काल घरी येऊन बातम्या लावल्या,
नव्या मुख्यमंत्र्याचा शपशविधी पहावा म्हटलं तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये ‘सेवा
हमी कायदा’ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री मा. देवेद्र फडणवीस सांगत
होते. हे कसं शक्य आहे. साडेपाचला सोहळा संपला असेल, पंतप्रधानांपासून सगळे नेते
मुंबईत आहेत, विदर्भातून जिव्हाळ्याची माणसं लोटलीत, दुर्लभ असं मुख्यमंत्री पद
लाभलय ते कुटुंब, मित्रमंडळीसह ‘साजरं’ करायची वेळ असताना लगेच कॅबिनेट बैठक होते
काय आणि त्यात निर्णय होतो काय, थोडं धक्कादायक होतं. रात्री आठ वाजता सह्याद्री वाहीनीवर
तर ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत चालू होती, लोकसत्ताचे
संपादक गिरीश कुबेर ती घेत होते. एका तासाच्या विनाव्रत्यय मुलाखतीत मुख्यमंत्री
देवेद्र फडणवीस प्रामाणिक उत्तरं देत होते. हेवा वाटला! बर्याच वर्षांनी महाराष्ट्राला
एक खमकं, आशादायी नेतृत्व लाभल्याचं जाणवत राहीलं.
आज सकाळी ११ ते ५ या वेळेत कॅबिनेटची
सलग बैठक होणार आहे. वा! खरंच ते कामाला लागले. महाराष्ट्राला चांगले दिवस
येण्याची ही सुरूवात मानुया, नव्या सरकारला शुभेच्छा देवूया.
बरे झाले देवा
देवेंद्र लाभला
मोहरा आहे हा
आश्वासक ||
ता.क.
वार्ताहर अमेय तिरोडकर यांचं एक स्टेटस फेसबुकवर वाचायला मिळालं ते बोलकं आहे. वाचा:
शपथविधीला एक पंचाऐंशी वर्षांच्या आजी भेटल्या. डॉ. थत्ते त्यांचं नाव. गाव चिपळूण. काठी टेकत रखरखत्या उन्हात अनवाणी पायाने चालत आल्या होत्या. जनसंघाच्या स्थापनेपासूनच्या कार्यकर्त्या. मी विचारलं, "आजी ह्या वयात चालत आलात...देवेंद्र तुमचा नातेवाईक लागतो का ?" म्हणाल्या..."अहो, तो ज्याचा कळस आहे ना...त्या पायाचे दगड आम्ही आहोत. आम्ही खपलोत गेली पन्नास वर्षं. हे आमचं भाग्य आहे की आमच्या हयातीत देशात आणि राज्यात एकहाती सत्ता आलेली पहायला मिळाली"
भाजपाला आज जो हा दिवस दिसलाय ना त्यामागे थत्ते आजींसारख्या असंख्य 'पायाच्या दगडांचं' योगदान आहे.
No comments:
Post a Comment