28 October, 2010

‘आदर्श’ सहकार ?



तीन दिवसांपुर्वी आशेचा किरण या पोस्ट मध्ये डॉ. गिरीश जाखोटिया यांनी दाखवलेला मार्ग अनुसरून आपण भ्रष्टाचाराचा मुकाबला करू शकू असं वाटत असतानाच आज हे आदर्श सोसायटीचं प्रकरण बाहेर आलं आणि त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या पासून सर्वच राजकिय पक्षांचे नेते, आमदार खसदार, सनदी अधिकारी, दोन माजी लष्कर प्रमुख यांचा समावेष आहे हे पाहून या सर्वांची तोंडं किती मोठी झाली आहेत हेच दिसून येत आहे. कन्हयालाल गिडवाणी या कॉग्रेसच्या नेत्याचे तर या एकाच सोसायटीत तीने फ्लॅट आहेत. आपण सारे भाऊ भाऊ भ्रष्टाचाराचा घास वाटून खाऊ ही म्हण आणखी रुढ होत आहे. आता पाहूया दिल्लीच्या मॅडम काय कारवायी करतात ते?       

महाराष्ट्र टाईम्स मधली ही बातमी वाचा


मटा ऑनलाइन वृत्त मुंबई
लष्करी अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधलेल्या आदर्श सोसायटीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सासूबाईंचा फ्लॅट असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी हा महिती प्रसिद्धी माध्यमांना दिल्याचे समजते. भगवती मनोहरलाल शर्मा या चव्हाण यांच्या सासूबाई आहेत.

कारगिल युद्धात शहीद झालेल्यांच्या पत्नींना घरे देण्यासाठी हा भूखंड लष्करी अधिकाऱ्यांनी मिळवला. प्रत्यक्षात तेथे एकाही अशा दुदैर्वी वीरपत्नीला फ्लॅट मिळाला नाही. तेथे लष्कराच्या आजी आणि माजी ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी फ्लॅट्स बळकावले अशी तक्रार नौदलाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केली. कारण हा टॉवर नौदलाच्या संवेदनशील भागाला खेटूनच उभा राहीला आहे.

आता असे उघडकीस आले आले आहे अनेक राजकीय नेते आणि सनदी अधिकारी यांनीही तेथे फ्लॅट्स मिळवले आहेत ..

यामध्ये, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सुरेश प्रभू अशी नावे आहेत. तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव शंकरन, भारतीय परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ अधिकारी देवयानी खोब्रागडे, मुंबईच्या माजी जिल्हाधिकारी कुंदन अशी अनेक नावे आहेत. देवयानी,आयएएस अधिकारी उत्त्तम खोब्रागडे यांची कन्या आहे.

या प्रकरणीची आता सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. सीबीआयने सोसायटीच्या चिटणीसांना, एका आठवड्यात या प्रकरणाबाबत विचारलेल्या माहितीचा तपशील पुरवावा, असे कळवले आहे.

दरम्यान लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांनी, या प्रकरणाच्या चौकशीच आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री अँथनी यांनीही या मामल्याची माहिती काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना दिली आहे.

हा भूखंड सोसायटीला मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारमधील अनेक अधिकाऱ्यांनी नियम बाजूला सारले असे आता आढळले आहे. या अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

येथील प्रत्येक फ्लॅटची किंमत किमान तीस कोटी रूपये आहे, परंतु या प्रत्येक सदस्याने हा फ्लॅट सुमारे साठ लाख रूपयांत खरेदी केल्याची नोंद महसूल खात्यात आहे.

दरम्यान चव्हाण यांचे विरोधक सक्रीय झाले असून इतक्या महत्त्वाच्या, संरक्षणाच्या दृष्टिने नाजूक मामल्यात चव्हाण यांनी दुर्लक्ष केले असा त्यांचा आरोप असून ही बाब पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नजरेस आणून द्यावे असे विरोधकांचे प्रयत्न आहेत.

25 October, 2010

आशेचा किरण



समाजात पैशाला आलेलं अवास्तव महत्व, त्यासाठी काय वाट्टेल ते करायची आणि कोणतीही हद्द गाठायची तयारी, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार असल्यासारखं वागणं, दूसर्याची मालमत्ता घशात घालण्याची वृत्ती आणि सत्तास्थानाचा आपल्या वैयक्तीक फायद्यासाठी केलेला वापर अशा अनेक गोष्टी आपण अगदी रोजच्या रोज अनुभवत आहोत. राष्टकूल क्रिडा स्पर्धा संपल्या आणि त्या स्पर्धांमध्ये आपल्या क्रिडापटूंनी पदकांची कमाई केली असली तरी त्या स्पर्धांच्या निमीत्ताने झालेला प्रचंड खर्च आणि त्यात झालेला भ्रष्टाचार म्हणजे सामान्य करदात्यांच्या खिशात घातलेला हातच आहे. ती करदात्यांची लूटच आहे. लवासा सारख्या प्रकल्पांच्या अनधिकृत कामांकडे प्रथम डोळेझाक करायची आणि नंतर ती नियमीत करायची हा सत्तेचा गैरवापर आहे. याच्यावर अंकूश ठेवायचा ते सरकारच यात सामील झालं आहे. सगळीच शहरं बाधकाम व्यावसायीकांच्या दावणीला बांधली गेली आहेत. न्याय व्यवस्थेतही संबंधीत वकील गब्बर होत आहेत आणि तारीख पे तारीखबघत पक्षकारांच्या पिढ्या बरबाद होत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या कायद्याला धाब्यावर बसवून आपली पोतडी भरण्याच्या मागे लागले आहेत आणि कायद्याचे रखवालदार त्यांचीच चाकरी करताना दिसत आहेत. रोजच अशा प्रकारच्या बातम्या वाचून सुन्न व्हायला होतं आणि हळूहळू आपणही या बाबतीत कोडगे होत आहोत की काय असा प्रश्न पडतो. आपण संवेदनशिलता हरवून बसलो आहोत असं वाटायला लागतं. यावर उपाय काय? या सगळ्या विरुद्ध लढणारा अण्णा हजारें सारखा एखादाच असं वाटत असताना आजच्या लोकसत्ता मध्ये डॉ. गिरीश जाखोटिया  यांचा लेख वाचला  आणि एक आशेचा किरण दिसला. आपणही वाचा: समस्त व्यावसायिकांनो एक व्हा!

23 October, 2010

वेंगुर्ल्याची कोजागिरी


शहरातले डोळे दिपवून टाकणारे दिवे मागे सोडून शुभ्र चांदण्यात न्हाऊन निघायला पाहिजे तर गर्दीतून बाहेर पडून कुठे तरी दूरवर गेलं पाहिजे. गावात, नदी किनारी, सागर तीरी असच कुठे तरी गेलं पाहिजे. पण हल्ली सगळीकडेच विजेचे दिवे चमकू लागल्याने (भार नियमन करून मायबाप सरकार उपकार करतं ते सोडून) चांदण्याच्या आनंदाला आपण पारखे होत आहोत. कोजागिरीच्या रात्री काही तास ब्लॅक आऊट करायला हरकत नसावी. असो..... तर कोजागिरी म्हटलं की मला आठवते ती आम्ही मित्रांनी वेंगुर्ल्याला साजरी केलेली कोजागिरीची रात्र. दिवस कॉलेजचे होते, कोजागिरीची रात्र बाहेर जाऊन जागवायची असते याची बहूतेक त्याच वर्षी जाण आली होती. सावंतवाडीच्या सांसकृतीक वातावरणात या दिवसाला नव्हे रात्रीला अनन्यसाधारण महत्व असायचं. मोती तलावाच्या काठावर कवीसंमेलन असायचं, त्याला बा.भ.बोरकर, मंगेश पाडगावकर, आमचे सर वसंत सावंत या सारखे कवी बहार आणायचे. कोजागिरीच्या स्वच्छ चांदण्यात लोक नुकतेच बाहेर पडायला लागले होते.

आम्ही पाच मित्रांनी सावंतवाडी सोडून सागर किनारा गाठायचं ठरवलं. सायकली घेऊन वेंगुर्ल्याला जायचा बेत ठरला. सुर्य मावळतीला जात होता आणि आम्ही वेंगुर्ल्याला. पौर्णिमेचा चंद्र जसजसा वर येवू लागला तसतसे आमचे चेहरेही उजळले. मित्राच्या आईने करून दिलेलं धोंडस, भेळी साठीचं साहित्य, फरसाण, पाण्याच्या बाटल्या (होय पाण्याच्याच बाटल्या) घेऊन आम्ही रमतगमत वेंगुर्ल्याच्या बाजारपेठेत येऊन पोहोचलो. एका ओळखीच्या घरात सायकली ठेऊन समुद्र किनारा गाठला. आत सारखी वेळेवर फारशी गर्दी नव्हती पण काही मंडळी चांदण्यात फिरायला आली होतीच. आम्हाला त्यांचा सहवास नको होता आणि समोर पसरलेला अथांग सागर जसा होता तशीच समुद्राची वेळही लांबपर्यंत दिसत होती. ती आम्हाला खुणावत होती. आम्ही चालत चालत निघालो. ती उभ्या दांड्याची वेळ असावी. निर्जन किनारा, शुभ्र चांदण्यात चमचमणारं पाणी, फेसाळणार्‍या लाटा, पिठूळ वाळू आणि पाठीमागे माडाचं बन. मन मोहून टाकणारं वातावरण, गप्पांचा फड जमला आणि कुणालाच वेळकाळाचं भान राहिलं नव्हतं. सागराचं संगीत आणि आमच्या गप्पा यांची जणू चढाओढ लागलेली. समुद्रावरून येणारे उबदार वारे आणि माडाच्या बनातून मधूनच येणारी गार झुळूक आमच्या आनंदात भर घालत होती.

समुद्रावर आल्या आल्या धोंडसाचा फडश्या पाडला होताच पण आता बराच वेळ झाल्याने पुन्हा भुक लागली होती. भेळीचं साहित्य बाहेर काढलं आणि ती बनवायला घेतली. त्या भेळीवर ताव मारला तरी शेवटी थोडी भेळ आणि फरसाण शिल्लक राहिलीच. लांब पाण्यात दोन तीन आकृत्या हुंदडताना दिसल्या. गप्पांचा ओघ कमी झाल्याने आता सर्वजण तिकडेच पाहात होते. ते कुत्रे होते. नेहमी असणार्या कुत्र्यांपेक्षा जरा मोठे, अंगा पिंडाने भरलेले. पाण्यात खेळता खेळता ते आमच्या जवळ येऊन पोहोचले. आमच्या जवळ उरलेली भेळ आम्ही कुत्र्यांना घातली पण ते त्या भेळीला तोंड लावायला तयार नव्हते. मग माझा मित्र दिगंबर इरेला पेटला. वेंगुर्ल्याचे कुत्रे भेळ कशी खाणत नाय? फरसाण तरी खातत काय बघूया असं म्हणत त्याने त्याना फरसाण खायला घातली पण ते स्वान समर्था घरचे असावेत तसे त्या फरसाणीलाही तोंड लावेनात. अरे हे कुत्रेच मा? राजन ने शंका उपस्थित केली. सगळ्यांच्या कळजाचा ठोका चुकला. कोकणात रात्री बरोबर जोडला गेलेला शब्द म्हणजे भुताटकी. ही लक्षणं काही बरी नाहीत असा भाव सर्वांच्याच चेहर्यावर येऊन गेला. गणेश आमच्यात नवीन होता. चला जावया त्याने सुचना केली. घड्याळा कडे लक्ष गेलं रात्रीचे बारा वाजून गेले होते. त्या अफाट पसरलेल्या समुद्र किनार्यावर आम्ही पाच आणि ते तीन जगा वेग़ळे कुत्रे. ते पाण्यात आत पर्यंत जाऊन पुन्हा येत होते. आम्हाला त्यांची संगत नकेशी झाली. तसेच मागे फिरलो. पण परतीची वाट सापडत नव्हती. वेंगुर्ला शहरापासून आम्ही बरेच दुरवर आलो होतो. उत्साच्या भरात तेव्हा ते समजलं नव्हतं. किनार्य़ावर सगळं सारखच वाटतं. हा चकवा तर नाहीना? मनात अनेक शंकांनी घर केलं. त्यात एखादा घाबरला तर दुसर्या दिवशी त्याचे आई वडील आम्हाला ओरडणार. तेवढ्यात एक भिंत दिसली., जिवात जीव आला, चला इथून नक्की वाट दिसेल म्हणून आम्ही तिकडे गेलो. पण काय तिथे राखेचे ढिग, काही अर्धवट जळालेले ओंडके, फुटकं मडकं असच काहीबाही होतं. ते एकंदर दृष्य पाहून हे स्मशान आहे हे आमच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आता तर आम्ही आगीतून फुपाट्यात पडल्या सारखे झालो. जाऊदे काहीही असो. आता इथून लवकरात लवकर काढता पाय घेतला पाहिजे म्हणून विरूद्ध दिशेला चालत राहिलो. कधी मळलेली वाट तर कधी आड वाट असं करत मुख्य रस्त्यावर आलो. सगळीकडे सामसुम होती.  बाजाराच्या दिशेने चालत राहिलो. ज्या घरात सायकली ठेवल्या होत्या तिथे येऊन दार ठोकलं. पण तो पठ्ठ्या डाराडूर झोपला असावा. को..जा..ग..र...ती याचं उत्तर द्यायला तो बांधील नव्हता. आमचा नाईलाज झाला. आम्ही एस्टी स्टॅन्डचा रस्ता धरला. उरलेली रात्र कुत्र्यांच्याच सहवासात स्टॅन्डवर पेंगत काढली, आधार एवढाच की ते कुत्रे स्मशानातले नव्हते तर प्रवाशाना सरावलेले माणसाळलेले होते.   
         

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates