16 July, 2021

पचेल तेच खावं

स्वर्गारोहणवरून पुढे: तर याच पांगच्या धाब्यावरची गोष्ट, पण मी टूर लिडर म्हणून आलो होतो तेव्हाची. कथेत आडकथा येते तशी ही इथेच सांगून टाकतो. ‘रुचेल ते बोलावं आणि पचेल ते खावं’ अशी म्हण आहे. या म्हणीचे टूरवर दोन भाग पडतात. टूर लिडरने गेस्टना रुचेल ते बोलावं आणि गेस्टनी पचेल ते खावं असं अपेक्षीत असतं. इथे दोन्ही अटी पाळण्यासाठी तोंडावर नियंत्रण असलं पाहिजे. तर ही गोष्ट ‘पचेल ते खावं’ची. मुंबई ते पांग हा मागच्या चार पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे प्रवास झालेला होता. सगळेच गेस्ट उच्चविद्याविभूषीत असल्याने मी त्याना काय सांगणार? तरीही पुढचा धोका ओळखून मी सुचना दिल्या (त्या रुचत नासल्या तरी द्याव्याचा लागतात, अनुभवातून आलेलं शहाणपण असतं ते.) म्हटलं “इथे या धाब्यावर जे आहे त्यापैकी काहीही ऑर्डर करू शकता, पण असं असलं तरी पुढचा प्रवास खुप वळणावळणाचा आणि घाटाचा आहे. या प्रवासात अष्टांगाला धक्के बसण्याची शक्यता आहे, तेव्हा भरपूर आणि जड पडेल असं काही खाऊ नका, पण ब्लॅक टी, लेमन टी, सुप, लिंबू पाणी, सरबत असं काहीही आणि कितीही पिऊ शकता.” सगळ्यांनी माना हालवल्या, मी थोडा बाजूला गेल्यावर प्रा. मॅडम उवाच “तो काय कट मारायला बघतोय, मी तर सरळ जेवणारच आहे.” त्या यतेच्छ जेवल्या. बरोबरच्यांनी त्याना अडवलं नाही. पुढच्या प्रवासात मग पिचकारी सुरू झाली. “किती राहिलय?” असा प्रश्न दर दहा मिनिटांनी येवू लागला. असा त्रास होतो म्हणून अंतर थोडंच कमी होणार आहे? हॉटेल येई पर्यंत त्यांच्या पोटात मात्र काही राहिलं नव्हतं. सर्व प्रथम जी जवळची रुम होती त्याची चावी मॅडमच्या हातात दिली. मग चहाला, रात्रीच्या जेवणाला न येता त्यानी दुसर्‍या दिवशी सकाळीच दर्शन दिलं.

यात सगळा दोश त्यांचा नव्हता, त्यात हाय अ‍ॅल्टीटयूड सिकनेसचा मोठा वाटा होता आणि ते लक्षात घेवूनच मी तशा सुचना दिल्या होत्या. अ‍ॅल्टीटयूड सिकनेसचा त्रास कमी करण्यासाठी Diamox आणि पचनासाठी Pan 20/40 या गोळ्या घ्याव्यात अशा सुचना दिलेल्या असतातच. सहल, प्रवास आणि जीवनप्रवास हे आनंदात झाले पाहिजेत तर काही पथ्य पाळलीच पाहिजेत. अशाच एका लडाखच्या सफरीत एका मॅडमनी गोळी घ्यावी लागेल म्हणून सल्फाची अ‍ॅलर्जी आहे म्हणून उगीचच सांगितलं आणि मग तब्यत बिघडल्यावर इंजक्शन घ्यावं लागलं. काहीजण मी आयुष्यात गोळी घेतलेली नाही हे कारण देतात. “साहेब तुम्ही आयुष्यात लडाखला तरी कुठे आला होता?” असा प्रश्न विचारला ते ‘रुचणार’ नाही.                   

आता खाण्याचीच गोष्ट निघाली आहे तर माझ्या पहिल्या लडाख सफरीमधली एक गम्मत सांगतो. त्या गृपमध्ये एकाच ऑफिसमधल्या बाराजणी आल्या होत्या. दुपारच्या जेवणाला बसल्या असताना त्यांच्या टेबलवर बारा रोट्यांची लगोरी लावलेली होती. बोलण्याचा गडबडीत थोडा उशीर झाला आणि थंडी व लडाखच्या कोरड्या वातावरणाने त्या जास्त कडक झाल्या. एकीने एक रोटी घेतली आणि म्हणाली “चावत नाही” 

मी मागेच बसलेला होतो म्हटलं “ती तुम्हाला कशी चावणार? तुम्ही तीला चावायचं”

“तेच म्हणते चावत नाही” उत्तर आलं. 

मग म्हटलं “तुम्ही खाताय का त्या?” 

ती: “तर काय करायचं?” 

मी: “आता आपल्याला शांती स्तूपाला जायचं आहे, तिथे नेण्यासाठी ठेवल्याहेत त्या.” 

“अगं बाई हो...!” म्हणत दोघी तिघींनी घेतलेल्या रोट्या परत जाग्यावर ठेवल्या आणि मग एकच हशा पिकला. 

जुलै-ऑगष्ट मधे लडाखला जर्दाळूची झाडं जर्दाळूंनी लगडलेली असतात. आल्ची मॉनेस्ट्री पाहून झाल्यावर आम्ही दुपारच्या जेवणाला थांबणार होतो. मॉनेस्ट्रीच्या बाहेर बरीच जर्दाळूची झाडं होती. खाली फळांचा सडा पडला होता. एक दोन खावून पाहिल्यावर त्याची आंबट गोड चव चांगली वाटली. त्यात आमचा टूर लिडर सागर सावंतने ते झाड गदागदा हालवून जर्दाळूंचा पाऊस पाडला. त्यावर ज्यांनी ज्यांनी ताव मारला त्यांना मग दुपारचं जेवण गेलं नाही. त्यावर सागर म्हणतो “जेवणार काय? जर्दाळू किती खाल्लात?”  

भाग १: मुक्काम तर येणारच

भाग २: क्यामेरा क्या तेरा

भाग ३: जागेपणीचं स्वप्न

भाग ४: स्वर्गारोहण

भाग ५: पचेल तेच खावं







1 comment:

  1. छान अनुभव,सर..
    कोरोना काळात इतकेच म्हणू शकतो की रम्य त्या आठवणी..

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates