31 May, 2015

सराहन - चायल


सराहन 
     
सिमला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग २२ च्या आसपास २५-३० किलोमीटर आत गेलं तर सराहन, चायल सारखी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी जाऊन आपण हिमालयात निवांतपणे भटकण्याचा आनंद घेवू शकतो. अगदी चार रात्री पाच दिवसाचा कार्यक्रम आखून चंदीगढहून निघाल्यास या दोन्ही ठिकाणचा प्रवास संस्मरणीय होऊ शकतो. सराहान हे ठिकाण  सिमल्या पासून १८० किलोमीटरवर आहे.
 

सराहानला आम्ही हॉटेल श्रीखंड मध्ये राहिलो होतो.  हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळाचं हॉटेल श्रीखंड (समोरच दिसणार्‍या श्रीखंड महादेव पर्वतावरून हे नाव ठवलं आहे.) अशा ठिकाणी आहे की संपुर्ण सराहान व्हालीचं दर्शन अगदी प्रत्येक खोलीतून होतं. फक्त हॉटेलमध्ये विश्रांती घेणार्‍यालाही इथे शांती लाभू शकेल. जवळच पुरातन कालीन भिमाकाली मंदीर परिसर आहे. बुशहर संस्थानची राजधानी असलेलं हे ठिकाण असून भिमाकाली मंदीर हे एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. पुरातन वास्तूकलेचा उत्तम नमूना असलेलं भिमाकाली मंदीर देखणं आहे. लाकूड आणि धातूमध्ये केलेलं कोरीव काम हे या मंदीराचं वैशिष्ट्य आहे. चहूबाजूंनी हिमाच्छादीत शिखरांनी वेढलेल्या या ठिकाणी राहण्याचा आनंद काही औरच आहे.

चायल

चायल सिमल्या पासून ४४ किलोमीटरवर आहे. पतियाळाच्या महाराज्यांचं हे उन्हाळ्यातील वास्तव्याच ठिकाण असून संपुर्ण भाग देवदार वृक्षांनी वेढला आहे. चायल आता अभयारण्य म्हणून घोषीत झालं असून जंगलाचा बर्‍यापैकी अनुभव घेता येतो. 
  
या ठिकाणी राहून फागू, कुफरी आणि शिमला या ठिकाणीही आपण फिरायला जाऊ शकतो. पतियाळाच्या महाराजांचं तेव्हाचं निवासस्थान आता हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळाच्या  हॉटेल चायल पॅलेसमध्ये रुपांतरीत केलं असून अन्य पर्यटकांना तिथे  तिक्त्त्ट काढून भेट देता येते.  













23 May, 2015

सांगला


काल्पा, रिकॉंग पिवो मागे टाकत पुन्हा राष्ट्रीय महामार्ग २२ वरून सांगला-छितकूलकडे वळलो आणि त्या दुर्गम प्रदेशातला आणखी दुर्गम भाग सुरू झाला. सतलज आणि बास्पा नदीच्या पाण्यावर या भागात ठिकठिकाणी जल विद्युत प्रकल्प उभारले आहेत. त्या प्रकल्प क्षेत्रात असणारीच काही बांधकामं वगळता या भागात फारशी वस्ती नाही आणि म्हणून बांधकामंही नाहीत.
      

हिमालयामधल्या रस्त्यांवर सर्व सुरळीत चाललं असताना ‘सुहाना सफर और यह मौसम हसी’ असं वाटत असलं तरी एखादा कडा कोसळण्याने ही पुढची सगळी वाहतूक बंद होवू शकते. काल्पाहून सांगला गावात निघतानाही त्याची शक्यता जास्त होती. पहाटे लवकर निघण्यापेक्षा दहा वाजताच निघावं हा चालकांचा सल्ला मी ऎकायचं ठरवलं. त्याचा प्रत्ययही लगेच दोन तासात आला. वाटेत एका 
जलविद्युत प्रकल्पासाठी बांधलेल्या पुलावरून गाडी पुढे गेली आणि तिथे बंदोवस्तासाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आमच्या गाड्या थांबवल्या, गाडी वळवून मागे नेण्याची खुण हाताने केली. पुढे भली मोठी दरड कोसळून सांगला गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला होता. गाड्या मागे वळवून नदीपल्याडच्या रस्त्यावरून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की ती दरड नसून एक टेकाडच कोसळलं होतं. तिथे रस्ता असल्याची खुण मिटवणारी ती माती बघताना काल्पाच्या हॉटेलच्या मॅनेजरची आठवण झाली. सकाळी उठल्यापासून सांगलाचे रस्ते चालू आहेत ना? याची खात्री करून निघा असं तो पुन्हापुन्हा सांगत होता. आता लक्षात आलं त्याच्या म्हणण्याला आधार होता. तरी नशीब पर्यायी मार्ग उपलब्ध होता नाही तर मागे फिरावं लागलं असतं. दहाच दिवसांपुर्वी नेपाळला आलेल्या भुकंपाची आठवण झाली, कोडारीला भुकंपाचं केद्र होतं. दोन वर्षापुर्वीची कैलास-मानसरोवरची यात्रा आठवली. ते कैलास आणि हे किन्नौर कैलाश नावात जसं साम्य तसं परिस्थितीतही. सांगला, पुढे छितकूल हे भारत तिबेट सिमेवरचं भारताच्या बाजूचं शेवटचं गाव पुढे मानवी वस्ती नाही पर्वत ओलांडल्यावर तिबेटची सिमा सुरू होते. तिबेटच्या कोडारीकडच्या बाजूला जोरदार भुकंपाचे धक्के बसून होत्याचं नव्हतं झालेलं आणि इकडे छितकूलच्या बाजूला आम्ही उभे होतो.


इथे हिमालयात फिरताना बघायचे असे ठरावीक स्पॉट नसतात. सगळाच प्रवास एक देखावा बनून समोरून सरकत असतो. इथे जर एखादी डुलकी काढली तर काहीतरी नक्कीच चुकणार.
पर्वत, दर्‍या, नद्या, धबधबे, शिखरं, देवदार, सुचिपर्णी वृक्ष हे सगळीकडे असले तरी ठिकठिकाणंचं सौदर्य वेगळं, दृश्य वेगळी. म्हणून तर एकदाका तुम्ही हिमालयात गेलात की त्याचेच होऊन जाता, मग प्रदेश कुठला का असेना, हिमालय आपल्याला बोलावतच राहातो. पाचुच्या रंगाचे पर्वत लख्ख उन्हात न्हाऊन निघाले होते. तशी पुर्णप्रवासात नारकांड्याची एक सर तेवढी सोडली तर आकाश स्वच्छ होतं. प्रवास उत्तम चालला होता.

किन्नौर कॅम्प्स
गाडी सांगला गावात आली, छोटीशी वस्ती, सात-आठ ईमारती आणि त्यात थाटलेली दुकानं, तेवढा बाजार पार करून गाड्या पुढे गेल्या. ‘किन्नौर कॅम्प्स’ हे आमचं वासतव्याचं ठिकाण अजून पाच किलोमीटरवर होतं. एक अवघड वळण घेवून गाड्या उताराला लागल्या आणि  किन्नौर किन्नौर कॅम्प्सच्या तंबूंजवळ वरच्या बाजूला थांबल्या. किन्नौर कॅम्पसचे श्री. नेगी स्वागताला हजर होतेच, सर्वांच्या गळ्यात मानाचा स्कार्फ घालून त्यानी आमचं स्वागत केलं. नैसर्गीक साधनांचा उत्तम वापर करून उभारलेला जेवणासाठीचा भला मोठा मंडप पाहूनच त्यांच्या कल्पकतेची आणि ‘अथिती देवो भव’ची कल्पना येत होती. दोन दिवसाच्या आदरतिथ्याने त्यानी ती खरी करून दाखवली.
 
बास्पा नदीच्या खळाळत्या प्रवाहाकाठी असलेला किन्नौर कॅम्पस म्हणजे हिमालयचा मनमुराद आनंद लुटायचं उत्तम ठिकाण आहे. सहलीचा चांगला मार्ग पोटातून जातो, तिथे पोटोबा खुश असायचा. सगळ्या तंबूंकडे धावपळ करणारी मोजकी माणसं असूनही व्यवस्था चोख होती. चहू बाजूनी पर्वत शिखरानी वेढलेला तो परीसर, पक्षांचा किलबिलाट  आणि बास्पाचा खळाळता प्रवाह मन शांत करण्यासाठी अगदी योग्य जागा.
ही अशी जागा शोधणं हे ही तेवढंच महत्वाचं. माझा मित्र आत्माराम परब हा या बाबतीतही उजवा ठरतो. सहलीत आपण कुठे राहतो यावरून त्या सफरीचं यश बर्‍याच अंशी अवलंबून असतं. आत्माने हे ठिकाण शोधलं म्हणून मनातल्या मनात त्याला धन्यवाद देत मी बास्पाच्या प्रवाहाकडे वळलो. ही पण आत्माची खासीयत, जगात कुठल्याच ठिकाणी तो अनोळख्या सारखा वागत नाही. जणू काही सगळ्या वाटा त्याने आधीच धुंडाळल्या आहेत. बास्पा नदीचा तो प्रवाह आणि नदी काठची ती जागा कायम स्मरणत रहाण्यासारखी आहे. नदीच्या दोन्ही काठांना भल्यामोठ्या देवदार वृक्षांनी वेढलं आहे. खळातता प्रवाह सोडून आपली तपस्या भंग करायला तिथे कुण्णी म्हणून नसतं.



कामरू फोर्ट
सांगलाच्या जवळच असलेला तिबेटी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे कामरू फोर्ट. सांगला व्हॅलीच्या पार्श्वभुमीवर उठून दिसणारा हा पुरातन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या किल्ल्याच्या तीसर्‍या मजल्यावर विराजमान झालेल्या कामाक्षी देवीच्या मुर्तीमुळे आता जुना इतिहास मागे पडून ते कामाक्षी देवीचं मंदीर बनलं आहे. हा पुरातन किल्ला असला तरी आजही तिथलं नक्षीकाम शाबूत आहे. याच किल्ल्याच्या आवारात पंधराव्या शतकातलं बद्रीनाथ मंदीरही आहे तसंच मुख्य प्रवेश द्वारावर बुद्धाचा भव्य पुतळा पाहायला मिळतो. छायाचित्रणाच्या दृष्टीने महत्वाची सांगलाव्हॅली, तीचं प्रसन्न करणारं लॅन्डस्केप आणि त्या परीसरात उठून दिसणारा कामरू फोर्ट फोटोग्राफर आणि  चित्रकार यांना हवातसा वाव देणारंच हे ठिकाण आहे. 


भारत तिबेट सीमेवरचं शेवटचं छितकूल हे गाव पाहिल्याशिवाय सांगलाची सफर पुर्ण होऊ शकत नाही. मोजकीच घरं असलेलं हे गाव निसर्गसौदर्याने वेढलं आहे. अगदी मे महिन्यातही तिथे बर्फात खेळण्याची मजा लुटत येते. बास्पा नदीचा निळा प्रवाह, वनरायी आणि शुभ्र  बर्फाच्छादीत शिखरं पाहून आपल्या देशात किती आणि काय काय फिरण्यासारखं आहे  याची कल्पना येते. त्या छोट्याशा गावात फेरफटका मारला तेव्हा तिथल्या जोरदार प्रवाहावर चालणार्‍या पिठाच्या गिरणीचं दर्शन घडलं. नैसर्गीक साधनसंपत्ती आणि स्त्रोत यावरच तिथलं जीवन अवलंबून आहे. चार पाच तासांच्या ट्रेकिंगला जाणार्‍यांना ही जागा योग्य अशीच आहे. दगड आणि लाकूड यांचा वापर करून बांधलेली इथली घरं आणि मंदीरं पाहून या भागाच्या वेगळेपणाची कल्पना येते.



परत निघण्याआधी भल्या पहाटे उठून तासभर फेरफटका मारल्यास पुढच्या कित्येक पहाट त्या आठवणींनीच नक्कीच सुखकारक होतील.    





किन्नौर कॅम्पसचे सूसज्य तंबू  















       

21 May, 2015

काल्पा


सगळा हिमाचल प्रदेश नावाप्रमाणे हिमालयातच वसल्यामुळे तिथे सरळ रस्तेच दुर्मिळ. वेडी-वाकडी वळणं घेत जाणारे रस्ते हेच जणू हिमाचल प्रदेशचं वैशिष्ट्य. किनौर व्हाली तर या अवघड रस्त्यांसाठीच प्रसिद्ध आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसर्‍या बाजूला उभे पर्वत अशा घाट रस्त्यामधून वाट काढतच शिमला जिल्ह्यामधून किन्नौर जिल्ह्यात जावं लागत. शिमला जिल्ह्यात बर्‍यापैकी वस्ती असल्याने वाटेत सफरचंद, चेरी, पिचच्या बागा लागतात. अवकाळी पावसाच्या मार्‍यापासून सफरचंदांच्या फुलांचं रक्षण व्हाव म्हणून तिथल्या जागृत शेतकर्‍याने बरिचशी झाडं आच्छादलेली दिसतात. कुठल्याही घरासमोर फुलांनी लगडलेली गुलाबाची झाडं पाहून मन प्रफूल्लीत होतं.
किन्नौर कैलाशचं अनोखं रुप (छाया: दिपकराव जाधव) 



ढाली, कुमारसैन, किंगल, खोपरी, रामपूर अशी गावं मागे टाकत जेव्हा आपण किन्नौर जिल्ह्यात प्रवेश करतो तेव्हा आजूबाजूच्या प्रदेशातही फरक पडलेला असतो. खळाळत्या प्रवाहासह रस्त्यात साथ करणारी सतलज नदी कधी आपलं सौम्य तर कधी रौद्र रुप दाखवत दौडत असते. वाटेत येणारे दगड, गोटे, माती स्वत:बरोबर घेवून निघालेला तिचा प्रवाह तेवढाच कायतो शहरातील माणसांच्या लोंढ्यासारखा वाहात असतो बाकी सगळं कसं शांत शांत. पण याला अपवाद करतो तो वारा. सुसाट वेगाने निघालेला हा वारा तिथल्या महाकाय प्रर्वतांनाही भिडतो. जमिनीची सारखी धुप होत असते. मे महिन्यात तिथल्या उन्हाळ्यामुळे बर्फ वितळल्याने उघड्या झालेल्या पर्वतांवरचे दगड घोंडे या वार्‍यानेच आपली जागा सोडतात आणि तिव्र उतारावरून थेट दरीत झेप घेत असतात. अशा कोसळणार्‍या दगडांची गती एवढी वेगाची असते की त्याला ‘स्टोन शुटींग’ असा शब्दच प्रचलीत आहे. अशाच एका दगडाने आमच्या गाडीवर हल्ला केला आणि पुढची काच फुटता फुटता वाचली, तरी त्या दगडाने आपली कायमची खुण उमटवलीच.






मोकळ्या शितल हवेतल्या इथल्या पक्षी जगताने आपलं लक्ष वेधून घेतलं नाही तरच नवल. पायी चालत जायला जर मोकळा वेळ असेल तर त्यांचं उत्तम दर्शन घडतं. नुसत्या हिमालयीन मैनाही गुबगुबीत देखण्या दिसतात. पक्षी, फुलं, फळं या सगळ्यांचेच रंग उठून दिसणारे. सफरचंचाची फिकट गुलाबी फुलं किती साजरी दिसतात. सगळं कसं रसरशीत. लांबच्या प्रवासाने आळसावायला झालं तर वाहनातून उरल्यावर पाच मिनिटात पुन्हा तजेला येतो. ही मोकळी हवा, तिथला निसर्ग, महाकाय पर्वत, पाताळात जाणार्‍या दर्‍या, खळाळते प्रवाह आणि शुभ्र बर्फाच्छादीत शिखरं हे हिमालयाचं जगभरातील पर्यटकांना भुलवणारं रुप न्याहाळायलाच इथे जायचं, वर्ष भराचं वारं पिऊन घेण्यासाठी.

निसर्गाच्या या अफाट कॅनव्हासवरच्या बारीकशा रेषा हिच माणसाची इथली खुण. नदी काठावरून वरवर जाणारे रस्ते नागमोडी वळण घेत पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणचं दर्शन देत राहातात आणि मग कधीतरी अचानक मागचा प्रदेश दिशेनासा होतो आणि नव्या दुनियेत आपण प्रवेश करतो. एक पर्वत ओलांडून दुसर्‍या पर्वताच्या उतारावर गाडी धावत असते, सुर्याचा डोंगराआडून लपंडाव सुरू होतो आणि आजचा त्याचा दिवस आता संपणार अशी वर्दी मिळते तरी आपलं मुक्कामाचं ठिकाण अजून दूरच असतं. हिमालयात मैलाच्या दगडाला फारसं महत्व नाहीच. आपण शहरी माणसं ते पहात अंतराचा, वेळेचा अंदाज बांधत असतानाच एखादं असं डायव्हर्शन येतं की मती गुंग होते. त्यावरून धावणारी वाहनं कधी थांबवायची ती ठरवणार कोण तर निसर्ग. काल्पाकडे जाणार्‍या रस्त्यावर आम्हाला असंच एक डायव्हर्शन घ्यावं लागलं. चक्क २२ किलोमीटरचं. दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी एवढा दविडीप्राणायाम करावा लागला. किमान दोन तासांचा तरी प्रवास वाढला. हा पर्यायी रस्ताच आता कायमचा होणार असं दिसत होतं. ‘सिमा सडक संघटन’ने (BRO) आपलं काम तिथे सुरू केलं होतं. ‘ब्रो’ चे मजूर आणि GREF चे अभियंते या भागात सतत कार्यरत आहेत म्हणूनच तिथल्या जनतेला आणि आपल्यासारख्या पर्यटकांना या भागात फिरता येतं अन्यथा पायी यात्रा करणं हा एकमेव मार्ग शिल्लक उरला असता.

जेवढं खडतर जीवन तेवढीच किंवा त्याहून उतुंग अशी माणसाची जिद्द. पर्वत उतारावर चार-पाच फुटाच्या पायर्‍याकरून तिथला शेतकरी शेती करतो ते पाहून आपण विचार करायल उद्युक्त होतोच. दिवसभर थकवणारा प्रवास करीत मुक्कामाकडे लक्ष ठेवून जाणार्‍या आम्हाला ‘किन्नौर कैलाश’चं दर्शन घडलं आणि नकळत वाहनाना विश्राम द्यावाच लागला. मावळतीकडे निघालेला सुर्य त्या पर्वतांच्या मुकुटावर झळाळी चढवण्याचं काम घाईने करीत होता आणि सगळ्यांनाच तो अचूक क्षण टिपायची उत्कंठा लागून राहिली होता. तो मुकुट सोनेरी होणं न होणं नशिबावर अवलंबून असतं. शेवटी रोजचे रंग वेगळे हेच खरं.

रिकोंग पिवो असं तिबेटी नाव धारण केलेलं किन्नौर जिल्ह्याचं ठिकाण आल्यावर काल्पा हे गाव दिसायला लागतं तरी ते अंतर सहा-सात किलोमीटर एवढं आहे. रिकोंग पिवो हे जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी ती काही खुप मोठी बाजारपेठ नव्हे असं असलं तरी पर्यटकांना आणि तिथल्या लोकांना रोजच्या गरजा भागवण्याएवढं सामान तिथे नक्कीच मिळतं. दुतर्फा सफरचंदांच्या झाडांची सलामी घेत घेत जाताना काल्पा कघी आलं, खरं तर आपण काल्पाला कधी आलो ते कळतही नाही. समोरची भिंतच असावी तसा  अगदी जवळ किन्नौर कैलासचा धवल पर्वत उभा ठाकलेला असतो आणि संधीप्रकाशातही तो उठून दिसायला लागतो. त्याच्या मागे उगवलेला चंद्र अजून कसा वर येत नाही अशी वाट पाहत असणारे आपण कुडकुडत उभे असतो आणि थंडी किती असेल याची पहाणी करण्यासाठी थरथरती बोटं स्मार्ट फोनवर फिरवू लागतो.


चंद्र प्रकाशातलं किन्नौर कैलासचं रुप केवळ अप्रतिम. त्याचं वर्णन करता येणार नाही. चांदण्यात न्हावून निघालेला किन्नौर कैलास पहायचा असेल तर तिथेच गेलं पाहिजे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री किन्नौर कैलासचं ते साजरं रुप न्याहाळायला आम्ही त्या रात्री  बराच वेळ जागे होतो, आर्थात चंद्राच्या साक्षीने.

काल्पा हे सतलज व्हाली मधलं छोटसं गाव आहे. जवळच्याच कोठी गावात चंडीका देवीचं पुरातन मंदीर आहे. देवदार वृक्षांच्या छायेत असलेलं पुरातन मंदीर भारतीय आणि तिबेटी कलेचा संगम असलेलं देवालय आहे. कुठलंही स्तोम न माजवलेली ही छोटी पण सुरेख मंदीरं हे तिथल्या जनतेची श्रद्धास्थानं आहेत. वैशाख पौर्णिमेला इथल्या काही देवालयाचीही कपाट उघडतात, अशाच एका गावात देव येण्याच्या प्रसंगी पारंपारीक नृत्यात दंग असलेले गावकरी आम्हाला पहायला मिळाले. भल्यामोठ्या देवदार वृक्षांच्या मागे उभ्या असलेल्या पर्वत रांगा हिमालयाचं भव्य रुप दोन दिवसाच्या वास्तव्यातही आपल्या मनावर कायमचं कोरुन ठेवतात.  

देव येण्याच्या प्रसंगी पारंपारीक नृत्यात दंग असलेले गावकरी










LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates