20 April, 2020

जंगलची वाट - काझिरंगा



काझिरंगा.... लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं हे राष्ट्रीय उद्यान पहिल्यांदा पाहिलं ते नोहेंबर २००५ मध्ये. आसामच्या विद्यार्थी आंदोलनानंतर राजकीय स्थिती बदलली असली तरी पुन्हा बाबाची संध्या मुळावर आल्यासारखा प्रकार होता. बॉम्बस्फोट, बंद चालूच होते आणि त्या रणधुमाळीतच बायको मुलीसह पुर्वांचलाचा २१ दिवसांचा दौरा करायचं ठरवलं आणि आम्ही निघालोही. कोलकाता, गुवाहाटी फिरत होतो तरी काझिरंगाला पोहोचल्यावर मुक्कामाला आल्यासारखं वाटलं, कारण बाकीची जमतील ती ठिकाणं पहायची पण काझिरंगा बघायचंच असं नक्की केलं होतं. संघ्याकाळी सात सव्वासातला मिट्ट काळोखात काझिरंगाच्या बोनानी लॉजमध्ये पोहोचलो तेव्हा या जंगलाचं स्वरूप लक्षात आलं नव्हतं. कारण त्या आधी दोन तासांचा प्रवास हा काळोखातच झाला होता.


दुसर्‍या दिवशी वरच्या छायाचित्रात दाखवलेल्या वाटेने काझिरंगात प्रवेश केला आणि अजून त्यामधून बाहेर पडता आलेलं नाही. या जंगलाने मनात घर करून ठेवलयं. पुढे अनेकदा आत्माराम परब यांच्याबरोबर इथे जात राहिलो. प्रत्येक वेळी हे जंगल नव्याने उलगडत जातं. हत्तीच्या उंचीचं गवत असलेल्या या नॅशनल पार्कमध्ये रान हत्ती, वाघ, हरणं असे अनेक प्राणी असले तरी इथला राजा आहे तो एकशिंगी गेंडा. त्याचं दर्शन झालं आणि तो पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रुपात दर्शन देत राहिला. पहिल्यांदा पाहिला तो हत्तीवरून सफारी करताना, नंतर संध्याकाळच्यावेळी एका मचाणावर चढण्यासाठी जात असताना काही कळायच्या आत अगदी चार हाताच्या अंतरावर दोन धुडं अचानक सामोरी आली आणि मागोमाग गार्डने घायीघायीत पुन्हा जीपमध्ये बसण्याची सुचना केली. एवढा जवळ आलाय तर फोटो घेवूया असं वाटत होतं पण त्या पेक्षा जिवाची भिती वाटत असल्याने मागे सरलो. पण त्या दिवशी त्याने सर्वांग दर्शन द्यायचं ठरवलं असावं, सुर्य अस्ताला गेल्याने आम्ही माघारी परतताना जीप थांबली कारण गेंड्याचं धुड वाटेलगतच आपल्याच नादात चाललं होतं. आता तर फ़ोटो घेतलेच शिवाय व्हिडीओही घेतला. व्हिडीओ काढातोय म्हटल्यावर त्याने रस्ता ओलांडताना सगळ्या पोज दिल्या. काझिरंगाची भेट सार्थकी लागली. 




                                            

19 April, 2020

जंगलची वाट - ताडोबा




ही ताडोबामधली वाट, हो वाटच... रस्ता म्हणायला इथे माणसाने केलेल्या खुणांपेक्षा जनावरांनी केलेल्या खुणांच जास्त, त्याचंच राज्य आहे तिथे. आपल्यासारख्या माणसांना तिथे खाणाखुणांनीच बोलायचं असतं आणि काही दिसलं की आsssवासायचा असतो. आता यातल्या खाणाखुणा करायच्या सुचना आमचे टुर लिडर रत्नदीप पाटील यांनी दिल्या होत्या तर आsssवासणे हे आपसूकच व्हायचं. असो, तर ताडोबाच्या जंगलात फिरत असताना त्या दिवशी नशीबाने आमची जीप बंद पडली आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळा अनुभव घ्यायची संधी मिळाली. जीपमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करेपर्यंत आम्हाला खाली उतरावं लागलं, एरवी मात्र असं उतरायला परवानगीच नसते. भर दुपारी त्या वाटेवर वाळलेल्या पाल्यापचोळ्यात पाय ठेवला आणि जंगलाने संवाद सुरू केला. मातीची न तुडवलेली ढेकळं बोलू लागली. आम्हाला असे अचानक आपल्या जागेवर उतरलेले पाहून काळतोंडी माकडं आणि त्याची वात्रट पोरं हातातली कामं टाकून का...य? अश्या भावनेने पाहू लागली आणि नंतर य:किंचीत मानव अशा नजरेने आमच्याकडे दुर्लक्ष करती झाली. चार दोन हरणं थोडी थबकली आणि जरा अंतर राखून चरायला लागली. कोतवालाने (Drongo) तर लक्षच दिलं नाही. एरवी गावी कोकणात आम्ही याला किरकावळा म्हणायचो त्यानेही एखादा कटाक्षही टाकला नाही किंवा विविध आवाज काढण्याच्या आपल्या कलेने इतर वन्यजिवांना काही सांगितलंच असेल तर ते आम्हाला कसलं कळणार? या सगळ्याचं काही वाटून न घेता काही फोटो काढले आणि मार्गस्थ झालो. मुक्कामावर आल्यानंतर मात्र आमचा रुबाब बघण्यासारखा होता, कारण आम्ही पुन्हा माणसात आलो होतो. इथे दुर्लक्षण्याची पद्धत वेगळी असते.  





                                      

07 April, 2020

चांदणवेडा गाव




हिर्‍यासारखा हिरवळीतला हवाहवासा गाव
टिपूर चांदणे अजून पडते, हलते आहे नांव

कशी कुणी अन कधी खोदली इवलीशी ही बाव
डोंगर कापीत कुणी काढला रस्ता इथला राव?

खळखळ वाहे निर्झर इथला नाही त्याला ठाव
तळ्यात डुंबत असती कमळे हसत खेळती डाव

आनंदाने आंबा डोले नाही त्याला हाव
स्वागत करतो सकल जनांचे रंक असो वा राव

माड-फोफळी चवर्‍याढाळीत म्हणती पणती लाव   
देवळातली घंटा जागवी मनातला सद्भाव

धुक्यात दडला असे पहुडला चांदणवेडा गाव
मनात हुरहुर, करतो काहूर  हवाहवासा गाव


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates