skip to main |
skip to sidebar

“
हे झाड कुठचं ओ ?”
हा प्रश्न तसा साधा पण त्यातल्या मालवणी भाषेतल्या हेलाने माझं लक्ष वेधून घेतलं. या बाई थेट मालवणहून सहलीला आल्या असतील असा माझा समज झाला. पन्हाळा आणि पुढे दांडेली अभयारंण्यात फिरताना मात्र आम्ही कायमचे मित्र झाले. सारंगकाका आणि ताई त्या नंतर अनेक सहलींना भेटल्या आणि ऋणानुबंध वाढत गेले. काल त्यांनी घेतलेला D70 कॅमेरा दाखवायला आल्या. येताना कोकणातल्या फणसाचे गोड गरे आणि मालवणी खाजं आणायला विसरल्या नाहीत. मालवणी माणसाला फणसाची उपमा देतात, बाहेरून काटे आणि आतून गोड. पण या सबाह्य गोड स्वभावाच्या. महापालिकेच्या शाळेतून शिक्षीका म्हणून निवृत्त झाल्या पण घरात बसून राहील्या नाहीत. झाडं फुलं यांची खुप आवड, फिरण्याची आवड, जंगलातून फिरताना एखादा प्राणी दिसला की एवढ्या खुश होतील की सांगता सोय नाही. एकदा असाच ताडोबात वाघ दिसला तर या लहानमुलासारख्या उत्साहाने ओरडल्या “
काय नाय वाघ...!, दिसता बघा कसो...! बाबा माज्या केदो मोठे......, जंगलचो राजोच तो...!”
त्यांच्यातलं लहान मुल अजून जागं आहे. वयाच्या सदुसष्टव्या वर्षी मधूमेह, स्लिपडीस्कचा त्रास असूनही “
शिरापडो तेच्यार”
म्हणत, त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत, आपण आनंदी राहत आणि इतरांना आनंद देत त्या त्यांच्या ‘
बालसुलभ’
स्वभावाप्रमाणे अनेक क्षेत्रात अजून खुप शिकायचं आहे म्हणून रस घेतात आणि प्रश्न विचारतात. आता फोतोग्राफी शिकायची आहे म्हणून म्हणत होत्या. हे असं जगलं पाहीजे. सारंगताईंकडून जगण्याची कला शिकली पाहीजे.
आत्ताच्या काळात व्यक्तीस्वातंत्र्याचा एवढा अतिरेक होताना दिसतो की घरातही लहान मुलांना बोलायची सोय उरलेली नाही. पालकांनी जरा कुठे रागवलं की काही बाबतीत असं होतं की मुलं सरळ आत्महत्या करतात. हे असं का घडतं? चांगले संस्कार व्हायला पाहिजेत तर ‘
छडी लागे छम् छम्’
चा जमाना गेला तरी मुलांनी स्वैर वागू नये म्हणून त्यांना काहीवेळा समज देणं आवश्यक असतच. जुने जाऊद्या म्हटलं तरी त्या जुन्या अनुभवांवरच आपलं पुढचं पाऊल पडत असतं. कुमारवयात पालकांनी केलेली कानऊघाडणी किंवा पालकांच्या वागणूकीचा मुलांना तेव्हा राग येत असला तरी पुढे आयुष्यात कधीतरी ते वागणं बरोबर होत हे ध्यानात येतं. हरिवंशराय बच्चन हे लेखक कवी म्हाणून आपणा सर्वांना माहित आहेतच पण ते कशाप्रकारचे पालक होते हे अमिताभ बच्चन शिवाय कोण चांगलं सांगू शकेल. हरिवंशराय बच्चन पाकल म्हणून तेव्हा तसे वागले म्हणूनच आजचा ‘बिग बी’ पहायला मिळाला असं खुद्द अमिताबच म्हणतो. नुकताच लोकसत्तामध्ये एक लेख वाचनात आला. जरूर वाचा शिला..ध्यास!
काहीवेळा खुप बोलण्या पेक्षा एखादी कृतीच बरच काही सांगून जाते. समर्थानी म्हटलच आहे ‘
क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे’
. समाजकारण, राजकारण आणि पर्यावरण या बाबतीत बरच काही बोललं जातं, लिहिलं जातं पण फारशी कृती होताना दिसत नाही या पार्श्वभुमीवर ‘
गंगाजल नॅचर फाउंडेशन’
ची ‘
जन जोडो गंगा यात्रा’
आपल्याला बरच काही सांगून जाते. कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता गेली कित्येक वर्षं श्री. विजय मुडशिंगीकर गंगा शुद्धीकरणाच्या ध्यासाने कार्यरत आहेत. ‘
गंगाजल’
हे त्यांचं प्रदर्शन मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरात आजपर्यंत लागलं आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून गंगेसारख्या पवित्र नदीचं झालेलं ओंगळवाणं रुप जन जागृतीसाठी लोकांसमोर आणणं हा एकचं ध्यास त्यानी घेतला आहे. गंगा नदीला जर तीचं गतवैभव प्राप्तकरून द्यायचं असेल तर तीच्याकाठी असलेल्या गावा-गावात, शहरा-शहरात गेलं पाहीजे. तीथल्या जनतेला गंगेच्या शुद्धीकरणाचं महत्व पटवून दिलं पाहीजे. वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा मुळातच उपाय केला पाहीजे हे ओळखून ‘
गंगाजल नॅचर फाउंडेशन’
ने ‘
जन जोडो गंगा यात्रा’
हे अभियान हाती घेतलं होतं.
मुडशिंगीकर यांच्याबरोबरच मुंबईतील सुरेंद्र मिश्रा,
मच्छिंद्र पाटील,
संतोष मरगज,
माहितीपट निर्माते उन्मेश अमृते,
मुंबई दूरदर्शनचे केवल नागवेकर हेही या अभियानात सहभागी झाले होते. गंगोत्री जवळील मुखवा,
उत्तरकाशी,
ऋषिकेश,
हरिद्वार,
कानपूर,
अलाहाबाद,
बनारस,
पटना,
कोलकाता,
गंगासागर असा हा प्रदीर्घ पल्ला पार करून नुकतीच गंगासागर येथे ही यात्रा यशश्वीपणे पुर्ण झाली. सामान्य लोक, विद्यार्थी, साधू, जवान अशा अनेकांपर्यंत हा संदेश पोहोचला. एकेका ठिकाणी चार-चार दिवस थांबण्याचा स्थानिक जनतेचा आग्रह होता पण निधीअभावी तसं करणं शक्य झालं नाही. पण हाती घेतलेलं काम पुर्ण झालं, पंधरा दिवस का होईना गंगा शुद्धीकरणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवता आला. स्वर्गीय गंगा आपलं विलोभनीय रुप घेवून पृथ्वीवर आली. इथल्या मातीचं तीने सोनं केलं. जनतेची भरभराट केली. त्याच्या बदल्यात आपण मात्र तीची विटंबना केली. आतातरी जागं होवूया. पाणी आणि त्याचं महत्व यावर अजून किती कंठसोस करावा लागणार हा आजचा खरा प्रश्न आहे.
नरेंद्र प्रभू