25 September, 2009

नागडे पाय

देवाचा हप्ता या ब्लॉग पोष्ट मध्ये ‘लोक साईबाबा पुढे चप्पल काढल्यासारखं करतात पण प्रत्यक्षात बुट, चप्पल पायातच असतात’ हे माझं म्हणणं एवढ्या लवकर बुंबरँग होवून माझ्यावरच उलटेल असं मला वाटलं नव्हतं. अगदी सात दिवसात देवाने मला माझं ते विधान सपशेल मागे घ्यायला लावलं. त्याचं काय झालं महाराजा, गेले चार-पाच दिवस सकाळच्या वेळी मला एक साक्षात्कार होतोय. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलो की अनेक अनवाणी, नागडे पाय रस्त्यावरून चालताना दिसतात. (हो मी फक्त पायच पाहतो.) दोन दिवस दुर्लक्ष केलं पण ते तसे समोर येतच राहीले. सकाळीच नव्हे तर संध्याकाळी सुद्धा. हा काय प्रकार म्हणून बायको जवळ चौकशी केली तेव्हा उलगडा झाला. नवरात्रात हल्ली हे असं करतात. हे म्हणे व्रत आहे. नवरात्रात नऊ दिवस अनवाणी, अन्नपाण्या शिवाय रहायचं. (दिवसाच हा. रात्री खावून ‘पिवून’ नाचायचं).

वा..! मी या भक्तांचे चरण बघून धन्य झालो. कित्तेक जण तशी सवय नसल्याने असे काही चालतात की ती अजब चाल बघत रहावी. पण अशा टाचा घासून देव कसा पावणार ? (मला आणखी एका साक्षात्काराची वाट बघावी लागणार.) नऊ दिवस मोच्याचा धंदा बसणार, झालच तर त्या उघड्या पायांवर एखाद्याचा चपलेचा पाय पडणार.

(वर दिलेला फोटो हरेक्रिष्णजीच्या सौजन्याने)

नरेन्द्र प्रभू


24 September, 2009

असा ‘मान्य’ राजकारणी

Sudhir Sawant काल रात्री नऊच्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने जणार्या लोकलमधून माझा प्रवास चालू होता. सैनिकी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीकडे माझं सहज लक्ष गेलं, पाहतो तर ते शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत होते. बरोबर एक सहाय्यक, लोअर परेल स्थानकावर ते उतरले, मलाही त्याच स्थानकावर उतरायचं होतं. या पुर्वी एका समारंभात ब्रिगेडियर सुधीर सावंतांशी माझी तोंडओळख झालेली असल्याने मी त्याना नमस्कार म्हटलं. त्यानीही हात मिळवला. झी वाहिनीवर एका थेट प्रक्षेपण होणार्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते निघाले होते. “मंत्र्यांचा विमानाच्या खालच्या वर्गाचा प्रवास सध्या गाजत असताना आपण सामान्य माणसांबरोबर प्रवास करता हे पाहून बरं वाटलं अशी माझी प्रतिक्रीया मी त्यान देवून टाकली.

आमदार, खासदार ही पदं भुषवलेले असुनही कसलाच बडेजाव नसलेले आणि मोठेपणासाठी गोतावळा बरोबर फिरवणारे म्हणून मला त्यांचा अभिमान वाटला. त्याचबरोबर दिलेली वेळ पाळता यावी म्हणून प्रसंगी लोकल ट्रेनने प्रवास केला ही गोष्ट सुद्धा दखल घेण्याजोगी.

शशी थरूर, एस्. एम्. कृष्णा यांसारखे केंद्रीय मंत्री सरकारी बंगल्यांचा रंग पसंद नाही म्हणून तीन तीन महीने पंचतारांकीत हॉटेलात राहून सरकारचे, पर्यायाने जनतेचे पैसे (पंचतारांकीत हॉटेल साठी दिवसाला एक लाख रुपये भाडं) उधळीत असताना, विमानाच्या खालच्या वर्गाचा प्रवास जनावरांच्या लायकीचा, असले तारे तोडत असताना हा अनुभव मानाला दिलासा देणारा ठरला. राजकारणात असलेल्या काही चांगल्या लोकांपैकी ब्रिगेडियर सुधीर सावं आहेत एवढं नक्की.


नरेन्द्र प्रभू


22 September, 2009

पत्रे...! धोंडे...! कर्म...!


स्थळ: दादर येथील धुरू सभागृह , कृष्णाबाई नारायण सुर्वे लिखित मास्तरांची सावलीव डॉ. नंदा केशव मेश्राम लिखीत मी नंदाया दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा, ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे, कृष्णाबाई सुर्वे, डॉ. नंदा मेश्राम, ‘लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर, कवयित्री नीरजा, शब्दांकनकार नेहा सावंत व सुमेध वडावाला-रिसबूड आदी मान्यवरांची उपस्थिती.

सभागृह साहित्य रसिकांनी तुडूंब भरल्यामुळे मी एका बाजूला उभा होतो. माझ्या जवळच एका मी मी म्हणणार्‍या दुरचित्रवाणी वाहिनीचा व्हीडीओग्राफर उभा होता, थोड्याच वेळात त्या वाहिनीचा वार्ताहरही आला. कार्यक्रम रंगात असतानाच त्या वार्ताहाराने मला कानात विचारलं यातल्या नंदा मेश्राम कोण ? सहाजिकच होतं नंदा मेश्रामना याआधी मी सुद्धा पाहिलं नव्हतं. त्याना त्याने ओळखलं नाही तर समजण्यासारखं होतं. पण दरम्यान वक्त्यांच्या भाषणात कवी नामदेव ढसाळांच उल्लेख झाला. त्या वार्ताहाराने मला लगेच प्रश्न केला नामदेव ढसाळ उपस्थित आहेत का ? ते प्रमुख वक्ते म्हणून जाहिर झाले होते पण उपस्थित नव्हते. मी नकारार्थी मान डोलावली. जरा वेळाने सुशिलकुमार शिंदेंचा उल्लेख झाला. त्या वार्ताहाराने पुन्हा मला प्रश्न केला सुशिलकुमार शिंदें उपस्थित आहेत का ? आता मला बाजुच्या भिंतीवर डोकं आपटावसं वाटायला लागलं. सुशिलकुमार शिंदें सध्या केंद्रीय मंत्री आहेत आणि पुर्वी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मी त्रासिक चेहरा करून उत्तरलो. बरं तो वार्ताहार मराठीतच बोलत होता. एवढं अगाध ज्ञान असलेला ग़ृहस्थ हातात माईक टेकवून अशा कार्यक्रमाला पाठवला म्हणून मी त्या वाहिनीला मनोमन सांष्टांग दंडवत घातले.

एफ. एम. वर सुद्धा बरेच रेडिओजॉकी आशीच अचरट बडबड करत असतात.

आमच्या एक सारंग काकू आहेत. अस्सल मालवणी. त्या तिथे उपस्थित असत्या तर म्हाणाल्या असत्या कर्मSS झाला...! पत्रे...! धोंडे...!


नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates