26 November, 2009

राजकारण्यांचं पुनर्वसन झालं बाधीतांचं कधी होणार?


बरोबर एक वर्षापुर्वी साधारण याच वेळी मी दूरचित्रवाणीवर मुंबईवरच्या हल्ल्याची बातमी पाहीली. पार्ल्याच्या पुलाजवळ झालोल्या बॉम्बस्पोटचा आवाज मला घरी बसूनच ऎकू आला. काहीतरी अघटीत घडतय याची जाणीव झाली. आपण सुरक्षित नाही असं वाटत राहीलं. पुढचे तीन दिवस मग तो विध्वंस उघड्या डोळ्यांनी पहातच होतो. त्याचीच एक प्रतिक्रीया म्हणून हा ब्लॉग सुरू केला. आज २६/११ च्या त्या घटनेला एक वर्ष पुर्ण होतय. काय सुधारणा झालीय आपल्यात, पोलिसात? एक NSG सेंटर, काही वाहनं. तीच बुलेटप्रूफ जॅकेट आणि त्याच बंदूका. एक गोष्ट मात्र तत्परतेने केली गेली, ती म्हणजे राजकिय पुढार्‍यांचं पुनर्वसन. चार महिन्यात विलासराव केंद्रात मंत्री झाले. वर्षाच्या आत आबा त्याच गृहमंत्री पदावर आले. शिवराज पाटील वाट बघताहेत.

या हल्यात जे शहीद झाले त्यांच्या कुटूंबियांचं, जे जखमी झाले त्यांचं पुनर्वसन कधी होणार? ते आता पहायच. आपण शहीदाना श्रद्धांजली अर्पण करू शकतो आणि जखमींना सहानभुती.तुम्ही तिथे होता, म्हणून आम्ही जिवंत आहोत.
आपल्या शौर्यला प्रणाम.

23 November, 2009

पुर्वांचलाची चित्र सफर भाग ५


सकाळी भालुकपाँग सोडलं तेव्हा अजून सहा वाजायचे होते. आज आम्हाला तवांग गाठायचं होतं. भालुकपाँग हे असम राज्यातलं शेवटचं गाव. जीप मध्ये बसल्या-बसल्या दूसर्‍या मिनीटाला अरूणाचल प्रदेश हे राज्य सुरू झालं. मग तवांग येईपर्यंतचे निसर्गाचे विभ्रम केवळ पहात राहण्यासारखे.
22 November, 2009

वस्त्रहरणचा पाच हजारी प्रयोग


प्रयोग पाच हजारावा

काल षण्मुखानंद हॉलमध्ये वस्त्रहरणचा पाच हजारावा प्रयोग जल्लोषात साजरा झाला. गेल्या आठ दिवसांपुर्वीच शो हाऊसफुल्ल झाल्याच्या बातम्या होत्या. प्रेक्षागृह तुडुंब भरलं होतं. सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती मछिंद्र कांबळींवरचा स्नेह प्रगट करत होती. पाहुणे कलाकर सर्वश्री प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे, सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, जितेंद्र जोशी, किशोर चौघुले, जयवंत वाडकर यांनी तर बहारच उडवून दिली होती. एवढा हशा त्या प्रेक्षाग़ृहाने क्वचितच पाहीला असेल. नेहमी समरस झाल्याचं नाटक करणारे राजकिय नेते खुर्चीला खिळून होते.

मच्छिंद्र कांबळीं हे विनोदाचे बादशहा होते हे निर्विवादपणे मान्य करावं लागेल. नाटक मग ते मालवणी असो की मराठी रंगमंचावर प्रवेश केल्याक्षणी ‘तो आला, त्याने पाहीलं आणि त्याने जिंकलं’ हे समिकरणच होवून गेलं होतं. मच्छिंद्र कांबळींची अनेक नाटकं पाहीली संवाद फेक, टायमींग आणि अभिनय या सर्वातच तो ‘बाप’ माणूस होता. कारकीर्दीच्या अत्युच्य शिखरावर असतानाच त्यानी घेतलेलीच एक्झीट म्हणूनच चटका लावणारी होती. कालचा प्रयोग जसा उत्सवी होता तसाच तो मच्छिंद्र कांबळींना आदरांजली वाहणारा पण होता. जातीचा कलावंत असलेल्या मच्छिंद्र कांबळींनी मालवणीला प्रतिष्ठा मिळवून दिली तिला सातासमुद्रापलिकडे नेलं. त्या मालवणी राजाक मानाचो मुजरो.

21 November, 2009

यांचा निषेध केलाच पाहीजे...!


काल आय्.बी.एन्. लोकमत वाहिनीच्या मुंबई आणि पुणे कार्यालयांवर हल्ला झाला. महिलासहीत पत्रकार, कर्मचार्‍यांना मारहाण झाली. त्याची दृष्य आपण सर्वांनी दूरचित्रवाणीवर पाहीली. त्या हल्ल्यांचा सर्व प्रथम मी निषेध करतो. हा लोकशाहीच्या चौथ्यास्तंभावरचा पर्यायाने लोकशाहीवरचा हल्ला आहे हेही तेवढच खरं. पण या राज्यात कायद्याची भिती आहे कुणाला?

एका वृत्तपत्रवाहिनीवर हल्ला झाला, तो थेट दाखवला जात होता, पोलिसाना लगेच कल्पना दिली गेली तरीपण पोलिस पाऊण तासानंतर आले. मुंबई म्हणजे काही भामरागड किंवा गडचिरोली नव्हे, पोचायला वेळ लागतो. जाणूनबुजून उशिरा येणार्‍या पोलिसांचाही निषेध झालाच पाहिजे.

या आधी लोकसत्ताचे संपादक श्री. कुमार केतकर यांच्या घरावर जिवघेणा हल्ला झाला, त्या हल्याच्या बाबतीत काय कारवाई झाली? त्या हल्यामागचा सुत्रधार म्हणून आमदार मेटेना राष्ट्रवादी पक्षातून काढून टाकलं आणि पुन्हा (लोकांची स्मृती अल्पकाळ टिकते असं मानून) पक्षात सामावून घेतलं. आताचे गृहमंत्री आर्.आर.पाटील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतात. त्यांचा ही निषेध झालाच पाहिजे.

स्वाभिमान संघटनेच्या गुंडांनी काही दिवसांपुर्वी निरपराघ तरूणाला मारहाण केली होती. त्याचं काय झाल? कुणाला शिक्षा झाली? त्याच्या सुत्रधाराला काय शिक्षा झाली? त्याचाही निषेध झालाच पाहिजे.

दोनच दिवसांपुर्वी पोलिस प्रशिक्षणात हप्तेवसुलीचा कळस झाला आहे अशी लोकसत्ताची हेड लाईन होती वाचाळ आबा त्यावर मात्र मुग गिळून गप्प का आहेत? त्याचाही निषेध झालाच पाहिजे.

19 November, 2009

हप्तावसुलीचे बुम्बरँग


आजच्या लोकसत्ता मध्ये हप्तावसुलीचे धडे ही अस्वस्थ करणारी बातमी वाचली. शिर्षक वाचून वाटलं नवीन पोलीस कामावर रुजू झाल्यावर वरीष्ठ अधिकार्‍यांकडून त्याना हप्ता वसुल करायला लावला जातो, पण तसं नाही तर प्रशिक्षण घेतानाच त्यात असलेल्या कसरती, व्यायाम यातून सवलत मिळण्यासाठी हे हप्ते घेतले जातात. हे भयंकर आहे. उद्या घरबसल्या प्रशिक्षण पुर्ण केलं म्हणूनही दाखला देतील हे लोक. बोगस डिगर्‍या तसे बोगस प्रशिक्षण. कमांडो प्रशिक्षणाचीही तीच गत. वा आनंद आहे. आता कुणा दहशतवाद्याना हल्ला करायलाच नको. कुणीही येईल आणि पोलिसाना टपली मारून जाईल. हातात रायफल आहे पण ती चालवता येत नाही अशी स्थिती आहे.

याला जबाबदार आपण, समाज आणि राजकारणी हेही तेवढच खरं. हे वर पासूनच झिरपत आहे. पण ते आता त्यांच्यावरच उलटणार आहे. संरक्षणासाठी दिलेला पोलिस लाच देऊन पास झाला की खराच प्रशिक्षीत आहे याची खात्री कशी देणार आणि तो कसलं संरक्षण करणार. पुढार्‍यांनो तुम्हीच सांभाळा. जनता तुम्ही आधीच वार्‍यावर सोडलेली आहे. (आता पुढार्‍यांबरोबर खाजगी बॉडीगार्ड दिसले तर नवल वाटायला नको) पोलिस आता वॉचमन सारखे होतील.

पण असा त्रागा करून कसं चालेल, हे असं व्हायचच. २६/११ ला वर्ष व्हायच्या आत तेव्हा नापास म्हणून काढून टाकलेले (त्यांच्या भाषेत नैतिक जबाबदारी) आबा पुन्हा गृहमंत्री म्हणून विराजमान झालेच ना? त्यानी कसलं प्रशिक्षण घेतलं?


17 November, 2009

अनावर ‘मोह’ आणि मोहाची फुले


सरकार बनवण्याच्या ओढाताणीत पंधरा दिवस गेले. मालदार, मलईदार वगैरे खाती वाटली गेली. कुणाच्या मुखी लोणी तर कुणाच्या तोंडी अंधार आला. पण मंत्री कल्पक असेल तर कुठचही खातं कमावत होवू शकतं. पुर्वी पक्षातून निलंबीत झालेले पण नंतर गोड मानून घेतलेले ह.भ.प. मंत्री अशा पैकीच एक. मागच्या वेळी त्याना वन खातं मिळालं तेव्हा महाराष्ट्रातील एकूण वन क्षेत्र कमी झालं. बाकीच्या वन जमीनीचा त्यानी ‘विकास’ केला. आता आदिवासी विकास करण्यासाठी जाणत्या राजाने त्याना नेमलं. त्यांची नजर मोहावर आधीपासूनच होती. जंगलात गेल्यावर त्याना मोहाची फुलं दिसायची. आदिवासी त्या फुलांपासून दारू बनवतात हे त्यानी हेरलं. खात्याचा कारभार हाती आल्या आल्या त्याना त्या मोहाची ‘हर्बल लिकर’ बनवावी असा साक्षात्कार झाला. आदिवासींच तेवढच एक अन्न सरकारी कचाट्यातून सुटलेलं. तेसुद्धा आता हे ह.भ.प. हिरावून घेवू पहाताहेत.

उसाची शेती करून शेतकरी श्रीमंत झाला नाही ना कारखाना मात्र संचालक मंडळ हवेली पासून हवाला पर्यंत पोहोचलं. द्राक्ष बागायतदार उपाशी आणि वाईनरीवाले तुपाशी. आता या ‘हर्बल लिकर’मुळे काय होणार ते वेगळं सांगायला हवं का?

16 November, 2009

सुखांत – एक चर्चा


येत्या वीस तारीखला सुखांत हा एक वेगळ्या विषयावरचा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक – संजय सुरकर, निर्माती- अनुया म्हैसकर, लेखक – किरण यज्ञोपवीत, कलाकार- अतुल कुलकर्णी, ज्योती चांदेकर, कविता मेढेकर, तुषार दळवी अशी टिम आहे.

एका आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलाला वाढवून त्याला मोठं केलं, नावारूपाला आणलं. ती आईच एका दिवशी अपघातात सापडते. तिचं शिर सोडून संपूर्ण शरीर निकामी होतं. संवेदना जातात. मुलगा, सुन तिचं सगळं करायला तयार असतात पण त्या स्वाभिमानी स्त्रीला इच्छामरण पाहीजे असतं. आपल्याच वकिल मुलाला ती आपला खटला न्यायालयात लढायला लावते. आईवर अतिशय प्रेम करणारा मुलगाच न्यायालयात तिच्यासाठी दयामरण मागतो. नको असताना जगवण, की हवं असताना मरण देणं म्हणजे प्रेम? खरा न्याय कोणता? इच्छा-मरण कायद्याने मंजूर करावं का? असा प्रश्न विचारणारा हा चित्रपट आहे.

वरील कलाकार, निर्माती, लेखक यांच्या संवादाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचा नुकताच योग आला. चर्चेतून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली. अतुल कुलकर्णीचा नेहमी प्रमाणे वेगळ्या धाटणीचा एक चित्रपट, पहायला हवा.

कळी उमलताना

माझ्या मित्राच्या फर्माईशीमुळे ही कविता पोस्ट करतो आहे.


एक कळी उमलताना

रोज पाहतो खुलताना

खोड काढली कधीतर

फुरंगटून बसताना


एक कळी उमलताना

पहाटवारा झेलताना

डोळे अर्धेच उघडून

शाळेसाठी जाताना


एक कळी उमलताना

आनंदाने बागडताना

अभ्यासाच कोडं सोडवत

थकुन जाते निजताना


एक कळी उमलताना

क्षणोक्षणी फुलताना

मी मात्र रमुन जातो

तिचं बालपण आठवताना


15 November, 2009

पुर्वांचलाची चित्र सफर भाग ४


काझीरंगा अभयारण्य सोडवत नव्हतं, तरी पण त्याला टाटा करून आम्ही तेजपूरच्या दिशेने निघालो. वाटेत फिरत फिरत रात्रीचा मुक्काम भालुकपाँगला करायचा होता. दरम्यान हे काही फोटो मिळाले. असामी कलेचे नमूने पहाण्या सारखे, निसर्गही तेवढाच प्रेक्षणीय.


14 November, 2009

मालक नव्हे पालक


मुलं हळूहळू मोठी होताना

त्यांना खरच उमलू द्या

जीवन सुंदर असतं

त्यांनासुद्धा समजू द्या


पुस्तकांचं ओझं तर

त्यांच्या पाचविलाच पुजलेलं

आपल्या अपेक्षांचं ओझं

आपण आणखी त्यावर लादलेलं


शिक शिक म्हणून चौदा तास

वर्गामध्ये डांबायचं

आपणच आपल्या मुलाला

बंदिवासात ढकलायच?


शाळेत जायला कंटाळा येतो

घरात यायची भीती वाटते

नव्वद टक्के मार्क पडले

तरी मुल डोळे भरते?


कोण होणार म्हणून मागे लागून

कोण आहे हे विसरायच

जन्मजात रंगकर्मीला

शल्यविशारद बनवायच?


प्रत्येक माणूस वेगळं आहे

चैतन्याचं झाड आहे

साच्यामध्ये घालून त्याला

पुतळा का बनवायचं आहे?


झाड उंच होईपर्यंत

आपण सभोवतालचं कुपण आहोत

आपण मुलांचे मालक नव्हे तर

फक्त त्यांचे पालक आहोत


खेळू खरेच रंगेआज बालदिन, घरातलं मुल घराला घरपण देतं, ध्यानी,मनी,स्वप्नी मग ते मुलच वास करतं. माझी छकूली ऋचा त्याला अपवाद कसा असेल? आज तिच्यावर लिहीलेली हे कविता.


इवल्याच पावलांचा

मज नाद ऎकू येतो

तू उठवले मला की

स्वप्नात भास होतो?


तव पदरवात असते

लय,ताल खेळण्याची

मज वाटते असे की

आताची खेळी माझी


तू डाव मांडला हा

मी खेळलो जरासा

स्वप्नास ज्ञात सारे

जागेपणी निराशा


तू थांबली परंतू

मी खेळतोच आहे

डोळे सताड उघडे

मी, स्वप्नात राहू पाहे


येना खरीच आता

खेळावयास संगे

मी, भांडणार नाही

खेळू खरेच रंगे


12 November, 2009

लातों के भुत बातों से नही मानते

हिंसेचा पुरस्कार कुणीच करू नये. प्रश्न चर्चेनेच सोडवले पाहीजेत हेही खरं. पण हे सगळं कुणाबरोबर? समोर तशी व्यक्ती असेल तर आणि तरच. अबू आझमी आणि लालू यादव सारखे बैल समोर आले तर त्यांच्या नाकात वेसणच घातली पाहीजे. निवडून आल्याचा उन्माद आणि जाणून बुजून काढलेली खोड याला जशास तसे उत्तर देणे आवश्यक होतं. अरे महाराष्ट्र सहिष्णू आहे म्हणूनच तुम्ही इथे येवून हे बोलू शकता. आधी लाथ मारायची आणि मग सॉरी म्हणायचं हे यांनी आधीच ठरवून केलं होतं. त्याला योग्य ते उत्तर मिळालं. एकाच्या कानाखाली आवाज काढल्याबरोबर किती ठिक़ाणाहून आवाज आले बघा. तो मुलायम कठोर बोलला. रामविलास (की बिलास ?) तो पण बोलला, सोमनाथ चटर्जीचा रसगुल्ला बाहेर आला. (हेच ते महाशय, सौरभ गांगुलीला कर्णधार पदावरून दूर केलं तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष असूनही यांनी गळा काढला होता.) आपली वेळ आली की सगळे प्रादेशिक होतात. बाकी चिल्लर बरेच बकबकले. पण तो बैल लालू देशाचे तुकडे होतील म्हणतो. हा बघा किती मस्तवाल राष्ट्रगीत सुरू असताना कसा बसलाय. याला लाथ घालून नको उठवायला? (अधिक माहितीसाठी या बैलाला कोणीतरी आवरा रे...... हा सरदेसाईंचा ब्लॉग वाचा) अशांना बोललेलं कळेल? अजून तो कृपा कसा बोलला नाही? की कोडं (कोडा ? ) सोडवत बसलाय?


11 November, 2009

ती चिंब चिंब ओली

ती चिंब चिंब ओली

दवात भिजली, धुक्यात न्हाली

तरूवेलींना उठवत आली

चिंब चिंब ओली ॥


तृणपात्यांवर नाजूक नक्षी

साखर झोपेत अजून पक्षी

शुक्रतारका क्षितिजा वरती

धुसर आता झाली ॥


सडा साजरा प्राजक्ताचा

नाद राऊळीच्या घंटेचा

लगबगीने सुवासिनी ही

सडा अंगणी घाली ॥


पुर्वेला मग आली लाली


रात्र संपली, पहाट झाली

दवबिंदूंनी धरती न्हाली

झाली नखशिखांत ओली ॥


10 November, 2009

वस्त्रहरण प्रयोग क्र. ५०००


तमाम मराठी मुलूखाला, नाट्यरसिकांना आणि विशेषकरून मालवणी जनतेला आनंदाची पर्वणी म्हणजे वस्त्रहरण या नाटकाचा होऊ घातलेला ५००० वा प्रयोग. मा. गंगाराम गव्हाणकर यांनी लिहीलेलं आणि स्व.मच्छिंद्र कांबळी यानी गाजवलेलं आणि जगवलेलं हे नाटक खरंतर शिवाजी पार्क येथे देशाच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरं व्हावं अशी मच्छिंद्र कांबळींची इच्छा होती. ते हयात असते तर ते झालंही असतं. तसा योग नव्हता, पण आता वस्त्रहरणचा ५००० वा प्रयोग षण्मुखानंद हॉलमध्ये २१ नोव्हेंबरला होत आहे. पु.ल. देशपांडे यांनी अस्सल फार्स म्हणून गौरवलेलं हे नाटक जेव्हा सातासमुद्रा पलिकडे पयोग करायला चाललं होतं तेव्हा, मास्टर भगवान, डॉ.काशिनाथ घाणेकर, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, अचिन पिळगावकर, विजू खोटे, बाळ धुरी ह्या रथी-महारथीनी मदतीसाठी एक प्रयोग षण्मुखानंद हॉलमध्येच केला होता. आता २१ नोव्हेंबरला पाहुणे कौरव-पांडव आहेत, प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे, सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, जितेंद्र जोशी, किशोर चौघुले, जयवंत वाडकर आणि तात्या सरपंच संतोष मयेकर.

मराठी नाट्य क्षेत्रातले हे सुवर्ण क्षण याची देही याची डोळा पहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मी त्या दिवसची आतुरतेने वाट पहात आहे.


कार्टूनपासून मुलांना वाचवा

लहान मुलगा बोलालया लागला, तो शिनचॅन सारखाच बोलतो, वागतो म्हणून पहिल्यांदा जेव्हा त्याचं कौतूक होतं तेव्हाच खरंतर धोक्याची घंटा वाजलेली असते. पण आपण त्याच्या कौतुकात एवढे रममाण होतो की पुढे काय वाढून ठेवलय त्याची आपणाला तेव्हा कल्पनासुद्धा येत नाही. लहानगा टीव्हीसमोर बसल्याने, आपल्याला आपली कामं करता येतात, शांतपणे झोपता येतं म्हणून त्याची आईही खुश असते. तो मोठा होत जातो तशा तक्रारी सुरू होतात. तो ऎकतच नाही, सारखा कार्टून पाहायचं म्हणून हट्ट धरून बसतो. थोड्या दिवसानी तो शाळेत जावू लागतो. कार्टूनची समस्या आणखीनच उग्र होते. शाळेतून आल्या आल्या टीव्हीसमोर बसूनच खाणं पिणं चाललेलं असतं. घरच्यांचं कौतूक चालूच आसतं. मुलगा किंवा मुलगी जात्याच हुशार असल्याने अभ्यासात पहिली असतात. पण ती जस जशी पुढच्या वर्गात जातात तस तशी ती अभ्यासात मागे पडत जातात. मग एके दिवशी शाळेतून बोलावणं येतं. मुलांच्या बाबत हळवी असलेली आई रडतच घरी येते. मग शिकवण्या सुरू होतात. पण त्याच्यात काही केल्या सुधारणा होत नाही. एका जागेवर बसून मन लावून अभ्यास काय, कोणतीही गोष्ट करणं अशा मुलाना जमत नाही. एकाच चॅनेलवर कार्टूनसुद्धा ही मुलं बघत नाहीत. एक प्रकारची चंचलता येते आणि तो मग स्वभाव बनतो. मैदानी खेळ न खेळल्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ही समस्या गंभीर आहेच.

घरोघरी असणार्‍या या समस्येवर उपाय काय? असा प्रश्नही विचारला जातो. त्यावर उपाय नक्कीच आहे. कित्येक घरात टीव्ही सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत चालूच असतो. हे पहील्यांदा बंद केलं पाहीजे. टीव्ही आपल्यासाठी आहे, आपण टीव्हीसाठी नाही. पालकानीच जर टीव्ही बघायच सोडलं नाही तर मग मुलांना आपण कुठल्या तोंडाने सांगणार आणि काय संस्कार करणार? या बाबतीत दोन तक्रारी सतत केल्या जातात. एक शहरात खेळायला मैदाने शिल्लक नाहीत. दोन जे कार्यक्रम टीव्हीवर असतात तेच तर मुलं बघतात. शहरात मैदानं शिल्लक नाहीत हे खरं आहे. पण हात पाय मोकळे करण्यासाठी मुलांनी पहील्यांदा घराबाहेर पडणं आवश्यक आहे. इमारती भोवती असलेल्या मोकळ्या जागेत मुलं सायकल चालवू शकतात. बर्‍याच ठिकाणी कर्‍हाटे, मल्हखांब किंवा तत्सम खेळ शिकवले जातात. अशा ठिकाणी जावून मुलांना त्या खेळाची आवड निर्माण होईलच पण शारीरिक दृष्ट्या ती तंदूरूस्त होतील. दुसरी बाब सद्ध्या टीव्हीवर चांगले कार्यक्रम दाखवले जात नाहीत हा आक्षेप. काही अंशी ते खरंही आहे. पण टीव्हीवर दिसणारी चॅनेल आपला टी.आर्.पी. कसा वाढेल याचाच विचार करतात. मुलांवर चांगले संस्कार कसे होतील याचा नाही. तो विचार आपण पालकांनी करायचा आहे. मुलांनी काय बघावं हे आपण विचारपुर्वक ठरवलं पाहीजे. त्यांच्याबरोबर तो कार्यक्रम आपण बघितला पाहीजे आणि टीव्ही बंद केला पाहीजे. दिवसातून एकदा तरी राष्टीय किंवा सह्याद्री चॅनेलवरच्या बातम्या बघाव्यात. हळूहळू मुलांना ते बघण्याची सवय लागते. पुर्वी आमच्या लहानपणी चांगल्या मालिका असत असं नुसतं न सांगता जर शक्य असेल तर त्या बाजारातून आणून मुलांना दाखवाव्यात. मुलं त्या आनंदाने बघतात. माझ्या मुलीच्या बाबतीत मी असा प्रयत्न केला आहे आणि तो यशश्वीही झाला आहे. चाणक्य, मालगुडी डेज, महाभारत सारख्या मालिका, वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके सारख्या सिनेमांच्या सीडीज् बाजारात विकत मिळतात. या सारख्या कार्यक्रमांमुळे प्रबोधन तर होईलच पण मग मुलांना चांगल्या कार्यक्रमांची आवडही लागेल. थोडे प्रयत्न केले तर मुलं कार्टूनपासून दूर रहातात हे मी अनूभवातून सांगू शकतो. ‘निक’ या कार्टून दाखवणार्‍या वाहिनीनेच पुढाकार घेतला म्हणजे समस्या किती गंभीर हे लक्षात येतं. आता इतर वाहिन्यांची वाट न बघता आपणच त्या वाहिन्या वरचे कार्यक्रम बघणं बंद करावं हे उत्तम.


06 November, 2009

जन आंदोलनाची केंद्रं, कोकणातील मंदीरं


सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कळणे हे गाव असो की रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर, विकासाच्या नावाखाली या गावांच्या पर्यायाने संपूर्ण कोकणाच्याच गळ्याला नख लावण्याचा घाट घातला जात आहे. नितांत सुंदर अशा आणि जैव विविधतेने नटलेल्या कोणणाचा कायापालट करण्याच्या भुलथापा अनेक वर्ष मारल्या गेल्या, नंतर आता अचानक तेथील जमीनींवर धनदांडग्यांची आणि राजकारण्यांची वाईट नजर पडली आहे.

कळणे येथील जमीनी द्यायला नकार देताच त्या येणकेण प्रकारेण ताब्यात घेण्यासाठी साम दाम दंड भेद नितीचा वापर गेलं जवळजवळ वर्ष दीड वर्ष करण्यात येत आहे. जेवढा दबाव वाढवला जात आहे तेवढाच तिव्र प्रतिकार तेथील ग्रामस्थ करीत आहेत. गावातली लहानथोर सर्व मंडळी न चुकता देवळात येवून आपला संघर्ष चालू राहील याची काळजी घेत आहेत. जवळच्याच रेडी गावात आलेल्या खाण प्रकल्पाने कोणाचा फायदा झाला याची पुरेपूर जाण असलेला गावकरी आता भुलथापाना बळी पडणार नाही.

जैतापूरचा प्रश्न तर अधिकच चिंता उत्पन्न करणारा आहे. अणु उर्जा प्रकल्प हा भुकंप प्रवण क्षेत्रात असता कामा नये हा साधा नियम न पाळता किंवा त्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करून या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची कारवाई केली जात आहे. गेल्या विस वर्षात किमान चारवेळा त्या भागात पाच रिश्टर स्केलपेक्षा मोठे भुकंप झाले आहेत. प्रकल्पाची उभारणी झाली आणि मोठा भुकंप झाला तर जी जिवीत हानी होईल त्याची भरपाई कधीच होणार नाही. उर्जा प्रकल्पा मुळे किरणोत्सर्ग होवून ग्रामस्थांवर होणारे कायमचे परिणाम, कोकणच राजा हापूस आंबा नष्ट होणं, मासे नाहीसे होणं, निसर्गाची वाताहात लागणं, ग्रामस्थाना विस्थापिताचं जीणं जगावं लागणं, समुद्रात प्रकल्पाचं गरम पाणी सोडल्यामुळे अनेक जलचर, मासे, वनस्पती नष्ट होणं या मुळे तो परिसर भकास तर होईलच पण या प्रकल्पामुळे निर्माण होणार्‍या विजेच्या कितीतरी पट अधिक कायमचे नुकसान त्या परिसराचं होईल यात शंका नाही. कोकणात पडणार्‍या पावसाच्या पाण्यावर आधारीत जलविद्युत प्रकल्प राबवून या समस्येवर सहज मात करता येईल आणि पर्यावरण रक्षणाचं पुण्य ही पदरात पडेल. पण लक्षात कोण घेतो?

भ्रष्ट मंत्र्यांविरोधात अण्णांनी चाबूक उगारला...!


पंधरा दिवस घोळ घालून शेवटी सरकार येवू घातलय. तीच डोकी मंत्रीपदावर येतील, प्रत्येकाला आता खातं हवं असणार. जनतेची सेवा ऎवजी खात्यातून मेवा हेच त्यांचं लक्ष आहे. शेवटी पापी पोटांचा प्रश्न आहे महाराजा...! कुणाची झाकली मुठ तर कुणाची उघडी. या आधी नालायक म्हणून काढून टाकलेल्यांना पुन्हा पावन करून घेण्याचा प्रयत्न होईल. भ्रष्टाचारी आमदारांना पुन्हा मंत्री करू नका, तसं झालं तर त्यांच्या विरोधात आंदोलन छेडलं जाईल असा इशारा जननेते अण्णा हजारे यांनी दिला आहे. या कोडग्याना आता जनाची नाही आणि मनाचीही नाही हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. इतने बडे शहर फेम आबा २६/११ ला वर्ष व्हायच्या आधी आत घुसतील. बघू आता काय होतं ते. राजभवनात खुर्च्या तापलेल्याच आहेत.

05 November, 2009

सरकार - गेंड्याच्या कातडीचे


गेंड्याची कातडे आता

यांच्या पेक्षा मऊ आहे

पुढच्या पाच वर्षाच्या कारभाराचे

हे फक्त ट्रेलर आहेबहुमतात येऊन सुद्धा

अजून सरकार बनत नाही

तेराव्याचं जेवून सुद्धा

यांचं सुतक संपत नाही


04 November, 2009

पूर्वांचलाची चित्र सफर भाग ३


भल्या पहाटे हत्तीवरून काझीरंगा फिरण्यासारखी दुसरी मौज नाही. आम्ही जीप मधून हत्तींच्या तळा पर्यंत पोहोचलो, तेव्हा अजून सारखं दिसतही नव्हतं. आदल्या दिवशीच तिकीटाची व्यवस्था केल्याने आता हत्तीवर आरूढ होवून निघायच तेवढं बाकी होतं. एका रांगेत उभे राहून मग आम्ही मचाणावर चढलो, एक हत्ती घेवून माहूत आला. आम्ही तीघं त्याच्यावर बसलो. दाट धुक्यातून वाट काढत हत्ती चालायला लागला. अरे हो ती हत्तीण होती. हत्ती एवढ्याच वाढलेल्या एलीफंटाग्रास मधून आम्ही जात होतो. हळूहळू सुर्य वर आला आणि बघा काझीरंगाचा राजा आम्हाला कसा सामोरा आला तो......!

आणि नरकासुर पळत सुटला..........
कोकणात आणि गोव्यात नरक चतुर्दशी पासून दिवाळीला सुरवात होते. नरक चतुर्दशीच्या पहाटे श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. गोव्यात हे नरकासुराचे प्रस्थ फार. दिवाळी आली की फटाके, आकाश कंदील जसे विकायला ठेवले जातात तसे नरकासुराचे मुखवटेही विक्रीला ठेवलेले असतात. नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी पासून मग अनेक मंडळांची धावपळ सुरू असते. आदल्या दिवशी सामानाची जमवाजमव झाली की दिवेलगण होईपर्यंत नरकासुर बनवून तयार होतो. बांबू पासून बनवलेल्या ढाच्यावर कपडे चढवले जातात, वर मुखवटा लावला जातो. आत एक माणूस जावून त्या नरकासुराला उचलून घेतो आणि तो नरकासुर मग नाचवला जातो. गाण्याच्या आणि संसकृतीक कार्यक्रमांचा बार उडवला जातो. नरकासुर सजावट स्पर्धा आयोजित केली जाते. रात्रभर असे कार्यक्रम झाल्यावर पहाटे नरकासुराची मिरवणूक निघते आणि नंतर त्याचे दहन केले जाते.

या वर्षी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर गोव्यात खुन आणि बॉम्बस्पोट झाले त्या मुळे सगळीकडेच पोलीस बंदोवस्त होता. रात्रभर जागरण आणि नरकासुराबरोबर नाचणे एवढं करायचं तर थोडी घेतलीच पाहीजे नाही का? तर तशी घेवून पोरं टोरं नाचत होती. पहाट झाली मिरवणूक निघाली. ढोल, ताशा, तेलाचे डबे असं जे आवाज करील ते बरोबर घेवून ते बडवत ते नाचत होते. नरकासुराsssरे नरकासुरा, बरे बेरे कपडे भोकात भरा असं ओरडत ती मिरवणूक तिठ्यावर आली तसा त्यांना अधीकच जोर चढला. नरकासुराला बघण्यासाठी दिवाळीच्या पहाटे उठलेली मंडळी जमा होवू लागली. गर्दी झाली. मिरवणूकीतली पोरं चेकाळली डबे जोरजोरात वाजवायला लागली, एकाने दबा उचलून जमिनीवर आपटला. इतर माकडांनी टोप्या टाकाव्यात तसे मग सगळ्यानीच डबे जमिनीवर आपटायला सुरवात केली. गोंधळ वाढत होता. एवढा वेळ जीपमध्ये शांत बसलेला पोलीस इनिस्पेक्टर खाली उतरला, त्यांच्या दिशेने चालत येवू लागला. एकाने ते बघितलं, तो ढुंगणाला पायलावून पळत सुटला, बाकीच्यानी त्याचं अनुकरण केलं. नरकासुरात असलेल्याला तसं करणं शक्य नव्हतं. पण तो ही शक्यतेवढ्या लवकर तरातरा चालत निघून जावू लागला, थोडा सावध झाल्यावर त्यानेही पळायला सुरवात केली. अरे नरकासुर खय गेलो? गर्दीतून विचारणा झाली तो पय धावता....कुणी तरी उत्तर दिलं.


03 November, 2009

यांचा मला अभिमान वाटतो.


श्री.ज्ञानेश्वर मुळे, भारताचे मालदीवमधले उच्चायुक्त. दै. लोकसत्ता मधून बर्‍याच वेळा लिखाण करतात. माहितीपर आणि वाचनिय लेख असल्याने मी ते नेहमीच वाचतो. गेल्याच रविवारी उच्चायुक्त करतात तरी काय? : बदलते विश्व बदलता भारत त्या आधी मालदीव : असेही गोड आतंकवादी! बदलता भारत बदलते विश्व असे लेख लोकसत्ताच्या वाचकांनी वाचले असतीलच. एवढ्यामोठ्या पदावर असताना श्री.ज्ञानेश्वर मुळे यांना सामान्य वाचकांसाठी काही लिहावेसे वाटते हेच खुप आहे. त्या पलिकडे जावून ते जेव्हा आपल्या नित्य कामाच्या बाबतीतले अनुभव लिहीतात तेव्हा खरच अचंबीत व्हायला होतं. मालदीवला साखरेचा तुटवडा पडू नये म्हणून केलेले प्रयत्न किंवा ताज हॉटेलच्या उद्घाटनाला मालदीवचे राट्राध्यक्ष आणि मा. रतन टाटा यांची घडवून आणलेली भेट अशा प्रकारच्या गोष्टीमधून त्यांची काम करायची पद्धत दिसून येते. राजदूत किंवा उच्चायुक्त हे दोन देशातला एक नाजूक दुवा असतो. दुसरा देश मग तो कोणताही असूदे पण आपल्या देशाशी त्या देशाचे संबंध चांगलेच असले पाहीजेत. ते संबंध सुधारणं बर्‍याच अंशी या उच्चायुक्तांवर अवलंबून असतं. आणखी एक गोष्ट परदेशात असलेल्या भारतीय नागरीकाना आपल्या देशाच्या उच्चायुक्तांचा मोठा आधार असतो. अनेकदा परदेशात गेल्यावर पासपोर्ट हरवणे, संकटाची परिस्थिती निर्माण झाल्याने त्वरीत मायदेशी निघून येणे अशा प्रसंगी आपल्या वकिलातीचाच सहारा घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर मुळे सारखे अधिकारी असले की या गोष्टी सोप्या होतात अन्यथा... परदेशात असलेल्या आपल्य लोकांना याचा जास्त अनुभव असेलच. आपलं काम चांगल्या प्रकारे करणं, भारतीयांना देलासा देणं, देशाच्या हिताचा सतत विचार करणं, काही वेळा वाट वाकडी करूनही मादतीचा हात पुढे करणं या गोष्टी केल्या मुळे आणि सोनेरी पिंजर्‍यात न रहाता सामान्यांच्या जवळ जाण्याने मुळेसाहेब तुमचा मला अभिमान वाटतो.


01 November, 2009

प्रत्येक झारीत शुक्राचार्य असलेच पाहीजेत का?


काही माणासांना काम करण्या पेक्षा ते न करण्यातच पुरूषार्थ का वाटतो असा खरच प्रश्न पडतो. आपल्या हातून काही चांगलं घडत नसेल तर निदान वाईट तरी करू नका. एखाद्याचं काम अडवणं, दुसर्‍याला मोठेपणा मिळेल म्हणून गैरमार्गाने अडथळा आणणं, अधिकाराचा गैरवापर करणं, चांगल्या बाबतीत बिब्बा घालणं, कसं होतं ते बघतो म्हणणं, हो करतो म्हणून ते कधीच न करणं, एकीकडे संतपणाचा आव आणत दुसरीकडे अपेक्षा करणं, हे सगळं केलच पाहीजे का?

तुम्ही असं किती दिवस अडवणार? तुम्ही ज्या खुर्चीवर बसला अहात ते अढळ पद नक्कीच नाही. बदल ही एकच गोष्ट सातत्याने घडत असते. Constant is a change. आज तुम्ही अहात उद्या दुसरा कुणीतरी. पण उद्या तुम्ही नसाल ना तेव्हा, तेव्हा सुद्धा जर लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवावं असं वाटत असेल तर आज आपल्या हातात आहेत ती लोकांची कामं करा. जर तुम्हाला काही करता येत नसेल किंवा करायची इछा नसेल तर निदान ते काम होत असताना त्या मधला अडथळा तरी बनू नका. ते काम वैयक्तीक असलं तरी आणि सार्वजनिक असलं तरी. सार्वजनिक हिताचं काम तर प्राधान्याने केलं पाहीजे. त्यात कोणत्याच प्रकारचा अडथळा नको. निरपेक्ष पणे समाजाचं काम करणारी मंडळी ते करतात तेव्हा त्या कामात सगळ्यांच्या सहकार्याचीच अपेक्षा असते. अडथळ्यांची नव्हे. तेव्हा शुक्राचार्य बनू नका. बघा हजारो वर्ष झाली पण शुक्राचार्य लक्षात राहीले ते त्यांच्या वाईट गुणांसाठी. निगेटीव्ह प्रसिध्दी कुणाला हवी हवीशी वाटेल? कोण पसंत करेल?

निर्लज्ज राजकारणी आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय


निवडणूकीचा निकाल लागून आठ दिवस होवून गेले तरी महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नाही. आधी मुख्यमंत्री कोण?, मग उपमुख्यमंत्री कोण? मग कोणाचे किती मंत्री, आता कोण कोण मंत्री या सगळ्या ठासमारीत सरकारचं घोंगडं भिजत पडलय. तिकडे राजभवनावर मंडप सजवून चार दिवस झाले. उन्हाने खुर्च्या गरम होवून पुन्हा थंड झाल्या पण राजकारण्यांपैकी कुणी तिकडे त्या गरम करायला फिरकलेला नाही. रोज दिड लाख रुपये एवढं मंडपाचं भाडं भरलं जात आहे. हा पैसा कुणाचा?

तिकडे ज्याना मंत्रीपदाची आशा नाही अशा आमदारांनी आमदार निवासातल्या सागराभिमुख खोल्यांची कुलूपं परस्पर फोडून त्यात घुसखोरी केली आहे. या घुसखोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकीच रद्द केली पाहीजे. हे प्रतिनिधी पुढची पाच वर्ष कशा प्रकारचा कारभार करणार त्याची ही झलकच आहे.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates