आज दि. १९ नोहेंबर २०१७
रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या साहित्यरंग
महोत्सव २०१७ - "प्रवासवर्णन आणि पर्यटन विकास" या ४ दिवसीयकार्यक्रमाअंतर्गत ‘चाकोरी बाहेरील पर्यटन’ या विषयावर ईशा टूर्सचे
संचालक ‘आत्माराम परब’ याची प्रकट मुलाखत होणार आहे.
स्थळ: दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र
११२ ए,
ज.के.सावंत
मार्ग, (यशवंत नाट्यगृहाशेजारी) माहिम मुंबई
४०००१६
या निमित्ताने
अधिक माहितीसाठी मासिक ईशान्य वार्ताच्या दिवाळी
विशेषांकात प्रसिध्द झालेला ईशा टूर्सचे
संचालक ‘आत्माराम
परब’ यांच्या वरचा माझा लेख.
माझी
ती पहिलीच लेह-लडाखची सफर होती. चंदीगड-मनाली-लेह करून आम्ही कारगील आणि पुढे
श्रीनगरला जाण्यासाठी लेहहून निघालो होतो. गेल्या नऊ-दहा दिवसांची भटकंती स्वप्नवत
वाटत होती. लडाखचा देखणा प्रदेश अजून संपला नव्हता. पण आताचा आमचा प्रवास म्हणजे
संध्याकाळी किंवा रात्री कारगीलला पोहोचणे एवढ्याचसाठी होता. असं असलं तरी चकीत
होणं आणि फोटो काढणं चालूच होतं. सकाळी लेहचा निरोप घेऊन साडेचार-पाच तास होत आले
होते. सगळं शरीर संथावलेलं होतं. जेवणासाठी धाब्यावर थांबण्याची वाट सगळेच पहात
होते. आम्ही थकलो होतो. बाहेर भाजून काढणारं उन, आणि चालत्या जिपमध्ये मध्येच
जाणवणार्या झळा तर उंचावर गेल्यावर पुन्हा थंडी असा हवेचा खेळ चालू होता.
सृष्टीचा अनोखा नजारा मात्र पुन्हा पुन्हा कॅमेर्याला अव्हान देत होता.
‘ईशा
टुर्स’चे पर्यटक घेऊन चाललेल्या आमच्या गाड्या अचानक थांबल्या, त्या रस्त्याच्या
कडेला एका मागोमाग एक पार्क केल्यावर त्यांची इंजिनं बंद झाली. पुढे मैलभरावर
धुळीचा लोट उठला आणि मागोमाग मोठ्ठा स्पोटाचा आवाज झाला. समोरच्या पर्वताला आपटून
त्याचा प्रतिध्वनी आल्यावर पुन्हा सन्नाटा पसरला.
अब
क्या हुवा?
या
आमच्या त्रासिक प्रश्नाला
ब्रो
वालोंका काम चालू है।
असं
निर्विकार उत्तर ड्रायव्हरकडून मिळालं. त्यांच्यासाठी ते नेहमीचं होतं. कमालीचा
पेशन्स असलेल्या त्या ड्रायव्हर्सना आम्ही ‘बुद्धम शरणम....’ म्हणून आधीच शरण गेलो
होतो. चला आता तासाभराला राखण लागली. अंग आंबून आलं होतं. बाहेर तापलेल्या उन्हात
उतरण्यापेक्षा आहे ते बरं म्हणून बसून राहिलो. रस्त्यावर दगड मातीचा ढिगारा पडला
होता. आता ब्रोची (Border Road Organization) माणसं येतील, मग रस्ता साफ होईल आणि
मगच आम्ही मार्गस्थ होऊ याची कल्पना आली. एवढ्यात आत्माराम परब (संचालक ईशा टुर्स)
स्वत: खाली उतरून त्या ढिगार्याच्या दिशेने गेले. पहाणी केली. आपल्या गाड्या
जाण्यासाठी काय करता येईल याचा अंदाज घेऊन बहुदा त्यानी खाली वाकून समोर रस्यावर
पडलेले दगड दरीत उचलून टाकायला सुरूवात केली.
“अरे
हा माणूस स्वत:च कामाला लागला ! “
”.......”
हळूहळू
एक-एक ड्रायव्हर, मग आम्ही असे पन्नास-साठ हात कामाला लागले. आमच्या गाड्या
जाण्यापुरता रस्ता मोकळा झाला. गाड्या मार्गस्थ झाल्या. मगाशी आलेली मरगळ
कुठल्याकुठे पळून गेली. लडाख बरोबरच आत्माराम परबानी मनात घर केलं ते कायमचं.
लडाखच्या
पहिल्या सफरीत ‘आत्माराम परब’ हे अजब रसायन अनुभवलं. आत्माराम परब वरून ‘आत्मा’
असा प्रवास झाला. आणि मग प्रत्येक वर्षी लडाखवारी व्हायला लागली. लडाखची वाट खडतर
आहे, अनेकदा ती अडते पण आत्मा असला की अडथळे दूर होतात (केले जातात), सगळ सुगम
होऊन जातं. पण एकदा मात्र त्याला अपवाद झाला. लडाखला ढगफुटी झाली आणि अख्खं खोरं
आणि तिथले आधीच कठिण असलेले रस्ते उध्वस्त झाले. आत्मा केनियाच्या टूरवर होता.
तिथून मुंबईला येऊन थेट विमानतळावरून तो लेहला निघाला. ‘ईशा टुर्स’च्या पर्यटकांनी
अल्पावधीत जमवलेली पुंजी घेऊन आत्मा ढगफुटीनंतरच्या तिसर्या दिवशी लेहला जावून पोहोचला. तिथले ओळखीचे
ड्रायव्हर, सखे-सोबती, मित्र यांच्या घरी जाऊन मदतीचा हात पुढे केला. अशा अवस्थेत
माणसाला मदत आणि पाठीवर धीराचा हात या दोहोंची गरज असते. आत्माने ती मदत केली.
लडाखशी असलेलं बंधुत्वाचं नातं आणखी दृढ झालं.
आता
लडाखला ‘ईशा टुर्स’च्या दिड-दोनशे पर्यटकांच्या सहली हे नेहमीचंच झालं आहे. एवढ्या
मोठ्या गोतावळ्यात आत्माचा मदत करण्याचा मुळ स्वभाव मात्र कायम आहे. आता ‘लडाख
बुद्धीस्ट असोशिएशन’ तर्फे चालवल्या जाणार्या शाळेतील ३५ वंचीत मुलांचं पालकत्व
‘ईशा टुर्स’ने घेतलं आहे.
जेव्हा
जशी ताकद होती तशी त्या माध्यमातून तन-मन-धन या तिन्हींचा वापर करून आत्माचा
लडाखचा प्रवास सुरूच आहे. जग पादाक्रांत करीत असताना त्याचं लक्ष लडाखवर असतंच
असतं. तिथे गेल्यावर मात्र लडाखचा आसमंत कसाही असला तरी याच्या प्रतिभेचं इंद्रधनू
सप्तरंगांची उधळण करीत असतं. जगण्यातला आनंद शतगुणीत करीत रहातं.