19 November, 2009

हप्तावसुलीचे बुम्बरँग


आजच्या लोकसत्ता मध्ये हप्तावसुलीचे धडे ही अस्वस्थ करणारी बातमी वाचली. शिर्षक वाचून वाटलं नवीन पोलीस कामावर रुजू झाल्यावर वरीष्ठ अधिकार्‍यांकडून त्याना हप्ता वसुल करायला लावला जातो, पण तसं नाही तर प्रशिक्षण घेतानाच त्यात असलेल्या कसरती, व्यायाम यातून सवलत मिळण्यासाठी हे हप्ते घेतले जातात. हे भयंकर आहे. उद्या घरबसल्या प्रशिक्षण पुर्ण केलं म्हणूनही दाखला देतील हे लोक. बोगस डिगर्‍या तसे बोगस प्रशिक्षण. कमांडो प्रशिक्षणाचीही तीच गत. वा आनंद आहे. आता कुणा दहशतवाद्याना हल्ला करायलाच नको. कुणीही येईल आणि पोलिसाना टपली मारून जाईल. हातात रायफल आहे पण ती चालवता येत नाही अशी स्थिती आहे.

याला जबाबदार आपण, समाज आणि राजकारणी हेही तेवढच खरं. हे वर पासूनच झिरपत आहे. पण ते आता त्यांच्यावरच उलटणार आहे. संरक्षणासाठी दिलेला पोलिस लाच देऊन पास झाला की खराच प्रशिक्षीत आहे याची खात्री कशी देणार आणि तो कसलं संरक्षण करणार. पुढार्‍यांनो तुम्हीच सांभाळा. जनता तुम्ही आधीच वार्‍यावर सोडलेली आहे. (आता पुढार्‍यांबरोबर खाजगी बॉडीगार्ड दिसले तर नवल वाटायला नको) पोलिस आता वॉचमन सारखे होतील.

पण असा त्रागा करून कसं चालेल, हे असं व्हायचच. २६/११ ला वर्ष व्हायच्या आत तेव्हा नापास म्हणून काढून टाकलेले (त्यांच्या भाषेत नैतिक जबाबदारी) आबा पुन्हा गृहमंत्री म्हणून विराजमान झालेच ना? त्यानी कसलं प्रशिक्षण घेतलं?


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates