27 October, 2013

दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने


लडाख....
....... प्रवास अजून सुरू आहे. 

या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्यावेळी मी केलेल्या भाषणाचा गोषवारा. 

मित्रहो, आपल्या मध्ये मी आज बोलायला उभा आहे तो या सन्माननीय व्यक्तींमध्ये माझा मित्र आत्माराम परब असल्यामुळेच. मित्रहो, ह्या मिलींदजींनी माझा उल्लेख काका म्हणून केला पण या माणसाच्या सहवासात आल्यापासून मी रोजच्या रोज तरूण होत आहे. या माणसात उत्साह, उर्जा एवढी आहे की एखाद्या लहान मुलासारख्या याला नेहमी नवनवीन कल्पना सुचत असतात आणि आम्हा मित्रांना पालवी फुटल्या सारखं होत राहतं. मला याने मुल तर केलच पण लेखकही केलं. या माणसाने पर्यटनाच्या क्षेत्रात जी काय वेगळी आणि साहसी वाट शोधून काढली आणि आज तीला मळलेली वाट केली त्या त्याच्या अनोख्या प्रवासामुळे मी आज आपल्यामध्ये उभा आहे. आत्माच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटारसायकल प्रवासाची खिळवून ठेवणारी कथा, त्या घटनांचा थरार म्हणजे हे पुस्तक आहे. आज पुण्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशीत होताना माझ्या मनात संमिश्र भावना उचंबळून येत आहेत कारण या पुस्तकाचं आणि पुण्याचं हे पुस्तक जन्माला येताना पासूनचं नातं आहे. या पुस्तकाच्या काही प्रकरणांचं वाचन या पुण्यातच झालं. तेही रेणू दिदिंच्या घरात. मी पुस्तक वाचत होतो आणि दीदी मात्र मनाने त्या मोटारसायकलवर स्वार झाल्या होत्या. त्याच वेळी माझ्या लिखाणाने टॉप गेअर मघे जावून वेग घेतला होता. या पुस्तकाची जी मर्यादीत आवृत्ती लेह मध्ये जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशीत झाली त्या पहिल्या प्रिंटचे पहिले वाचक लेप्टनन जनरल रवी दास्ताने हे ही पुण्याचेच. हे पुस्तक आणि पुणं यांचं आणखीही एक नातं म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावना श्रेष्ट सामाजसेविका, लेखिका आणि ज्या एकलव्य न्यासाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या न्यासाच्या अध्यक्ष रेणूदिदि गावस्कर यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. असं हे पुस्तक आधीच पुण्याशी घट्ट बांधलं गेलं आहे.
    
हे पुस्तक लिखाणाचा जो प्रवास झाला तो प्रवासही फारच रोमांचकारी होता ते माला इथे सांगावसं वाटतं.  सोपानदेव आणि बहिणाबाई चौधरींमध्ये घडलेला एक किस्सा आहे. सोपानदेव एकदा विवेकानंदावर काही वाचत बसले होते. बहिणाबाईंनी विचारलं तू हे काय आणि कुणाबद्दल वाचतोस, तर सोपानदेव म्हणाले आई तो थोर माणूस होता तुला तो कसा कळणार? बहिणाबाई मात्र तो काय वाचतोय ते ऎकत राहिल्या. दुसर्‍या दिवशी पहाटे जात्यावर दळण दळताना त्या ओवी म्हणू लागल्या तेव्हा सोपानदेव चमकले आणि ते विचारू लागले ही स्वामी विवेकानंदावरची ओवी आहे तुला गं कशी माहित? बहिणाबाई म्हणाल्या काल तू हेच तर वाचत होतास.    

एका रात्री तीन साडेतीन तास या पुस्तकाला घटनाक्रम माझ्या या मित्राने मला सांगितला आणि सकाळी उठल्या उठल्या लाडाख प्रवास अजून सुरू आहेहे नाव आणि एकूण एकवीस प्रकरणांची नावं एका कागदावर लिहिली आणि आत्माला वाचून दाखवली. या माणसाला आम्ही जवळची मित्रमंडळी आत्मा म्हणतो आणि हे पुस्तक मी लिहिलं असलं तरी या पुस्तकाचा खरा आत्मा हाच माणूस आहे. एकदा एका दिव्यातून सुखरूप बाहेर आल्यावर पुन्हा त्या वाटेला सहसा कुणी जात नाही पण याने तर कस्टमची नोकरी सोडून हा मार्ग स्विकारला, त्या त्याच्या जीवन प्रवासाची सुद्धा ही कथा आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात असा एक हिरो असतो, आपल्याला त्या मनातल्या हिरो सारखं वागता आलं पाहिजे असं आतून कुठं तरी वाटत असतं, पण जोखीम पत्करायची आपली तयारी नसते. आत्मारामने ती जोखीम पत्करली आणि हिमालयातल्या अनेक वाटा प्रशस्त केल्या. नुसतीच जोखीम नव्हे तर कल्पकता, जिद्द, चिकाटी, माणसं जमवणं आणि ती राखणं, झोकून देणं असा अनेक गुणांनी युक्त असा हा माणूस एकदा का आपला मित्र झाला की मग तो सतत आपल्या संपर्कात येत राहातो. या पुस्तकात जो थरार मांडलाय त्या प्रत्येक घटनेत याचे हे गुण आपल्याला दिसून येतील. पुस्तक लिहून झाल्यापासून ते वाचकांना वाचायला मिळावं असं मला सारखं वाटत होतं. लिहून झाल्यानंतर तीन वर्षांनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि आता सहा महिन्यात हे दूसरी आवृत्ती निघत आहे.

आज पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक वाचकांचे फोन आले आणि त्यानी पुस्तकाचं कौतूक तर केलंच पण लडाखला जायची इच्छाही प्रगट केली. या पुस्तकाचे प्रिंटर माधव पोंक्षेसाहेब यानी हे पुस्तक छपाईला जायच्या आधी वाचून काढलं आणि आता लडाखला जायचंही नक्की केलय. लडखच्या पर्यटनाला चालना देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं म्हणूनही मला आनंद वाटत आहे. पुस्तक प्रकाशीत झालं आणि लगेचच वाचकांचे अभिप्राय यायला लागले. त्यातले बहूतेक वाचक एका दिवसात पुस्तक वाचून संपवलं म्हणणारे होते. काही निवडक अभिप्राय या आवृत्तीत छापले आहेत पण काही मनात घर करून राहिले त्यातला आत्माच्या आईचा अभिप्राय प्रातिनिधिक म्हणायला हवा. पुस्तकातला घटनाक्रम तिला चांगलाच माहित होता पण शेवटच्या दोन प्रकरणातलं लडाखचं वर्णन वाचून तीने आत्माला विचारलं लडाखाक जावक किती पैसे लागतत रे...., यंदा माका जावचा आसा. मला वाटतं याच्या एवढा उत्तम अभिप्राय असू शकत नाही. दिवसागणीक वेडी स्वप्न घेवून घराबाहेर पडणारा हा मुलगा आणि कायम कापरं काळीज घेवून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ही माय. तीला एक फोन करण्यासाठी ऎशी-पंच्याऎशी किलोमिटर पायपीट करत, नद्या-नाले, डोंगर तुडवत गेलेला हा तीचा शिवबा त्या खडतर वाटेवरून परत आला त्या हृदयस्पर्षी नात्याचीही ही गोष्ट आहे. नुकतीच आपण उत्तरांचलची ढगपुटी टिव्हीवर पाहिली असेल तशाच प्रकारच्या ढगफुटीने हिमाचलप्रदेश मध्ये 1995 साली हाहाकार माजवला होता आणि नेमक्या त्याच जीवघेण्या आपत्तीत आत्माराम आणि त्याचे मित्र सापडले होते त्याची थरारक कथा म्हणजे हे पुस्तक आहे.     

एखादी संस्था माणूस म्हणून जन्माला येते हे मी याच्याबाबतीत अनुभवलय त्यामुळेच मला वाटतं हा एक संस्था म्हणून जन्माला आलाय. अनेक व्यवधानं सांभाळत त्याचा हा प्रवास अव्याहत सुरू आहे. मला दिदिंनी सांगितलेली एक चीनी गोष्ट सांगावीशी वाटते. एक शेतमजूर दमून भागून घरी आल्यावर एक मेणबत्ती लावायचा, झोपी गेल्यावर त्याला नेहमी एक स्वप्न पडायचं. त्या मेणबत्तीच्या ज्योतीमधून त्या स्वप्नाला सुरूवात व्हायची. तिथला राजा त्याच्या जवळ येवून आपल्या मुलीचं लग्न कसं होणार म्हणून चिंतामग्न स्थितीत बसायचा. याला वाटायचं मी यात काय करणार? मग एकदा सेवकाने शेतमजूराला सांगितलं, अरे तो राजा तूलाच गळ घालतोय, तू त्या सुंदर राजकुमारीशी लग्न कर. मग तो राजी होतो आणि त्यांचं लग्न होतं. तो शेतमजूर रोज एक मोणबत्ती पेटवाचा आणि त्याच्या स्वप्नाला त्या ज्योतीमधून सुरूवात व्हायची. आत्मा असंच रोज आम्हाला ज्योतीमधलं स्वप्न देतो आणि ती स्वप्न अशी सत्यात उतरतात. मग त्या स्वप्नांच्या अशा आवृत्या निघतात. या प्रसंगी मला वाटतं आमच्या नव्या पुस्तकाची इथे पुण्यात घोषणा करावी. मित्रहो, ईशा टूर्स आणि आत्माराम परब यांच्या जीवन प्रवासावर प्रभाव टाकणारी माणसं, प्रसंग आणि किस्से यावरचं पुस्तक लिहावं असं नक्की झालं आहे त्या आमच्या नव्या पुस्तकाचंही असंच स्वागत होईल याची मला खात्री आहे. 


नुकतीच आत्माची लडाखची शंभरावी सफर झाली आणि लगेचच एकशे एकावी पण झाली. शंभराव्या सफरीत ईशा टुर्सचे जे दिडेशे पर्यटक त्याच्या सोबत लेह लडाखला होते त्यांच्या बरोबर मी सुद्धा होतो. तिथे त्याचं जे भव्य स्वागत आणि सन्मान झाला तो पाहून मला आनंद तर झालाच पण एक मर्‍हाठी माणूस म्हणून खुप अभिमानही वाटला. मला वाटतं हे पुस्तक वाचताना आपल्याही मनात तशीच भावना उत्पन्न होईल. लडाखला गेला नसाल तर जावंसं वाटेल. गेला असाल तर पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल. या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी मी हे नक्की म्हणू शकतो कारण तशा प्रकारचे अभिप्राय महाराष्ट्रभरातून आम्हाला प्राप्त झाले आहेत. पुस्तक कसं आहे ते आपण वाचून ठरवालच पण हे पुस्तक वाचल्याने लडाखप्रांत मात्र आपल्या मनात घर करून राहील अशी मला खात्री आहे. धन्यवाद.  जय हिंद, जय माहाराष्ट्र.                  

नरेंद्र प्रभू 

25 October, 2013

‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा.


लडाख प्रवास अजून सुरू आहे या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा. 
२६ ऑक्टोबर २०१३. एस. एम. जोशी फाउंडेशन, सभागृह, पुणे, सायंकाळी ६ ते ९

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

पुस्तकावरचे काही अभिप्राय:

अत्यंत भावपुर्ण, प्रेरणादायी आणि दाद देण्याजोगे असे हे प्रवासकथन आहे. या पुस्तकातून लडाखचं चांगलं दर्शन होतं.  लोकसत्ता.

अतिवृष्टीच्या आपत्तीत सापडलेल्या चमूची चित्तरकथा, एकापेक्षा एक अशा खिळवून ठेवणार्‍या घटनांची थरारक मालिकाच या पुस्तकातून उलगडत जाते किंबहूना तुम्हाला थेट भिडते. पुस्तकाच्या पानातून लडाख प्रांत तुम्हाला भेटत राहतो. लोकप्रभा
    
लडाख वरील हे पुस्तक अतिशय वाचनीय झालेले आहे. प्रतीकूल परिस्थितीत प्रवास कसा करावा याचीच ही चित्तरकथा आहे. नवशक्ती

या पुस्तकाने पार झपाटून टाकले. एकदा वाचून समाधान झाले नाही म्हणून पुन्हा वाचावयास घेतले. संघर्षमय प्रवास नेमका कसा असतो याची अनुभूती लाभली...... सारे काही थरारक. आपल्यासमवेत अन्य पर्यटकांनाही  लडाख चे प्रेम लावलेत तेही अफलातूनच. मृत्युचे तांडव, पराकोटीची भूक, ढासळणारे मनोधैर्य सार्‍याची प्रचिती मनाला धग ... उत्सुकता लावून गेली. एकदातरी लडाखला भेट द्यायलाच हवी एवढी उर्मी या पुस्तकाने दिली. आपण लडाख सचेत केला आहे. प्रसिद्ध समाजसेवक डॉ. विकास आमटे आणि डॉ. सौ. भारती आमटे. वरोरा.   

लेखकासोबत प्रत्यक्ष लडाखला फिरत आहे आणि त्या प्रवासाचा मी एक भाग आहे, असं पुस्तक वाचताना वाटत राहतं. इच्छाशक्ती, श्रद्धा, समर्पण यांचा संगम असलेलं हे मराठीतलं उत्तम पुस्तक आहे.- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि माजी खासदार श्री. अधिक शिरोडकर  


हे पुस्तक वाचताना लडाखच्या शौर्य सफरीवर गेल्यासारखे वाटते, हे नुसते प्रवास वर्णन नसून ते शौर्य, करूणा, प्रेम, अगतिकता, माणूसकी, भाग्य, जिद्द अशा जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारे सुंदर पुष्प आहे.  
दीपक जाधव- उपायुक्त, विक्रीकर विभाग, महाराष्ट्र शासन.
पुस्तक हातात घेतताच एका रात्रीत वाचून संपवलं. जीवनाची अशाश्वत: आणि थरार प्रत्येक पानापानात भेटत राहतो. मराठी साहित्यात एक अमुल्य भर.
डॉ. घ:नशाम बोरकर  


21 October, 2013

गाणे आयुष्याचे



कितीक वळणे या वाटेवर
आठवणींचा होतो गुंता
कधी पाठीवर हात तुझा अन
कधी एकटा फिरतो नुसता

किती माणसे वळणावरली
तेव्हा तेव्हा मजला भिडली
मी ही रुजलो थोडा थोडा
त्यांची माझी वाट वेगळी

चालत आहे या वाटेवर
सरळ वाट मज नाही गमली
वळण पुढे अन मी मागे रे
गंम्मत वाटे वळणा पुढली 


वळणा पुढती वळण असे हे
वाटा इथल्या छोट्या मोठ्या
मी वाटेवर स्वछंदाने फिरतो आहे
जरी..., रुतला काटा

फिरता फिरता या वाटेवर
आयुष्याचे गाणे व्हावे
गाता गाता पुन्हा एकदा
मनात रुजलेले गवसावे


नरेंद्र प्रभू






19 October, 2013

स्वप्नामधली जाग



मी मनात हरवून जातो
हा किती काळ रात्रीचा
लाभली साथ चंद्राची
या रातीला पुनवेच्या

तू तिथे परंतू नव्हती
घोटाळत आगे मागे
आठवात पिंगा धरूनी
मी शोधत होतो धागे

त्या धूसर दवाच्या वाटा
अंगांग शिरशीरी काटा
तो प्रहर रामाचा होता
चांदण्यात बुडत्या वाटा

मग लाली तुझीया गाली
की हासत उषाच आली
कोंबडा आरवे खाली
हलकेच जाग मज आली

ही जागेपणीची स्वप्ने
की स्वप्नामधली जाग
आकळले नाही मजला
मी कीती काढला माग

नरेंद्र प्रभू



18 October, 2013

हे इथेच घडू शकतं...!




फेसबुक वर हे छायाचित्रं पाहिलं आणि एकेकाळी कशाला आजही आपल्या देशातून सोन्याचा धूर आणि तुपाच्या नद्या वाहताहेत असं आपण म्हणू शकतो असं वाटायला लागलं. कुणा विजय (की पराजय) मल्हाने हे तुप ओतून आपल्या संपत्तीचं प्रदर्शन केलं असतं तर तो त्याचा माज आहे असं आपण म्हटलं असतं, पण आज सरकार अन्नसुरक्षा उपक्रम राबवून जिथे सत्तर टक्के लोकांना पोटभरण्याची हमी देवू पाहात आहे त्या पैकीच काही लोक पुण्य कमावण्यासाठी लाखो किलो तूपाची नदी वाहू देण्यात धन्यता मानतात याला काय म्हणायचं?

आमचं घरकाम करणारी बाई वर्षभर राब राब राबते आणि चतुर्थीच्या अकरा दिवसात कर्ज बाजारी होते. असं कर्जबाजारी होण्यात तीला धन्यता वाटते. तो आपल्याला वर्षभर देतो मग त्याला अकरा दिवसात काही कमी पडू नये म्हणून तीचा हा अट्टाहास असतो. न खाणार्‍या, पिणार्‍या आणि दिसणार्‍या देवाला असं उतू जाईपर्यंत दिलं म्हणजे मग आपली जन्माची दादात मिटेल असं जर आपण आजही मानत असू तर आणखी शेकडो नरेंद्र दाभोळकर कामी आले तरी आपण असेच वागत राहाणार. काय करायचं ? भक्ती आणि विकृती या मधलं अंतर नाहीसं झालं आहे.        

  

13 October, 2013

आनंदाचं सोन लुटलं




काल महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडमध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो. प्रिय मित्र आत्माराम परब यांची प्रकट मुलाखत होती. मुंबईकरांच्या आणि हातात असेल ती वस्तू दुसर्‍याला सगळ्यांची अडचण करून विकणार्‍या रस्त्यावरच्या विक्रेत्यांच्या अडथळ्यांच्या शर्यतीत भाग घेत घेत मुलुंडला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. मुलाखत नुकतीच सुरू झाली होती. आधीपासून माहित असलेलेच सर्व प्रसंग मुलाखतीमधून पुन्हा ऎकायला मिळत होते. आत्माची लडाखची पहिली थरारक सफर, मग लडाखवर जडलेलं प्रेम, कस्टमची नोकरी सोडून पर्यटन व्यवसायात उडी घेणं, लाडाखच्या पायवाटेचा हमरस्ता बनवणं, स्वत: लडाखला एकशे एक वेळा जाणं, या सगळ्या प्रवासात ओघाने आलेले मान-अपमान स्विकारणं, हजारो पर्यटक उत्साहाने लडाखला नेणं असा सगळा प्रवास उलगडला जात होता. हे सगळं आधीच माहित होतं तरीही मला ते क्षण पुन्हा नव्याने जगता आले. त्याच्यासोबत मी लडाखला अनेकदा गेलो आहे. त्याच्या शंभराव्या लडाख सफरीचाही मी साक्षिदार बनलो त्या वेळी उर भरून आला तसा कालही येत होता.


मित्रहो आयुष्यात असे क्षण येऊन जातात. त्या वेळी डोळे उघडे ठेवून सजगपणे ते क्षण टिपून ठेवले तर मग ते अख्खं आयुष्यभर पुरतात. वर म्हटल्याप्रमाणे विशेष प्रसंगी किंवा कुठल्याही क्षणी पुन्हा पुन्हा आठवत राहातात आणि आपलं जगणं अधिक समृद्ध, अधिक आनंदी आणि रसपुर्ण होत जातं.

या कार्यक्रमाला गेल्यामुळे मला आधिच्या सहलीमधली दिक्षित,उदय बर्वे, फडके, साळवी, कांचन, उषा  अशी अनेक मंडळी भेटली. साळवी दांपत्याबरोबर तर मग त्यांच्या घरी तासभर गप्पा रंगल्या, नंतर घायाळ पती-पत्नी त्यात सामिल झाले. नंतर वैद्य जोशी  या मित्रांबरोबर मनमोकळ्या गप्पा झाल्या, घरी पोहोचायला रात्रीचा दिड वाजला. पण काल दसर्‍याआधीच मी आनंदाचं सोन लुटलं.


आज सकाळीच नितिन पोतदारांनी फेसबुकवर लिहिलं होतं.

आज विजयादशमी - दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! विचारांच सोन लुटायच असेल तर आपला मित्र परिवार मोठा असला पाहिजे. आठवड्यातुन नाहीतर किमान महिन्यातुन एक तरी नविन ओळखं किंवा मित्र जोडायलाच पाहिजे असा नियमच केला पाहिजे. आणि जर नविन ओळखं नाही झाली तर आपल्या जुन्या मित्रां पैकी एकाला तरी आठवणीने आतमीयतेन आणि प्रेमाने भेटलं पाहिजे. आपण एक पाउल पुढे टाकुन सीमोल्लघंन तर करुया!     



याचाच धागा पकडून मला म्हणावसं वाटतं की नविन ओळखीतर केल्याच पाहिजेत पण आपली रोजची माणसं मोठी (वयाने नव्हे लौकिकार्थाने) होताना पाहणं, त्या प्रसंगी उपस्थित राहणं, त्यांना प्रोत्साहीत करणं हे केलं पाहिजे. त्या प्रसंगांनी, त्या प्रसंगांच्या आठवणींनी जीवन खुप सुंदर होईल, समृद्ध होईल.

02 October, 2013

मधाचे बोट



अन मधाचे बोट ओठी
जाहली कुजबुज मोठी
हे दिले की ते दिले ?
पण झाकलेली मुठ हाती

ते खरे स्वातंत्र्य नव्हते
जाहली पहाट नव्हती
काजव्यांचा खेळ सारा
वाघळांची रात्र होती

शोषण्याची रित न्यारी
कातडी काळीच भारी
फिरंग्यांची ब्याद गेली
परी, स्वार झाले खादीधारी

अन मधाचे बोट ओठी
सबसीडीची आस होती
कोष होती रिकामे
परी, फासची 'आधार' हाती

नरेंद्र प्रभू

01 October, 2013

तुम्ही नागवेच



तुझा बाच म्हणला होता
पंच्याऎशी टक्के शिस्टीम खाते
त्याला आता बरीच वर्स झाली
आता त्याची बेरीज शंभर होते

कुणी चारा खाल्ला
कुणी स्पेक्ट्रम हाणला
कल माडीवर म्हणे
वाड्रा पण आलेला

किती पण रंगवली तरी
तुमची तोंडं काळीच दिसतात
कोळशाच्या खाणीत म्हणे
तुमचीही कामं असतात

तुझ्या पणज्याचे कपडे
पॅरिसहून धुवून यायचे
त्याचे डागही मग
तिकडेच धुतले जायचे

आता तुम्ही कपडेच बदलता
आधीचे मिडयावाल्याना देता
एवडे कपडे घातले
तरी, राव तुम्ही नागवेच दिसता

नरेंद्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates