही,
परिस्थितीशरणता नाही आणि दुसर्यावर दोषही नाही. हे सगळं नाटककाराचं कसब असलं तरी
नट म्हणून जितेंद्र जोशींनी त्याला पुर्ण न्याय दिलाय, तसा तो गिरीजा ओक यांनी पण
दिला.
मनोरंजनाच्या गदारोळात आणि मालिकांच्या महामारीत एक उत्कृष्ठ कलाकृती पहायची असेल
आणि उद्याचा नटसम्राट आज रंगमंचावर पहायचा असेल तर मित्रहो हे नाटक पहाच.
याना बक्षिसी म्हणून काय द्यायचं....... पुन्हा एकदा ते नाटक बघणारच.
ता.क. पुढच्या रांगेत मृणाल देव, प्रतिक्षा लोणकर, प्रशांत दळवी, आसावरी जोशी
अशी मराठी कलाकार मंडळी तर होतीच पण परेश रावल हा कसलेला कलावंतही या नाटकाचा
आस्वाद घेत होता.