14 October, 2009

या नरकासूरांपासून वसूंदरेला कोण वाचवणार ?


शाळंना सुट्ट्या पडल्या आणि दिवसभर हातात पिस्तूलं घेऊन फट्... फट्... आवाज करत एकमेकांच्या मागे धावणारी मुलं दिसू लागली. जसजशी दिवाळी जवळ येईल तसतसे फटाक्यांचे आवाज वाढत जातील. करमणूकीची अनेक साधनं उपलब्ध असतानाही आणि या फटाक्यांमुळे पर्यावरणाला किती हानी पोहोचते ते माहीत असतानासुद्धा शिकलेली पालक मंडळी असं का वागतात हा खरच मोठा प्रश्न आहे. ‘फटाक्याचे तोटे’ हा प्रोजेक्ट पुर्ण करून एक अभ्यास हातावेगळा झाला म्हणून आनंदाने फटाके वाजवणारी मुलं जेव्हा मी पाहीली तेव्हा मात्र कपाळावर फटाके मारून घ्यावेसे वाटले. ‘सगळे वाजवतात, त्यात आपले’ असं म्हणून त्यात भर घालण्यापेक्षा फटाके न वाजवता प्रदूषणाला आळा घालणं किती महत्वाचं आहे हे आता तरी समजलं पाहीजे.

फटाक्यांमुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होतं. रक्तदाब वाढणे, बहीरेपण येणे, दमा, खोकला असे विकार बळावणे, स्वसनक्रियेचे आजार होणे असे अनेक त्रास फटाक्यांमुळे उद्भवतात. आगी लागण्याचा संभव असतो. फटाक्यांच्या कारखान्यात लहानमुलं काम करतात. त्यांच्या शरिरावर फटाक्यांच्या दारूचा वाईट परीणाम होवून ती प्राणाला मुकतात. कालच मतपेट्या बंद झाल्या, दिवाळीनंतर त्या उघडतील तेव्हा निवडणूकांचा निकाल लागल्यावर राज्यकारभार हातात घेवू इच्छिणारेही फटाके लावून प्रदूषणात भर घालतील.

आपण एकच करू शकतो ‘फटाके वाजवू नका’ असं आवाहन करू शकतो.


13 October, 2009

मतदान कराच


आज विधानसभेसाठीच्या मतदानाचा दिवस. पाच वर्षांनी अशी सुसंधी येते, ज्या दिवशी आपण आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवतो. पुढची पाच वर्षं कुणी राज्य करायचं, राज्याला दिशा द्यायची ते ठरवण्याचा हा दिवस. आज आपण घरी बसलात तर मग राजकारणावर बोलायचा तर आपल्याला अधिकार नाहीच पण नागरीक म्हणून असलेलं आपलं कर्तव्य आपण बजावलं नाही असं होईल, तेव्हा आज मतदान कराच.

एक मात्र ल्क्षात असूद्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या, मतदार संघ आपलीच जहागीर समजणार्‍या, पैशाचा माज आलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या, घराणेशाही जोपासणार्‍या, दारू – पैशांचं वाटप करणार्‍या उमेदवाराना पाडाच.

12 October, 2009

पराकोटीचं देशप्रेम


दुसर्‍या महायुद्धादरम्यानची गोष्ट. एक जपानी सैनिक युद्धात पकडला गेला. नाशिकमध्ये तो युद्धबंदी म्हणून स्थानबद्ध होता. सिगारेटचं त्याला व्यसन होतं. तो सतत सिगारेट ओढत असे. एका दिवशी त्याची काडापेटी संपली म्हणून ती विकत घेण्यासाठी त्याला बाजारात जायचं होतं. दोन पोलिस आणि तो अशी वरात बाजारपेठेतून निघाली. काडापेटी मिळण्याची शक्यता असलेल्या प्रत्येक दुकानात तो जायचा आणि पुन्हा काडापेटी न घेताच मागे परतायचा. तो दिवस तसाच गेला. दुसर्‍या दिवशी पुन्हा वरात निघाली शेवटी एका दुकानात त्याने काडापेटी विकत घेतली. एक अकाडापेटी विकत घेण्यासाठी त्याने एवढा वेळ का लावला, तर त्याला स्वतःच्या देशात तयार झालेलीच काडापेटीच विकत घ्यायची होती. ज्या वेळी त्याला ‘Made in Japana काडापेटी मिळाली तेव्हाच त्याने ती विकत घेतली. स्वदेशी वस्तू विकत घेण्यासाठी त्याने आपलं व्यसनही बाजूला ठेवलं.

प्रकाशभाई मोहाडीकरांनी सांगितलेली ही गोष्ट ऎकून मला आत्मपरिक्षण करावसं वाटलं. आपण असा विचारतरी करतो का ? मंदीच्या या काळात रोजच्या रोज आपण किती विदेशी बनावटीच्या वस्तू विकत घेतो. देशप्रेम रक्तातच असावं लागतं एवढं खरं.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates