04 December, 2009

वेळेचं महत्व


मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या हल्ली मुंबईत वेळेवर धावतात ते पाहून खुप बरं वाटतं. पुर्वी याच गाड्या फार उशीराने धावायच्या. त्याला कारणं अनेक असतील पण आता परिस्थिती सुधारली आहे, मात्र हे घडत असताना आधी वेळेच्या बाबतीत नाव ठेवायला जागा नसलेली पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक नेहमीच विलंबाने होताना दिसते. हे असं का घडतं? एखादी संस्था असो किंवा व्यक्ती वेळ न पाळल्याने ते किती जणांचं नुकसान करत असतात. व्यक्तीगत पातळीपासून देशाच्या पातळीपर्यंत वेळ पाळली नाही तर त्याचा विकास कसा होणार? वेळ हातातून निघून गेल्यावर जागं होवून काय उपयोग? व्यवस्थेतली ढिलाई जर अंगवळणी पडली तर मग ती सवय होते आणि नंतर मात्र कायमचं नुकसान होतं. या वेळ होण्याला ‘इंडीयन स्टॅन्डर्ड टाईम’ म्हणून हसण्यावारी नेण्यात येतं पण ही दुसर्‍यासाठी शिवी ठरते. वेळ का झाला याची कारण देण्यात काही अर्थ नाही, तर ती आपणच शोधून त्यावर उपाय केला पाहीजे. समजा आपल्याला जन्म दिल्यावर जर देवाला आठवलं, अरे याला डोळे, नाक, कान लावायचे राहीले तर वेळ निघून गेल्यावर ते आठवून काय उपयोग? (काही अभागी माणसांच्या बाबतीत हे होतं तेव्हा त्यांचे काय हाल होतात हे आपण पहातोच.)

दुसर्‍याला दिलेली वेळ पाळणं फार गरजेचं आहे. ती न पाळून आपण सतत त्याचा अपमान तर करतोच पण आपलीही किंमत त्याच्या लेखी कमी होत असते. वेळ का झाला याची कारणं नक्कीच समर्थनीय नसतात किंवा अपवादात्मक वेळा त्याला माफी असते. तुम्ही काय घरीच अहात ना? किंवा ऑफीसलाच बसलात ना? असं म्हणून आपण दुसर्‍याला गृहीत धरतो, बस मिळाली नाही, ट्राफिक जाम, अशी कारणं आपण सहज दुसर्‍याच्या तोंडावर फेकतो पण हेच कारण विमान, किंवा लांब पल्ल्याच्या गाड्याना चालत नाही याची आपणाला चांगलीच कल्पना असते, तेव्हा मात्र वेळा पाळल्या जातात. काळ कुणासाठी थांबत नाही हे एक उत्तम आहे नाही तर त्यालाही या लेट लतीफानी कारणं सांगून बेजार केलं असतं. असो, त्याचं काय झालं माझ्या एका मित्राला सकाळी सात वाजताची वेळ दिल्याने तो बिचारा साडेसहा वाजताच आपल्या कार्यालयात येऊन बसला आणि वेळ देणारे महाशय आठ वाजून गेले तरी तिकडे फिरकले नव्हते आता बोला...!

03 December, 2009

सुख वाटे जीवा......!


एखद्या दिवशी पहाटे उठल्यापासून संपूर्ण दिवसभर गाण्याची एक ओळ सारखी ओठावर येत असते. घरात, प्रवासात, कार्यालयात कुठेही गेलं तरी मग ते गाणं आपली पाठ सोडत नाही. मनात सारखं रुंजी घालत राहतं. कित्येक दिवस न ऎकलेलं हे गाणं मनात येतं कुठून? रात्रीच्या झोपे नंतर, विश्रांतीनंतर गाण्याची ती ओळ एकदा का ओठावर आली की सतत येत राहते. मन प्रफुल्लीत करत राहते. त्या दिवसाचं सोनं होतं. कोण वाजवतं ती तबकडी मनात. आज पर्यंत ऎकलेल्या असंख्य गाण्यांमधून नेमकी हीच ओळ का? बर ती गुणगुणल्यानंतर समाधान का मिळतं? परत परत त्याच त्या ओळीवर येऊन ती आपण का गात राहतो? एक गंम्मतच आहे नाही? आज उठल्या उठल्या भिमसेन जोशींनी गायीलेली

जातां पंढरीस सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटतांचि

ही ओळ ओठावर आली, सारखी येतच राहीली.

02 December, 2009

या टोपीखाली दडलय काय?


मुंबई पोलिस काय किंवा महाराष्ट्र पोलिस काय सगळं पोलिस खातं सध्या चर्चेचा विषय झालं आहे. नुकतच २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यांना एक वर्ष पुर्ण झालं. प्रसिद्धी माध्यमांमधून सुरक्षेवर पर्यायाने पोलिस खात्यावर उलटसुलट चर्चा झाली. नोकरीत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी एकेमेकांवर तोंडसुख घेतलं. त्या निमित्ताने पोलिसांमध्ये असलेल्या गटबाजीच प्रदर्शन झालं. राजकारण्यांना लाजवेल अशाप्रकारे आय्.पी.एस्. अधिकारी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. कर्तबगार पण हांजी हांजी न करणारे अधिकारी साईड पोस्टींगला आणि ताटाखालची मांजरं मोक्याच्या जागेवर ही आजची आपल्या पोलिस खात्याची स्थिती. माजी पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर एकेठिकाणी म्हणाले की पोलिसांचा वचक राहिलेला नाही. हुजरेगिरी करण्यात आणि चिरीमिरी घेण्यात गुंतल्याने त्यांचं आपल्या कामात लक्ष नाही. (हल्ली प्रशिक्षणाच्या वेळीच हे शिक्षण सुद्धा दिलं जातं.) पोलिस ड्रेसकोड पाळत नाहीत. टोपी घालत नाहीत. पण आज ती टोपी दुरचित्रवाणीवर वारंवार दिसत होती. त्याचं काय झालं, लातुर सत्र न्यायालयातून एका खुनाच्या आरोपीला पोलिस पुन्हा कारागृहात घेवून चालले होते. वाटेत या कायद्याच्या रक्षकाना भुक लागली, तहान लागली. मग त्या पोलिसानी आरोपीकडे पाहीलं. तो पण भुकेला होता. पोलिसांमधील माणूस (लाचार) जागा झाला. त्यानी त्या आरोपीला घेऊन तहान आणि भुक दोन्ही भागवायचं ठरवलं. ते बार अँड रेस्टॉरंट जवळ आले. त्या आधी त्या आरोपीचा खिसा चाचपला. सरकारी वाहन थांबवलं. बेड्या असताना आरोपीला धड खाता पीता येणार नाही म्हणून त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या. बार मध्ये मटणाचं ताट जेवायला (प्यायलासुद्धा) बसले. जवळच्याच बाकड्यावर बेड्या ठेवल्या, त्यावर टोपी ठेवली. डोळे मिटून उदरभरणाचं यज्ञकर्म करताना मात्र कॅमेर्‍याने हे दृष्य टिपलं.

आता सांगा हे असे पोलिस कुणाच्या मिठाला जागणार खुन्याच्या की सरकारच्या?


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates