13 October, 2013

आनंदाचं सोन लुटलं




काल महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडमध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो. प्रिय मित्र आत्माराम परब यांची प्रकट मुलाखत होती. मुंबईकरांच्या आणि हातात असेल ती वस्तू दुसर्‍याला सगळ्यांची अडचण करून विकणार्‍या रस्त्यावरच्या विक्रेत्यांच्या अडथळ्यांच्या शर्यतीत भाग घेत घेत मुलुंडला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. मुलाखत नुकतीच सुरू झाली होती. आधीपासून माहित असलेलेच सर्व प्रसंग मुलाखतीमधून पुन्हा ऎकायला मिळत होते. आत्माची लडाखची पहिली थरारक सफर, मग लडाखवर जडलेलं प्रेम, कस्टमची नोकरी सोडून पर्यटन व्यवसायात उडी घेणं, लाडाखच्या पायवाटेचा हमरस्ता बनवणं, स्वत: लडाखला एकशे एक वेळा जाणं, या सगळ्या प्रवासात ओघाने आलेले मान-अपमान स्विकारणं, हजारो पर्यटक उत्साहाने लडाखला नेणं असा सगळा प्रवास उलगडला जात होता. हे सगळं आधीच माहित होतं तरीही मला ते क्षण पुन्हा नव्याने जगता आले. त्याच्यासोबत मी लडाखला अनेकदा गेलो आहे. त्याच्या शंभराव्या लडाख सफरीचाही मी साक्षिदार बनलो त्या वेळी उर भरून आला तसा कालही येत होता.


मित्रहो आयुष्यात असे क्षण येऊन जातात. त्या वेळी डोळे उघडे ठेवून सजगपणे ते क्षण टिपून ठेवले तर मग ते अख्खं आयुष्यभर पुरतात. वर म्हटल्याप्रमाणे विशेष प्रसंगी किंवा कुठल्याही क्षणी पुन्हा पुन्हा आठवत राहातात आणि आपलं जगणं अधिक समृद्ध, अधिक आनंदी आणि रसपुर्ण होत जातं.

या कार्यक्रमाला गेल्यामुळे मला आधिच्या सहलीमधली दिक्षित,उदय बर्वे, फडके, साळवी, कांचन, उषा  अशी अनेक मंडळी भेटली. साळवी दांपत्याबरोबर तर मग त्यांच्या घरी तासभर गप्पा रंगल्या, नंतर घायाळ पती-पत्नी त्यात सामिल झाले. नंतर वैद्य जोशी  या मित्रांबरोबर मनमोकळ्या गप्पा झाल्या, घरी पोहोचायला रात्रीचा दिड वाजला. पण काल दसर्‍याआधीच मी आनंदाचं सोन लुटलं.


आज सकाळीच नितिन पोतदारांनी फेसबुकवर लिहिलं होतं.

आज विजयादशमी - दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! विचारांच सोन लुटायच असेल तर आपला मित्र परिवार मोठा असला पाहिजे. आठवड्यातुन नाहीतर किमान महिन्यातुन एक तरी नविन ओळखं किंवा मित्र जोडायलाच पाहिजे असा नियमच केला पाहिजे. आणि जर नविन ओळखं नाही झाली तर आपल्या जुन्या मित्रां पैकी एकाला तरी आठवणीने आतमीयतेन आणि प्रेमाने भेटलं पाहिजे. आपण एक पाउल पुढे टाकुन सीमोल्लघंन तर करुया!     



याचाच धागा पकडून मला म्हणावसं वाटतं की नविन ओळखीतर केल्याच पाहिजेत पण आपली रोजची माणसं मोठी (वयाने नव्हे लौकिकार्थाने) होताना पाहणं, त्या प्रसंगी उपस्थित राहणं, त्यांना प्रोत्साहीत करणं हे केलं पाहिजे. त्या प्रसंगांनी, त्या प्रसंगांच्या आठवणींनी जीवन खुप सुंदर होईल, समृद्ध होईल.

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates