गुरू.....! आज विचार केला तर वाटतं गुरू मला पहिल्यांदा भेटला तो कोचर्याच्या निसर्गात आणि आजूबाजूच्या माणसात. शाळेची पायरी चढायच्या आधी खळ्यातल्या विहिरीतून पाझरणारं पाणी पाटातून वाहात जायचं आणि माडाच्या अळ्यात जाऊन विसावायचं. अंगण सारऊन झाल्यावर उरलेली शेण-माती भिमाबाई माडाच्याखाली पसरायची तेव्हा मी तिला विचारायचो शेण माडाखाली का टाकलस? “माडाखाली शेण घातल्याशिवाय वर नारळ कशे लागतले?” असा तीचा प्रतिप्रश्न असायचा. दिवाळीच्या सुमारास बागायतीमधील ढसमुसळेपणाने वाढलेलं रान शांताराम तोडायचा तेव्हाही माझा प्रश्न असायचा ही झाडं का तोडतोस? त्याचाही प्रतिप्रश्नच असायचा “ती झाडां तोडल्याशिवाय सावळ कशी गावतली आणि उन कसा पडतला?” शिवरात्रीच्या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटायचा तेव्हा आई “माडाखाली उभो रवा नको हा, चुडात आंगावर पडात” म्हणायची. माती, पाणी, उजेड आणि वारा यांच्या ताकतीची, कार्याची ओळख अशी नकळत झाली. पुढे शाळेत जायला लागल्यावर शाळेकडे जाणारी वाट म्हणजे निसर्गाचा अविष्कारच होता. जुन महिन्यात बदलत जाणारं सृष्टीचं रुप, हा हा म्हणता अक्राळ विक्राळ रुप धारण करून लाल मातीचा रेवा घेऊन धावणारे ओहळ, हिरव्या रंगाच्या अनंत छटा ल्यालेले डोंगर, नागपंचमीच्या सुमारास वारुळावर अचानक उगवणारी अळंबी, गणपतीच्या शाळेत आकार घेणार्या मुर्ती, सरत्या श्रावणाबरोबर पालटणारे धरतीचे रंग, ती रानफुलं, तिरडयाचं रान, आता नितळ झालेलं ओहळाचं निर्मळ पाणी आणि आजूबाजूला कापणीला आलेली सोनेरी शेतं. भावईच्या देवळासमोरचं ओसंडून वाहणारं तळं, कामतेकरांच्या घाटीवरून दिसणारी धुर सोडणारी छपरं, मारुतीच्या देवळात चालणारी आरती आणि चव्हाटयावरून परतणारी एस.टी. शाळेत हुंदडत जाता येता मी या सर्वांचा अनुभव घेत घेत नकळत शिकत गेलो.
मंदिरातल्या भजन-आरतीत रस नसला तरी ग्रामसेवा मंडळाच्या वाचन मंदिरात मन रमू लागलं, वाचनाची ओढ लागली. पाट हायस्कूलच्या प्रांगणात पाय ठेवला तेव्हा पासून मला शिक्षक वर्गाचीही ओढ लागली. आम्ही सहावीत असताना नंदा सामंतबाई आम्हाला भुगोल आणि हिंन्दी शिकवायला आल्या, त्यानीच आम्हा विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले, वर्गात कसं वागावं, कसं बसावं काय आणि किती बोलावं पासून कानावरच्या केसांची दखल त्या घेत. प्रसंगी कडक होत पण मायेने शिकवत. सुट्टीच्या दिवसात जादा तास घेऊन आम्हाला शिकवत. रविंद्रनाथ टागोरांवरचा धडा तर त्यांनी आम्हाला शाळेजवळच्या झाडाखाली बसवून शिकवला होता. निसर्गापासून काय आणि किती घ्यावं हे त्यानी आम्हाला शिकवलं. मालवणच्या सिंधुदूर्ग किल्यावरची सहल असो की जवळच्याच निवतीचा समुद्र किनारा असो सामंतबाई सहलीला असल्या की आम्हाला हुरूप येत असे.
नववीत असताना शिक्षकांचा बावन्न दिवसांचा राज्यव्यापी संप झाला. तेवढे दिवस शाळा बुडाली. पुढचं दहावीचं वर्ष, गणितासारखा विषय कच्चा राहिला तर मग धडगत नाही म्हणून मंडपे सरांनी आम्हाला त्यांच्या बिर्हाडी शिकवयला सुरूवात केली. त्यांचा दिड-दोन वर्षांचा मुलगा अविनाश सारखा मध्ये-मध्ये नाचे म्हणून त्याला खिडकिच्या गजांना सर बाधून ठेवत. आता ते आठवलं तरी कससच वाटतं. कसलीही अपेक्षा न ठेवता शिकवणारे असे शिक्षक त्या काळात लाभले म्हणूनच कसलीच शाळाबाह्य शिकवणी न घेताच एस.एस.सी.ला चांगले मार्क मिळाले. दहावीत गणिताला नाईक सर होते. मला गणित चांगलं येतं तेव्हा वर्गात इतरांबरोबर वेळ वाया जाऊ नये म्हणून ते मला स्टाफरूम मध्ये आपल्या खुर्चीवर बसून सरावासाठी पेपर सोडवायला सांगत.
एस.एस.सी. झालो, हायस्कूल मधून कॉलेजात गेलो पण या शिक्षकांच मार्गदर्शन कायमच लाभत आलं. असाच एकदा भेटायला गेलो असताना नाईक सर म्हणाले “खुप शिक, मोठा हो. मुंबईसारख्या शहरात जा, चांगल्या मित्रांच्या संगतीत रहा, आताच चढतीचा मार्ग पत्करण्याचे दिवस आहेत नंतरचं आयुष्य पठारावस्तेत जातं..., सरळ चालत रहायचं..., तेव्हा आत्ताच जेवढं वर जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न कर” नाईक सरांचे ते शब्द अजूनही काल परवाच ऎकल्यासारखे वाटतात. क़ॉलेजला गेलो तेव्हा गुमास्तेसर नसते तर कदाचीत पदवीला मुकलो असतो. सरकारी नोकरी लागली असूनही विद्यापीठाच्या परिक्षांना बसायला त्यांनी मला खास परवानगी दिली.
No comments:
Post a Comment