28 May, 2013

त्या काळ कोठडीतली ११ मिनीटं


 
अभिनेते शरद पोंक्षे आग्रह करीत होते फक्त अकरा मिनीटं त्या काळ कोठडीत बसून अनुभव घ्या. काय वाटतं..... कसं वाटतं....

अंदमांच्या सेल्युलर जेल मध्ये आपण कधी गेलात तर त्या कारागृहामधल्या कुठल्याही कोठडीत फक्त अकरा मिनीटं बसून बघा. मी तो अनुभव घेतलाय. हे आपण आपल्या इच्छेने करतोय, कुठल्याही क्षणी आपण बाहेर जावू शकतो, इथे आपल्यावर कुठलच बंधन नाही हे सर्व माहित असूनही ती ११ मिनीतं तिथे असह्य होतात हा स्वानुभव आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी तिथे ११ वर्षं महाभयंकर अशा यमयातना भोगल्या. आणि त्या भोगत असताना कमलासारखं महाकाव्य लिहिलं, पंगतीभेद विसरायची दिक्षा दिली, कैद्याच्या अंगीचा बाणेदारपणा जिवंत ठेवला. वास्तवीक क्षणोक्षणी आत्महत्येचेच विचार मनात यावेत अशीच तिथली स्थिती होती. तसे ते भोग भोगत असताना प्रत्येक क्षणी केवळ देशाचाच विचार वीर सावरकरानी केला होता.

आज रम्य वाटणार्‍या त्या कारागृहात गेल्यावर जर आपण त्या कोठडीत गेलात आणि ११ मिनीटं जरी थांबलात तरी मनाला, शरीराला ज्या यातना होतात त्यांचा अनुभव घेतला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशासाठी काय प्रकारची शिक्षा भोगली याची पुसटशी तरी कल्पना येते.

आज वीर सावरकरांची जयंती, गेल्या पुण्यतिथीला घेतलेला तो अनुभव आठवला. काळाच्याही पुढे जावून सावरकरानी या देशाचा जो विचार केला तो किती योग्य होता त्याची आपणाला अगदी रोजच्या रोज जाणीव होत असते. नुकतच चीनने जे अतिक्रमण केलं ते त्याचं ताजं उदाहरण आहे, याच संदर्भात भारतीय नौदलातील माजी अधिकारी विनायक श्रीधर अभ्यंकर यांचा लोकसत्तामध्ये आज प्रसिद्ध झालेला लेख स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचं महत्व अधोरेखीत करतो. तो लेख जरूर वाचा:

20 May, 2013

ईश्वरास




कधी पंतंग होऊन वार्‍यावर झुलताना
कधी नीलनभावर विहंगासम फिरताना
तू डुलवशील जणू बाळ असे मी तान्हा
हळूवार असे तो झोका सावरताना

आच्छादीत जाशी आसमंत तव मायेचा
पसरला लांबवर गालीच्याच पाचूंचा
तू दिसशी सर्वदूर अब्ज अब्ज बाहूंचा
मी उभा इथे हा माथा की स्वर्गाचा

हलक्याहून हलके तनमन आज जहाले
कधी उठले होते प्रश्न तेही निमाले
काजळ काळे डाग दूर दूर गेले  
नी तुझेच ते रुप जवळी माझ्या आले

निमिषात उडाले भाव मनीचे खिन्न
कापुरासम विरती होती क्षणात भिन्न
तू हृदयी गाशी मस्त होवूनी तान
किती मोद वाटतो आज हरपले भान


भूतानमधल्या टकसंग गुंफेचा ट्रेक करताना वर पोहोचल्यावर उचंबळून आलेल्या भावना. नितांतसुंदर हिमालयात गेल्यावर हे असं होतं.

नरेन्द्र प्रभू

  

01 May, 2013

माझ्या महाराष्ट्र देशा





त्रिवार वंदन तुझीया पायी
महाराष्ट्र देशा
तव मातीतच घडलो जडलो
माझ्या परमेशा

कठिण कातळ, कणखर भाषा
शस्त्रांच्या घोषा
दिव्य पराक्रम रणवीरांचा
तुझ्या बाहूपाशा

अपार श्रद्धा, अविरत परिश्रम
करू सिद्ध आशा
काळालाही भिववीशील तू
धाक असे म्लेन्षा

अथांग सागर तुझ्याच ठायी
कृष्णा गोदावरी
अभेद्य कवच सह्यकड्यांचे
तुझीया माथ्यावरी

तू तुकयाचा, ज्ञानेशाचा
समर्थ वारकरी
तूच पराक्रम समरांगणीचा
शिवबाच तुझ्या अंतरी


माय मराठी अमृताची
अवीट गोड भाषा
त्रिवार वंदन तुझीया पायी
महाराष्ट्र देशा


नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates