मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या हल्ली मुंबईत वेळेवर धावतात ते पाहून खुप बरं वाटतं. पुर्वी याच गाड्या फार उशीराने धावायच्या. त्याला कारणं अनेक असतील पण आता परिस्थिती सुधारली आहे, मात्र हे घडत असताना आधी वेळेच्या बाबतीत नाव ठेवायला जागा नसलेली पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक नेहमीच विलंबाने होताना दिसते. हे असं का घडतं? एखादी संस्था असो किंवा व्यक्ती वेळ न पाळल्याने ते किती जणांचं नुकसान करत असतात. व्यक्तीगत पातळीपासून देशाच्या पातळीपर्यंत वेळ पाळली नाही तर त्याचा विकास कसा होणार? वेळ हातातून निघून गेल्यावर जागं होवून काय उपयोग? व्यवस्थेतली ढिलाई जर अंगवळणी पडली तर मग ती सवय होते आणि नंतर मात्र कायमचं नुकसान होतं. या वेळ होण्याला ‘इंडीयन स्टॅन्डर्ड टाईम’ म्हणून हसण्यावारी नेण्यात येतं पण ही दुसर्यासाठी शिवी ठरते. वेळ का झाला याची कारण देण्यात काही अर्थ नाही, तर ती आपणच शोधून त्यावर उपाय केला पाहीजे. समजा आपल्याला जन्म दिल्यावर जर देवाला आठवलं, अरे याला डोळे, नाक, कान लावायचे राहीले तर वेळ निघून गेल्यावर ते आठवून काय उपयोग? (काही अभागी माणसांच्या बाबतीत हे होतं तेव्हा त्यांचे काय हाल होतात हे आपण पहातोच.)
दुसर्याला दिलेली वेळ पाळणं फार गरजेचं आहे. ती न पाळून आपण सतत त्याचा अपमान तर करतोच पण आपलीही किंमत त्याच्या लेखी कमी होत असते. वेळ का झाला याची कारणं नक्कीच समर्थनीय नसतात किंवा अपवादात्मक वेळा त्याला माफी असते. तुम्ही काय घरीच अहात ना? किंवा ऑफीसलाच बसलात ना? असं म्हणून आपण दुसर्याला गृहीत धरतो, बस मिळाली नाही, ट्राफिक जाम, अशी कारणं आपण सहज दुसर्याच्या तोंडावर फेकतो पण हेच कारण विमान, किंवा लांब पल्ल्याच्या गाड्याना चालत नाही याची आपणाला चांगलीच कल्पना असते, तेव्हा मात्र वेळा पाळल्या जातात. काळ कुणासाठी थांबत नाही हे एक उत्तम आहे नाही तर त्यालाही या लेट लतीफानी कारणं सांगून बेजार केलं असतं. असो, त्याचं काय झालं माझ्या एका मित्राला सकाळी सात वाजताची वेळ दिल्याने तो बिचारा साडेसहा वाजताच आपल्या कार्यालयात येऊन बसला आणि वेळ देणारे महाशय आठ वाजून गेले तरी तिकडे फिरकले नव्हते आता बोला...!
No comments:
Post a Comment