25 January, 2012

रेल्वे प्रवासात असुविधा झाल्यास 8121281212 वर SMS करा




रेल्वे प्रवासात असुविधा झाल्यास काय करावं? हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडला असेलच. सरकारी खात्यात अनेक खेटा मारल्या तरी कामं होत नाहीत हा नेहमीचा अनुभव असल्याने प्रावासात आपल्याला लगेच मदत मिळेल याची आपण कधीच आशा धरत नाही. कसा बसा प्रवास संपवण्यावरच आपला भर असतो, पण आता IRCTC आपल्या हकेला ओ देते असा चांगला अनुभव एका प्रवासी मित्राला आला आहे. त्याचं असं झालं हा प्रवासी हैद्राबाद अजमेर एक्सप्रेसने प्रावास करत असताना दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा जागा झाला तेव्हा टॉयलेट मध्ये पाणी नव्हतं. त्याची झोप उडाली. अजून अठरा तासांचा प्रवास बाकी होता. आता काय करावं? त्यानी रेल्वेत असलेल्या कर्मचार्‍याकडे तक्रार केलीच पण 8121281212 या नंबर ला "Traveling in the A1 compartment of Hyderabad Ajmeer express train No 12720. No water in the bathrooms . Pl arrange. Also replace leaking valves else problem repeats." असा SMS केला आणि आच्छर्य म्हणजे " Your reference id is 1110250019.For status visit www.scr.indianrailways.in. or SMS as STATUS TO 8121281212 . Thanks for registering complaint "  असं उत्तर आलं. पुढे वीस मिनीटात “water will be filled at the nearest
Railway station having water filling facility.
”  असा SMS आला. आणि खरोखरच इटारसी स्टेशनवर पाणी भरलं गेलं. नंतर आठवड्याभराने गळणारी वॉल्व दुरूस्त केले आहेत असा मेसेज आला. या बद्दल रल्वेचं खरच अभिनंदन केलं पाहीजे. आपण रेल्वे प्रवास करत असताना जर आपणाला जर काही असुविधा झाल्यास 8121281212 वर SMS कराच. मेरा भारत महान...!  
        

16 January, 2012

पैलतीर



सांज सभोवती दाटून येता
हसून करिती अपूले स्वागत
पैलतीरावर दोघे क्षणभर
पैलतीरावर दोघांचे घर

घर दोघांचे होते सुंदर
नात्यांमध्ये पडले अंतर
ऎलतीरावर नाती सगळी
पैलतीरावर दोघांचे घर

नाती-गोती होती बोजड
आठवणींच्या हिंदोळ्यावर
लपल्या व्यथा लोचना आड
हसून करिती त्यांना ते दूर

मधून वाहे अथांग पाणी
ऎलतीराला जाणीव नाही
रुजून येती नवीन नाती
पैलतीरावर अशी कितीक ती

पळभर येती निघून जाती
असे सोबती अशीच नाती
घटकाभरची विश्रांती ती
आयुष्याचे संचित होती

नरेंद्र प्रभू

10 January, 2012

हर्णै बंदर




कुबेराची संपत्ती आणि समुद्रातील धन कधी संपायचं नाही. त्यातली कुबेराची संपत्ती अजून पाहायची आहे पण समुद्रातील धन पाहीलं ते हर्णै बंदरावर. चमचमत्या चांदीचा वर्ख ल्यालेली मासोळी पुरा बंदर किनारा व्यापून उरली होती. जिकडे बघावं तिकडे मासळीच मासळी. शेकडो होड्या बंदराला लागल्या होत्या आणि त्या मधून आणलेलं ते धन कोळी लोक बैल गाड्यांमधून किनार्‍यावर आणून आणून ओतत होते. किती ओतलं तरी ते संपत नव्हतं. निवती, मालवणच्या समुद्र किनार्‍यावर रापण ओढून आणलेले मासे बघितले होते पण हे त्या हून कित्येक पटीने अधिक होतं. किनार्‍यावर आणल्या आणल्या त्याचे लिलाव पुकारले जात होते. मासळी घाऊक दरात विकली जात होती. थोड्या अंतरावर किरकोळ विक्री करणार्‍या कोळणी जोरदार आवाजात गिर्‍हाईकाशी बोलत होत्या. लिलाव करणार्‍यांचा आवाज टिपेला पोहोचला होता. सुर्य बुडायच्या आत बाजार आवरता घ्यायचा होता आणि साडेपाचच्या सुमारासच किरणं तिरकी होवून लांब सावल्या पडल्या होत्या.

दिड-दोन हजार लोकवस्ती असलेलं हर्णै गाव अर्ध अधिक किनार्‍यावर लोटलं होतं. दिवसभरातील हे सर्वात घाई गडबडीचे क्षण होते. दिड-दोन तासात सारा व्यवहार आटपायचा होता. बंदरावर गेल्या गेल्या धावत जाणारं एक मुंगूस दिसलं, त्यालाही दुसर्‍या दिवशीची बेगमी करायची होती. एक गाय टोपलीतलं काहीतरी चोरून खाताना दिसली, बैल गाडीवाले जेवढ्या फेर्‍या होतील तेवढ्या मारायच्या प्रयत्नात होते. लिलावाच्या आरोळ्या उठत होत्या. भाव केले जात होते. कुणाला उसंत म्हणून नव्हती. एका बाजूला मात्र बर्फाचे गोळे विकणारी बाई, बाजूलाच भाजी विकणारे असे लोक जरा निवांतपणे गडबडीतले लोक मोकळे होण्याची वाट पाहात होते. त्याही पेक्षा निवांत असं ते हर्णै गाव बंदर किनार्‍या पासून दूर शांत शांत भासत होतं.         
   
आंजर्ल्यात पोहोचल्या पासून हर्णै बंदर पाहाण्यासाठी आम्ही आतूर झालो होतो. मासळी खाण्या बरोबरच ती पाहाण्यातही आनंद असू शकतो हे त्या दिवशी समजलं. वस्तीतूनच बंदराकडे जाणारी ती अरूंद वाट पार करत, ड्रायव्हींगचं कसब पणाला लावत महेशदानी गाडी किनार्‍यावर आणून लावली आणि मग आम्ही सगळे त्या गर्दीचाच भाग झालो. कुठलाच एक ठरावीक हेतू समोर नसतानाही मग पुढचा तास-दिड तास आम्ही त्या गर्दीत व्यग्र होवून गेलो. मोठमोठे मासे हातात घेऊन पाहिले, लिलावाचा पुकारा केला, खेकडे विकत घेतले. सुर्य मावळतीला जाईपर्यंत उत्सव साजरा केला.   

(फोटो: रेखा भिवंडीकर)







LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates