06 October, 2011

सीमोल्लंघन...!




आज दसरा..., विजयादशमी. मोबाईलवर आणि इमेलवर अनेक मित्रांचे शुभसंदेश सकाळपासून येते आहेत. दुष्टप्रवृत्तीवरच्या विजयाची आठवण म्हणून आपण दसरा साजरा करतो. सीमोल्लंघनाचाही हाच दिवस. पुर्वीच्या काळी सुगीच्या दिवसांनंतर शेतकरी, व्यापारी गावाची वेस ओलांडून परगावी जात, पराक्रमी राजे राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी सज्य होवून युद्धाभुमीवर जात. पण ते कधीतरी परत येणार म्हणून त्यांना आनंदात निरोप दिला जाई. मोबाईल आणि संगणकाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा, अ‍ॅपलचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स आता अनंताच्या यात्रेला या जगाचं सीमोल्लंघन करून आजच गेला. अवघं छप्पन्न वर्षांचं आयुष्य जगलेला स्टीव्ह किती मोठं काम करून गेला.  

‘‘आपण प्रत्येक उगवणारा दिवस हा आपला जणू शेवटचाच दिवस आहे असं जगायला लागलो तर एखादा दिवस असा उजाडतो की त्या सगळय़ा जगण्याचा अर्थ कळतो.’’ असा अर्थ समजलेला आणि तशाप्रकारे जगलेल्या स्टीव्हच्या आत्म्यास शांती लाभो.

लोकसत्ताच्या अन्यथा या सदरात काही दिवसांपुर्वी आलेला स्टीव्ह जॉब्सच्या भाषणाचा स्वैर अनुवाद त्याची आठवण म्हणून मुद्दाम देत आहे.   


गिरीश कुबेर, शनिवार, ३ सप्टेंबर २०११
girish.kuber@expressindia.com 
मित्रांनो, मला तुमच्यासमोर भाषणासाठी संधी मिळाली, याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठातील बुद्धिमान मुलांसमोर बोलायला मिळणं, हा मला माझा मोठा सन्मान वाटतो. खरं सांगायचं विद्यापीठाशी माझा संबंध आला तो हा असा आणि इतकाच. कारण तुमच्यासारखं असं माझं शिक्षण कधीच झालं नाही. आता तुमच्यासमोर आलोच आहे, तर मला तीन प्रमुख गोष्टी तुमच्यासमोर उघड करायच्या आहेत.

पहिलं म्हणजे मी माझं महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. सहा महिन्यांतच मला इथल्या वातावरणाचा कंटाळा आला. नंतर कसंबसं वर्ष काढलं मी महाविद्यालयात. पण मी इथं कधी रमलोच नाही. हे असं का झालं असावं? माझ्या दृष्टीनं याची कारणं माझ्या जन्मातच असावीत. माझी आई अविवाहित असतानाच तिला मी झालो. बाळंत झाली तेव्हा ती महाविद्यालयात शिकत होती. तेव्हा तिची परिस्थिती लक्षात घेता तिनं मला दत्तक द्यायचं ठरवलं. एक वकील आणि त्याची सुविद्य पत्नी मला दत्तक घेणार होते. पण ऐन वेळी ते म्हणाले त्यांना मुलगी हवीये. तेव्हा माझी आई चिडली. तिची अट होती की कोणा पदवीधरालाच मला दत्तक द्यायचं. पण हे असं घडलं. तेव्हा ऐन वेळी जो समोर आला, त्याला तिनं मला देऊन टाकलं. अट एकच. मला महाविद्यालयात शिकू द्यायचं. तेव्हा माझे आताचे जे आईवडील आहेत, ते मला लाभले.
गरीब होते ते. पण त्यांना मी शिकावं असं प्रामाणिकपणे वाटत होतं. माझ्या खऱ्या आईच्या इच्छेला मान देत त्यांनी मला शिकू द्यायचं ठरवलं. तेव्हा मी महाविद्यालय निवडलं ते अगदी महागडं होतं. अगदी स्टॅनफोर्डइतकं. माझं म्हणणं शिकायचं तर मग स्वस्त महाविद्यालयात कशाला जा. पण खरं सांगायचं तर त्यात काहीही अर्थ नव्हता. कारण मी जे काही शिकत होतो, त्यातलं काहीही मला आवडत नव्हतं. एकीकडे पोटाला चिमटा काढून माझी फी भरणारे माझे आईवडील आणि ओढूनताणून शिकणारा मी. १७ वर्षांचा होतो, तेव्हा हे जाणवलं. मग ठरवलं. हे फारच होतंय. आयुष्यात काय कराचंय ते दिसत नाहीये आणि तरीही आपण आईवडिलांचे घामाचे पैसे असे उधळतोय. हे बरोबर  नाही. त्याच क्षणी निर्णय घेतला. हे नावडतं शिकणं थांबवायचं. बाहेर पडलो महाविद्यालयातून. मोकळा श्वास घेतला. एव्हाना जाणवलं होतं, आपण जे काही करतोय ते फारच स्वप्निल आहे. मित्राच्या वसतिगृहावर राहायला गेलो. इतरांच्या रिकाम्या कोकच्या बाटल्या  वगैरे विकून जेवायला चार पैसे मिळाले तर मिळवायचो. आठवडय़ातून एकदा मात्र पलीकडच्या गावातल्या हरे कृष्ण मंदिरात जायचो. अर्थात तिथे काही भक्ती वगैरे होती म्हणून नाही. तर तिथे आरतीनंतर मोफत जेवण मिळायचं म्हणून. पण तिथे जायलाही पैसे नसायचे. तेव्हा चालत जायचो. म्हणजे जायचेयायचे १४ किमी अंतर मी चालायचो. या काळात मला प्रश्न पडायचा. मला नक्की काय आवडतंय. तेव्हा लक्षात आलं. आपलं सुलेखन कलेवर प्रेम आहे. मग ते शिकायला लागलो. अक्षरांचे आकार, त्यांचे तलम पोत मला फार आवडायचे. अक्षरांच्या नुसत्या मांडणीतूनसुद्धा काही सांगता येतं, असं मला वाटायचं. आपण त्यांना कसं सादर करतो, यावर बरंच काही अवलंबून असतं, हे मला जाणवलं. त्यामुळे मी त्या कलेचं शिक्षण घ्यायला लागलो. जे शिकतोय त्याचा काय उपयोग, नोकरी मिळणार आहे का त्यामुळे, वगैरे फालतू प्रश्नांनी मी मला विचलित होऊ देत नव्हतो. आवडतंय ना.. शिकायचं. इतकाच तो विचार.

पुढे १० वर्षांनी जेव्हा मी माझा पहिला संगणक तयार केला, तेव्हा या सुलेखन कलेचा उपयोग झाला. कारण इतरांच्या तुलनेत माझ्या संगणकाचा कळफलक जास्त चांगला आणि सुलेखनासाठी उपयुक्त असलेला होता. मी तेव्हा जे शिकलो, ते हे असं उपयोगी आलं. मग जाणवलं, बरंच झालं आपलं महाविद्यालय सुटलं ते. मी असा त्या वेळी बाहेर पडलो नसतो, तर हे काही जमलंच नसतं.
दुसरी गोष्ट माझ्या उद्योगाची. मी आणि वॉझ यांनी माझ्या वडिलांच्या गॅरेजमध्ये पहिला संगणक तयार केला. बरीच खटपट करावी लागली. चांगलं फळ आलं त्याला. तेव्हा आम्ही नाव दिलं आमच्या संगणकाचं अ‍ॅपल. हे जमलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो. मग आम्ही दोघांनी कंपनीच काढली. पुढच्या १० वर्षांत आम्हा दोघांच्या कंपनीत चार हजारजण नोकरीत होते आणि अ‍ॅपलचा आकार २०० कोटी डॉलर्सचा झाला होता. आमचा पहिला मोठा संगणक जन्माला आला होता. मॅकिंतोश. मी तेव्हा तिशीत होतो. तिथे दुसरा धक्का बसला.

मला माझ्या भागीदारानं कंपनीतून काढूनच टाकलं. मला प्रश्न पडला. मीच जी कंपनी जन्माला घातली, तिथून मलाच कसं काय हे लोक बाहेर काढतात. पण तसं झालं होतं खरं. तेव्हा मी ठरवलं, या प्रश्नाच्या उत्तरात रक्त आटवायचं नाही. नवं करूया काहीतरी. खरं तर समोर अंधार होता. पण म्हटलं हरकत नाही. जमेलच आपल्याला काही ना काही. तशी खात्री होती. कारण माझं माझ्यावर प्रेम होतं. शांत बसलो. स्वत:लाच विचारलं. झालं ते झालं. आपल्याला आता काय करायला आवडेल. माझं पहिलं प्रेम होतं ते अर्थातच अ‍ॅपल. दुसरं काय? तर तेही अ‍ॅपलच. मग दुसरी संगणक कंपनी काढायची मी ठरवलं. तिला नाव दिलं नेक्स्ट. पाठोपाठ दुसरा उद्योग सुरू केला पिक्सर नावानं. जगातली पहिली अ‍ॅनिमेशन फिल्म मी केली. तिचं नाव टॉय स्टोरी. आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. याच काळात माझ्या कंपनीचा विस्तार इतका झाला की अ‍ॅपलला पुन्हा मोह झाला या कंपन्या घेण्याचा. कारण मी विकसित केलेलं तंत्रज्ञानच तसं होतं. शेवटी अ‍ॅपलनं या कंपन्या विकत घेतल्या. मी आपोआपच पुन्हा अ‍ॅपलमध्ये आलो. अ‍ॅपलचा सध्याचा जो काही विस्तार सुरू आहे तो मी नेक्स्ट आणि पिक्सरमध्ये जे काही केलं, त्याच्या जोरावर. इथंच मला माझी जीवनसाथी मिळाली. लॉरीन आणि माझा संसार उत्तम सुरू आहे.
मागे वळून बघितल्यावर आता मला वाटतं, अ‍ॅपलनी मला हाकललं नसतं तर नेक्स्ट आणि पिक्सर जन्माला आल्या असत्या का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला लॉरीन मिळाली असती का?
माझी तिसरी गोष्ट मरणाविषयीची आहे.

सतराव्या वर्षी मी कुठेतरी वाचलं होतं, ‘‘आपण प्रत्येक उगवणारा दिवस हा आपला जणू शेवटचाच दिवस आहे असं जगायला लागलो तर एखादा दिवस असा उजाडतो की त्या सगळय़ा जगण्याचा अर्थ कळतो.’’ हे वाक्य माझ्या डोक्यात सतत गुंजत असतं. मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं? तो सत्कारणी लावला का? हा प्रश्न माझ्या डोक्यातून कधी जात नाही.
गेल्या वर्षी कर्करोग झाल्याचं निदान झालं. ते कळल्यावर डॉक्टरांनाच वाईट वाटलं. कारण हा अगदी दुर्मीळ असा कर्करोग आहे. स्वादुपिंडाचा. डॉक्टर म्हणाले, तयारीला लागा.. शेवटच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्या.. जेमतेम तीन महिने तुम्हाला मिळतील.

मी घरी गेलो. दोन दिवसांनी माझी बायोप्सी करायची होती. त्यासाठी मला डॉक्टरांनी भूल दिली. घशातून एंडोस्कोप पोटात सोडला अणि माझ्या स्वादुपिंडाच्या काही पेशी घेऊन तो बाहेर आला. मी बेशुद्धच होतो. पण लॉरीन ते सगळं पडद्यावर बघत होती. ती म्हणाली, एंडोस्कोप बाहेर आल्यावर डॉक्टरच रडायला लागले. कारण त्यांना लक्षात आलं, परिस्थिती काही इतकी वाईट नाही. शस्त्रक्रिया केली तर मी वाचू शकेन. तशी ती शस्त्रक्रिया झाली आणि मी वाचलोदेखील.

मृत्यूच्या या स्पर्शानं मला बरंच काही शिकवलं. मरणाइतकं काहीही शाश्वत नाही. आपल्याला वेळ कमी असतो आणि तरीही त्यातला मोठा वाटा आपण वायाच घालवतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायचंय ते इतकंच की.. इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडस नावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं.. याचा कसलाही विचार करू नका.. इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका.. जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा. तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं.. त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका. बाकीचं सगळंच दुय्यम असतं. धन्यवाद.

(
अ‍ॅपलचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स नुकताच कंपनीतून पायउतार झाला. त्याआधी स्टॅनफोर्ड विद्यापीठानं त्याला विद्यार्थ्यांसमोर भाषणासाठी बोलावलं होतं. तेथील भाषणाचा हा स्वैर अनुवाद.. उद्याच्या अ‍ॅपलकारांसाठी)

          

28 September, 2011

मुक्तांगण – दिवाळी आधीची दिवाळी




दिवाळी अंकांची चाहूल लागायच्याआधीच मुक्तांगण हा आचार्य अत्रे कट्टा कांदिवली यांचा वर्धापन दिन विशेषांक हाती आला आणि दिवाळी पुर्वीच साहित्याचा फराळ मिळाला. एखादया उत्कृष्ट दिवाळी अंकाचा दर्जा असलेला हा विशेषांक आहे. विविध विषयांवरच्या वाचनीय साहित्याने सजलेला हा अंक म्हणूनच संग्रही ठेवण्या सारखा आहे.

आचार्य अत्र्यांच्या दातृत्वाच्या कहाण्या सांगणारा श्रीधर भटांचा लेख पहिल्यांदाच अंकाची उंची सांगून जातो. मग सलील कुलकर्णी यांचा अभ्यासपुर्ण लेख हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा गैरसमज दुर करतो. या लेखातही सुरेश भट आपल्याला भेटतात. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात तरूण पिढीला इंटरनेटचा लागलेला नाद आणि आधीच्या लोकांना असलेला तिठकारा धनंजय गांगलांनी नेमका टिपला आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळी हे दोन्ही गट कसे एकत्र आले याचं वर्णन मुळातूनच वाचण्याजोगं आहे.

गगनाला भिडणारी महागाई, रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात बदलणारे सोन्याचांदीचे भाव आणि एकूणच अर्थनीति विषयी आता शस्त्रक्रियेचीच गरज आहे अस साधार स्पष्ट करणारा अर्थपुर्ण मासिकाचे संपादक यमाजी मालकर यांचा लेख गोधळलेल्या मनाला उपाय सुचवतो. पं. भिमसोन जोशींच्या ह्रदय आठवणी सांगणारा सुर्योदयालाच सुर्यास्त झाला हा लेख पंडीतजींच्या विषयी आजवर माहित नसलेल्या काही गोष्टी सांगून जातो. भिमसेन जोशी हा संगीत सुर्य तळपायच्या आधी किती साधना करीत होता आणि प्रतिथयश झाल्यावरही किती नम्र होता हे वाचून पंडीतजीं विषयीचा जिव्हाळा आणखी वृदिंगत होतो. संगिताचे दुसरे पुजारी आणि  आपल्या संवादिनी वादनाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे गोविंदराव टेंबे आपल्याला भेटतात ते स्वरविलासी वादक या लेखात. आई या हळूवार विषयावर लिहितात ते येरवी अर्थवृत्तांतात भेटणारे चंद्रशेखर ठाकूर.

वरील मान्यवर आणि काही निमंत्रितांचे चांगले लेख या बरोबरच अनेक नवोदीतानाही संपादकानी लिहिते केले आहे, तसच त्या सर्व लेखांमध्ये थोरांच्या विचारांचं संकलन करून रांगोळी घातली आहे ती स्वत: संपादक राजेश गाडे यांनी. रोजच्या धावपळीच्या जीवनात समाज कार्यासाठी आता कुणाला वेळ काढता येतो? अशी सबब पुढे न करता, अत्रे कट्टा कांदिवलीच्या सर्व सभासदांनी आणि संस्थापक व मुख्य संयोजक, तसच संपादक राजेश गाडे यांनी हा वर्धापन दिन विशेषांक देखणा आणि वाचनीय होईल याची काळजी घेतली आहे त्याला दाद दिलीच पाहिजे.                          

05 September, 2011

गुरू






गुरू.....! आज विचार केला तर वाटतं गुरू मला पहिल्यांदा भेटला तो कोचर्‍याच्या निसर्गात आणि आजूबाजूच्या माणसात. शाळेची पायरी चढायच्या आधी खळ्यातल्या विहिरीतून पाझरणारं पाणी पाटातून वाहात जायचं आणि माडाच्या अळ्यात जाऊन विसावायचं. अंगण सारऊन झाल्यावर उरलेली शेण-माती भिमाबाई माडाच्याखाली पसरायची तेव्हा मी तिला विचारायचो शेण माडाखाली का टाकलस? माडाखाली शेण घातल्याशिवाय वर नारळ कशे लागतले? असा तीचा प्रतिप्रश्न असायचा.  दिवाळीच्या सुमारास बागायतीमधील ढसमुसळेपणाने वाढलेलं रान शांताराम तोडायचा तेव्हाही माझा प्रश्न असायचा ही झाडं का तोडतोस? त्याचाही प्रतिप्रश्नच असायचा ती झाडां तोडल्याशिवाय सावळ कशी गावतली आणि उन कसा पडतला? शिवरात्रीच्या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटायचा तेव्हा आई माडाखाली उभो रवा नको हा, चुडात आंगावर पडात म्हणायची. माती, पाणी, उजेड आणि वारा यांच्या ताकतीची, कार्याची ओळख अशी नकळत झाली. पुढे शाळेत जायला लागल्यावर शाळेकडे जाणारी वाट म्हणजे निसर्गाचा अविष्कारच होता. जुन महिन्यात बदलत जाणारं सृष्टीचं रुप, हा हा म्हणता अक्राळ विक्राळ रुप धारण करून लाल मातीचा रेवा घेऊन धावणारे ओहळ, हिरव्या रंगाच्या अनंत छटा ल्यालेले डोंगर, नागपंचमीच्या सुमारास वारुळावर अचानक उगवणारी अळंबी, गणपतीच्या शाळेत आकार घेणार्‍या मुर्ती, सरत्या श्रावणाबरोबर पालटणारे धरतीचे रंग, ती रानफुलं, तिरडयाचं रान, आता नितळ झालेलं ओहळाचं निर्मळ पाणी आणि आजूबाजूला कापणीला आलेली सोनेरी शेतं. भावईच्या देवळासमोरचं ओसंडून वाहणारं तळं, कामतेकरांच्या घाटीवरून दिसणारी धुर सोडणारी छपरं, मारुतीच्या देवळात चालणारी आरती आणि चव्हाटयावरून परतणारी एस.टी. शाळेत हुंदडत जाता येता मी या सर्वांचा अनुभव घेत घेत नकळत शिकत गेलो.

मंदिरातल्या भजन-आरतीत रस नसला तरी ग्रामसेवा मंडळाच्या वाचन मंदिरात मन रमू लागलं, वाचनाची ओढ लागली. पाट हायस्कूलच्या प्रांगणात पाय ठेवला तेव्हा पासून मला शिक्षक वर्गाचीही ओढ लागली. आम्ही सहावीत असताना नंदा सामंतबाई आम्हाला भुगोल आणि हिंन्दी शिकवायला आल्या, त्यानीच आम्हा विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले, वर्गात कसं वागावं, कसं बसावं काय आणि किती बोलावं पासून कानावरच्या केसांची दखल त्या घेत. प्रसंगी कडक होत पण मायेने शिकवत. सुट्टीच्या दिवसात जादा तास घेऊन आम्हाला शिकवत. रविंद्रनाथ टागोरांवरचा धडा तर त्यांनी आम्हाला शाळेजवळच्या झाडाखाली बसवून शिकवला होता. निसर्गापासून काय आणि किती घ्यावं हे त्यानी आम्हाला शिकवलं. मालवणच्या सिंधुदूर्ग किल्यावरची सहल असो की जवळच्याच निवतीचा समुद्र किनारा असो सामंतबाई सहलीला असल्या की आम्हाला हुरूप येत असे.

नववीत असताना शिक्षकांचा बावन्न दिवसांचा राज्यव्यापी संप झाला. तेवढे दिवस शाळा बुडाली. पुढचं दहावीचं वर्ष, गणितासारखा विषय कच्चा राहिला तर मग धडगत नाही म्हणून मंडपे सरांनी आम्हाला त्यांच्या बिर्‍हाडी शिकवयला सुरूवात केली. त्यांचा दिड-दोन वर्षांचा मुलगा अविनाश सारखा मध्ये-मध्ये नाचे म्हणून त्याला खिडकिच्या गजांना सर बाधून ठेवत. आता ते आठवलं तरी कससच वाटतं. कसलीही अपेक्षा न ठेवता शिकवणारे असे शिक्षक त्या काळात लाभले म्हणूनच कसलीच शाळाबाह्य शिकवणी न घेताच एस.एस.सी.ला चांगले मार्क मिळाले. दहावीत गणिताला नाईक सर होते. मला गणित चांगलं येतं तेव्हा वर्गात इतरांबरोबर वेळ वाया जाऊ नये म्हणून ते मला स्टाफरूम मध्ये आपल्या खुर्चीवर बसून सरावासाठी पेपर सोडवायला सांगत.

एस.एस.सी. झालो, हायस्कूल मधून कॉलेजात गेलो पण या शिक्षकांच मार्गदर्शन कायमच लाभत आलं. असाच एकदा भेटायला गेलो असताना नाईक सर म्हणाले खुप शिक, मोठा हो. मुंबईसारख्या शहरात जा, चांगल्या मित्रांच्या संगतीत रहा, आताच चढतीचा मार्ग पत्करण्याचे दिवस आहेत नंतरचं आयुष्य पठारावस्तेत जातं..., सरळ चालत रहायचं..., तेव्हा आत्ताच जेवढं वर जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न कर नाईक सरांचे ते शब्द अजूनही काल परवाच ऎकल्यासारखे वाटतात. क़ॉलेजला गेलो तेव्हा गुमास्तेसर नसते तर कदाचीत पदवीला मुकलो असतो. सरकारी नोकरी लागली असूनही विद्यापीठाच्या परिक्षांना बसायला त्यांनी मला खास परवानगी दिली.

या झाल्या नुसत्या आठवणी, पण आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांनी जे संस्कार केले त्याचं महत्व आता जाणवतं. गावचा निसर्ग, ते गुरूजन मागे टाकून मुंबईसारख्या जादूई नगरीत आलो पण त्यांची आठवण पदोपदी येते, खास करून माझी मुलगी जेव्हा आपल्या शाळेतल्या गोष्टी सांगते तेव्हा मला माझ्या वर्गातले प्रसंग हमखास आठवतात. मला असे शिक्षक लाभले म्हणून त्यांच्या अभिमान वाटतो आणि उर दाटून येतो. मनापासून शिकवणारे आता कमी झाल्याचं जाणवतं, पण हल्लीच ड्रायव्हींग स्कूल मध्ये गाडी चालवायला शिकलो तेव्हा तिथले शर्मासर भेटले आणि पुन्हा गुरूजनांची आठवण झाली. ड्रायव्हर कसा असावा, त्याच्या स्वतःबद्दलच्या, इतरांबाद्दलच्या, रस्त्यावरच्या जबाबदार्‍या, गाडीची देखभाल हे सर्व अपेक्षीत नसताना त्यानी शिकवलं. तीन-तीन तासांची दोन लेक्चर ठेवली, तज्ज्ञाना बोलावलं. गाडी चालवताना आता रस्त्यावर जशी शर्मा सरांची आठवण येते तशी जीवनाच्या वाटेवर सगळ्या गुरूंची आठवण येते, खर तर तीच खरी आयुष्यातली साठवण आहे.                                          


                                        

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates