01 October, 2009

आणि सावरकरानी सशस्त्रक्रांतीचा पुरस्कार केला

प्लेगच्या साथीला प्रतिबंध करण्याच्या निमित्ताने ब्रिटीश सरकारने जनतेचा जो असह्य छळ चालवला होता, स्त्रियांवर अत्याचार केले ते पाहून चाफेकर बंधू खवळले. चाफेकर बंधूंनी रँडला गोळ्या घालून ठार केलं. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १८ एप्रिल १८९८ रोजी दामोदरपंत चाफेकर हातात गीता घेऊन फासावर चढले. वासुदेव आणि बाळकृष्ण हे चाफेकर बंधू मे १८९९ मध्ये फाशी गेले. भगूर मध्ये ही बातमी बाल सावरकरांच्या कानी पडताच ते अस्वस्थ झाले. रक्त गरम झालं, हे तरूण देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर हसत ह्सत फासावर जाणार असतील तर आपण गप्प बसून चालणार नाही. ते तडक देवघरात गेले आणि कुलदेवता दुर्गेच्या चरणापाशी बसून प्रार्थना केली की “ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारीता मारीता मरेतो झुंजेन, पण आई तुझ्या मस्तकावर स्वातंत्र्याचा सुवर्ण किरीट चढवल्याशिवाय रहाणार नाही.” सावरकर त्यावेळी वयाचं पंधरावं वर्ष पुर्ण करत होते. बाल शिवाजीने रोहीडेश्वरी घेतलेली शपथ आणि सावरकरानी घेतलेली ही शपथ यात विलक्षण साम्य होतं. वीर सावरकरानी आयुष्याच्या अंतापर्यंत या प्रतिज्ञेचा पठपुरावा केला. सशस्त्रक्रांतीचा पुरस्कार केला पण सावरकर हिंसावादाचे पुरस्कर्ते होते असं नाही. पण इंग्रजांच्या दमनकारी राजवटीला धडाशिकवायचा असेल तर त्याना घटनात्मक मार्गाने विरोध करता येणार नाही कारण हिंदुस्थानच्या भल्याची तेव्हा घटनाच नव्हती, जे काही कायदे होते ते ब्रिटीश सत्तेचा पाया मजबूत करणारेच होते. ही राजवट उलथून टाकायची असेल तर क्रांती शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे सावरकराना त्या बाल वयातही चांगलच कळलं होतं आणि त्या दिशेने त्यांची पावलं पडत होती.


30 September, 2009

खरी कमाई

आज पोतदारांचा खुप दिवसानी फोन आला. काल दसर्‍याच्या शुभेच्छांचा SMS पाठवला होता. त्याचं उत्तर म्हणून त्यांनी हा फोन केला. पोतदार तसे नेहमी भेटणारे. भेटलो की छान गप्पा व्हायच्या. ते निवृत्त झाल्यापासून भेट नाही झाली. फोनवर बोलण्यासारखं काही काम नव्हतं त्या मुळे फोन केला नाही. माणसांचं हे असच असतं. एकाच वर्गात असणारे मित्र, एकाच ऑफिसात काम करणारे, एकाच वाटेने जाणारे, एकाच ट्रेनने एकाच डब्यातून जाणारे असे कितीतरी मित्र आपण रोजच्या रोज भेटत असतो, बोलत असतो, सहलीला जातो खुप छान सहवास असतो तो, तेव्हा त्याचं काही वाटत नाही, रोज भेटणार हे गृहीत धरलेलं असतं. पण शाळा कॉलेजचे दिवस संपतात तेव्हा, एखाद्याची बदली होते तेव्हा, एखादा निवृत्त होतो तेव्हा वाटा वेगळ्या होतात. मनात असुनही भेटता येत नाही, बोलता येत नाही. प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो. दिवस, महिने, वर्ष संपत जातात आणि कधीतरी असा फोन येतो तेव्हा आपण भुतकाळात रमून जातो. आठवणी काढत बसतो. पुन्हा भेटूया म्हणून ठरवतो. पण आता प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या झालेल्या असतात. भेटलो तरी मैफील जमेलच असं सांगता येत नाही. तेव्हा जवळ असताना हातचं राखलं नाही तर दूर झाल्यावरही ओढ वाटते, भेटावस वाटतं. हीच खरी कमाई असते. पोतदारानी अशी कमाई भरपूर केली आहे. बघू, त्याना लवकरच भेटेन.

29 September, 2009

गावचा दसरा




दसरा म्हणजे उत्साह, आनंद, जल्लोष. मुंबईतला दसरा म्हटला म्हणजे गरबा, दांडीया आणि रामलीला पण मला दसरा आठवतो तो गावचा. नवरात्रात रोज एक माळ या प्रमाणे नऊ माळा देवघरात, देवळात बांधल्या जायच्या. ललीतापंचमीचा उत्सव तर आमच्या घरातच होतो, माझ्या लहानपणी ललीतापंच्या दिवशी रात्र जागवली जायची. भजनं, किर्तन, लळीत व्हायचं. अष्टमी पासून तर धमाल असायची. अष्टमीला शाळेत सरस्वती पुजन, खंडेनवमीला शस्त्रांची पुजा म्हणून खोरं,कुदळ,पाटी या सर्वांचीच पुजा व्हायची. विजयादशमीला गावच्या देवळात सगळा गाव जमायचा. तरंग आणले जायचे. ते गावातील वेगवेगळ्या देवळात फिरवून मग रवळनाथाच्या देवळात ठेवले जायचे.

हे तरंग मला खुप आवडतात. नवनवीन साड्या नेसवून त्यांची मिरवणूक निघायची तेव्हा ती पाहाण्यासारखी असायची. एक एक खांब खांद्यावर घेवून जाणारे त्या दिवशी हिरो असायचे. ढोल वाजवत ही मिरवणूक जायची तेव्हा गावातल्या प्रत्येक देवळाजवळ थांबायची. थांबली असताना त्यातल्या एकावर देवाचं वारं यायचं. हू.. हू.. करून तो घुमू लागला की सगळेजण गोल उभे राहून ते पहात असत. काहीजण त्याला आपल्या अडीअडचणी विचारत आणि अंगात आलेला माणूस त्याची उत्तरं द्यायचा. लोक त्याला देव समजूनच प्रश्न विचारायचे. अजूनही विचारतात. ह्ल्ली बरीच वर्षं दसर्‍याला गावी जाणं झालं नाही. तरी पण दसरा म्हटला की नजरे समोर तेच दृष्य येतं.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates