जुन्या पिढीतला एखादा प्रज्ञावंत घ्या, किंवा आपल्या घरातली मागची पिढी घ्या तीस चाळीस वर्षांपूर्वीचं उदाहरण घेतलं तरी आपल्याला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्या काळातल्या बहुतेक जणांचं बालपण फार हलाकीत गेलं. अन्न, वस्र आणि निवारा या तीनही प्राथमिक गरजा भागवण्यासाठी त्यांना अपार कष्ट उपसावे लागले. प्रसंगी मानहानी पत्करावी लागली. पण शिक्षणाच्या, वैचारीक सामर्थ्याच्या बळावर त्यांनी आपलं जीवन समृद्ध केलं. भौतिक साधनांची कमतरता असतानाही मनाच्या श्रीमंतीपुढे त्यांना त्याची पर्वा वाटली नाही. मैलोन् मैल रस्ते तुडवत शाळा, कार्यालयं, कामाचं ठिकाण गाठलं. एकमेकांना सहकार्याचा हात देताना मैत्रीचे धागे घट्ट होत गेले. गरिबी असली तरी औदासीन्य आणि वैफल्य या मध्ये ते बुडून राहीले नाहीत. एकमेकांच्या अडचणीच्या काळात त्यांनी परस्परांना मदतीचा हात दिला. ओसरीवर थारा दिला आणि आपल्यातलं घासभर अन्नही दिलं.
आज आपण कितीही नाकारलं तरी प्रगतीचे वारे खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत, गावागावात रस्ते गेले, ज्या घरात सायकलही नव्हती त्या घरातल्या पुढच्या पिढीकडे मोटरसायकल आली, झालच तर चार चाकाची मोटार आली. आदिवासी भाग वगळता दोन वेळच्या अन्नासाठी महाग झालेला समाज काही अपवाद वगळता आता पहायला मिळत नाही. ज्याला शिकायची इच्छा आहे अशांना मोफत शिक्षणाची दारं उघडी झालेली आहेत. स्वातंत्र्यानंतर फार नाही पण एवढी तरी प्रगती आपल्या देशाने केली आहे. पण या भौतिक प्रगती बरोबर माणसाच्या मनाची श्रीमंती मात्र कुठे तरी हरवताना दिसत आहे. गावागावात दूरचित्रवाणी संचासमोर बसलेली मंडळी घ्या किंवा शहरात तासन् तास मॉलमध्ये भटकणारे नवश्रीमंत घ्या अगोदरचा शेजार्याबरोबर असलेला संवाद हरवून बसले आहेत. शुभंकरोती, परवचा कधीच इतिहासजमा झाली. आजीच्या गोष्टी गेल्या आणि त्या जागी ‘शिन्चांन’ आला. आजीने रसभरीत वर्णन करून सांगितलेल्या गोष्टी ऎकता ऎकता तो प्रसंग डोळ्यासमोर उभा करताना मुलांची कल्पनाशक्ती, तो प्रसंग अंतःपटलावर उमटणं, याबरोबर एक प्रकारचे संस्कार मनावर होत जात. काय वाईट, काय बरं. अनुकरण कुणाचं करायचं? रामाचं की रावणाचं? अगदी बालवयातच विचार पक्के व्हायचे. जीवनाची दिशा ठरवताना, प्रलोभनांशी सामना करताना, संकटांशी दोन हात करताना आतला आवाज मदत करायचा.
पेज थ्रीचं स्थान दिवाणखान्यात किंवा आताच्या हॉलमध्ये यायच्या आधी पुस्तकांचं एक कपाट असायचं. अगदी ज्ञानेश्वर, तुकोबांपासून ते गदिमा, पुलं पर्यंत काही संत, साहित्तिकांची पुस्तकं आपली जीवनसाथी असायची. काही रुपयांची पुस्तकं लाख मोलाचे विचार द्यायची. आयुष्य समृद्ध करायची. दूरचित्रवाणी संच आला आणि ती पुस्तकं कधी गायब झाली समजलच नाही. समोरच्या संचातून हावभावासहीत बोलणं, नाचणं गाणं सुरू झालं आणि रेडीमेड विचारांबरोबर आपण विचार करणं सोडलं. शेजार पाजारचा, मित्रा मित्रांमधला सोडा घरातलाच संवाद आपण हरवून बसलो. संध्याकाळ झाली की येणार्या गुरा-वासरांसारखे घरातले सदस्य घरा घरात निवार्याला येऊ लागले. फक्त खाणं आणि रहाणं या गरजा जिथे भागवल्या जातात त्याला घर म्हणायचं का? यालाच समृद्धी म्हणायचं का? चार पैसे गाठीशी असले, भौतिक साधनं मिळाली म्हणजे माणूस सुखी होतो का? रात्री बेरात्री पर्यंत चालणार्या पार्ट्यांच्या झगमगाटात किंवा सिनेमांच्या कोलाहलात शितल चांदणं किंवा प्राजक्ताचा सुगंध, पहाटवार्याबरोबरचं निसर्गाचं गाणं आपण कधी अनुभवणार?
Perfect
ReplyDelete