27 August, 2022

असा खयंच नाय खावक

Audio Link असा खयंच नाय खावक



 

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

घावणे, आंबोळ्यो, खापरोळी आणि ताटाभोवतीची रांगोळी

नारळाचो रस, वाटाण्याचा सांबार बगून आंघोळीक मारतलस गोळी

आवशीच्या हातचा कुळताचा पिठला आणि तांदळाची भाकरी

अरे नाष्टो काय खायत रवलस फुडे गम्मत आसा खरी

ती विचारतली... आता काजी भाजूया काय कलिंगण व्हया खावक

उताणी पडान म्हणशीत आवशी पोटात जागा नाय गे रवाक

म्हणान, मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

दुपारच्या जेवणाक गोलम्याची कोशंबीर आणि बांग़ड्याचा तिकला

भाताबरोबर भुरकूक कर्लीचा निसत्याक आणि वांग्या पण भरला

ताजो फडफडीत इसवण आजून वाट बगतलो तव्यार

अर्दाच जेवन झाला तरी येतला ता आंगार

ती म्हणतली इतक्याय जमणानाय तर इलं कित्या झकमारूक

आणि मगे तेच्यार जिरवणी म्हणान देतली सोलकडी पिऊक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

आरावलेलो कोम्बो अचानक गप जातलो

सागोती म्हणान वड्याबरोबर ताटात येतलो

दुपारी इतक्या जोवलस तरी आडवो हात मारतलस

पोटाकडे बगून आता खुप झाला म्हणतलस

आजून आये बगतली वाकान तूका वाडूक

चवच तशी म्हणत चघळत रवतलस हाडूक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

कितीय रवलस तरी म्हणतली आणखी दोन दिवस रव

आजून खय बगलस तू जत्रा आणि फिरान ह्या गाव

जत्रेतला खाजा आणि लाडू देतली बांदून

परड्यातली ताजी भाजी देतली कुशीक सारून

म्हणतली परत येशीत तेवा मात्र दिवस काड रवाक

ह्या पावटी इलस तरी कायच नाय खावक

म्हणान तुका सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय खावक

  नरेंद्र प्रभू    



08 August, 2022

किन्नौर आणि स्पिती व्हॅली

 



घरी बसल्या बसल्याच घामाच्या नुसत्या धारा लागल्यात. या उन्हाळ्याने जीव नकोसा झाला असं झालं की आठवतात ती थंड हवेची ठिकाणं. मित्रहो अशा ठिकाणांची आपल्या देशात वानवा नाही. निसर्गरम्य अनेक ठिकाणं आपल्या गहिर्‍या रुपात आपणाला साद घालत असतात. मात्र लगेचच त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तिथे हिमालयात जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. त्यातही हिरवागार निसर्ग, वसंतोत्सवाचा परमोच्य बिंदू, आल्हाददायक हवा या सर्वाचा पुरेपूर अनुभव घ्यायचा तर हिमाचल प्रदेश हे आपलं हक्काचं ठिकाण.

 

माथ्यावर भव्य मोकळं आकाश आणि खाली पसरलेला तेव्हढाच विशाल भू प्रदेश. माणसाचं अस्तित्व जणू नगण्य असल्याचं सारखं भासत रहातं, तो हिमाचल प्रदेशमधला कायमचा मनात घर करून राहणारा भू भाग म्हणजे किन्नौर आणि स्पिती व्हॅली. निसर्गाने इथे मुक्त हस्ताने रंगांची उधळण केली आहे. निळा-हिरवा प्रवाह घेऊन धावणार्‍या इथल्या नद्या, धवल मुकूट धारण केलेले पर्वत. चकाकणारे ग्लेशर्स, हिरव्यागार दर्‍या, निलवर्ण आकाश आणि अनंत रंगात नटलेली इथली जमीन. वसुंधरेच्या यच्ययावत सौंदर्याची जणू सगळी रुपंच इथे न्याहाळायला मिळतात. अनेक रुप रंगाने आणि विविधतेने नटलेला आपला देश पाहायचा तर स्पिती व्हॅलीला भेट दिल्याशिवाय तो मानस नक्कीच पुर्ण होत नाही.

 

राष्ट्रीय महामार्ग २२ वरून चंदिगडची वेस ओलांडली की मग हवेतला गारवा जाणवायला लागतो. रखरखीतपणा मागे टाकून गाडी जसजशी पुढे जायला लागते तसतशी रस्त्याच्या दुतर्फा झाडांची दाटी आणि फुलांची आरास दिलखुश करू लागते. हिमालयात जेवढ्या वेळा आपण जाल तेवढ्या वेळा त्याच्या गारुडाने मन त्याचं होवून जातं. आपण आपले रहात नाही हेच खरं. वाटेत दिसणारी निलमोहरांची रांग बघून क्षणभर इथेच थांबू म्हणणारं मन पुढच्या क्षणी दुसर्‍या रंगाच्या प्रेमात पडतं. मागचे रंग आणि हे रंग यांची रंगपंचमी मनातल्यामनात सुरू असतानाच उन्ह कलायला लागतात. सुचीपर्णी वृक्षांचा दबदबा वाढायला लागतो आणि मैलांचे दगड शिमला जवळ आल्याचं खुणावू लागतात. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला एकदा सोडल्यावर शहर आणि गजबजाट या पासून दूर स्वप्नवत गावात घेऊन जाणारा प्रदेश म्हणजे हिमाचलचा किन्नौर जिल्हा. ताजेपणाची क्षणाक्षणाला जाणीव करून देणारा.

 



हिमाचलचं खरंखुरं सौंदर्य न्याहाळण्यासाठीच तर इथं जायचं. ब्रिटिशकाळापासून शिमल्याला
क्विन ऑफ हिल्स असं म्हणत असले तरी ते शहर सोडल्यावर आपण खर्‍या अर्थाने राजा असतो. या देवभुमीवर जसजसे आपण पुढे जातो तसतसे आपसूकच या प्रदेशाच्या प्रेमात पडतो. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी उंचच उंच पाईन आणि सुचीपर्णी वृक्षांची दाटी न्याहाळत, कधी दूरवर दिसणारी पर्वतरांग कॅमेर्‍यात बंदीस्त करीत आपण किनौर जिल्ह्यात कधी येवून पोहोचलो हे कळत सुद्धा नाही. याच मार्गावर पुढे असलेलं हातू पीक हे तिथलं उंच शिखर आपल्याला खुणावत असतं. नजर निववणारी हिरवाई आणि ताजी स्वच्छ हवा आपला उत्साह वाढवत असते आणि जेव्हा हातू पीक हे ठिकाण येतं, तेव्हा तिथून दिसणारा देखावा पाहून मन प्रसन्न होतं. समोर दिसणार्‍या  हिमालयाच्या  रांगा आणि त्यावर उठून दिसणारी धवल शिखरं पाहून येथवर आल्याचं सार्थक झालं अशीच प्रत्येकाची भावना असते. गर्द वनश्री, डोंगर उतारावर कसणार्‍या    हातांनी केलेली शेती, सफरचंदानी लगडलेली झाडं, अनेकरंगी फुलं आणि हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा,  हिमालयाची अनेकविध रुपं पाहताना आपण हरखून जातो. ११००० फुटांवरचं हे ठिकाण सोडताना तिथला निसर्ग नजरेत आणि कॅमेर्‍यात भरून घेत पावलं पुढच्या प्रवासाकडे वळतात. याच हातू पीकवर १८१५  साली शूर गुरख्यांनी ब्रिटीशांविरुद्धची आपली अखेरची लढाई लढली होती.   

 

सिमला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग २२ च्या आसपास २५-३० किलोमीटर आत गेलं तर सराहन, चायल सारखी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी जाऊन आपण हिमालयात निवांतपणे भटकण्याचा आनंद घेवू शकतो. सतलज नदीचा जोरदार आणि खळाळता प्रवाह पार करत आपण सरहान या गावात येऊन पोहोचतो. बर्फाच्छादीत शिखरांनी वेढलेलं हे गाव आणि तिथलं भव्य भिमाकाली मंदीर पाहातान आपल्याला वेगळ्याच जगात येऊन पोहोचल्याचा साक्षात्कार होतो. ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेले हे मंदीर पुर्वीच्या बुशाहर संस्थानचं दैवत असून त्या संस्थानची सरहान ही राजधानी होती. भिमाकाली मंदीर हे सतलज व्हॅलीमधलं उत्तम लाकडी काम असलेलं सुंदर मंदीर आहे. या मंदीराच्या आवारातच रघुनाथ, नरसिंह आणि पाताळभैरव या देवतांची मंदीरंही आहेत. याच गावातून हिमालयातील श्रीखंड शिखराचं सुंदर दर्शन घडतं. चायल हे सिमल्या पासून ४४ किलोमीटरवर असलेलं एक निवांत गाव आहे. पतियाळाच्या संस्थानच्या महाराज्यांचं त्या काळातलं हे उन्हाळ्यातील वास्तव्याचं ठिकाण. या गावाचा संपुर्ण भाग देवदार वृक्षांनी वेढला आहे. चायल आता अभयारण्य म्हणून घोषीत झालं असून या ठिकाणी जंगलाचा बर्‍यापैकी अनुभव घेता येतो.  

 

 



किन्नौर मधलं स्वप्नातलं वाटावं असं गाव म्हणजे सांगला. त्या दुर्गम प्रदेशातला आणखी दुर्गम भाग सुरू होतो. सतलज आणि बास्पा नदीच्या पाण्यावर या भागात ठिकठिकाणी जल विद्युत प्रकल्प उभारले आहेत. त्या प्रकल्प क्षेत्रात असणारीच काही बांधकामं वगळता या भागात फारशी वस्ती नाही आणि म्हणून बांधकामंही नाहीत. इथे हिमालयात फिरताना बघायचे असे ठरावीक स्पॉट नसतात. सगळाच प्रवास एक देखावा बनून समोरून सरकत असतो. इथे जर एखादी डुलकी काढली तर काहीतरी नक्कीच चुकणार.

 

पर्वत, दर्‍या, नद्या, धबधबे, शिखरं, देवदार, सुचिपर्णी वृक्ष हे सगळीकडे असले तरी ठिकठिकाणंचं सौदर्य वेगळं, दृश्य वेगळी. म्हणून तर एकदाका तुम्ही हिमालयात गेलात की त्याचेच होऊन जाता, मग प्रदेश कुठला का असेना, हिमालय आपल्याला बोलावतच राहातो. पाचुच्या रंगाचे पर्वत लख्ख उन्हात न्हाऊन निघालेले पाहिले की मन अगदी तृप्त होऊन जातं.

 

बास्पा नदीच्या खळाळत्या प्रवाहाकाठी असलेली निवासी ठिकाणं किंवा कॅम्पस म्हणजे हिमालयचा मनमुराद आनंद लुटायचं उत्तम ठिकाण आहे. सहलीचा चांगला मार्ग पोटातून जातो, तिथे पोटोबा खुश असतो. ‘इशा टूर्स’च्या चोखंदळ पर्यटकांसाठी आम्ही या ठिकाणी मुद्दाहून एक किंवा दोन मुक्काम ठेवतोच. चहू बाजूनी पर्वत शिखरानी वेढलेला तो परीसर, पक्षांचा किलबिलाट  आणि बास्पाचा खळाळता प्रवाह मन शांत करण्यासाठी अगदी योग्य अशी ही जागा आहे. सहलीत आपण कुठे राहतो यावरून त्या सफरीचं यश बर्‍याच अंशी अवलंबून असतं. बास्पा नदीचा तो प्रवाह आणि नदी काठची ती जागा कायम स्मरणत रहाण्यासारखी आहे. नदीच्या दोन्ही काठांना भल्यामोठ्या देवदार वृक्षांनी वेढलं आहे. खळातता प्रवाह सोडून आपली तपस्या भंग करायला तिथे कुण्णी म्हणून नसतं. एखादा जास्तीचा दिवस काढून मुद्दाम इथे थांबावं आणि इथल्या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटावा असं हे गाव. सांगला हे गाव हिमालयाच्या कुशीतच विसावलेलं आहे. धकाधकीच्या शहरी जीवनापासून कोसो दूर असलेल्या या गावातला प्रत्येक क्षण अगदी लक्षात राहण्यासारखा असतो. तिथलं पुरातन नाग मंदीर, गावातली घरं, हिरव्यागार निसर्गाचं दैवी वरदान लाभलेलं हे गाव खरंच देवभुमी आहे. सांगलाच्या जवळच असलेला तिबेटी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे कामरू फोर्ट. सांगला व्हॅलीच्या पार्श्वभुमीवर उठून दिसणारा हा पुरातन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या किल्ल्याच्या तीसर्‍या मजल्यावर विराजमान झालेल्या कामाक्षी देवीच्या मुर्तीमुळे आता जुना इतिहास मागे पडून ते कामाक्षी देवीचं मंदीर बनलं आहे. हा पुरातन किल्ला असला तरी आजही तिथलं नक्षीकाम शाबूत आहे. याच किल्ल्याच्या आवारात पंधराव्या शतकातलं बद्रीनाथ मंदीरही आहे तसंच मुख्य प्रवेश द्वारावर बुद्धाचा भव्य पुतळा पाहायला मिळतो. छायाचित्रणाच्या दृष्टीने महत्वाची सांगलाव्हॅली, तीचं प्रसन्न करणारं लॅन्डस्केप आणि त्या परीसरात उठून दिसणारा कामरू फोर्ट फोटोग्राफर आणि  चित्रकार यांना हवातसा वाव देणारंच हे ठिकाण आहे.

 

 

गर्द वनराईने वेढलेला रस्ता पार करत चितकूल गावाकडे जाताना या धतीवर परमेश्वराने काय काय आणि किती किती मांडून ठेवलं आहे असं सारखं वाटत राहातं. बास्पा नदीच्या काठी वसलेलं भारत-तिबेट सिमेवरचं हे त्या बाजूचं शेवटचं गाव, याच गावात भारतीय बाजूचा रस्ता संपतो. किन्नौर कैलासची परिक्रमा करणार्‍यांनासुद्धा याच ठिकाणाहून पुढे पायी जाव लागतं. बास्पा व्हॅलीतली ब्रिटीशपुर्व काळातली वाटावीत अशी जुनी घरं, दहा-पंधारा माणसांची नगण्य वस्ती असलेली गावं आणि रस्त्यावर अभावानेच आढळणारं एखादं वाहन. रम्य पण सुनसान प्रदेशात आपण फिरत राहतो ते बरोबर असलेल्या आपल्या सहलसाथींच्या मदतीने. सभोवतालचं गर्द हिरवं रान, सुचीपर्णी वृक्ष, हिमाच्छादीत शिखरं निसर्गासमोर नतमस्तक होत आपण त्याच्या लिलांचा आनंद घेत केवळ डोळे भरून घेत असतो. हिवाळ्यात मात्र हा भाग बर्फाच्छादीत असतो आणि इथली माणसं हिमाचल प्रदेशच्या खालच्या भागात स्थलांतर करतात. इतर थंड प्रदेशाप्रमाणे इथे ही बटाट्याचं पिक घेतलं जातं. इथला बटाटा जगातला सर्वोत्तम समजला जातो.

 

किन्नौर कैलास पर्वताचं रमणीय दृष्य पाहाण्याचा आनंद लुटण्यासाठी काल्पा या किन्नौर जिल्ह्याच्या पुर्वीच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आपण जातो. ढाली, कुमारसैन, किंगल, खोपरी, रामपूर अशी गावं मागे टाकत जेव्हा आपण किन्नौर जिल्ह्यात प्रवेश करतो तेव्हा आजूबाजूच्या प्रदेशातही फरक पडलेला असतो. खळाळत्या प्रवाहासह रस्त्यात साथ करणारी सतलज नदी कधी आपलं सौम्य तर कधी रौद्र रुप दाखवत दौडत असते. वाटेत येणारे दगड, गोटे, माती स्वत:बरोबर घेवून निघालेला तिचा प्रवाह तेवढाच कायतो शहरातील माणसांच्या लोंढ्यासारखा वाहात असतो बाकी सगळं कसं शांत शांत. पण याला अपवाद असतो तो वारा. सुसाट वेगाने निघालेला हा वारा तिथल्या महाकाय प्रर्वतांनाही भिडतो. जमिनीची सारखी धुप होत असते. मे महिन्यात तिथल्या उन्हाळ्यामुळे बर्फ वितळल्याने उघड्या झालेल्या पर्वतांवरचे दगड घोंडे या वार्‍यानेच आपली जागा सोडतात आणि तिव्र उतारावरून थेट दरीत झेप घेत असतात. अशा कोसळणार्‍या दगडांची गती एवढी वेगाची असते की त्याला स्टोन शुटींगअसा शब्दच प्रचलीत आहे. सफरचंदानी लगडलेली इथली झाडं आपलं स्वागत करतात. किन्नौरची सफरचंदं जगातली उत्तम प्रतिची सफरचंदं मानली जातात. किन्नौर कैलास पर्वत आणि शिवलिंग शिखराचं डोळ्याचं पारणं फिटवणारं दर्शन हाच काल्पाला जाण्याचा मुख्य उद्देश असतो.  सगळा हिमाचल प्रदेश नावाप्रमाणे हिमालयातच वसल्यामुळे तिथे सरळ रस्तेच दुर्मिळ. वेडी-वाकडी वळणं घेत जाणारे रस्ते हेच जणू हिमाचल प्रदेशचं वैशिष्ट्य. किनौर व्हाली तर या अवघड रस्त्यांसाठीच प्रसिद्ध आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसर्‍या बाजूला उभे पर्वत अशा घाट रस्त्यामधून वाट काढतच शिमला जिल्ह्यामधून किन्नौर जिल्ह्यात जावं लागत. शिमला जिल्ह्यात बर्‍यापैकी वस्ती असल्याने वाटेत सफरचंद, चेरी, पिचच्या बागा लागतात. अवकाळी पावसाच्या मार्‍यापासून सफरचंदांच्या फुलांचं रक्षण व्हाव म्हणून तिथल्या जागृत शेतकर्‍याने बरिचशी झाडं आच्छादलेली दिसतात. कुठल्याही घरासमोर फुलांनी लगडलेली गुलाबाची झाडं पाहून मन प्रफूल्लीत होतं.

 

मोकळ्या शितल हवेतल्या इथल्या पक्षी जगताने आपलं लक्ष वेधून घेतलं नाही तरच नवल. पायी चालत जायला जर मोकळा वेळ असेल तर त्यांचं उत्तम दर्शन घडतं. नुसत्या हिमालयीन मैनाही गुबगुबीत देखण्या दिसतात. पक्षी, फुलं, फळं या सगळ्यांचेच रंग उठून दिसणारे. सफरचंचाची फिकट गुलाबी फुलं किती साजरी दिसतात. सगळं कसं रसरशीत. लांबच्या प्रवासाने आळसावायला झालं तर वाहनातून उरल्यावर पाच मिनिटात पुन्हा तजेला येतो. ही मोकळी हवा, तिथला निसर्ग, महाकाय पर्वत, पाताळात जाणार्‍या दर्‍या, खळाळते प्रवाह आणि शुभ्र बर्फाच्छादीत शिखरं हे हिमालयाचं जगभरातील पर्यटकांना भुलवणारं रुप न्याहाळायलाच इथे जायचं, वर्ष भराचं वारं पिऊन घेण्यासाठी.

 

निसर्गाच्या या अफाट कॅनव्हासवरच्या बारीकशा रेषा हिच माणसाची इथली खुण. नदी काठावरून वरवर जाणारे रस्ते नागमोडी वळण घेत पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणचं दर्शन देत राहातात आणि मग कधीतरी अचानक मागचा प्रदेश दिशेनासा होतो आणि नव्या दुनियेत आपण प्रवेश करतो. एक पर्वत ओलांडून दुसर्‍या पर्वताच्या उतारावर गाडी धावत असते, सुर्याचा डोंगराआडून लपंडाव सुरू होतो आणि आजचा त्याचा दिवस आता संपणार अशी वर्दी मिळते तरी आपलं मुक्कामाचं ठिकाण अजून दूरच असतं. हिमालयात मैलाच्या दगडाला फारसं महत्व नाहीच. आपण शहरी माणसं ते पहात अंतराचा, वेळेचा अंदाज बांधत असतानाच एखादं असं डायव्हर्शन येतं की मती गुंग होते. त्यावरून धावणारी वाहनं कधी थांबवायची ती ठरवणार कोण तर निसर्ग.

 

 

 

जेवढं खडतर जीवन तेवढीच किंवा त्याहून उतुंग अशी माणसाची जिद्द. पर्वत उतारावर चार-पाच फुटाच्या पायर्‍याकरून तिथला शेतकरी शेती करतो ते पाहून आपण विचार करायल उद्युक्त होतोच. दिवसभर थकवणारा प्रवास करीत मुक्कामाकडे लक्ष ठेवून जाणार्‍या पर्यटकांना किन्नौर कैलाशचं दर्शन घडतं आणि नकळत वाहनाना विश्राम द्यावाच लागतो. मावळतीकडे निघालेला सुर्य त्या पर्वतांच्या मुकुटावर झळाळी चढवण्याचं काम घाईने करीत असतो आणि सगळ्यांनाच तो अचूक क्षण टिपायची उत्कंठा लागून राहते. तो मुकुट सोनेरी होणं न होणं नशिबावर अवलंबून असतं. शेवटी रोजचे रंग वेगळे हेच खरं. चंद्र प्रकाशातलं किन्नौर कैलासचं रुप केवळ अप्रतिम. त्याचं वर्णन करता येणार नाही. चांदण्यात न्हावून निघालेला किन्नौर कैलास पहायचा असेल तर तिथेच गेलं पाहिजे. काल्पा हे सतलज व्हाली मधलं छोटसं गाव आहे. जवळच्याच कोठी गावात चंडीका देवीचं पुरातन मंदीर आहे. देवदार वृक्षांच्या छायेत असलेलं पुरातन मंदीर भारतीय आणि तिबेटी कलेचा संगम असलेलं देवालय आहे. कुठलंही स्तोम न माजवलेली ही छोटी पण सुरेख मंदीरं हे तिथल्या जनतेची श्रद्धास्थानं आहेत.

 

सतलज आणि स्पिती नदीच्या संगम हे या सफरीमधलं आणखी एक आकर्षण आहे.  कुठलाही नदिचा संगम पाहाणं ही अपुर्वाईच असते पण इथले प्रदूषण विरहीत प्रवाह पाहताना आपण प्रफुल्लीत होवून जातो. पुढे नाको हे आणखी एक सुंदर गाव लागतं. इथलं नाको लेक अप्रतिम असंच आहे. सभोवताली दाटीवाटीने उभी असलेली झाडं आणि उंचावरच्या शुभ्र शिखरांचं प्रतिबिंब या नाको लेकमध्ये पडलेलं पाहाण्यातला आनंद शब्दातीत असाच आहे. इथे उन्हाळ्यात नौका विहारचा आनंद लुटता येतो तर हिवाळ्यात गोठलेल्या तलावावर स्किईंगचा खेळ खेळता येतो. आळस झटकून उबदार बिछान्यातून बाहेर पडण्याची तयारी असणार्‍यानी पहाटेच्या वेळी थोडं वर चालत जाऊन नाको गाव, तलाव आणि व्हॅलीच विहंगम दृष्य कॅमेर्‍यात बंदीस्त केलं तर तो आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आपल्याला छायाचित्राच्या माध्यमातून कायमचा जपून ठेवता येतो.        

 

किन्नौर मधली हिरवाई कमी कमी होत जाते आणि पुढे आपण स्पिती व्हॅलीकडे मार्गस्थ होतो. हिंदूधर्माचा पगडा असलेली गावं आणि संकृती मागे टाकून आपण तिबेटी संकृती आणि बौध धर्मियांच्या गुंफा असलेल्या प्रदेशात प्रवेश करीत असतो. या पहाडी प्रदेशात आता लोकांची आपसातली संपर्काची भाषाही बदललेली असते. वाटेत लागणार्‍या गेऊ या गावात तिबेटीयन धर्मगुरूची पाचशे वर्षांपासून जतन करून ठेवलेली ममी पाहायला मिळते. आता हा सगळ प्रदेशच वैराण आणि लडाख प्रांताशी साधर्म्य असलेला असा आहे. समुद्र सपाटी पासून ११,००० फुट ते १४,००० फुट उंची असलेला लाहोल स्पिती हा हिमाचल प्रदेशमधला जिल्हा विरळ हवा, बर्फाच्छादीत शिखरं, खोल खोल दर्‍या, उंचच उंच पहाड आणि गडद निळं आकाश या अनोख्या वैशिष्यासाठीच प्रसिद्ध आहे. आता पर्यंत न पाहिलेले रुद्र भिषण पहाड, नजर न पोहोचणार्‍या खोल दर्‍या यामधून वाट काढत जाणारी इवलीशी सडक आणि त्यावरून जाणारं आपलं वाहन हे दृष्यच आपण किती किंचीत आहोत हे आपल्याला सागत असतं, असं असलं तरी अशा दुर्गम ठिकाणी रस्ते बांधणारे हात आणि सिमा सडक संघटन याना आपण आपसूकच प्रणाम करतो. स्पिती नदीच्या काठी वसलेलं ताबो हे गाव तिथल्या ताबो गुंफेमुळे प्रसिद्ध आहे. दहाव्या शतकतली ही गुंफा हिमालयातील अजंठा म्हणूनही प्रसिद्ध आहे. भारताच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेली ही गुंफा तिथली सर्वात मोठी गुंफा आहे. काझा गावाकडे जाण्याआधी वाटेत लागणारी धनकर गुंफा तिथून न्याहाळता येणार्‍या विहंगम दृष्यामुळे लक्षात राहाते.

 

काझाच्या जवळच असलेलं किब्बर गाव हे जगातलं सर्वात उंचीवरचं कायम राहात्या वस्तिचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे चारशे लोकवस्ती असलेलं हे गाव मोटरवाहतूकीच्या रस्त्याने जोडलेलं आहे. स्पितीमध्ये इतर सर्व ठिकाणी मातीच्या विटांपासून बनवलेली घरं आहेत मात्र हे गाव त्याला अपवाद आहे. इथे मिळणार्‍या  दगडांपासून ही घरं बनवली गेली आहेत. याच परिसरात असलेली की मॉनेस्ट्री तीच्या वैशिष्ट्यपुर्ण रचनेमुळे आणि आजूबाजूला असलेल्या पर्वतांमुळे कायमची लक्षात राहाते. एक हजार वर्षं जुनी असलेली ही गुंफा किल्ल्यासारखी असून दोन तीन मजली इमारती या ठिकाणी आहेत.

 

हिमाचल प्रदेश म्हणजे फक्त हिरवागार निसर्ग असं जे आपलं मत असतं ते त्याच राज्यातील लाहोल-स्पिती या जिल्ह्याला भेट दिल्यानंतर बदलतं. हिमालयाच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग असलेल्या देवदार वृक्षांची इथली अनुपस्थिती, इथला राकट रांगडा प्रदेश, वैराण पण मावळतीच्या आकाशातील रंगांशी स्पर्धा करणार्‍या मातीचे रंग या आपल्या आगळ्यावेगळ्या सुंदरतेने भरून काढतो आणि तिथला आसमंत न्याहाळताना त्याचं स्वर्गिय सौंदर्य आपल्याला चकीत करून टाकतं. हिमाचल प्रदेशच्या पुर्वोत्तर भागात तिबेटला लागून असलेलं हे ठिकाण म्हणजे भारत आणि तिबेट मधला टापू. स्पितीचा अर्थच मधली भूमी. तिबेटला लागून असल्याने या भागावर बौद्ध धर्माचा पगडा आहे. परतीच्या प्रवासात कुनझुंम पास पार करून अटल टनेल मार्गे मनालीच्या दिशेने आपण पुन्हा हिरवाईकडे परततो. परतीच्या मार्गावर असलेला चंद्रताल लेक पाहताना अजून हिमाचल पाहायचा आहे हे लक्षात येतं. या तलावातून बाहेर पडणार्‍या  पाण्याचा प्रवाह आपल्या दृष्टीस पडतो पण तलावात येणारं पाणी दिसत नाही. तलावात खालच्या बाजूलाच हे झरे असावेत.   

 

हिमाचल प्रदेशची स्वर्गीय भुमी, तिथले देवदार, पाईन, सुचीपर्णी वृक्ष, मनमोहक फुलं, सहस्र्वावधी धवधबे, खळाळत्या नद्या, विस्तिर्ण तलाव असा नेत्रदिपक देखावा पाहाण्याबरोबरच स्पिती व्हॅलीमुळे लडाखसारख्या प्रदेशाच्या दर्शनाचा लाभ आपणाला या ठिकाणी गेल्यावर घेता येतो हे या सफरीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. हिमालयाचं तसं कितीही वर्णन केलं आणि फोटो काढले तरी तिथे प्रत्यक्ष गेल्याशिवाय त्याच्या भव्यतेची, सौंदर्याची, रौद्रपणाची कल्पना येणार नाही. माणसाला इवलसं असल्याची जाणीव करून देणारा श्रीखंड पर्वत, किन्नौर कैलास शिखर याची देही याची डोळा पाहाण्यासाठी तिथेच गेलं पाहीजे.     

 

नरेंद्र प्रभू

९९८७००३६९०


चला जाउया सोडून बंधन


P.C. Atmaram Parab


या सफरीवर असे विसावा

वाट फुलांनी भरलेली

सखे सोबती मैत्र जीवांचे

अधिक मैत्री ठरलेली

 

मोर पीसासम हलके होईल

मन वेडे ते तिथेच राहील

हिरव्या वाटा निळा समुंदर

भरती असते आलेली

 

किती पहा हे सुंदर पक्षी

विहरत जाती काढीत नक्षी

रोमांचित  करती रान-सावल्या

 वाघ सिंह हत्तीची साक्षी

 

गाठू उंची हिमालयाची

लुटूया मज्जा शुभ्र हिमाची

मोर पीसांचे निळे सरोवर

शिखरे पाहू ती सोन्याची

 

चला जाउया सोडून बंधन

नविन जग ते येवू पाहून

क्षण सोन्याचे आनंदाचे

भरून घेऊ तेथे जाऊन

 

नरेंद्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates