23 August, 2015

माझं लडाख


लडाखचा हा फोटो पाहून ही कविता सुचली.

दूर जाती इथल्या वाटा
कडे-कपारीच्या खाली
किती विसरू म्हणता 
याद पुसता न आली

किती उजाड डोंगर
कुठे चांद्रभूमी झाली
वाट नाहीच सरळ
असे नागमोडी खाली

खिंड संपली तरीही
पुन्हा खिंडीकडे वाट
जात असता दिसतो 
उभ्या पर्वताचा घाट

शुभ्र शिखरांच्या राशी
आणि पाचूचे ठिपके
वर आभाळ मोकळे
देई उन्हाचे चटके 

रंग रंग उधळतो
इथे आसमंत सारा
निळे हिरवे प्रवाह
आणि दुधाच्याही धारा

कधी सुसाट धावतो
वर ढग खाली वारा
आडोश्याला जागा नाही
हिमवृष्टीचाही मारा

असे रोज रोज होते
सय भरूनीया आली 
किती विसरू म्हणता 
याद पुसता न आली

नरेंद्र प्रभू

२२/०८/२०१५ 



21 August, 2015

सहलीला जाताय ?



रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून चार क्षण निवांत जगण्यासाठी, नवं काही अनुभवण्यासाठी आपण सहलीला निघतो खरं, पण जाताना, तिथे गेल्यावर टाळल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत अशा गोष्टी हमखास विसरतो.






सहलीला का जायचं? म्हणजे! मज्जा करायला, धम्माल करायला. हेच आपलं उत्तर असणार. पण महाराजा अशी मज्जा आपण खरंच करतो का? की आपण जे काय केलं त्यालाच धम्माल, मस्ती म्हणणार? नेहमीच्या ताण-तणावांपासून दूर, खूप मोकळेपणाने एका वेगळ्या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. पूर्वी सुट्टी सुरू झाली की मुलं मामाच्या गावाला जात असत. आजोळी गेल्यावर डोंगरावर फिरायला जाणं, सुरपारंब्यानी खेळणं, नदीमध्ये किंवा तलावात डुंबायला जाणं, पोहणं, पतंग उडवणं, विटी-दांडू खेळणं किंवा चांदण्या रात्री अंगणात बसून आजीकडून गोष्टी वसूल करणं. एवढं करून जेव्हा ती मुलं अपल्या घरी परतत असत तेव्हा सुट्टी जरी झरकन संपली तरी वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा त्यांच्या गाठीशी नक्कीच असे. साहसी खेळ, मैत्रीची भावना, व्यायाम अशा व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक गोष्टी आपसूकच अंगी बाणवल्या जात. आता तो काळ मागे पडला तरी सुटी सुरू होताच सगळ्यांनाच सहलीला जायचं असतं. या सहलीमध्ये आजोळी महिनाभर उधळल्यासारखं राहायला मिळत नसलं तरी अशा सहलींचं नियोजन शक्य तेवढय़ा लवकर केल्यास अनेक गोष्टी साध्य करता येतात.


सहलीचं ठिकाण नक्की करताना आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे, काय पहायचं आहे, नेमकं त्या ठिकाणी आपण का जाणार आहोत हे नीट विचार करून ठरवलं पाहिजे. न पेक्षा अभयारण्यात जाऊन मॉल शोधायचा आणि वाळवंटात जाऊन हिरवळ नाही म्हणून कासावीस व्हायचं असं होतं. सहलीचे मोजके दिवस, त्यासाठी येणारा खर्च, प्रवासात होणारी दमछाक, ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणची व्यवस्थित माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील एखादीच व्यक्ती सहल ठरवते आणि इतर सगळेजण सुट्टी आणि बजेट एवढाच विचार करून होकार भरतात आणि नंतर प्रत्यक्ष सहलीत त्यांचा बऱ्याच वेळा भ्रमनिरास होतो. मग ताडोबासारख्या अभयारण्यात गेल्यावर रोज भल्या पहाटे उठून आपण जंगलात का जातो? दुसरं बघण्यासारखं काही नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. ज्या ठिकाणी आपण जाणार असू त्या ठिकाणचे बंद वार व वेळ कोणती आहे ते लक्षात घेऊन कार्यक्रम नक्की करावा, काही वेळा बंद वारी किंवा वेळी मंडळी पोहोचतात आणि बंदची पाटी पाहून हिरमुसली होतात.

सहलीचं ठिकाण जेवढं लवकर नक्की करता येईल तेवढं अगोदर केलं की तिथे जाण्यासाठी विमान किंवा रेल्वेचं आरक्षण वेळेत करता येतं आणि पैसेही वाचतात. ज्या ठिकाणी आपण जाणार असू त्या ठिकाणचं वातावरण आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक वस्तूंची खरेदी वेळेत करता येते. मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्यांना थंडीची सवय नसते, इथल्या उकाडय़ामुळे मंडळी त्रस्त असतात आणि हिमालयात थंड हवेच्या ठिकाणी जातानाही थंडीसाठी पुरेसे कपडे बरोबर घेत नाहीत. मग पहिल्याच रात्री कडाक्याच्या थंडीत त्यांना हुडहुडी भरते. जे कपडय़ांचं तेच चप्पल किंवा बुटांचं. सहलीला नवी कोरी पादत्राणं वापरण्याचं शक्य तो टाळावंच. एकतर आपल्या पायांना अजून त्याची सवय व्हायची असते, ऐन सहलीत मग चप्पल पायाला लागणं किंवा अस्वस्थ वाटणं अशा गोष्टींमुळे सहलीची मजाच निघून जाते. दूरवरच्या प्रदेशात सहलीला जाताना लागणारी वैयक्तिक औषधं आणि त्याची डॉक्टरनी दिलेली यादी जवळ बाळगावी, आपल्याला लागणारी त्याच ब्रॅण्डची औषधं सगळीकडे मिळतातच असं नाही.

सामानाची बॅग भरताना ती आपल्याला एका हाताने सहज उचलता येईल अशी असावी. जास्त सामान असल्यास दोन बॅगांमध्ये समान वजन होईल असं विभागून भरावं. आपण कुठे जात आहोत त्यावरून बॅगचा आकार प्रकार ठरवावा. राजगडावर अवघड वाटेने ट्रेक करावयाचा असताना भली मोठी सुटकेस घेऊन आलेले गृहस्थ मी आजही विसरू शकत नाही. महाराजांनीसुद्धा सुरतेहून आणलेले पेटारे असे चढवले नसावेत. हिमालयात कडे कोसळणे किंवा अचानक आलेल्या पुरामुळे वाहनं सोडून चालत मार्गक्रमण करून दुसऱ्या वाहनात बसावं लागतं. अशा प्रसंगी प्रत्येकाला आपलं सामान स्वत: उचलण्यावाचून दुसरा पर्याय नसतो, अशा वेळी याचा उपयोग होतो. प्रवासात पाठीवरची बॅग केव्हाही उपयुक्त ठरते.

क्लब, कंपनीने ऑफर दिली म्हणून अनोळखी ठिकाणी गेल्यास अनेकदा मनस्तापच वाटय़ाला येण्याची शक्यता असते. एखाद्या जंगलाच्या ठिकाणी कुटुंबाला घेऊन गेल्यावर जवळपास काहीच सोईसुविधा नसतात किंवा आपल्याला त्याची माहिती नसते. ते ठिकाण इतरांच्या दृष्टीने खास असलं तरी आपण अशा ठिकाणी फसवलो गेल्याची भावना बाळगून खुप दु:खी होतो. तिथे गेल्यानंतर कार्यक्रम ठरवण्यात, वाहनाची सोय करण्यात वेळ निघून जातो आणि नुसता वनवास भोगून परत यावं लागतं. अशा सहलींना एकटंच न जाता मित्रपरिवार सोबत असेल तर वेगळा आनंददायी अनुभव येऊ शकतो. मात्र यासाठी इतरांना आगाऊ सूचना देऊन कार्यक्रम नक्की करावा लागतो.

हल्ली बरीच मंडळी विमानाने प्रवास करतात. या पहिल्याच दिवशीच्या विमान प्रवासात खूप घाईगडबड उडते. सामान झटपट भरण्याच्या गडबडीत विमानात बरोबर घेण्याच्या हातसामानात कात्री, ब्लेड, नेलकटर किंवा तत्सम वस्तू ठेवल्या जातात आणि सुरक्षा तपासणीत त्या फेकून द्याव्या लागतात आणि मग रुखरुख तर लागतेच, पण कामाच्या वेळी त्या आपल्याजवळ नसतात. कित्येक वेळा विमान कंपनी सामानाची ने आण करताना नेमकी आपली बॅग विसरून आलेली असते. गंतव्य स्थानावर पोहोचल्या पोहोचल्या आपल्याला पुढे निघायचं असतं. अशा वेळी फारच त्रास होतो, त्रागा होतो. जर आपण कैलास मानसरोवर, लडाखसारख्या अतिशीत प्रदेशात जात असाल तर थंडीसाठीचे काही कपडे हातसामानातच ठेवावेत म्हणजे त्रास थोडा तरी कमी होतो.

स्मार्ट फोन हा तर आधुनिक काळातल्या मानवाचा अवयवच झाला आहे, असं म्हटलं तरी तो एखाद्या वेळी हरवू शकतो, हे लक्षात घेऊन सहलीला निघण्यापूर्वी त्याचा पूर्ण बॅकअप घ्यावाच. तो हरवला तर तो जातोच, पण त्याबरोबर अमूल्य अशी माहिती, संपर्क क्रमांक, छायाचित्रं आपण गमावून बसतो. पुढे सहलभर क्षणाक्षणाला त्याच्या आठवणीने मन सैरभर होतं. माहितीचं नुकसान टाळण्यासाठी सामानाच्या पॅकअप बरोबर फोनचा बॅकअप खूपच महत्त्वाचा आहे. विदेशात सहलीला जाताना पारपत्र, त्याच्या छायांकित प्रती याची तयारी आधीच करून ठेवावी आणि वेळेच्या थोडं आधीच विमानतळावर जावं. घाई-गडबडीत अशा वस्तू हरवण्याचा संभव असतो.

या जगात अशी काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी माणूस बहुतेक वेळा एकदाच जातो. कैलास मानसरोवर, लडाख, स्कॅण्डेनेव्हिया अशांसारख्या दुर्गम प्रदेशात गेल्यावर त्या स्मृती आपल्याला कायमच्या जपायच्या असतात. एवढय़ा लांब जाणार म्हणून हौसेने नवा कॅमेरा विकत घेतला जातो. सहलीला निघण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती करून घ्यावी. पुरेशी साठवणक्षमता असलेली मेमरी कार्ड आणि जादा बॅटरी बरोबर असावी म्हणजे तिथे गेल्यावर होणारी निराशा टाळता येते. उंचावर किंवा पाण्याजवळ असताना कॅमेरा गळ्यात किंवा हातात अडकवलेला असावा म्हणजे चुकून पाण्यात किंवा खाली पडून होणारं नुकसान टाळता येतं. खाली पडलेला वजनदार कॅमेरा काही वेळा पुराणवस्तू म्हणूनच पदरी बाळगावा लागतो. उत्साहाच्या भरात असताना किमती इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घेतली पाहिजे, नाही तर कॅमेरा खिशात ठेवून सागराला मिठी मारल्यावर खट्टू झालेली तोंडं विसरता येत नाहीत.

पॅकेज टूरला गेल्यावर आपण पैसे भरलेत म्हणजे आपल्याला हवं ते करण्याचा परवाना लाभला आहे किंवा आपण हवं ते करणार अशी वृत्ती नसावी. बऱ्याच वेळा तशी ती नसतेही पण अनवधानाने आपण तसे वागतो. दुर्गम भागात वातावरण, हवामान, आजूबाजूची परिस्थिती यामुळे काही गोष्टी सक्तीच्या असतात किंवा निषिद्ध असतात किंवा आपल्याला करायच्या असल्या तरी करू नये असं सांगितलं जातं. या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं. उंच हिमालयात गेल्यावर हाय अल्टय़ुटय़ुड सिकनेसचा त्रास होतो. आठ हजार फुटांवरच्या उंचीपासून असा त्रास होऊ शकतो. कैलास मानससरोवर यात्रेत तर पंधरा हजार ते एकोणीस हजार फुटांदरम्यान यात्रा सुरू असते. कैलासची परिक्रमा सुरू होताना तर यमद्वारातून जावं लागतं. हे नाव सांकेतिक असावं. या अशा उंचीवर समूहाबरोबर जाताना 'मला माझी क्षमता तपासून पाहायची आहे' असा हट्ट बाळगू नयेच. कित्येकदा साडेपंधरा फूट उंचीवरच्या मानससरोवरात मंडळी डुबकी मारतात आणि मग आजारी पडल्याने पुढच्या परिक्रमेला मुकतात. या सहलींमध्ये आणखी एक पथ्य पाळावं लागतं ते म्हणजे खाण्याचं. विरळ हवामानात पोटात गॅस निर्माण होते, हवेत प्राणवायू कमी असल्याने, सततच्या प्रवासाने पचन संस्थेवर ताण येतो. अशा प्रवासात जड पदार्थ खाऊ नयेत किंवा कमी खावेत. बऱ्याच वेळा जेवणाचे पदार्थ मांडलेले असतात. तसे ते असले तरी आपल्याला पचेल तेवढंच अन्न ग्रहण करावं. पुढे लगेचच सुरू होणारा प्रवास कसा आहे, रस्त्यांची स्थिती, याचा विचार करूनच शक्यतो पचनाला हलके पदार्थ खावेत. इथे किती उपलब्ध आहे त्याला प्रश्न नसतो, आपणाला किती पचतं हे पाहिलं पाहिजे. कारगिल-लेह मार्गावर जुलै-ऑगस्टमध्ये जर्दाळूंच्या झाडांना फळं लगडलेली असतात. काही ठिकाणी झाडांखाली फळांचा सडा पडलेला असतो. ती फळं किती खावीत याला आपण मर्यादा घातली पाहिजे. गोड-आंबट लागणारी फळं नकळत जास्त खाल्ली जातात आणि मग पोटदुखीचा त्रास हा ठरलेला.

सहलीचा कार्यक्रम आपण आधीच ठरवलेला असतो. त्या ठिकाणी गेल्यावर आयत्या वेळी त्यात बदल करण्याची सूचना करणं किंवा तसा हट्ट धरणं चुकीचं ठरतं. चंद्रपूरला कोळशाच्या खाणी आहेत हे आपण भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं असतं. चंद्रपूरला आलो आहोत, ताडोबाला चाललो आहोत, ते तर जाऊच पण आलोच आहोत तर कोळशाच्या खाणीलाही भेट द्यायची आहे, असा प्रस्ताव मांडून आयोजकांची कोंडी करू नये. कोळशाच्या खाणीला भेट द्यायची असेल तर पूर्वपरवानगी घ्यावी लागते. शिवाय वेळेचं बंधन हे आहेच. कहर म्हणजे काही मंडळी दुसऱ्याला सूचनाही न देता परस्पर निघून जातात आणि सगळ्यांचाच खोळंबा होतो. काही वेळा अनवस्था प्रसंग ओढवतो. प्रवासात अनोळखी व्यक्तीने दिलेले पदार्थ खाऊ नयेत हे सर्वानाच माहीत आहे, पण अनोळखी व्यक्तीने दिलेला सल्लाही विचार करूनच मानायचा की नाही ते ठरवलेलं केव्हाही चांगलं ठरतं. श्रीनगरहून कारगिलला आणि पुढे लेहला जाणाऱ्या सहलीत सोनमर्गचा दुपारच्या जेवणासाठीचा जेमतेम तासाभराचा मुक्काम असताना तिथल्या घोडेवाल्याचा सल्ला मानून एक कुटुंब घोडय़ावरून पलीकडच्या डोंगरावर बर्फ 'एन्जॉय' करायला जातं आणि मग सगळ्यांचा एकूण तीन तासांचा वेळ वाया जातो, याला काय म्हणावं? सुरक्षेच्या दृष्टीनेही याचा विचार करावा लागतो. अनोळखी ठिकाणी रात्रीच्या वेळी बाहेर पडल्यावर उजेडाची सोय नसेल किंवा वीज गेली तर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणं कठीण होऊन बसतं. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना विजेरी सोबत असणं जरुरीचं आहे.

संयम, सुरक्षा आणि शिस्त या त्रिसूत्रीचा मान ठेवला, तर मग पंचमहाभूतंही अपल्याला वश होतात. सहली दरम्यान असे काही सुवर्णक्षण येतात की आपण हरखून जातो. विशाल आकाशाचं गहिरं निळेपण, मखमलीच्या अनंत छटा लेवून असलेली हिरवाई, आजवर केवळ चित्रपट आणि छायाचित्रातच पाहिलेली शुभ्र बर्फाच्छादित शिखरं, अथांग नीलसागर, वेगवेगळ्या वनश्रीने नटलेली अरण्यं, अगणित पक्ष्यांचे थवे, जंगलचे राजे, एखादंच पाऊल पडलं असावं, असं वाटणाऱ्या रानवाटा, सागर-सरितेने केवळ आपल्यासाठीच जमा केलेली पुळण, इतर रात्रींपेक्षा मोठ्ठा वाटणारा, आपल्याकडे पाहून हसणारा चंद्रमा, सोनेरी किरणांनी न्हावून निघालेली पर्वत शिखरं, खळाळत्या नद्या, मनात घर करून राहणारी माणसं, सर्वदूर पसरलेले चहाचे मळे, धुवाधार धबधबे, अवचित गाठणारा पाऊस, शिरशिरी आणणारं वारं, मध्यरात्र उलटून गेली तरी न संपणारी समुद्राची गाज, नवचैतन्य घेऊन उगवणारा रवी, टपोरी हसरी फुलं आणि धुक्यात हरवलेल्या अंधूक वाटा हे सगळं सगळं आपलं असतं. अविस्मरणीय अशी छायाचित्रं आपण कॅमेऱ्यात बंद केलेली असतात. हे सगळे हळवे, सोनेरी क्षण आपण आपल्या मनात कायमचे बंदिस्त करून परतत असतो, पुढल्या आयुष्यात सतत आठवण्यासाठी.

सहल ही फक्त त्या दिवसांसाठीच आनंद देणारी नसते तर पुनर्प्रत्ययाचा आनंद आपण पुढे कित्येकदा घेतच असतो. ते सुंदर क्षण आपण प्रत्येक सहलीत वेचायचे असतात, सकारात्मक भावनेने टाकलेलं सहलीतलं प्रत्येक पाऊल आपल्याला त्यांच्याकडे घेऊन जात असतं. आपण हसलो की जग हसतं. अनेक नव्या ओळखी होतात. कित्येक जण कायमचे जिवाभावाचे होऊन जातात. वेगळं वातावरण, वेगळी माणसं, जी कालपर्यंत माहीतही नसतात, ती आता आपलीच होऊन बसतात. शेवटी जड अंत:करणाने हात हलवायचे असतात, ते पुन्हा मिळवण्यासाठी. आयुष्यभर आनंदाची पखरण करणारी सफर आपणच सजवायची असते, फुलदाणी सारखी.

नरेंद्र प्रभू -


08 August, 2015

व्दैतअव्दैत



चित्रकार शरद तावडे
नामांकित चित्रकार शरद तावडे यांचं ‘व्दैतअव्दैत’ हे चित्रप्रदर्शन मुंबईत मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई ४०० ०२३  येथे दिनांक १० ते १६  ऑगस्ट २०१५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील. सदर प्रदर्शनाचं उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार श्री. वासुदेव कामत यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.     

चित्रकार शरद तावडे यांची विविध विषयांवरची अनेक समुह आणि एकल  प्रदर्शनं देशाच्या विविध भागात झाली असून आताचं ‘व्दैतअव्दैत’ हे प्रदर्शन अध्यात्मिक दिशेने जाणारं आहे. कैलास मानसरोवर, ग्रामिण महाराष्ट्र, देऊळ अशा अनेक विषयांना वाहिलेली तावडे यांची चित्रं रसिकांनी आतापर्यंत वाखाणलेली आहेत.

मानवी मनाचा अविभाज्य भाग असलेलं व्दैत जेव्हा साधनेच्या मार्गावर जाताना एकरूप होवून जातं तेव्हा अव्दैताची प्रत्ययकारी अनुभूती येते. अशा समाधी अवस्थेत जो अवर्णनीय आनंद होतो त्याची झलक या चित्रांमधून आपल्याला अनुभवता येईल. टाळाच्या नादमधूर स्वर ऎकायचा असेल तर त्यांचा एकमेकांवर हलकेच आघात व्हावा लागतो, पिस्तूलालाही गोळ्यांशिवाय धाक दाखवता येणार नाही, सृंखलेचही तेच आणि अगदी नेहमीच्या वापरातल्या चापालाही एकत्र आणणार्‍या  तारेशिवाय त्याला कुणी चाप म्हणणारच नाही. रोजच्या वापरातल्या वस्तूंची नेमकेपणाने मांडणी करून चित्रकाराने आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार घडवला आहे. आध्यात्मिक विषयाची कॅनव्हासवर उमटलेली ही चित्रं विरळीच म्हणावी लागतील.

आपल्या या अनोख्या चित्रांबद्दल चित्रकार शरद तावडे म्हणतात:   



सदर प्रदर्शनाचा मुंबईकर कलारसिकांनी जरूर लाभ घ्यावा. 

03 August, 2015

तुझा एकच हात दे रे



जीवन सुंदर बनवायला तुझ्यासारखा एकच मित्र पुरे
आयुष्यातले थोडेच क्षण तुझ्यासोबत जगलो खरे
त्या क्षणांचा सोबती मित्रा तुच होतास
थोडा कमी किंवा थोडा जास्तही नव्हतास

जगता जगता एक दिवस तू मला भेटलास
कसा कोणजाणे पण माझ्या हृदयात बसलास
आता हळूहळू कळतय तू म्हणजे नक्की काय आहेस
कधी भाबडा तर कधी नुसता यार आहेस

मतलबी मिठ्यांची दोस्ती मला कधी जमली नाही रे
पण तू समोर आल्यावर आवेगही आवरता आला नाही रे
म्हणूनच म्हणतो, जीवन सुंदर बनवायला फक्त तुच पुरे
शंभर दोस्तांच्या गरड्यापेक्षा तुझा एकच हात दे रे

नरेंद्र प्रभू
०२/०८/२०१५

अंतरराष्ट्रीय मैत्री दिवस        

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates