‘ईशान्य वार्ता’ जानेवारी १७ च्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख
‘ईशान्य वार्ता’चा दिवाळी अंक नागालॅन्डचे राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ आचार्य यांना भेट
देताना आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू
|
या वेळचा पुर्वांचलच्या
आसाम, मेघालय आणि नागालॅन्डचा दौरा खासच होता. नागालॅन्डमध्ये साजरा होणारा ‘हॉर्नबील
फेस्टीव्हल’ हे प्रमूख आकर्षण होतं. नागालॅन्डची राजधानी कोहीमापासून १२ कि.मी.वर
असलेल्या किसामा गावात डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार्या या
महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला नागालॅन्डचे राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ आचार्य
यांचे पाहुणे म्हणून आम्ही उपस्थित होतो. नागालॅन्डच्या १७ जनजातींच्या नृत्याचे
रंगारंग अविष्कार पाहताना भान हरपून गेलं. या कार्यक्रमाला शेजारील आसाम राज्याचे
नवनिर्वाचीत मुख्यमंत्री मा. श्री. सर्वानंद सोनोवालही त्यांच्या राज्यातील बिहू
सारखे अनेक नृत्य प्रकार सादर करणारं कला पथक घेऊन उपस्थित होते. नागालॅन्ड आणि
आसाम या राज्यातील जनता विधायक कामाकरीता एकत्र येऊ शकते हे दर्शवणारी ही घटना गत
काळातील अनेक जखमांवर नक्कीच फुंकर घालणारी होती.
हॉर्नबील फेस्टीव्हल |
‘हॉर्नबील
फेस्टीव्हल’ या शासकीय कार्यक्रमाची सुरूवात उंगमा गावचे गुरूं (Guru Sangyusang
Pongener of Ungma Village) यांनी पारंपारीक आशिर्वादाने केली तर रेव्ह. मोअ
लोंगचारी या बाप्तीस चर्चच्या धर्मगुरूंनी धार्मिक प्रार्थना म्हटली. या नंतर तो
कार्यक्रम खर्या अर्थाने शासकिय स्वरूपात सुरू झाला. नागालॅन्डचे मुख्यमंत्री
टि.आर. झेलियांग यानी उद्घाटनपर भाषण केलं. इतर ठिकाणी अशा शासकिय कार्यक्रमाची
सुरूवात यजमानाच्या भाषणाने झाली असती. इथल्या कार्यक्रमाचं हे एक वैशीष्ट्य
म्हणता येईल. या एकाच गोष्टीवरून या उत्तर-पुर्वेकडच्या राज्यातील सामाजिक जाणिवा
आणि समाजमनावर जमात आणि धर्माचा पगडा किती घट्ट आहे याची प्रचिती आली. असं असलं
तरी शासकिय कार्यक्रमात असलेला त्यांचा सहभाग, शेजारील राज्याशी होऊ घातलेलं
सौहाद्रपुर्ण सहचर्य आणि भारताशी भारतीय म्हणून निर्माण होणारी आपुलकीची भावना या
गोष्टी खुप महत्वाच्या होत्या.
नागालॅन्डचे राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ आचार्य यांना अभिवादन करताना ईशा टूर्सचे संचालक
श्री. आत्माराम परब. |
मुख्य भूमीपेक्षा
साधारण दिड तास आधीच होणारा सुर्यास्त जसा काळोखाचं साम्राज्य घेऊन येतो तशी तिथली
वाहतूक मंदावत जाते आणि बाजारपेठाही बंद होतात, मात्र ‘हॉर्नबील फेस्टीव्हल’चे
दिवस याला अपवाद होते. कोहिमाच्या बाजारात रात्रीच्या वेळी रस्त्यावर साजरा होणारा
कार्निव्हल माहिमच्या जत्रेची आठवण करून देत होता. अनेक खाद्य पदार्थ, रंगी-बेरंगी
वस्त्र प्रावरणं, इलेक्ट्रॉनीक सामान, मास्क अशा गोष्टींनी रस्ता भरला होता.
भितीचं नामोनिशाण नसलेल्या या गर्दीत आम्हीही सामिल झालो होतो. कोहिमामधली गर्दी
भारतातल्या कुठल्याही खुशालचेंडू शहरासारखीच भासत होती, पण हाही एक ‘इंडीया’ होता.
