‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ असं आपल्या तुकाराम महाराजानी सांगून ठेवलं आहे. हे प्रसन्न मन हे सिद्धीचं साधनही होवू शकतं.
मन गुरु आणि
शिष्य । करि आपुलेंचि दास्य ।
प्रसन्न आपआपणास
। गति अथवा अधोगती ।।
असं मन प्रसन्न करण्याचं एक कारण काल घडलं. प्रिय मित्र आत्माराम परब
यांनी वेबीनारची लिंक पाठवली आणि पावणे दोन तासांची एक मैफिल जमून गेली. श्री. विभास
जोशी (https://pragatileadership.com/team/vibhas-joshi) यांनी या वेबीनारची आखणी आणि सुत्र संचालन केलं होतं. अनेकदा
ऐकलेले मुद्दे पण या नेमक्या वेळी खुप छान आणि सुत्रबद्धरितीने त्यानी मांडले आणि मनातली
जळमटं दूर करून टाकली. त्यांचा कृतज्ञता (Gratitude) व्यक्त करणे हा मुद्दा खरच खूप भावला. महिन्याभराच्या बंदमधून
पुढल्या किती ते माहित नसलेल्या बंदकडे वाटचाल होत असताना स्थिरचित्त कसं रहावं आणि
का रहावं हे ते जाता जाता सांगून गेले. म्हणाले कितीतरी कारणं असतील ज्यासाठी आपण आभार
मानले पाहिजेत, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आत्माने अशा अनेक गोष्टीत मला
सहभागी करून घेतलं आहे खरंच मी त्याच्या प्रती कृतज्ञ आहे.
कशाबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे याची यादीच करायाला घेतली तर.... असा विचार केला
आणि कितीतरी गोष्टी नजरेसमोर येवू लागल्या. जिवाभावाची माणसं बरोबर आहेत, रहायला घर आहे, जेवण मिळतय, वेगवेगळे पदार्थ
करून बघता येत आहेत, विशेष म्हणजे प्रकृती उत्तम आहे, चावलेलं गिळता येतं, खाल्लेलं पचतय, पाय घरात असलेतरी ते चालताहेत, या लॉकडाऊनमधून
बाहेर पडून पुन्हा नक्की भभारी घेऊ अशी खात्री आहे, आपण एकमेकांना मोबाईलवर पाहू शकतो; बोलू शकतो, राहून गेलेलं वाचन पुर्ण करू शकतो, शोशलमिडीयाचा वापर करू शकतो, छंद जोपासता
येताहेत, याही परिस्थितीत हसू फुलवणारे मित्र आहेत, पक्षी आकाशात उडताहेत, जग थांबलेलं
नाही, आपल्या जिवावर उदार होवून डॉक्टर; परिचारीक, पोलिस, सफाई कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीवाले, दुधवाले, औषध दुकानदार इ. सगळे आपल्याला सेवा पुरवत आहेत, लहान मुलं निरागसपणे हसताहेत, मुख्य म्हणजे
आशा आणि जिद्द कायम आहे, देव पळालेले
नसून कुणीतरी काळजी घेतय, मन मोकळं करायला
मित्र नातेवाईक आहेत, गाणी-गोष्टी ऐकू शकतो, व्यायाम- योगासनं करयला भरपूर वेळ आहे, ध्यान लावू शकतो, कुटुंबाला वेळच वेळ देवू शकतो ही यादी आणखी वाढवू शकतो या सगळ्या गोष्टींबद्दल
मी आज कृतज्ञ आहे. घरात बंद झालो असलो तरी आनंदी आहे. कोरोनावर
उपाय सापडेलच पण त्याला मनावर स्वार व्हायला द्यायचं नाही हे आपल्या हाती आहे.
‘राजास जी महाली‘ ही संत
तुकडोजी महाराजांची कविता लहानपणी शिकलो होतो त्या कवितेचा अर्थ आत्ताकुठे समजू लागलाय.
त्यातली ‘पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे’ ही ओळ मनाला भावली.
नरेंद्र प्रभू