20 October, 2012

हार्ट-टू-हार्ट - नितीन पोतदार




झी चौवीस तास वर कॅर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांची हार्ट-टू-हार्ट या कार्यक्रमात आत्ताच झालेली मुलाखत मराठी मनाला खरंच अंतर्मुख करणारी होती. देशभर चाललेली अंधाधुंदी, भ्रष्टाचार, विकृत राजकारण, बेभरवशाचे सर्वच क्षेत्रातील नेते या सर्वांमुळे भांबावून गेलेल्या मराठी मनाला आश्वासक आधार देणारी ही मुलाखत होती.

  • विश्वासार्हता हा माराठी माणसाचा ब्रॅन्ड आहे.
  • स्वत:च्या कामात झोकून द्या यश मिळतच.
  • जागतीक स्थरावर अंगभूत गुणांनाच फार महत्व आहे.
  • परकीय गुंतवणूकीची देशाला गरज आहे.
  • मराठी माणूस कुठल्याच क्षेत्रात मागे नाही.
  • सरस्वती की लक्ष्मी ?  याला दिलेलं हार्डवर्क हे उत्तर.

असे अनेक मुद्दे या मुलाखती दरम्यान आले. उदय निरगुडकर यांनी घेतलेली ही मुलाखत मनाला उभारी देणारी होती. आज पाहायला चुकला असाल तर उद्या नक्की पहा.
   

17 October, 2012

सॅन्डस्केप



कवी विष्णू सुर्या वाघ/छायाचित्र उमेश साळगावकर


उमेश साळगावकर
विष्णू सुर्या वाघ या गोमंतक पुत्राला ही सुंदर कविता  सुचली ती माझे मित्र उमेश साळगावकरांची छायाचित्रं पाहून. जिथे सागरा धरणी मिळते... तिथे.... अनेकांनी अनेकदा आपली सकाळ विशेषत: सायंकाळ नक्कीच रमणीय केली असेल. वाळूचे किल्ले बांधले असतील किंवा आपल्या नावाची अक्षरं कोरली असतील, पण अशा सागर वेळेवर जेव्हा उमेश साळगावकरांसारखा जातीवंत कलाकार जातो तेव्हा ती त्यांच्या कॅमेर्‍यामागच्या डोळ्याला अधिकच देखणी दिसते. सागर आणि रुपेरी वाळू यांच जे अतूट नातं आहे त्याचं तितकंच विलोभनीय चित्रण साळगावकरांनी आपल्या कॅमेर्‍याव्दारे केलं आहे. सागर किनारा, त्यावरची हळवी झालेली वाळू, कधी लाटांनी तर कधी दवबिदूंनी. कधी तिथल्याच उभयचरांनी केलेली कशीदा आणि नैसर्गिक कलाकुसर यांचं प्रत्ययकारी दर्शन आपल्याला साळगावकरांच्या छायाचित्रांमधून पाहायला मिळतं आणि ते पाहून आपण स्तिमित होतो. आपण नेहमीच पाहिलेला किनारा काय सौदर्य ल्यालेला असतो त्याची प्रचिती येते.

गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ छायाचित्रणात कौशल्य दाखवून अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणार्‍या उमेश साळगावकरांनी छायाचित्र प्रदर्शनातून रसिकांना आनंद दिला आहे. आजवर निसर्गाची अदाकारी नेहमीच आपल्याला भुलवीत आली आहे. पण ती अधिक डोळसपणे पाहायला लावणारं छाया, प्रकाश आणि वाळू यांच्या सुरेख आकृतीचं छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. ‘सॅन्डस्केप’ या शिर्षकाखाली होणारं हे त्यांचं चौथं प्रदर्शन आहे. सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम गुरूवार दिनांक १८ ऑक्टोबर सायंकाळी वा. मुंबई क्रिकेट असोसियेशन चे अध्यक्ष मा. रवी सावंत यांच्या शुभहस्ते होणार असून १९ ते २४ ऑक्टोबर २०१२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी या वेळेत, जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी रोड, काळाघोडा मुंबई ४०० ००१ या ठिकाणी प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनामुल्य खुले राहील. हे प्रदर्शन पुन्हा एकदा आपल्याला सागरतीरी जायला नक्कीच उद्युक्त करील.

04 October, 2012

ज्ञातव्य – एक नेत्रसुखद अनुभव




ज्ञातव्य हे सुलेखनकार सुभाष गोंधळे यांचं चित्रप्रदर्शन आर्टीस्ट सेंटर गॅलरीत सध्या सुरू आहे. कालच हे चित्र प्रदर्शन पाहाण्याचा योग आला आणि वाट वाकडी करून आर्टीस्ट सेंटर गॅलरीत गेल्याचं समाधान वाटलं. नुसती अक्षरं, शब्द पण ते सुलेखनाच्या माध्यमातून समोर आले की स्तिमीत व्हायला होतं. देवनागरी लिपीतील स्वर आणि व्यंजनं, त्यांच्या उच्चारणातील सुलभता आणि काठीण्य चित्रांच्या माध्यमातून किती सहजतेने हाताळलेलं आहे ते ती चित्र पाहाताच लक्षात येतं.

सुलेखनकार सुभाष गोंधळे (सुगो)
ॐ नम: शिवाय हा मंत्र तर आपल्याला थेट मंदीराच्या गाभार्‍यात घेऊन जातो. मंत्रोच्चारानंतर निर्माण होणारी स्पंदनं आणि आवर्तनं ही चित्रांच्या माध्यमातून कॅनव्हारवर प्रकट करणं हे सुगोंच्या शैलीचं खास वैशिष्ट्य म्हणता येईल. कराग्रे वसते लक्ष्मी या मंत्राचे भावही कॅनव्हासवर तेवढयाच ताकदीने साकार झाले आहेत.


हे अक्षरांनो मंत्र व्हा असं जर म्हटलं आणि खरोखरच ती अक्षरं मंत्र झाली आणि आपल्याशी बोलू लागली तर? अक्षरं, शब्द आपल्या अर्थ, भावासहीत आपल्याला सामोरी आली तर काय बहार येईल? सुगो अर्थात सुभाष गोंधळे हे सुलेखनकार ज्ञातव्य (समजण्यास सोपे) या आपल्या प्रदर्शनाव्दारे आपल्याला ही संधी उपलब्ध करून देत आहेत. सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी शब्दांना असे आकार दिले आहेत की ते शब्द आपल्याशी त्यांच्या अर्थासहीत बोलू लागतात. आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात.

केवळ अक्षरांना आकार देऊन पाहाणार्याला आध्यात्मिक अनुभवाचा प्रत्यय देण्याचं  काम सुगो करतात ते पाहून अचंबीत व्हायला होतं. , स्वस्तिकअशा चिन्हांना सुगोंनी ज्या रंगसंगतीत सादर केलं आहे ती पाहाताना ध्यान धारणेची प्रभावळ पाहिल्याचा आनंद मिळाला तर नवल वाटू नये.

देवनागरी लिपीचं सौंदर्य मंत्रांच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरवतांना सुगोंनी त्या भाषेचा आत्मा, नजाकत याला नक्कीच न्याय दिला आहे. प्रत्येक अक्षराला त्याचं स्वत:चं व्यक्तित्व, स्वभाव आणि लय प्राप्त करून देताना सुगोंच्या कुंचल्यातून सादर झालेली एक अप्रतिम अदाकारी पाहाताना मन मोहून जातं. सुलेखन ही एक कला तर आहेच पण ते एक व्यक्त होण्याचं साधनही आहे. आपल्याशी बोलणारी ही अक्षरं, ते शब्द, मंत्र याचा आनंदानुभव घ्यायचा असेल तर सुगोंच्या प्रदर्शनाला अवश्य भेट दिली पाहिजे. सदर प्रदर्शन आर्टीस्ट सेंटर गॅलरी, ऍडोर हाऊस, ६ के दुभाष मार्ग, जहांगीर आर्ट गॅलरी जवळ, काळाघोडा, फोर्ट मुंबई ४०० ००१ या ठिकाणी, १ ते ७ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील. बोलणारे शब्द थेट हृदयाशी संवाद साधतात याचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येईल.    


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates