मुलं हळूहळू मोठी होताना
त्यांना खरच उमलू द्या
जीवन सुंदर असतं
त्यांनासुद्धा समजू द्या
पुस्तकांचं ओझं तर
त्यांच्या पाचविलाच पुजलेलं
आपल्या अपेक्षांचं ओझं
आपण आणखी त्यावर लादलेलं
शिक शिक म्हणून चौदा तास
वर्गामध्ये डांबायचं
आपणच आपल्या मुलाला
बंदिवासात ढकलायच?
शाळेत जायला कंटाळा येतो
घरात यायची भीती वाटते
नव्वद टक्के मार्क पडले
तरी मुल डोळे भरते?
कोण होणार म्हणून मागे लागून
कोण आहे हे विसरायच
जन्मजात रंगकर्मीला
शल्यविशारद बनवायच?
प्रत्येक माणूस वेगळं आहे
चैतन्याचं झाड आहे
साच्यामध्ये घालून त्याला
पुतळा का बनवायचं आहे?
झाड उंच होईपर्यंत
आपण सभोवतालचं कुपण आहोत
आपण मुलांचे मालक नव्हे तर
फक्त त्यांचे पालक आहोत
No comments:
Post a Comment