18 March, 2017

कच्छचं आखात


लायारी नदीचं पात्र
लडाखचे उघडे पर्वत, किंवा कच्छसारखा वैराण प्रदेश यामध्ये काय पहायचं असा प्रश्न ते न पाहिलेल्या माणसांना नेहमीच पडतो. आता काय पहायचं असा प्रश्न पडला तर तो फक्त उपस्थित करून न थांबता जर त्या प्रदेशात गेलं तर किती म्हणून पहायचं असा प्रश्न पडू शकतो. ग्रेटर रण ऑफ कच्छ किंवा कच्छच्या आखातात जाऊन असाच प्रश्न मला पडला. मात्र अशा ठिकाणी जाताना माहितगार व्यक्ती किंवा संस्थेचा हात धरून गेलं तर थोडक्या वेळात खुप काही पहाता येतं. नुकताच मी ‘ईशा टुर्ससोबत कच्छ्ला जाऊन आलो. दोन रात्री तीन दिवस आम्ही सारखे हिंडत होतो. पण हे एक ट्रेलर होतं. कच्छला खुप काही पहाण्यासारखं आहे. 

नंदी रॉक

आत्माराम परब या माझ्या मित्राला माणसं आणि स्थळं (मला ठिकाणं म्हणायचं आहे) वश आहेत. जुगल तिवारी हे त्याचं आणखी एक उदाहरण आहे, हा माणूस बरोबर असला की कच्छच्या वैराण प्रदेशाचं नंदनवन होवून जातं. या धरातलावर असलेली प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण त्याचं सौदर्य पाहाण्याची दृष्टी पाहिजे किंवा ती सुंदरता विषद करून सांगणारी व्यक्ती तरी पाहिजे. जुगल तीवारी या माणसाजवळ या दोन्ही गोष्टी आहेत. आत्माराममुळे जुगल तिवारीची भेट झाली आणि जुगल तिवारी भेटल्याने कच्छ त्याच्या नजरेने पहाता आलं. 

कच्छ म्हणजे एरवी खुरटी झुडुपं आणि क्षितीजापर्यंत पसरलेला वैराण प्रदेश, प्रथम दर्शनी कुणालाही असंच वाटावं अशी स्थिती आहे. पण जुगल तिवारी भेटतात आणि मग पट उलगडत जातो. ऑरगॅनिक सेंटरवर चवदार रसपान केल्यावर चादुवा रिझर्व फॉरेस्ट या तिथल्या राजाच्या खाजगी जंगलाला आपण भेट देतो. एरवी उजाड असलेल्या या प्रदेशात हे जंगल म्हणजे ओयासीस वाटावं. तिथल्या राजाने निर्माण केलेल्या या जंगलात जुगल तिवारीनी झाडं लाऊन आपला वाटा उचलला आहे. दाट झाडी असलेल्या या जंगलात पक्षांना हक्काची जागा मिळाली असून या ठिकाणी पाण्याने भरलेला तलावही आहे. तिथून निघाल्यावर वाटेतच मगरींच साम्राज्य असलेला एक छोटा तलाव आहे, इथेही पक्षी आणि कासव पहायला मिळतात. 


पुढचा पडाव असतो बनी ग्रासलॅन्ड आणि नंदी रॉक. सभोवती क्षितीजापर्यंत नजर जाईल तिकडे पसलेलं हे ३,८४७ स्वे.कि.मी. एवढा पसारा असलेलं ग्रासलॅन्ड म्हणजे न संपणारा प्रवास वाटतो. जिकडे जाव तिकडे मध्यभागी आपण आहोत आणि सगळीकडे हा सपाट भूभाग आहे असाच भास होत रहातो. अपवाद आहे तो लाखो वर्षांपुर्वी लाव्हारसाच्या उद्रेकाने तयार झालेला काळा डोंगर. याच डोंगरावर आजही जीवाश्म (Fossils) सापडतात. लाव्हामुळॆ करपून गेलेले दगड, नंदी रॉक आणि तो काळा डोंगर सगळंच आपल्याला आदीम काळात घेऊन जातं. मग  उन्हं कलायला लागली की गाड्या चारी दंड लेक जवळ वळतात. या लेकवर अनेक पक्षी आपली वाट पहात असतात. पेलिकन्स, घुबड, ईगल, रातवा, टिटवी असे अनेक पक्षी सहज दिसतात आणि दुरवर बसलेले बाकी पक्षी दाखवण्यासाठी जुगल तिवारींची धडपड चाललेली असते. मावळतीला चाललेल्या सुर्याची किरणं आणि नंतर पसरणारी लाली त्या विस्तीर्ण तलावाच्या पाण्यावर पसरलेली असतात आणि सुर्यास्तानंतर परतणार्‍या कॉमन क्रेंसचे  थवे पहाण्यासाठी आपण तिथेच ठाण मांडून बसलेले असतो. 

दुसर्‍या दिवशी सुर्योदयापूर्वी लायारी या मृत नदीच्या पात्रात जायचं आहे अशी सुचना जुगल तिवारी देतात तेव्हाच आता तिथे काय असणार असं कुतूहल वाटायला लागतं. डिस्कव्हरी चानेलवरच्या अनेक चित्रफिती ज्यात जुगल तिवारींचा सहभाग आहे त्या दाखवण्याचा प्रयत्न ते करत असतानाच, त्यांच्याजवळ असलेला जीवाश्मांचा खजीना आपल्याला खुणावत असतो. जुगल तिवारींनी जमवलेला हा जीवाश्मांचा खजीना अमुल्य असाच आहे. तिथे गेल्यावर तो पाहण्याचा जरूर लाभ उठवलाच पाहिजे. 

पहाटे उठून लायारी या मृत नदीच्या पात्रात सर्वांना न्यायला जुगल तिवारी सज्ज असतात. वेळ जाऊ नये म्हणून त्यांनी निघतानाच नाष्टाही सोबत घेतलेला असतो. साधारण अर्ध्यातासाच्या प्रवासानंतर त्या पात्रातच गाड्या उभ्या रहातत. क्षितिजावर तांबडं फुटलेलं असतं. अजून सुर्यबिंब वर यायला वेळ असतो. झपझप पावलं टाकत आपण जुगल तिवारींच्या मागोमाग पात्रातील मोक्याच्या ठिकाणी जायला निघतो. पहिल्या किरणात दिसणारं नदीचं पात्र आणि खडकांची सुंदरता जुगल तिवारीच्या CEDO होमस्टेमध्ये आलेल्या प्रत्येकाला दिसावी अशी त्यांचे मनापासूनची इच्छा असते. सुर्य बिंब वर येतं आणि मग तासभर ते नदीच पात्र किती बघू आणि कॅमेर्‍याने किती टिपू असं होवून जातं. तासा दिडतासाच्या भ्रमंतीनंतर गाड्यांच्या बॉनेटवरचा नाष्टा हे सरप्राईज असतं.








लायारी नदीच्या पात्राचं गारूड मनावर स्वार झालं असतानाच आपण निरोना आर्टीसन व्हिलेज मध्ये पोहोचतो. लाखेचा वापर करून खेळणी, फर्निचर, लाटणी आदी वस्तू कशा रंगवल्या जातात त्याचं प्रात्यक्षीक पहायला मिळतं. दुसरीकडे वेगवेगळ्या आकाराच्या नादमधूर घंटा बनवणारा कलाकार आपली हातोटी दाखवतो आणि या सगळ्याच्या परमोच्य बिंदू असतो तो म्हणजे रोगन आर्ट. एरंडाच्या तेलातील रंगाने थेट कपड्यावर केलेली कलाकुसर म्हणजे रोगन आर्ट. ही कला जोपासलेले फक्त दोनच कलाकार आपल्या देशात आहेत त्यातला एक आपल्यासमोर हजर असतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना त्यांच्या भारत भेटीच्या वेळी हीच कलाकृती भेट म्हणून दिली होती.  

संध्याकाळच्या कलत्या उन्हात व्हाईट रण पहाण्यात काही औरच मजा असते. जर आपण जाऊ तेव्हा रण उत्सव चालू असेल तर त्याचीही मजा घेता येते. इथेही नजर जाईल तिकडे शुभ्र मिठाने आच्छादलेली हजरो एकर जमीन पहायला मिळते आणि त्यावरून चालताना येणारा कुरूकुरू आवाज मनात मुरत जातो. 

रोगन आर्ट
मोडवा बिच वरचे हजारो फ्लेमिंगो, मांडवी बंदर, तिथला बोटींच्या प्रतिकृती बनवण्याचा कारखाना, हम दिल दे चुके सनम सारखे चित्रपट जिथे चित्रीत झाले तो विजय विलास पॅलेस, सृजन हे हस्तकलांचं कायमस्वरूपी भव्य प्रदर्शन आणि विक्री केंद्र, शामजी कृष्ण वर्मा स्मारक अशी अनेक महत्वाची ठिकाणं पहात पहाता भुज शहरात आपण येऊन पोहोचतो. 

विजय विलास पॅलेस 
व्हाईट रण



सृजन हस्तकला केंद्र
तीन दिवसाच्या अथक भ्रमंतीत कच्छचं एक आगळं रुप मनात साठऊन आपण त्याचा निरोप घेतो, पण ‘अभी कुछ नही देखा’ अशीच भावना मनात घर करून रहाते, पुन्हा एकदा आधिक दिवसांसाठी कच्छला गेलं पाहिजे असं वाटत रहातं. 

नरेंद्र प्रभू




             

                                                                        

                                                    

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates