10 March, 2009

लोणार सरोवर



औरंगाबाद पासून १७० कि.मी. अंतरावर बुलढाणा जिल्ह्यात लोणार हे गाव आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपुर्वी अवकाशातून अशनीपात होऊन या ठिकाणी १८७५ मीटर व्यासाचं एक सरोवर तयार झालं. जगातील अशनीपातापासून तयार झालेलं हे तिसर्‍या क्रमांकाचं मोठं सरोवर आहे. आजुबाजुला गोड्या पाण्याचे स्त्रोत असले तरी या विवरात साठलेलं पाणी मात्र समुद्राच्या पाण्यापेक्षा खारट आहे.
लोणारला जाण्यासाठी औरंगाबादहून पहाटे सहा वाजता निघालो. वाटेत पठारी प्रदेश असल्याने दूर क्षितीजापर्यंत पसरलेली शेतं दिसत होती. काही ठिकाणी नदीवर घालतलेले बांध दिसले तर एका ठिकाणी नदीच्या पात्रातच विहीरी दिसल्या . वाटेत सिंधखेडराजा हे विरमाता जिजाऊ यांचं जन्मगाव लागलं. या प्रदेशावर मोगलांची सत्ता असल्याने जिजाबईला त्यांच्या जाचाची चांगलीच कल्पना होती म्हणून स्वराज्याचे स्वप्न जिजाऊने पाहीले व पुढे शिवबाला दाखवले. त्याची मनात उजळणी चालू होती. हा पठारी प्रदेश दुरवर नजर फिरवता येते, पण कोकणात, पच्छिम महाराष्ट्रात जसे कडे-कपारी आहेत तशी परिस्थीती इथे नाही. शिवजीमहाराजांची युध्दनीती विषेशतः गनिमी कावा म्हणूनच मोगलांना महागात पडला व दक्षिण विजय मिळवता आला नाही.
भुकेने इतिहासातून बाहेर काढले. सिंधखेडराजा गावात एका ठिकाणी चवदार मुगवडे, भजी, चहा मिळाला. पोटपुजा झाली बरं वाटलं. जवळच द्राक्षबागेतून काढून आणलेली ताजी द्राक्ष मिळाली, छान होती. ' वेडी-वाकडी वळणे वाहने सावकाश हाका ' असले फलक रस्त्यांवर नव्हते लांबवर दिसणारे सरळ रस्ते, प्रवास मजेत चालला होता. दोन्ही बाजूला असलेली शेतं सोबत करत होतीच.
एक वळण घेऊन निघालो आणि लोणारचं अंतर दाखवणारे मैलाचे दगड दिसायला लागले. लोणारची माहिती देणारे श्री. बुकदाणे सर भेटतील का ? मनात विचार आला. बुकदाणे सर भेटले तर काम सोप होईल, पण बुकदाणे सर प्रकृती अस्वास्थ्या मुळे भेटले नाहीत त्यानी आपला विद्यार्थी शैलेश सरदार (मो.. ९७६३५४५१६९) याला पाठवलं . या पठ्ठ्याने मात्र पुर्ण परीसर, लोणार सरोवर , रामगया हे यादवकालीन रामाचं मंदिर (या मंदीरात आता रामा ऎवजी कृष्णाची मुर्ती आहे.) दाखवलं . अरे हो पण आम्ही सुरवात कमळजा देवीच्या मंदीरा पासून केली. तर हे कमळजादेवीचं मंदिरही यादव कालीन आहे. या मंदीरात चक्रधर स्वामींचं आसन आहे. कमळजादेवी हे तेथील ग्रामदैवत , दरवर्षी जत्रा भरते त्यामूळेच एवढ्या सुंदर कोरीव मंदीरात ग्रामस्तानी रंग काढून मुळ सौंदर्य नष्ट केलं आहे. अजून बाहेरून रंग काढलेला नाही हे नशीब. अशनीपातामूळे इथल्या दगडात चुंबकीय शक्ती निर्माण झाली आहे. होकायंत्राची सुई गोल फिरते. पुढे तळ्याच्या काठाने चालत गेलं की विष्णू मंदिर, रामगया मंदिर , रामेश्वराची आयताकृती पिंडी (दक्षिण भारतात अशीच पिंडी आहे.) अशी मंदीरे लागतात. संपन्न कला-संकृतीचं प्रतीक. वर चढून आल्यावर लोणारच्या धारेजवळ गेलो. हे धारेचं पाणी अठरा कि.मी. वरून जमिनीखालून येतं, बरेच लोक इथे आंघोळ करताना दिसले.
पुढे ५०० मीटरवर मोठा मारूती मंदिर आहे. हा मारूती हात उशाला घेऊन झोपलेला आहे. त्याच्या जवळ होकायंत्र नेल्यास सुई फिरते आणि चुकिची दिशा दिसते. हे मंदिर कानेटकर घराण्याच्या मालकीचं आहे. एवढं सगळं करेपर्यंत एक वाजून गेला होता. दैत्यसुदन मंदीराला भेट देऊन आम्ही शैलेशचा निरोप घेतला. वेळ व पैसा सार्थकी लागला होता.
परत येताना सिंधखेडराजाला आलो तर तिथे एक मिरवणूक निघाली होती. बहुतेक ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सदस्यांची असावी. उत्साही कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांना उचलून घेतलं होतं. ते अवघडले होते. सहन करता येत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थीती, पुन्हा खालचा चिडता किंवा चिरडता जाऊ नये याची काळजी घ्यावी लागत होती. सकाळी जाताना जिजाऊचं वाटलेलं हे गाव आता जागं झालं होतं. सिंधखेडराजाचे आताचे राजा माणसांवर स्वार झाले होते. आताचं राजकारण पण तसच नाही का ? थेट माणसांना चिरडणारं .

जालना जवळ आलं तसं रस्त्याशेजारी धाबे, रेस्टॉरंटची गर्दी दिसू लागली. त्यापैकी एका धाब्यावर जेवलो. जेवण चागलं होतं. १२ तासांहून जास्त फिरुनही उत्साह कायम होता.  
लेखकः नरेंद्र  प्रभू


3 comments:

  1. आठ्वणी ताज्या झाल्या. देवगिरी किल्ला, वेरुळ अजिंठा घृष्णेश्वर भद्रा मारुती आणि म्हैसमाळ या औरंगाबादच्या आसपास च्या स्थंळांना आपण भेट दिलीत का?

    ReplyDelete
  2. नुकताच मी औंरगाबादला गेलो होतो, पण लोणारला नाही गेलो, आता हे ्वाचल्यानंतर वाटते आपण चुक केली

    ReplyDelete
  3. Recent findings have shown the water of lonar contain the bacteria having the property to repel the radioactive rays.We should conserve this only unique gift bestowed to us by the universe

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates