18 March, 2010

जन जोडो गंगा अभियानाची यशश्वी सांगता


काहीवेळा खुप बोलण्या पेक्षा एखादी कृतीच बरच काही सांगून जाते. समर्थानी म्हटलच आहे ‘क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे’. समाजकारण, राजकारण आणि पर्यावरण या बाबतीत बरच काही बोललं जातं, लिहिलं जातं पण फारशी कृती होताना दिसत नाही या पार्श्वभुमीवर ‘गंगाजल नॅचर फाउंडेशन’ ची ‘जन जोडो गंगा यात्रा’ आपल्याला बरच काही सांगून जाते. कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता गेली कित्येक वर्षं श्री. विजय मुडशिंगीकर गंगा शुद्धीकरणाच्या ध्यासाने कार्यरत आहेत. ‘गंगाजल’ हे त्यांचं प्रदर्शन मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरात आजपर्यंत लागलं आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून गंगेसारख्या पवित्र नदीचं झालेलं ओंगळवाणं रुप जन जागृतीसाठी लोकांसमोर आणणं हा एकचं ध्यास त्यानी घेतला आहे. गंगा नदीला जर तीचं गतवैभव प्राप्तकरून द्यायचं असेल तर तीच्याकाठी असलेल्या गावा-गावात, शहरा-शहरात गेलं पाहीजे. तीथल्या जनतेला गंगेच्या शुद्धीकरणाचं महत्व पटवून दिलं पाहीजे. वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा मुळातच उपाय केला पाहीजे हे ओळखून ‘गंगाजल नॅचर फाउंडेशन’ ने  ‘जन जोडो गंगा यात्रा’ हे अभियान हाती घेतलं होतं.

मुडशिंगीकर यांच्याबरोबरच मुंबईतील सुरेंद्र मिश्रा, मच्छिंद्र पाटील, संतोष मरगज, माहितीपट निर्माते उन्मेश अमृते, मुंबई दूरदर्शनचे केवल नागवेकर हेही या अभियानात सहभागी झाले होते. गंगोत्री जवळील मुखवा, उत्तरकाशी, ऋषिकेश, हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद,  बनारस,  पटना, कोलकाता, गंगासागर असा हा प्रदीर्घ पल्ला पार करून नुकतीच गंगासागर येथे ही यात्रा यशश्वीपणे पुर्ण झाली. सामान्य लोक, विद्यार्थी, साधू, जवान अशा अनेकांपर्यंत हा संदेश पोहोचला. एकेका ठिकाणी चार-चार दिवस थांबण्याचा स्थानिक जनतेचा आग्रह होता पण निधीअभावी तसं करणं शक्य झालं नाही. पण हाती घेतलेलं काम पुर्ण झालं, पंधरा दिवस का होईना गंगा शुद्धीकरणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवता आला. स्वर्गीय गंगा आपलं विलोभनीय रुप घेवून पृथ्वीवर आली. इथल्या मातीचं तीने सोनं केलं. जनतेची भरभराट केली. त्याच्या बदल्यात आपण मात्र तीची विटंबना केली. आतातरी जागं होवूया. पाणी आणि त्याचं महत्व यावर अजून किती कंठसोस करावा लागणार हा आजचा खरा प्रश्न आहे.      

नरेंद्र प्रभू
        


16 March, 2010

डॉ. किबे



कोणत्याही सहलीवर असताना ज्या हॉटेल किंवा निवासस्थानी आपण राहतो ते आपलं तात्पुर्तं का होईना पण घरच असतं. ज्या खोलीत आपण राहात असतो तिथे बरोबरची व्यक्ती आधीपासून ओळखीची किंवा नात्यातली असली तर प्रश्नच नसतो पण परक्या माणसाबरोबर वास्तव्याची वेळ आली तर एकमेकांशी सूर जुळतीलच असं सांगता येत नाही. हल्ली तर दोन व्यक्तींसाठी असलेल्या खोलीत पलंगसुद्धा एकच असतो आणि त्याच्यावर पांघरूण पण एकच असतं. दोघांची देहयष्टी, झोपण्याचे प्रकार, झोपल्यानंतरचे प्रकार, आकार आणि आवाज या मुळे बर्‍याच वेळा दोघांची किंवा किमान एकाची झोपमोड होण्याची शक्यता असते. सहलीच्या व्यस्त दिनक्रमात प्रातर्विधी, आंघोळीत जाणारा वेळ यामुळेही अडचण होवू शकते. बाकी व्यसनं, सवयी असे अनेक घटक एकमेकांमधील संबंध कसे असतील ते ठरवतात. या झाल्या भौतिक गोष्टी पण स्वभाव आणि आचार विचार यामुळेही गोंधळ होवू शकतो.

नुकत्याच झालेल्या अंदमान सहलीदरम्यान डॉ. अरवींद किबेंचा मी रुमपार्टनर होतो. चेन्नईच्या हॉटेल मध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली आणि पुन्हा परतीच्या वाटेवर  चेन्नई विमानतळावर त्यांचा निरोप घेताना खुप जुन्या ओळखीच्या सहृदयाची ताटातूट होत आहे अशी भावना निर्माण झाली. तसे डॉ. किबे ऎशी वर्षाचे, वयाने, पेशाने, ज्ञानाने आणि सर्वार्थानेच मोठे असलेल्या डॉ. किबेंनी मात्र ते मला त्या सहा दिवसांच्या सहवासात कधी जाणवू दिलं नाही. रुममध्ये असताना अनेक विषयांवर चर्चा झाल्या, आध्यात्मावर तर रोजच त्यांचे मौलिक विचार ऎकायला मिळत. वैद्यकीय व्यवसाय, राजकारण, खेळ, पर्य़टन, योग आणि अध्यात्म सर्वच विषयांवर त्यांचा अभ्यास आणि आवड याचा मला प्रत्यय आला. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेलं द्विशतक त्यांनी एखाद्या लहानमुलाच्या उत्साहाने साजरं केलं आणि हॅवलॉकला रात्रीच्या निवांत वेळी सागर किनारी तपस्व्यासारखी ध्यानधारणा केली. या वयातही असं समजून, समरसून जगणं आणि छोट्या-छोट्या तर नाहीच पण जगाच्या द्रुष्टीने मोठ्या दुःखाचाही बाऊ न करता ते वर्तमान कसा जगत आहेत हे जवळून पाहणं हा खरच एक सोहळा होता.                           

15 March, 2010

रंग कोणते खरे?



 
रंगावरती रंग घासूनी
पेल्यावरती पेला
सरली रजनी, सरली मदिरा
पायांमध्ये झेला

ती कुठे उर्वशी, कुठली रंभा
काहीच आकलेना
गालावरचे रंग उडाले
दर्पणी पहावेना

रंग उषेचे क्षितिजावरती
अधीर अंगणी ललना
हिंदोळ्यावर खिदळत होत्या
सांजपर्‍या सुखवदना

ते रंग खरे की हे रंग खरे?
संशय का मनी आला?
दिनमणी उदया अस्ता येता
संभ्रम सरूनी गेला

नरेन्द्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates