08 July, 2009

गढवाली पाहुणचार

गोमुखची खडतर पायपीट संपवून गंगोत्री गाठली तेव्हा म्हटलं चला खरोखरच गंगेत घोडं न्हालं. तशी वाटेत गोमुखला जाताना अनेक खेचरं अक्षरशः गंगेत न्हात होती. तर वर बसलेले खेचरस्वार प्राण मुठीत घेऊन एक एक पल्ला पार करत होते. पायी चालणारे एकमेकाना ' जय भोले - जय भोले ' म्हणून उत्साह वाढवत होते पण हे खेचरस्वार काहीच बोलत नव्हते, समोर काही अडचण आली तर ती खेचरं मागे परतून पळ काढायला बघत. त्यात पुन्हा आपण काही बोललो आणि त्या खेचरांचा गैरसमज झाला तर, नको ते बोलणं नको, म्हणून खेचरस्वार गप्प.

तर बिकट वाटेने जाऊन आल्यावर पायात त्राण नव्हतच, परंतू गोमुखची यात्रा झाली म्हणून मन समाधानी होतं. कडाक्याची थंडी असल्याने दुपारीही आंघोळ करवेना. ( गंगेच्या बर्फा सारख्या थंड पाण्यात डुबकी मारणार्‍याना आंघोळ न करताच मी प्रणाम करत होतो.) तरी पण गरम पाणी घेऊन आंघोळ आटोपली आणि माझ्या मित्राच्या मित्राला भेटायला त्याच्या दुकानात गेलो. हा गढवाली पंड्या शास्त्र आणि हिशोब, अध्यात्म आणि व्यापार सारख्याच हुशारीने सांभाळत होता. वर जे काही घडतय ते ' गंगामय्या कि कृपा से ' म्हणून सांगत होता. उद्या आम्ही परत जाणार म्हणताच ' अब आजका खाना हमारे साथ खाना होगा ' असा त्याचा आग्रह झाला. गेले चार दिवस तसं आम्हाला व्यवस्थित जेवण जेवता आलं नव्हतं. चला हे घरचं जेऊन बघू म्हणून आम्ही लगेच होकार दिला.

गंगोत्री परिसर पालथा घालून आम्ही पुन्हा त्याच्या दुकानात हजर झालो. जेवण तयार असावं. यजमानाने " नेगी s..s...s " म्हणून जोरात हाक मारली तसा १८ - १९ वर्षाचा एक तरुण आला. जेवणासाठी आम्हाला तो नेणार एवढ्यात लाईट गेली. नेगीने लायटर एवढी बँटरी पेटवली आणि आम्ही त्याच्या मागून चालू लागलो. एका बोळवजा जागेतून दुकानाच्या मागे गेलो. खाली तुफान वेगाने रोरावत जाणारा गंगेचा प्रवाह आणि वर जायला एक कच्ची शिडी. खाली पडलो तर वरच जाणार आणि वर चढलो तर खाली जाणार अशी स्थिती. तो नेगी काजव्यासारखा प्रकाश देणार्‍या बँटरीच्या उजेडात आम्हाला त्या शिडीवर चढण्याचं आवाहन करत होता. गोमुखला जाऊन आलेले आमचे पाय आम्हाला साथ देत नव्हते, दिवसा उजेडी सरळ रस्त्यावर टाकू तिथे पडतीलच अशी शाश्वती नव्हती, मग इथे या काळोखात शिडीवर पायानी दगा दिला तर ? पण नेगीची ती सरावाची वाट. आम्ही का कु करतोय म्हटल्या बरोबर तो म्हणाला थांबा माझ्या पाठीवर बसा, ' डरनेकी कोई बात नही ' असं म्हणत त्याने मला अर्धा उचललाच महत्प्रयासाने त्याला रोखला. आता भीक नको कुत्रं आवर अशी अवस्था झाली. आम्ही सकाळी ' जय भोले - जय भोले ' म्हणत होतो आणि आता सोमरस न घेताच आमचे पाय तळ्यावर नव्हते. नेगी हट्टाला पेटलेला. मग त्याने वर सुरेश s..s...s म्हणून हाक मारली, एक मुलगा मेणबत्ती घेऊन आला. त्या प्रकाशात शिडी तरी दिसत होती. सकाळी जय भोले म्हणत रस्ता पार केला आता 'जिवाचं नाव शिवा' ठेवत शिडी चढलो. थेट छप्परावर आलो. तिथे एक झोपडीवजा आडोसा केलेला , त्यात गँसवर आमच्यासाठी खाना तयार होत होता.

सुरेश मनोभावे जेवण बनवत होता आणि आम्ही ते पहात कुडकुडत होतो. गंगोत्रीच्या दरीतून येणारा गार वारा थेट भिडत होता. नेगीने आमच्या अंगावर रजई टाकली. ( रजई कसली गादीच होती ती. ) दहा मिनीटात पातळ भाजी आणि गरम गरम रोट्या, लोणचं ताटात आलं. अप्रतीम चव. पंचपक्वांनांहून गोड. पोरच्या हाताला चव होती आणि आम्ही त्याच्या हातचं आवडीने खातोय म्हणून नजरेत समाधान. हा पाहुणचार कायमचा लक्षात रहाण्यासारखा.


लेखकः नरेन्द्र प्रभू


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates