05 December, 2009

चला पर्यावरणाशी मैत्री करूया भाग १


(आपलं पर्यावरणच्या नोहेंबर २००९ च्या अंकामधून प्रसिद्ध झालेला माझा लेख)


मित्रहो, समजा मी तुमच्या घरी आलो. आल्या आल्या तुम्ही दिलेला किंवा मीच आणलेला खाऊचा पुडा, फरसाण खाता खाता इकडे तिकडे उडवली, प्लास्टीकची पिशवी तिथेच टाकली, डेकवर मोठ्ठ्या आवाजात गाणी लाऊन नाचलो आणि जाताना माझं आणि बायकोचं नाव भिंतीवर कोरून गेलो तर ? ( हे करण्याचं सोडून द्या या तीन ओळी वाचताच तुम्ही मला वेड्यात काढलं असेल.) बरोबर आहे खरच हा वेडेपणा आहे. असभ्यपणाचा कळस आहे, कारण मी या गोष्टी तुमच्या घरात येऊन करणार होतो. अगदी या प्रकारे मी माझ्या घरात वागलो तरी ते समर्थनीय ठरणार नाही. आपण सगळे चांगले शिकलेले, सुशिक्षीत झालच तर सुसंस्कृत, पुढारलेले मग आपण असं वर्तन कसं करू ? नाहीच करणार कारण आपण घराच्या आतल्या स्वच्छतेविषयी कमालीचे सतर्क असतो पण तीच काळजी आपण घराबाहेर पडल्यावर घेतो का? हाच खरा प्रश्न आहे.

असाच एकदा मी आणी माझा मित्र अहमदाबादला रेल्वेने जात होतो. वातानुकूलीत २ टायरचा डबा, आम्ही आमच्या जाग्यावर बसलो, गाडी सुटली. समोरची आसनं रिकामीच होती. बोरीवली स्थानकावर दोन तरूण आत आले, समोरची आसनं त्यांची होती. गाडीने मुंबई सोडल्यावर मी आणि माझा मित्र गप्पात रंगून गेलो. ते दोघे त्यांचा लॅपटॉप उघडून बसले. खाणं सुरू झालं. सुखद प्रवासात खाणं जरा जास्तच होतं. तसच काहीसं चालू होतं. खाता खाता ते पदार्थ आजूबाजूला पडत होते, झटकून टाकले जात होते. खाणं संपलं तशी ती फरसाणची पिशवी सीटवरच ठेवली गेली. थोड्या वेळाने ती खाली पडली. मंडळीनी आणखी काहीतरी खायला सुरवात केली. बोलण्यावरून दोघे इंजिनीअर वाटत होते. एवढ्या शिकलेल्या माणसाना आपण काय शिकवणार आणि अशी माणसं ऎकण्याऎवजी एकेरीवरच येण्याचा जास्त संभव असतो म्हणून आम्ही गप्पच राहीलो. मात्र आमच्या बाजूला येणारा एखादा कागद उचलून आम्ही अडकवलेल्या एका पिशवीत टाकत होतो. लांबचा प्रवास असला म्हणजे अशी एक पिशवी ठेवली की कचरा कुठे टाकू असा प्रश्न पडत नाही. तासा दिडतासाने त्यांना बोलण्यातून (खाण्यातून सुद्धा) उसंत मिळाली तसे ते उठले आळोखे-पिळोखे देताना त्यांचं लक्ष त्यानीच केलेल्या कचर्‍याकडे गेलं. आम्हीसुद्धा खाणं खात होतो पण कचरा एका पिशवीत जमा केला होता तो त्यानी पाहीला. मंडळी जरा समजूतदार होती. त्याना आपली चूक समजली होती. पायानेच कचरा एकत्र करून चहाच्या रिकाम्या झालेल्या कपात त्यानी तो टाकला. आता तो कप कुठे टाकायचा असा प्रश्न होता मी आमची पिशवी दाखवली. आभार प्रदर्शन झालं. आधीच्या त्यांच्या प्रदर्शनामुळे न बोलताच सगळं समजलं होतं. गाडीच्या खिडक्या उघड्या असत्या तर हा कचरा आधीच बाहेर गेला असता.

दुसरी गोष्ट आहे प्रवासातलीच. हिमालयाच्या उतूंग पर्वतरांगांमधून वळणं घेत गाडी चालली होती. दूरवर दिसणारी हिमाच्छादीत शिखरं न्याहाळत, निसर्गाचा तो अनुपम ठेवा पहात असतानाच अचानक एका वळणानंतर पाहीलं तर काय एक मोटार थांबलेली होती. त्या मोटारीत मोठ्या आवाजात डेक लावला होता. त्या रोंबा-सोंबा गाण्यावर चार-पाच तरूण वेडे-वाकडे हातवारे करून नाचत होते. तो निसर्ग म्हणजेच एक संगीत होतं. एवढा वेळ त्यात रममाण झालेलं माझं मन, लागलेली समाधी भंग पावली. एक रम्य संध्याकाळ जी आपण केवळ मुकपणेच अनुभवावी तिला कुठेतरी तडा जात होता आणि तसं करणार्‍यांच्या ते गावीही नव्हतं. आजुबाजुचे प्राणी-पक्षी केव्हाच भिऊन पळाले असावेत.

क्रमशः


2 comments:

  1. हा विषय म्हणजे एक दुखरी नस आहे. आणि जास्त शिकलेली लोकंच असा अनाडीपणा आवर्जुन करतात. मी स्वतः लोकलच्या फ़र्स्ट क्लासच्या खिडकीतून कचरा फ़ेकणार्या बाईला अगं इथे नको टाकूस म्हटलं तर ती रेल्वेने कुठे सोय केलीय असलं काहीसं सांगू लागली. मी स्वतः तिचा कचर्याचा कागद हातात घेऊन नंतर माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी उतरल्यावर प्लॅटफ़ॉर्मच्या कचराकुंडीत टाकला आहे.

    ReplyDelete
  2. अपर्णा, आपलं काम आपण करत राहायचं, ही लोकं सुधारतील तेव्हा सुधारतील.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates