31 March, 2020

नित्य नवे रुप तुझे





नित्य नवे रुप तुझे नित्य नव्या कळा
सकाळीच देवा मंगल दर्शन सकळा

पहाटेच येती दूत लालीमा घेऊन
जग जागवाया जणू प्रकाशे रूण  

तुझ्या दर्शनाने येई जाग चैतन्याला
लक्ष लक्ष किरणांनी गाव उजळला

नवा दिस उजाडतो नवी आस डोळा
विरूनही गेला बघ अंधार हा काळा

आश्वासक रुप तुझे किती रे दयाळा
मनी अंतरी रे आता असा हा उजाळा

पक्षी जाती दिगंतरा जाग आली शिवाराला
सोनसळी पिक आले आनंद मनाला  

नरेंद्र प्रभू
३० मार्च २०२०








29 March, 2020

काळरात्र संपेल




संपेल रात्र काळी ही घोर लावणारी
येतील लाख किरणे क्षितिजी उठेल लाली

वणव्यात जाळणार्‍या भय तीव्र या धगीचे
ओला सुगंध येतो बघ मेघ पावसाचे

जाईल ना निराशा! धरुया नकोच शंका  
तू हाक नाव वेड्या गाठील तीर नौका

जाईल खास विरूनी दु:स्वप्न पाहिलेले  
झटकून टाक असले दुबळे विचार सगळे


नरेंद्र प्रभू

२९/०३/२०२० 



28 March, 2020

धरा अंतरीची वाट




कोण कुठला विषाणू
रोज सतावतो आहे
नाही कुणाचा भरोसा
जाई कुणी कोण राहे

वाटा मोकळया जाहल्या
चालायला कुणी नाही
रस्ता उजाड उजाड
धावायला कुणी नाही

पायवाटा झोपलेल्या
रस्ते ताणून दिलेले
कुणी येता अवचित
कावलेले त्रासलेले

कुठे गेली ही माणसें
सदा तुडवीत होती
कुणा कुणाच्या नावाने
उर बडवत होती

रानांमधली श्वापदे
झाली होती रानबंद
हमरस्ता चालती
नाही त्यांना हो निर्बंध

जिणे मानवाचे आता
किती कठीण जाहले
कसे खुराड्याच्या आत 
बंदीवान जाहलेले

धरा अंतरीची वाट
मन कधीचे साचले
करा आतला प्रवास
असे अथांग व्यापले

नरेंद्र प्रभू
२८/०३/२०२०

27 March, 2020

चागंले दिवस येतील..




झाडं-पेडं जिवंत राहिली तर फुलं-फळं येतील
वाईट दिवस सरून पुन्हा चागंले दिवस येतील

बंद दाराआड जनता लपून नाही बसलीय
स्वतःच दारासमोर लक्ष्मण रेषा आखलीय

जीव जगावायचाय, फुका का मारायचं?
समाजाचं देणं मानून घरातच बसायचं

स्वातंत्र्याचा लढा द्यायचाय नुसतं घरात बसून
देशसेवा सेवा घडणार आहे फक्त अंतर राखून

थोडे दिवस बंद होवून आझादीचं महत्व कळेल
आताच बाहेर पडाल तर प्राण सोडून जाईल   

थांबूया थोडं घरातच अडचण असली तरी
चागंले दिवस येतील जर राहिलात घरी   



नरेंद्र प्रभू 




26 March, 2020

राजा परिक्षीत आणि आपण



परिक्षीत राजाला राज्य कारभार सोपवून पांडव हिमालयात निघून गेले, भगवान श्रीकृष्णांनी वैकुंठाला प्रस्थान केलं आणि नेमकी त्याच वेळी कलीयुगाला सुरूवात झाली. कलीयुगाचा आरंभ झाला आणि सत्ययुग, त्रेतायुग आणि व्दापारयुगातले नियम बाजूला पडून कलीयुगातल्या सुंदोपसुंदीला सुरूवात झाली. प्रजाहित दक्ष आणि कर्तव्यनिष्ठ राजा परिक्षीत एकदा शिकारीला गेला असताना त्याचा कलीशी वाद झाला, राजाने कलीला पृथ्वीवरून निघून जायला सांगितलं पण आता व्दापारयुगाची समाप्ती झाली असून माझं इथेच रहाणं आवश्यक आहे असं कलीने सांगितलं आणि रहायला जागा मागितली, मग परिक्षीत राजाने त्याला द्यूत, मद्यपान, परस्त्रीगमन आणि हिंसा या चार ठिकाणी रहायची परवानगी दिली. पण एवढी चारच ठिकाणं पुरेशी नसून आणखी एखादं ठिकाण तरी द्यावं अशी कलिने मागणी केली. परिक्षीत राजाने मग त्याला सोन्यात रहाण्याची परवानगी दिली. मान हालवून कली निघून गेला आणि काही वेळातच गुप्तरुपात येवून  राज्याच्या मुकुटात राहू लागला.

दिवसभर जंगलात फिरून राजा दमून गेला, फिरता फिरता तो शमिक ऋषिंच्या आश्रमाजवळ आला. ऋषि ध्यानात मग्न होते, राजाने प्यायला पाणी मागितलं पण ऋषिंची समाधी लागली होती. राजाने तीन-चारदा विनंती करूनही ऋषि बोलेनात तेव्हा मुकुटातल्या कलीने संधी साधली आणि राज्याच्या विवेकाला हुलकावणी देवून, विवेकाला बाजूला सारून त्याला क्रोधयुक्त केलं, राजाने मरून पडलेला साप ऋषिंच्या गळ्यात अडकवला. तेव्हढ्यात शमिक ऋषिंचा पुत्र शृंगी नदीवरून परत आला. त्याने ते दृष्य पाहून राजाला शाप दिला की सात दिवसात महाविषारी तक्षकाच्या दंशामुळे तू मरण पावशील.

महालात परत येवून राजाने जेव्हा मुकूट काढून ठेवला तेव्हा त्याला आपली चूक कळून चुकली. त्या तक्षकापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने एका बंद पिंजर्‍यात स्वत:ला कोंडून घेतलं पण भुकेने व्याकूळ झाल्याने त्याला फलाहाराची इच्छा झाली. राजाने गोड बोरं मागवली, त्या बोरात लपलेल्या तक्षकाच्या अळीचा पिंजर्‍यात प्रवेश झाला. तीच्या दंशाने राजाचा अंत झाला.

कोरोनाच्या विषाणूने आपल्याला असंच कैद केलं आहे किंवा त्याच्यामूळे आज आपण घरात बंद झाले आहोत. राज्याच्या फळाच्या आशेने जशी तक्षकाला संधी मिळाली तशी संधी आपण कोरोनाला देता कमा नये. आज राजा आणि रंक सगळेच एका पातळीवर आले आहेत किंवा आपण सगळेच राजा झालो आहोत. परिक्षीतासारखी चूक करूया नको.           


25 March, 2020

माणूसकीच्या शत्रूसंगे





आज गुढी पाडवा, नव वर्षाचा पहिला दिवस, चैत्र पालवीने झाडं-वेली नवा साज घेऊन उभी असताना एरवी  आपण सगळे शोभा यात्रा आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यात मग्न असणार होतो. पण आज ती परिस्थिती नाही. जगभरात सन्नाटा पसरला असून आपल्या भारतात देखील २१ दिवसाची संचारबंदी लागू झाली आहे. एका विषाणूने अखिल मानवजातीला वेठीला धरलं आहे. म्हणून या संकटाचा सामनाही त्याच पातळीवर केला पाहिजे. जगात दोन नंबरची आरोग्य सेवा असणारी इटली हतबल झाली आहे, महाशक्ती अमेरिकेने आपला खजिना रिता करायला घेतला आहे. सगळे देश आपल्यापरीने या संकटाचा सामना करीत असताना या वरचा आत्तापर्यंतचा उपाय म्हणजे माणसा-माणसात अंतर राखणं.

विषाणूच्या या अक्रमणाला तोंड देण्यासाठी पुढे न येता देव मैदान सोडून पळाला असं काही दांभिक आता बोलू लागले आहेत. मित्र हो हे खरं नाही. देव आहेच, तो सामोराही येतोय, पण त्याला पहायला आधी आपला चष्मा बदलला पाहिजे, दृष्टीकोन बदलला पाहिजे. हो तो देव आता रस्त्यावर पोलिस, इस्पितळात डॉक्टर, परिचारीका, परीचारक, दारात दुधाची पिशवी ठेऊन जाणारा दुधवाला, सफाई कामगार अशा अनेक रुपात रोजच्या रोज प्रगट होत आहे. आपल्या जिवावर उदार होऊन धोका पत्करून ही मंडळी आज आपली सेवा करीत आहेत.

अशा कठिण प्रसंगी सर्दी आणि गर्दी या दोन गोष्टींची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे आणि हे करीत असताना देशासेवा करण्याची संधी दाराशी चालून आली आहे. आपापल्या दाराबाहेर पाऊल न टाकता केवळ घरात राहून आपण ही देशसेवा करू शकतो.

मित्र हो फक्त २१ दिवस घरात राहून आपण हे करू शकतो. सोप्पं आहे, आपण आपल्याच घरात रहात आहोत. (घरात राहून काय करायचं त्याच्या रोचक पोष्ट एव्हाना सर्वांनाच आल्या असतील). सोप्पं आहे म्हणतोय कारण आपल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरंनी ११ वर्षांहूनही जास्त काळ अंदमानच्या काळ कोठडीत व्यतीत करून हाल अपेष्टा सहन करून देशप्रेमाची शर्थ केली, असामान्य साहित्य संपदा निर्माण करून मराठी मातीचं ऋण फेडलं, खरंच या वेळी असं घरात बंद झाल्याबरोबर पहिल्यांदा वीर सावरकरांची आठवण दाटून आली.

माणूसकीच्या शत्रूबरोबर लढत असताना आज आपल्या देशाला आपल्या प्रत्येकाच्या सहकार्याची अपेक्षा आहे ती पुर्ण करूया. मला खात्री आहे आपण ते करणार आहोत आणि यावर विजय मिळवणार आहोत. खरंच माणूसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमूचे सुरू... अंती विजयी ठारू....  


गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! 


09 March, 2020

वसंतासवे खेळू होळी


मित्रवर्य आत्माराम परब यांनी टिपलेलं हे चित्र पाहून सुचलेली ही कविता.



रंग उषेचे लेऊन तरुवर लाल तांबडे झाले हो 
सुस्वर गाती खगवर सारे नभी भरारी घेती हो

रंग घेवूनी आकाशाचे सजली धरती आता हो 
कोण रेखितो चित्र अंबरी क्षणा-क्षणाला आता हो 

निसर्ग निर्मित रंगोत्सव हा सृजन घेऊनी आला हो 
चराचराला नवं संजीवन आनंदाचा ठेवा हो

वसंतासवे खेळू होळी रंग उसळूदे आता हो 
रंगातच राहूदे रंगूनी दंग होऊनी जाऊ हो 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates