
रत्नागिरी रेल्वे
स्थानकातून निघाल्यावर रत्नागिरी शहर मागे सोडल्यावरच कोकणातील सुंदर गावांमधून
आणि कातळावरून आपला प्रवास सुरू होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कधी आमरायी तर
कधी माडा-पोफळीची बनं लागतात आणि पलिकडच्या समुद्रावरून येणार्या वार्याबरोबर
ही झाडं झुलत असतात. वार्याबरोबर येणारा मातीचा सुगंध तर कधी मोहराचा हवाह्वासा
वाटणारा गंध मन प्रफुल्लीत करतात. या वातावरणाचा आनंद लुटत असतानाच आरे आणि वारी ही गावं लागतात. आपला प्रवास सागर किनार्याला
लागून असलेल्या डोंगरावरून सुरू असतो आणि ही गावं आली की सागर किनार्यांचं जे
दर्शन घडतं ते खरोखराच देव दुर्लभ असं आहे. अगदी रस्त्यावर गाडी थांबऊन त्याचा
आनंद घेता येतो. गणपतीपुळ्याला पोहोचायच्या आतच मस्त मुड येतो. गणपतीपुळं जसं जवळ
येतं तशी अनेक होम-स्टे, लॉजचे बोर्ड दिसायला लागतात, पुढे ही संख्या वाढतच
जाते.
गणपतीपुळ्याला घेऊन
आलेला रस्ता किनार्याजवळच संपतो आणि तिथेच गणेश मंदीराकडे घेऊन जाणार्या
वाटेवरची कमान लागते. स्वयंभू गणेशाचं दर्शन घेऊन समोरच असलेल्या विस्तीर्ण किनार्यावर
पाय ठेवताच सगळा थकवा निघून जातो. अफाट सागराचं हे दर्शनही मन मोहून टाकतं.
मंदीराला लागून असलेल्या टेकडीला प्रदक्षीणा घालता येईल अशी दगडांनी बांधलेली
पाखाडी (पाय वाट) आहे. साधारण एक कि.मी. असलेल्या या वाटेवर पहाटेच्या वेळेस गेलं
तर पांढर्या देव चाफ्यांच्या फुलांचा सडा किंवा केतकीचा सुगंध यांचा आनंद घेता येईल.
देवळापासून एक
कि.मी. वर असलेल्या ‘प्राचिन कोकण’ला भेट द्यायला हरकत नाही. ५०० वर्षांपुर्वीचं
कोकण आणि तिथे अस्तित्वात असलेली बारा बलुतेदार पद्धत कशी होती, गावचे व्यवहार कसे
चालत याचे काही देखावे या ठिकाणी
साकारण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे एका
टेकडीवर असलेल्या या परीसराची माहिती देणारे गाईड इथे आहेत. शेवटी असलेलं
शंख-शिपल्यांचं प्रदर्शन पहाण्यासारखं आहे.
गणपतीपुळ्यापासून दोन
किमीवर असलेल्या मालगुंडला मुद्दाम भेट दिली पाहिजे ती तिथल्या कवी केशवसुतांच्या
स्मारकात जाण्यासाठी. प्राचिन कोकणमध्ये कवी माधवांची ‘हिरवे तळ कोकण’ या कवितेचं
काव्य शिल्प पहायला मिळतं तर इथे मालगुंडमध्ये केशवसुतांच्या अनेक कविता वाचायला
मिळतात.
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजला आणुनी
ही कविता बालभारती
बरोबरच शाळेत घेऊन जाते आणि त्याच कवितेतल्या शेवटच्या कडव्यातील
पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!
या ओळी गेल्या
शंभर-सव्वाशे वर्षापासून आजपर्यंत समाजाची स्थिती आणि मागणी फारशी बदलली नसल्याची
जाणीव करून देतात.
गणपतीपुळ्याच्या
समुद्र किनार्यावर जर कधी फार गर्दी असेल तर इथे मालगुंडमध्ये असलेल्या
सागरकिनारी आपण विरंगुळ्याचे क्षण नक्कीच शोधू शकतो.
बाकी या गावांच्या कुठल्याही वाटेवर चालत फेरफटका मारला तर अनेक पक्षी आणि देखणी कुरणं पहात आनंदात भर टाकता येते. क्षुदाशांतीसाठी रस्त्याच्या लगत असलेल्या हॉटेलमध्ये चवदार पदार्थ मिळतात. अनेक खानावळी आहेत आणि रहाण्याच्या सोई बर्याच आहेत.
No comments:
Post a Comment