24 August, 2018

निसर्ग मित्र



एक दिवसाची सहल, निसर्ग पर्यटन, उत्तम जेवण-खाणं आणि निसर्गाबद्दलचं कुतूहल क्षमवणारं ज्ञान हे सगळं एकत्र अनुभवायचं असेल तर निसर्ग मित्र, व्दारा राजेंद्र भट, बेंडशिळ, बदलापूर पुर्व इथे गेलं पाहिजे. आम्ही नुकतेच त्या ठिकाणी जाऊन आलो. चहा, नाष्टा, जेवण यावर ताव मारला आणि मुख्य म्हणजे श्री. राजेंद्र भट आणि सौ. भट यांच्या सहवासात एक दिवस आनंदात गेला.

कृषीतज्ज्ञ श्री.राजेंद्र भट

१९९० साली बेंडशिळच्या उजाड माळावर  राजेंद्र भट या शहरी माणसाने थोडी जमीन खरेदी केली. उघड्या बोडक्या जागेवर अनेक प्रयोग करीत शेतीला सुरूवात केली. निसर्गाकडून घेताना त्याचं धन पुन्हा त्यालाच परत करत एक आदर्श निर्माण केला. सेंद्रीय शेती म्हणण्यापेक्षा निसर्ग शेती केली आणि निसर्गाकडून घेताना त्यालाही भरभरून परत केलं.

रासायनिक खतं, औषधं सोडाच पण जमिन न नांगरताही  शेती करता येते याचं प्रात्यक्षीक पहायचं असेल तर निसर्ग मित्रला भेट दिलीच पाहिजे. गांडूळ, बेडूक, किटक, पक्षी हे शेतकर्‍याचे (पर्यायाने मानवाचे)  मित्रच आहेत असं नव्हे तर ते सतत काम करणारे कामगारही आहेत. जीवनाची ही साखळी कसं काम करते ते इथे अभ्यासता येतं.

अनेक कृषी पर्यटन केंद्रांमधून मनोरंजन हाच मुख्य उद्देश्य असतो पण इथे मात्र कृषी विशयक ज्ञानाचा लाभ होतो.  प्रत्यक्ष शेती, विविध पिकं, पळझाडं, फुलझाडं यांचं दर्शन घ्यायचं असेल तर इथे जाण्याला पर्याय नाही.

कृषीतज्ज्ञ  राजेंद्र भट यांनी पाच एकरात बहुपीक पद्धतीने बहारदार शेती केली आहे.  भात, आंबा, नारळ या बरोबर कोको, कॅफी, काळी मिरी, मसाल्याची झाडं, नागवेल, हळद, सुरण   हे तर दिसतच पण ड्रागन फ्रुटचं झाड आणि त्याला लागलेली फळं पाहून मन तृप्त होतं. पर्यावरणाचा होणारा र्‍हास हा आजचा कळीचा मुद्दा आहे. नुकताच केरळ राज्यात आलेला महापूर हे त्याचं जितं जागतं उदाहरण आहे. नैसर्गिक स्त्रोतांचा वेगाने होणारा विनाश आपल्या परीने थांबवायचा असेल तर काय करता येईल याचं  उत्तर  शोधण्यासाठीही इथे जाता येईल.
                                    
या भूमीने मानवाला दान द्यावे
पाहिजे तितूकेच त्याला ते मिळावे
या करांनी या भूईला दान द्यावे  
आणि मातीतून पुन्हा ते रुजावे

निसर्ग मित्र
व्दारा राजेंद्र भट, बेंडशिळ, बदलापूर पूर्व
9324601272


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates