लडाख....
....... प्रवास अजून सुरू आहे.
या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीच्यावेळी मी केलेल्या भाषणाचा गोषवारा.
मित्रहो,
आपल्या मध्ये मी आज बोलायला उभा आहे तो या सन्माननीय व्यक्तींमध्ये माझा मित्र
आत्माराम परब असल्यामुळेच. मित्रहो, ह्या मिलींदजींनी माझा उल्लेख काका म्हणून
केला पण या माणसाच्या सहवासात आल्यापासून मी रोजच्या रोज तरूण होत आहे. या माणसात
उत्साह, उर्जा एवढी आहे की एखाद्या लहान मुलासारख्या याला नेहमी नवनवीन कल्पना
सुचत असतात आणि आम्हा मित्रांना पालवी फुटल्या सारखं होत राहतं. मला याने मुल तर
केलच पण लेखकही केलं. या माणसाने पर्यटनाच्या क्षेत्रात जी काय वेगळी आणि साहसी
वाट शोधून काढली आणि आज तीला मळलेली वाट केली त्या त्याच्या अनोख्या प्रवासामुळे
मी आज आपल्यामध्ये उभा आहे. आत्माच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटारसायकल
प्रवासाची खिळवून ठेवणारी कथा, त्या घटनांचा थरार म्हणजे हे पुस्तक आहे. आज
पुण्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशीत होताना माझ्या मनात संमिश्र भावना
उचंबळून येत आहेत कारण या पुस्तकाचं आणि पुण्याचं हे पुस्तक जन्माला येताना
पासूनचं नातं आहे. या पुस्तकाच्या काही प्रकरणांचं वाचन या पुण्यातच झालं. तेही
रेणू दिदिंच्या घरात. मी पुस्तक वाचत होतो आणि दीदी मात्र मनाने त्या मोटारसायकलवर
स्वार झाल्या होत्या. त्याच वेळी माझ्या लिखाणाने टॉप गेअर मघे जावून वेग घेतला
होता. या पुस्तकाची जी मर्यादीत आवृत्ती लेह मध्ये जम्मू-काश्मिरच्या
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशीत झाली त्या पहिल्या प्रिंटचे पहिले वाचक लेप्टनन
जनरल रवी दास्ताने हे ही पुण्याचेच. हे पुस्तक आणि पुणं यांचं आणखीही एक नातं
म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावना श्रेष्ट सामाजसेविका, लेखिका आणि ज्या एकलव्य
न्यासाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या न्यासाच्या अध्यक्ष रेणूदिदि गावस्कर यांची
या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. असं हे पुस्तक आधीच पुण्याशी घट्ट बांधलं गेलं
आहे.
हे पुस्तक लिखाणाचा जो प्रवास झाला तो प्रवासही फारच रोमांचकारी होता ते माला इथे सांगावसं वाटतं.
सोपानदेव आणि
बहिणाबाई चौधरींमध्ये घडलेला एक किस्सा आहे. सोपानदेव एकदा विवेकानंदावर काही वाचत
बसले होते. बहिणाबाईंनी विचारलं तू हे काय आणि कुणाबद्दल वाचतोस, तर सोपानदेव
म्हणाले आई तो थोर माणूस होता तुला तो कसा कळणार? बहिणाबाई मात्र तो काय वाचतोय ते
ऎकत राहिल्या. दुसर्या दिवशी पहाटे जात्यावर दळण दळताना त्या ओवी म्हणू लागल्या
तेव्हा सोपानदेव चमकले आणि ते विचारू लागले ही स्वामी विवेकानंदावरची ओवी आहे तुला
गं कशी माहित? बहिणाबाई म्हणाल्या काल तू हेच तर वाचत होतास.
एका रात्री तीन साडेतीन तास या पुस्तकाला घटनाक्रम माझ्या या मित्राने मला सांगितला आणि सकाळी उठल्या उठल्या ‘लाडाख प्रवास अजून सुरू आहे” हे नाव आणि एकूण एकवीस प्रकरणांची नावं एका कागदावर लिहिली आणि आत्माला वाचून दाखवली. या माणसाला
आम्ही जवळची मित्रमंडळी आत्मा म्हणतो आणि हे पुस्तक मी लिहिलं असलं तरी या
पुस्तकाचा खरा ‘आत्मा’ हाच माणूस आहे. एकदा एका दिव्यातून सुखरूप बाहेर आल्यावर पुन्हा त्या वाटेला
सहसा कुणी जात नाही पण याने तर कस्टमची नोकरी सोडून हा मार्ग स्विकारला, त्या
त्याच्या जीवन प्रवासाची सुद्धा ही कथा आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात असा एक हिरो
असतो, आपल्याला त्या मनातल्या हिरो सारखं वागता आलं पाहिजे असं आतून कुठं तरी वाटत
असतं, पण जोखीम पत्करायची आपली तयारी नसते. आत्मारामने ती जोखीम पत्करली आणि
हिमालयातल्या अनेक वाटा प्रशस्त केल्या. नुसतीच जोखीम नव्हे तर कल्पकता, जिद्द,
चिकाटी, माणसं जमवणं आणि ती राखणं, झोकून देणं असा अनेक गुणांनी युक्त असा हा
माणूस एकदा का आपला मित्र झाला की मग तो सतत आपल्या संपर्कात येत राहातो. या
पुस्तकात जो थरार मांडलाय त्या प्रत्येक घटनेत याचे हे गुण आपल्याला दिसून येतील. पुस्तक
लिहून झाल्यापासून ते वाचकांना वाचायला मिळावं असं मला सारखं वाटत होतं. लिहून
झाल्यानंतर तीन वर्षांनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि आता सहा महिन्यात
हे दूसरी आवृत्ती निघत आहे.
आज
पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अनेक वाचकांचे फोन आले आणि त्यानी
पुस्तकाचं कौतूक तर केलंच पण लडाखला जायची इच्छाही प्रगट केली. या पुस्तकाचे
प्रिंटर माधव पोंक्षेसाहेब यानी हे पुस्तक छपाईला जायच्या आधी वाचून काढलं आणि आता
लडाखला जायचंही नक्की केलय. लडखच्या पर्यटनाला चालना देण्यात हे पुस्तक यशस्वी
ठरलं म्हणूनही मला आनंद वाटत आहे. पुस्तक प्रकाशीत झालं आणि लगेचच वाचकांचे
अभिप्राय यायला लागले. त्यातले बहूतेक वाचक एका दिवसात पुस्तक वाचून संपवलं
म्हणणारे होते. काही निवडक अभिप्राय या आवृत्तीत छापले आहेत पण काही मनात घर करून
राहिले त्यातला आत्माच्या आईचा अभिप्राय प्रातिनिधिक म्हणायला हवा. पुस्तकातला घटनाक्रम
तिला चांगलाच माहित होता पण शेवटच्या दोन प्रकरणातलं लडाखचं वर्णन वाचून तीने
आत्माला विचारलं “लडाखाक जावक किती पैसे लागतत रे...., यंदा माका जावचा आसा.” मला वाटतं
याच्या एवढा उत्तम अभिप्राय असू शकत नाही. दिवसागणीक वेडी स्वप्न घेवून घराबाहेर
पडणारा हा मुलगा आणि कायम कापरं काळीज घेवून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली
ही माय. तीला एक फोन करण्यासाठी ऎशी-पंच्याऎशी किलोमिटर पायपीट करत, नद्या-नाले,
डोंगर तुडवत गेलेला हा तीचा शिवबा त्या खडतर वाटेवरून परत आला त्या हृदयस्पर्षी
नात्याचीही ही गोष्ट आहे. नुकतीच आपण उत्तरांचलची ढगपुटी टिव्हीवर पाहिली असेल
तशाच प्रकारच्या ढगफुटीने हिमाचलप्रदेश मध्ये 1995 साली हाहाकार माजवला होता आणि
नेमक्या त्याच जीवघेण्या आपत्तीत आत्माराम आणि त्याचे मित्र सापडले होते त्याची
थरारक कथा म्हणजे हे पुस्तक आहे.
एखादी
संस्था माणूस म्हणून जन्माला येते हे मी याच्याबाबतीत अनुभवलय त्यामुळेच मला वाटतं
हा एक संस्था म्हणून जन्माला आलाय. अनेक व्यवधानं सांभाळत त्याचा हा प्रवास
अव्याहत सुरू आहे. मला दिदिंनी सांगितलेली एक चीनी गोष्ट सांगावीशी वाटते. एक
शेतमजूर दमून भागून घरी आल्यावर एक मेणबत्ती लावायचा, झोपी गेल्यावर त्याला नेहमी
एक स्वप्न पडायचं. त्या मेणबत्तीच्या ज्योतीमधून त्या स्वप्नाला सुरूवात व्हायची. तिथला
राजा त्याच्या जवळ येवून आपल्या मुलीचं लग्न कसं होणार म्हणून चिंतामग्न स्थितीत
बसायचा. याला वाटायचं मी यात काय करणार? मग एकदा सेवकाने शेतमजूराला सांगितलं, अरे
तो राजा तूलाच गळ घालतोय, तू त्या सुंदर राजकुमारीशी लग्न कर. मग तो राजी होतो आणि
त्यांचं लग्न होतं. तो शेतमजूर रोज एक मोणबत्ती पेटवाचा आणि त्याच्या स्वप्नाला
त्या ज्योतीमधून सुरूवात व्हायची. आत्मा असंच रोज आम्हाला ज्योतीमधलं स्वप्न देतो आणि
ती स्वप्न अशी सत्यात उतरतात. मग त्या स्वप्नांच्या अशा आवृत्या निघतात. या
प्रसंगी मला वाटतं आमच्या नव्या पुस्तकाची इथे पुण्यात घोषणा करावी. मित्रहो, ईशा
टूर्स आणि आत्माराम परब यांच्या जीवन प्रवासावर प्रभाव टाकणारी माणसं, प्रसंग आणि
किस्से यावरचं पुस्तक लिहावं असं नक्की झालं आहे त्या आमच्या नव्या पुस्तकाचंही
असंच स्वागत होईल याची मला खात्री आहे.
नुकतीच आत्माची
लडाखची शंभरावी सफर झाली आणि लगेचच एकशे एकावी पण झाली. शंभराव्या सफरीत ईशा
टुर्सचे जे दिडेशे पर्यटक त्याच्या सोबत लेह लडाखला होते त्यांच्या बरोबर मी
सुद्धा होतो. तिथे त्याचं जे भव्य स्वागत आणि सन्मान झाला तो पाहून मला आनंद तर
झालाच पण एक मर्हाठी माणूस म्हणून खुप अभिमानही वाटला. मला वाटतं हे पुस्तक
वाचताना आपल्याही मनात तशीच भावना उत्पन्न होईल. लडाखला गेला नसाल तर जावंसं
वाटेल. गेला असाल तर पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल. या दुसर्या आवृत्तीच्या
प्रकाशनाच्या वेळी मी हे नक्की म्हणू शकतो कारण तशा प्रकारचे अभिप्राय महाराष्ट्रभरातून
आम्हाला प्राप्त झाले आहेत. पुस्तक कसं आहे ते आपण वाचून ठरवालच पण हे पुस्तक
वाचल्याने लडाखप्रांत मात्र आपल्या मनात घर करून राहील अशी मला खात्री आहे.
धन्यवाद. जय हिंद, जय माहाराष्ट्र.
Thanks for sharing, nice post! Post really provice useful information!
ReplyDeleteFadoExpress là một trong những top công ty chuyển phát nhanh quốc tế hàng đầu chuyên vận chuyển, chuyển phát nhanh siêu tốc đi khắp thế giới, nổi bật là dịch vụ gửi hàng đi nhật và gửi hàng đi pháp uy tín, giá rẻ