हर्षदाने लगीनघाईत काढलेला महिना आणि ऋचाच्या अभ्यासाची घाई सुरू होण्याआधी श्रम परिहार करावा, जवळपास कुठेतरी दोन दिवसांसाठी जावून यावं म्हणून आम्ही बोर्डीच्या चौधरी बागेत गेलो होतो. मुंबई-सुरत रेल्वे मार्गावरच्या घोलवड स्थानकात उतरून आम्ही रिक्षाने चौधरी बागेत जात होतो. ट्रेनने अहमदाबादला जाताना या भागाची तशी कल्पना येत नाही. मी विरार पर्यंतचा भाग फिरलो होतो. पुढे क्वचितच असणारे डोंगर आणि खारवट प्रदेश यामुळे मला तो भाग कधी फिरावासा वाटला नव्हता. पण या वेळी गेलो आणि बोर्डीच्या प्रेमात पडलो. स्वच्छ सुंदर रस्ता आणि दुर्तफा असणारी झाडं, मधेच एकाबाजूला दिसणारा अथांग समुद्र किनारा, दुपारचा वेळ असूनही मजा येत होती. वाटेत शनिवारी भरणारा बोर्डीचा आठवडे बाजार लागला. गाव मागे पडलं, वाटेत चिक्कूच्या वाड्या आणि मध्ये एखादा बंगला, सगळा प्रदेश हिरवागार, चौधरी बागेबद्दलची उत्सुकता ताणली जावू लागली. एवढ्यात रेल्वेचं फाटक लागलं, तिथेच बोरीगाव स्टेशन होतं. (या स्टेशनला उतरायला फलाट नाही म्हणून आम्ही अलिकडच्या घोलवड स्टेशनवर उतरलो होतो.) पुढे दोन किलोमिटरवर ‘चौधरी बाग’ असा बोर्ड दिसला. आम्ही प्रवेश करत असतानाच चंद्रहास चौधरी हसत मुखाने सामोरे आले. पुढचे पंचवीस-तीस तास मजेत जाणार याची ती नांदी होती.
दुपारच्या चवदार जेवणाने रसना तृप्त झाली होती. रोजच्यापेक्षा पोटात चार घास जास्तच गेल्याने वामकुक्षीला पर्याय नव्हता. ऋचाने मात्र पंधरा-वीस मिनीटं तळमळून काढली कारण तिला टारझन रोप खुणावत होता. सर्कस पाहताना त्यातले काही प्रयोग आपणाला करावेसे वाटतात. चौधरी बागेत त्याला बर्यापैकी वाव आहे. त्या टारझन रोपवर आम्ही सगळ्यानी सर्कस करून पाहिली. आमच्या बरोबर सरंगले कुटुंबही होतं ते आमचे खर्या अर्थाने फॅमिली फ्रॆंड. टारझन रोपवर कसरत करता करता चहा झाला आणि चंदहास आम्हाला बागेत फिरायला म्हणून घेऊन गेले. तिकडे बर्मा ब्रिज होता. भारताच्या पुर्वेकडच्या भागात खोल नाले पार करून जाण्यासाठी दोरखंडापासून तयार केलेले असे ब्रिज वापरले जातात. बर्मा ब्रिज प्रथम ऋचा आणि नंतर सगळ्यानीच पार केला. पण खरी कसोटी होती ती लाकडाच्या एकाच वाश्यावरून पलिकडे जाण्याची. तिथेही प्रथम ऋचाने बाजी मारली. नंतर अशोक, वैभव, हर्षदा, मी सगळ्यानीच चंद्रहासच्या मदतीने तो थरार अनुभवला. त्या एकाच वाश्यावरून चालल्यावर डोंबारी किती महान असतो याचा साक्षात्कार झाला. पोगो स्टीकवरून चालणं हा आणखी एक प्रकार चंद्रहास काकांनी करून दाखवला आणि मग ऋचा त्याच्या मागेच लागली. दुसर्या दिवशी निघेपर्यंत ती पोगोस्टीकवरून सफाईदारपणे चालायला लागली होती. बागेत सगळीकडेच झोपाळे, मचाण, टाझन हट असे प्रकार होते.
संध्याकाळी बोर्डीच्या समुद्रकिनार्यवर फेरफटका मारला. घोड्यावरून फिरलो. सुर्यास्त होताना पहाणं शक्य नव्हतं कारण हवा कुंद झाली होती. वारा थांबला होता. थोड्याच वेळात आकाश भरून आलं, पुर्वेला ढगांनी दाटी केली. आता हा कोसळणार. हरकत नाही, आज चिंब भिजायच असं आम्ही ठरवलं. पण तसं नसतच, ती निसर्गाची लहर असते. जोराचा वारा आला, विजा कडाडल्या, पुर्वेला गर्दी करून असलेले ढग आभाळभर पसरले, एखाद्याने अक्षता टाकल्या. हवेतला उष्मा मात्र गायब झाला. थंड वार्याची झुळूक आली. मातीच्या सुगंधाने आसमंत दरवळलं. तिन्हीसांजा होत असताना आम्ही माघारी फिरलो. पावसाचा शिडकावा सुरू होता. बागेतल्या टेंभुर्णीच्या पारावर बसून चहाचा आस्वाद घेत घेत गप्पा सुरू झाल्या. चंद्रहास आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञावहिनी या दोघांनीच मोटरसायकलवरून केलेल्या लडाखवारीचे अनुभव ऎकता आले. पावसाळी वातावरणात गप्पांची मैफ़ल जमली असतानाच आतून येणारा बोंबील फ्रायचा सुगंध अस्वस्थ करत होता. मच्छी करी, बोंबील फ्राय सोबत लुसलुशीत उकडीच्या भाकर्या असा जेवणाचा बेत होता. या वेळीही आडवा हात मारला. चौधरी बाग म्हणजे फळांचीच बाग. तीसुद्धा सेंद्रीय खतांवर बहरलेली. हल्ली मुंबईत हापूस किंवा एकूणच फळांना रंग-रुप असलं तरी पुर्वीचा तो सुगंध आणि स्वाद नसतोच. त्याचं कारण रसायनं. या फळांच्या केमिकल लोच्याने सगळी चवच नष्ट करून टाकली आहे. जेवणं आटोपल्यावर राजापुरी, सिंधू, हायब्रिड असे एकापेक्षा एक सरस चवीचे आणि स्वादाचे आंबे सामोर आल्याने तुडूंब भरलेल्या पोटात जागा करावी लागली. केमिकलची बाधा न झालेली या बागेतली फळं एकदा तरी जऊन खाल्लीच पाहिजेत. आंबे खाऊन झाल्यावर त्याच्या साली सशांना द्यायला ऋचाबरोबर सगळेच गेले. चार ससुले त्या साली खाण्यासाठी कोण धडपड करीत होते.
सकाळी पक्षांच्या किलबिलाटांने जेव्हा जाग आली तेव्हा अजुन सहा वाजायचे होते. स्वच्छ, प्रदुषण मुक्त वातावरणात छान झोप झाली होती. सकाळचा चहा झाला तेव्हा जवळच्याच डोंगरावर एक छोटासा ट्रेक करुन येऊया असं चंद्रहास म्हणाले आम्ही सगळे उत्साहात निघालो. थोडा कठीण चढ असलेली ती वाट चढताना पावलं जरा जपूनच टाकावी लागत होती. सभोवार गर्द हिरवाईने भरून राहीलेली व्हॅली आणि पलिकडे उंचावर धुक्यात बुडालेला बारड्याचा डोंगर. कुडा, टाकळा, बेहर्डा, साग अशा वनस्पतींची माहिती घेत, गंजाच्या वेलीची गोड पान खात आमचं मार्गक्रमण सुरू होतं. शेवटी डोंगरमाथ्यावर आम्ही पोहोचलो. शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर छापा टाकला होता तेव्हा वाटेत याच बारड्याच्या गुहेत त्यांनी रात्रीचा मुक्काम केला होता. तसच पारसी लोक जेव्हा प्रथम संजाणला आले तेव्हा त्यानी आपल्याबरोबर आणलेला पवित्र अग्नी याच गुहेत ठेवला होता असं म्हटलं जातं अशी माहिती चंद्रहासनी आम्हाला दिली. आमच्या पोटातला अग्नी आता प्रज्वलित होण्याच्या बेतात होता. आम्ही एका सोप्या उतारावरून झप-झप खाली आलो. टेंभुर्णीखाली बटाटे पोहे आमची वाट बघत होतेच. चौधरी-बागेचा कुक रजेवर गेल्याने प्रज्ञावहिनींच्या हातच्या सुग्रास भोजनाचा आम्ही आस्वाद घेत होतो.
काल पासुन बागेतला पोहण्याचा तलाव ऋचाला सारखा खुणावत होता, पण अशोकजी सोडून आम्हाला कुणालाच पोहण्याची कला अवगत नसल्याने आम्ही तिकडे फिरकलो नव्हतो. मग आमचा नाद सोडून ऋचाने सरळ चंद्रहास काकांनाच विचारणा केली. ते एका पायावर तयारच होते. मग आम्ही सगळेच एक-एक करून आत उतरलो. चंद्रहास पट्टीचे पोहणारे आणि चांगले प्रशिक्षक असल्याने आम्ही सगळेच हात-पाय मारू लागलो. लाईफ गार्ड जॅकेटवरून टायर पर्यंत अशी प्रगती झाली. पुढच्या वेळी पुर्ण शिकणार म्हणत पाण्याबाहेर आलो तेव्हा दोन अडीच तास केव्हा गेले ते समजलच नव्हत.
आता निघायची वेळ जवळ येऊन ठेपली. जेवणाची गोडी लागली होती. जेवताना आता पुन्हा कधी येऊ याच्या विचाराला लागलो. बेस्ट सिझन कुठचा असं विचारलं तर चंद्रहास म्हणाले आता तुम्ही आलात ते अगदी चुकीच्या वेळी. ऑगस्ट मध्ये या., छान धबधबे असतील. बागेत मधमाशा पालन केलं होतं. मध, आंबे, पपई घेतले. तृप्त मनाने पण जड अंत:करणाने पुन्हा कधी येता येईल याचा विचार करीत निघालो. मुंबई जवळचं एक उत्तम विश्रांती स्थळ आम्हाला गवसलं होतं