मनाला मरगळ
आली की उठावं आणि सह्याद्रीच्या रांगा धुंडाळाव्यात,ती
मरगळ तर दूर होतेच,
पण नव्या उर्जेने,
नव्या उत्साहाने मन भरून जातं. परवा राजमाचीला
जाऊन आलो आणि पुन्हा तो प्रत्यय आला. मुळात एका रात्रीचा मुक्काम राजमाचीवर करायचा
बेत होता पण शेवटी कार्यक्रम ठरला तो एका दिवसाचा. असो,
पण उत्साहच एवढा होता की एकच दिवस का असेना,
जाऊयाच म्हणून निघालो.
प्रिय
मित्र अतुल बरोबर घाटकोपर-पनवेल-चौक-कोंढाणे करत मुंढेवाडीपर्यंत पोचलो. सकाळचे
साडेनऊ वाजले होते. मग आम्ही मुंडेवाडीतला हेमंत मुंढे हा नववीतला मुलगा वाटाड्या
म्हणून सोबत घेतला आणि राजमाचीची वाट चढायला सुरूवात केली. आमच्या नव्या मित्राला अंतर आणि वेळेचा
अंदाज सारखासा नव्हताच. पण मुलगा चांगला होता. राजमाचीची दमछाक करणारा चढाव आणि
वाढती उन्हं यामुळे चांगलाच घाम निघत होता. दमून थांबल्यावर हेमंतला विचारलं तर
आता थोडंच अंतर आहे म्हणायचा. जसजसे वर वर चढत होतो तसतसा रम्य देखावा दिसू लागला.
हा देखावा पायी चालण्याचे श्रम जाणऊ देत नव्हाता.
खंडाळा घाटातून रेल्वेने जाताना किंवा लोणावळय़ाजवळच्या राजमाची पॉइंटवर आलं, की जंगलझाडीतला हा गड आणि त्याची ती जुळी शिखरं श्रीवर्धन-मनरंजन नेहमीच लक्ष वेधून घेतात.
कर्जतहून सहाआसनी रिक्षाने कोंदिवडे इथे
आल्यावर पुढे
खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट आहे.
ही उभी वाट खडतर
आहे. या वाटेने उधेवाडीत म्हणजे
राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचण्यास सुमारे ३.५ तास लागतात. हे
अंतर सुमारे आठ किलोमीटर
आहे.
उधेवाडी ही कोळी लोकांची २०-२२ घरांची वाडी आहे. लोणावळ्याहून राजमाचीवर यायचं
असल्यास लोणावळा,
तुंगार्ली गाव, धरण, ठाकुरवाडी मार्गे तब्बल १६ किलोमीटरची पायपीट करावी लागते. यापैकी कुठल्याही मार्गे आलं तरी अंगावर येणारी दीड-दोन हजार फुटांची सरळ चढण चढावीच लागते.
साग, ऐन, आंबा, जांभूळ, बेहडा, सावर, बहावा, पळस, पांगारा, कुडा, कुंभा, उंबर, वाघाटी, पळसवेल, करवंद-बांबूची जाळी आणि अशाच किती वृक्षवेली मात्र
आपली साथ करायला असतात. शिवाय नानातऱ्हेचे पशुपक्षी, कीटक, फुलपाखरंही साथ सोडत नाहीत.
निसर्गाचा आनंद लुटत वाट चालत रहायचं.
शिरावरचा राजमाची किल्ला खुणवत होता. जवळ
गेल्यावर ते दोन बालेकिल्ले खुणावत होते एक श्रीवर्धन आणि दुसरा मनरंजन. दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला.
समुद्र
सपाटीपासून २७५० फुटांवर असलेला हा किल्ला- राजमाची, बोरघाटातून
जाणार्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठीच या गडाची निर्मिती झाली असावी.
तो
काळ बहुधा सातवाहनांचा म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीचा! यानंतर राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, मुस्लिम सत्ताही या गडावर नांदून गेल्या. कल्याणच्या १६५७ च्या स्वारीनंतर त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर असे
किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. छत्रपती शिवाजी महाराजही एकदोनदा गडावर आल्याचे उल्लेख आहेत. पुढे संभाजी महाराज असेपर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाच्या सेनापतीने राजमाचीच्या किल्लेदारास वश करून हा गड जिंकला पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठ्यांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फडकवला. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रेच्या ताब्यात हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटापर्यंत पोहचला होता.
त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले, मात्र पेशव्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. आता
भारत सरकारने या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हा किल्ला पाहण्यासाठी किमान दोन दिवस वेळ काढणे गरजेचे आहे. किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या उधेवाडी गावात राहण्या-खाण्याची उत्तम सोय होते.
उढेवाडीतूनच डोक्यावरच्या श्रीवर्धन-मनरंजन बालेकिल्ल्यांकडे वाट निघते. कडय़ात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, अर्धवट लेणी यांचे दर्शन
देत ही
वाट दोन बालेकिल्ल्यांच्या मधल्या खिंडीत येऊन थांबते. या खिंडीत भैरवनाथाचे एक प्रशस्त मंदिर आहे. गडावरील मुक्कामासाठी वाडीशिवाय हाही एक पर्याय आहे. मंदिरात भैरव आणि जोगेश्वरीच्या मूर्ती आहेत. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी वेगवेगळय़ा काळात त्या अर्पण केलेल्या. मंदिरासमोर गडावरील तोफा ठेवलेल्या आहेत. याशिवाय दीपमाळ, भोवतीने काही कोरीव शिल्पंदेखील आहेत. यातील गजान्तलक्ष्मीचे शिल्प पाहण्यासारखे आहे.
श्रीवर्धन हा बालेकिल्ला
मनरंजंपेक्षा उंचीने
थोडा जास्त आहे. यावर जाण्यासाठी खडकातच पायऱ्यांचा मार्ग खोदलेला आहे. गोमुखी पद्धतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच दोन्ही बाजूंची देवडी थक्क करून सोडते. वळणावळणाच्या मार्गावरील प्रशस्त आकाराची, रेखीव खांबांवर उभी असलेली ही देवडी पूर्वी बहुमजली होती. पण आता तिचे छत पूर्ण कोसळले आहे. या दरवाजातून गडावर सरकावे तो डाव्या हाताला खडकात खोदलेली काही टाकी दिसतात. या टाक्यांच्या कडेलाच अंदाजे ८ फूट लांबीचा एक लोहस्तंभ पडलेला आहे. या टाकीजवळून निघालेली ही वाट पुढे एका शैलगृहाजवळ थांबते. या मूळच्या शैलगृहांची मध्ययुगात धान्याची कोठारे झाली. या शैलगृहाच्या दरवाजांवर गणेशपट्टी आणि कमळे कोरलेली आहेत. ही वाट पुढे श्रीवर्धनच्या शिखराकडे निघते. वाटेत आणखी काही उद्ध्वस्त बंधकामांचे
अवशेष, बुजलेल्या टाक्या, विष्णूचे एक छतविना छोटेसे मंदिर आणि गडाची सदर लागते. या साऱ्यांतून मार्ग काढत आपण गडाच्या सर्वोच्च अशा ढालकाठीच्या वा टेहळणीच्या बुरुजावर पोचतो.
या बुरुजावर आता नव्याने ध्वजस्तंभ उभारला आहे. या बुरुजावरून सारा राजमाची किल्ला आणि परिसर नजरेत येतो.
श्रीवर्धनची उत्तर बाजू म्हणजे या बालेकिल्ल्याची जणू एखादी माची आहे. या माचीच्या बुरुजांना दुहेरी तट घालून संरक्षित केले आहे. या दोन तटादरम्यान ये-जा करण्यासाठी भुयारी जिनेही आहेत. अशा बुरुजांना चिलखती बुरुज म्हटले जाते.
श्रीवर्धनच्या तुलनेत उंचीने कमी असलेल्या मनरंजनला सभोवार मजबूत तट घातला आहे. एकापाठोपाठ तीन दरवाजांतून मनरंजनमध्ये प्रवेश करावा लागतो. गडाच्या आत विस्तीर्ण पठार असून त्यामध्ये दोन मोठे तलाव, दारूगोळय़ाचे कोठार, किल्लेदाराच्या उद्ध्वस्त वाडय़ाचे अवशेष, सदर आदी वास्तू दिसतात. मनरंजनवरून पश्चिमेकडचा देखावा खूपच रमणीय दिसतो म्हणूनही या बालेकिल्ल्याला ‘मनरंजन’ म्हणतात, असेही सांगितले जाते.
राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. राजमाची किल्ल्यास कोंकणचा दरवाजा संबोधण्यात येत असे.
सभोवतालचा रमणीय परिसर, उल्हास नदीचं खोरं पाहाताना राजमाचीच्या एका बाजूस पवनमावळातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे. याला 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे.
झरझर नजर
फिरवत थोड्या धावपळीतच हा परीसर पाहून घेतला. सुर्य मावळतीला जायच्या आत पुन्हा कोंदिवडे गावाजवळ पोचायचं
होतं. सोळा सतरा किलोमीटरची पायपीटा करून दमायला झालं तरी दिवस सार्थकी लागल्याचं समाधान होतं. हे सगळं
शक्य झालं ते प्रिय मित्र अतूल मुळेच,
अतूल मस्त मजा आली. पुन्हा सवड काढून एका रात्रीच्या मुक्कामाला गेलंच पाहिजे.
पाहू कधी योग येतो ते.
No comments:
Post a Comment