दिमापूर, कोहीमा सारखी शहरं सोडली तर इतर भाग म्हणजे जिथे विकासाचा सुर्य अजून
उगवायचा आहे अशी खेडी होत. तिथे त्या खर्या भारतात आजही विकासाची गंगा पोहोचलेली
नाही. हॉर्नबील फेस्टीव्हलमध्येच भेटलेल्या सातार्याच्या डॉ. पाटील हेच सांगत
होत्या. नागालॅन्डचे लोकाभिमूख राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ आचार्य यांनी तिथे कार्यभार
सांभाळल्या दिवसापासून महाराष्ट्रातील जनता आणि नागालॅन्डमध्ये सामाजिक कार्याचा
एक पुल बांधायला सुरूवात केली आहे. डॉ. पाटील आणि त्यांच्या सोबत महाराष्ट्रामधून
गेलेले ४५ डॉक्टर आठ दिवस नागालॅन्ड मधल्या ११ जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन
वैद्यकिय सेवा देत होते. हॉर्नबील फेस्टीव्हलचा उद्घाटनाचा दिवस हा त्यांच्यासाठी
तिथला समारोपाचा दिवस होता.
गेल्या आठ दिवसात
महाराष्ट्रामधून आलेल्या डॉक्टरनी किती मोलाची सेवा केली त्याचं वर्णन महामहीम
राज्यपाल राजभवनावर त्यांची भेट घेतली तेव्हा आम्हाला विशद करून सांगत होते. या
डॉक्टरनी जरी गाडी किंवा जीपमधून प्रवास केला असला तरी तो घोड्यावरून केल्यासारखा
कठीण होता. जिथे रस्ते म्हणजे एक पायवाटच आहे, तिथल्या जनतेने अजून पक्के रस्ते
पाहिले नाहीत, जिथे प्रथमोपचाराचीही सोय नाही अशा नागालॅन्डच्या दुर्गम खेड्यात
जावून डॉक्टरनी जी सेवा दिली तशी सेवा प्रत्येकानी यथाशक्ती दिली पाहिजे म्हणजे
तिथले लोक आपसूकच भारताशी बांधले जातील असं राज्यपालांचं म्हणणं होतं. शिक्षक,
व्यापारी, कारखानदार, व्यावसायीक अशा अनेक थरामधील भारताच्या मुख्यभूमीवरील
व्यक्ती हे कार्य करू शकते आणि त्याने ते करावं असं राज्यपाल मा. श्री. पद्मनाभ
आचार्य यांचं म्हणणं होतं. इथल्या लोकांना भिक नको, त्याना बरोबरीची आणि सन्मानाची
वागणूक हवी आहे. ‘त्याना आपलं म्हणा’ हीच काळाची गरज आहे. पुर्वांचलाची मागणी आहे.
आम्हाला ते म्हणणं मनोमन पटलं होतं, अंतरमूख होवून आम्ही राजभवनाचा निरोप घेतला.
राजभवन भेटीच्या
सुखद आठवणी मनात रेंगाळत असताना दुसर्याच दिवशी आसाममध्ये एक बाका प्रसंग उभा
राहिला आणि भर दुपारी आम्ही गारठून गेलो होतो. नेमकं त्या वेळी राज्यपालांचं ते
म्हणणं आठवून, राजभवनाच्या उबदार वातावरणात हे बोलायला ठिक आहे पण इथली जनता त्या
लायकीची आहे काय? असा टोकाचा विचार मी करू
लागलो. त्याचं झालं असं: काझीरंगा राष्ट्रीय
उद्यानात जीप सफारीचा आनंद लुटण्यासाठी आम्ही आमच्या आरामदायी रिसॉर्ट मधून निघालो
होतो. गावातल्या कच्च्या रस्त्यावरून आमच्या गृपच्या दोन गाड्यांपैकी एक गाडी पुढे
निघून गेली होती. मागावून निघालेल्या दुसर्या गाडीच्या पुढच्या सिटवर बसून मी
निसर्ग सौदर्याचा आनंद घेत होतो. समोर रस्त्याच्या मधोमध बकरीची दोन कोकरं पहूडली
होती. चालकाने मोठमोठ्याने हॉर्न वाजवूनही ती हलायला तयार नव्हती. खाली उतरून
त्याना बाजूला करू का? अशा प्रश्नाला चालकाने नकारार्थी मान हलवली. बाजूलाच
चार-पाच आदिवासी मुलं खेळत होती. त्यांच्याशी आसामी भाषेत बोलून चालकाने त्या कोकरांना
बाजूला करायला सांगितलं, पण काय झालं कोण जाणे, त्या मुलांनी जोरजोरात हाका मारून
गाव जमा केला. दहा-बारा लोकुरवाळ्या बाया, आणखीन
मुलं, बापे असे पंचवीस-तीस लोक अचानक गाडी समोर येवून भांडू लागले.
हॉटेलवाल्याचा उद्धार सुरू झाला. त्या कोकरापैकी एकाच्या पायाला जखम झाली होती. ती
आमच्या गाडीमुळे झाली असून भरपायी दिल्याशिवाय गाडी जावू देणार नाही असं त्यांचं
म्हणणं होतं. त्या कोकरांपासून किमान दहा फुटांवर आमची गाडी उभी होती आणि एवढ्या अंतरावरून
त्याना जखम होणं अशक्य होतं. आमचा चालक तेच पुन्हापुन्हा सांगत होता, चालकाने
समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. मी समजावू का म्हणून विचारलं तर चालक नको
म्हणाला. मी पुढच्या गाडीत फोन करून सदर घटना सांगितली. तडजोडीचे प्रयत्न करूनही
काही मार्ग निघेना. जीप सफारीची वेळ निघून चालली होती. गाडीतली मंडळी वैतागली,
रक्त सळसळू लागलं. “ही आदिवासी मंडळी असाच कांगावा करतात, जखमी कोकरू मुद्दामहून
भर रस्त्यात ठेवून पैसे वसूल करण्याची ही पद्धत आहे. अशा गोष्टींना आम्ही का बळी
पडायचं.” असं तावातावाने बोललं जात होतं. चालकाचा सय्यम सुटला आणि त्याने गाडी
सुरू केली आणि गर्दी मधून पुढे न्यायला सुरूवात केली. तेव्हढ्यात एक इसम भला मोठा
बांबू घेऊन गाडीची काच फोडायला पुढे सरसावला. चालकाने नमतं घेतलं. आम्ही हताश
होवून बसलो असतानाच पुढे निघून गेलेली गाडी माघारी आली. त्या गाडीचा चालक खाली
उतरला बाचाबाची सुरू झाली. त्याने आपली गाडी तिथे ठेवून आमची गाडी पुढे पाठवली.
थोड्यावेळाने ती गाडीही जीप सफारीसाठी गेटवर आली आणि मी निश्वास सोडला.
जीप सफारीत काझीरंगा ज्याच्यासाठी ओळखलं जातं तो एक शिंगी गेंडा
अगदी जवळून दिसत असतानाही मला ती कोकरं सारखी डोळ्यापुढे येत होती. हे लोक असं का
वागतात? पर्यटकांना घेऊन एवढ्या दुरवर यायचं आणि असा अनुभव आल्यावर याना मदत तर
सोडाच, पण इथे कोण कशाला येईल? कालची
राज्यपालांची भेट झाल्याला अजून चौवीस तासही झाले नव्हते. त्यांना आमचं दु:ख कसं
कळणार......? सुर्य मावळतीला गेला आणि एक काळा अध्याय संपला म्हणून मी हॉटेल
मधल्या खोलीत गेलो. मित्र कौस्तूभ पुढच्या गाडीत होता. त्याच्याजवळ खंत व्यक्त
करीत असताना त्याने सांगितलेल्या गोष्टीने मी माझे डोळे उघडले, सुर्यास्तानंतर
प्रकाश पडला. मी समजत होते त्याहून गोष्ट अगदी उलटी होती. माझ्या गाडी आधी पुढे
गेलेल्या आमच्याच गृपच्या गाडीच्या मागच्या चाकानेच त्या कोकराला जखमी केलं होतं.
त्या आदिवासिंचं म्हणणं रास्त होतं. मागाहून आमची गाडी नसती तर त्याना कसलीच
नुकसान भरपायी मिळाली नसती. पुढे गेलेली गाडी आमची नसती तर फार मोठा गैरसमज घेऊन
आम्ही पुर्वांचल सोडलं असतं.
प्रत्येक गोष्टीला
दुसरी बाजू असते. ती समजली नाही तर गैरसमज हा ठरलेला. पुर्वांचलाबाबत एक अढी मनात
कायमची घर करून राहीली असती. बकरीची कोकरं बोलणार नाहीत, संवाद आपणच साधायला हवा.
नरेंद्र प्रभू
सांताकृझ, मुंबई
No comments:
Post a Comment