11 July, 2026

गाजलेली मैफिल आणि निळाईची गाज



थबकल्या झिम्माड धारा, स्तब्ध ही उनाड वारा

नाविकाचे गीत माझ्या, ऐकती करिती किनारा

लोक भेटायास आले, निशब्द होऊन गेले

शब्द-शब्द कवितेतला अन् भावही वेचून गेले

सागराचे गुज त्याच्या, साठले गीतात होते   

वादळाची स्पंदने, धडकून कापरे भरीते

 आदळे हदयात माझ्या, आंधळा अफाट दर्या

स्वार तो झाला तयावर, पेलले आकाश लिलया  

सचैल न्हाली सांज होती, हरपलेले भान होते

कोण कोणाला मिळाले? का कुणा ठाऊक होते?  

                                                 नरेंद्र प्रभू

काल प्रभादेवी मुंबईत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु. ल. कट्ट्यावर लेखक, कवी कॅप्टन वैभव दळवी यांचा निळाईची गाज हा बहारदार कार्यक्रम सादर झाला आणि गेले आठ दिवस मुंबईत बरसणारा पाऊस दोन तासात रसिक मनावर कोसळून गेला. तुडुंब भरलेल्या नॅनोसभागृहात गर्दी ओसंडून वहायला लागली आणि आयोजकांना रसिकांसाठी दुसरं दालन खुलं करावं लागलं. निळाईची गाज ऐकायला सागराला उधाण यावं तशीच गर्दी लोटली होती आणि जमलेल्या श्रोत्यांना कॅप्टन वैभव दळवी यांनी तृप्त करून सोडलं. त्यांच्या कवितेचा भावार्थ, अत्यंत नेटकं आणि प्रभावी सादरीकरण, त्याला लाभलेली दृकश्राव्य माध्यमाची साथ आणि टाळ्यांचा कडकडाट मैफिलीला सातवे आसमान पार घेऊन गेला.

·         कविता आणि आयुष्याची लय: संवादाची सुरुवात कवितेच्या सामर्थ्याबद्दल झाली. कॅप्टन दळवी यांनी स्पष्ट केले की, आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टींपासून ते विश्वाच्या विशालतेपर्यंत सगळीकडे कवीचे मन आणि गाणे दडलेले असते.

·         लहानपणीचे संस्कार: कॅप्टन दळवी यांनी शिवडी-लालबाग येथील गिरणगावातील त्यांच्या बालपणाबद्दल सांगितले. त्यांचे वडील, जे स्वतः एक कवी होते, त्यांनी त्यांना अनेक नामवंत साहित्यिक व्यक्तींशी ओळख करून दिली, ज्यामुळे त्यांची साहित्यातील आवड निर्माण झाली.

·         समुद्र आणि वादळाचे अनुभव: समुद्राशी त्यांचे नाते खूप घट्ट आहे. त्यांनी 'भरून आलं आभाळ' आणि 'जहाज बुडता बुडता' या कवितांद्वारे समुद्राचे सौंदर्य आणि वादळातील त्याचे रौद्र रूप यावर भाष्य केले आहे.

·         शिस्त आणि सर्जनशीलता: गणवेशातील शिस्त आणि कवितेतील मुक्त अभिव्यक्ती यांचा मेळ कसा साधता, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, युनिफॉर्म हे त्यांचे कर्तव्य आहे, तर कविता ही त्यांची आत्माभिव्यक्ती आहे .

·         जीवघेणा प्रसंग: त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत थरारक प्रसंगाचे वर्णन त्यांनी केले, जेव्हा अटलांटिक महासागरात त्यांचे जहाज बुडत होते. त्यांनी आणि त्यांच्या टीमने धैर्याने आणि युक्तीने त्या संकटावर कशी मात केली, हा प्रसंग अतिशय प्रेरणादायी मुळापासून ऐकण्यासारखा आहे.

·         भारतीय सैनिकांना आदरांजली: कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी त्यांची गाजलेली कविता 'कोण लागतो रे तो तुमचा?' सादर केली. आपल्या भारत देशाच्या सियाचीन सारख्या दुर्गम सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाचे आणि त्यांच्या संघर्षाचे मर्म या कवितेतून त्यांनी मांडले आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या पु. ल. कट्ट्यावरदर शुक्रवारी अशी मैफिल जमत असते, जमलं तर नव्हे जमवून याच.

ता. क. या कार्यक्रमाचा दुसरा भाग इथेच सादर व्हावा अशी मागणी रसिकांमधून कार्यक्रम संपता संपता केली गेली हेच या कार्यक्रमाचं फलित आहे.      



09 July, 2026

निळाईची गाज

 


स्पिती व्हॅली मधलं लांझा हे जीवाश्म गाव (Fossil village). समुद्रसपाटीपासून १४५०० फुट उंचीवरच्या या गावात फिरताना पायाखालच्या जमिनीवर तुम्हाला जीवाश्म सापडले तर ते नवल नाही. लाखो वर्षांपूर्वी समुद्र तळाला झालेल्या फार मोठ्या हालचालीतून हिमालयाची निर्मिती झाली आणि त्यावेळी समुद्रात असलेले जलचर अचानक पणे एवढ्या उंचीवर उचलले गेले आणि कालौघात जीवाश्मांची घडण झाली. नील नभाने मंडित बर्फाच्छादित हिमालयाचे दर्शन घेत असतानाच कधीकाळी समुद्राचा भाग असलेले हे जीवाश्म न्याहाळत होतो आणि सोबत लाभली होती ती सागरांच्या लाटांवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या कॅप्टन वैभव दळवी या अवलियाची. मुंबई ते चंदीगड हा विमान प्रवास करत असताना साधारण अशाच उंचीवर कॅप्टन वैभव दळवी यांनी त्यांचं समुद्रायन हे पुस्तक भेट म्हणून दिलं आणि कॅप्टन दळवींची प्रत्यक्ष ओळख व्हायच्या आधीच पुस्तक रूपाने त्यांच्याशी जवळीक साधली गेली होती. प्रवासाच्या धामधुमीत पुस्तक वाचायला मिळालं नाही पण या पुस्तकाचे लेखक वैभव दळवी बरोबर असल्याने त्यांच्या अनेक सागर सफारींच्या चित्तवेधक कहाण्या ऐकायला मिळाल्या. लांझा  गावात महासागराची भेट अशा दोन प्रकारे झाली आणि नंतरच्या प्रवासात ती वृद्धिंगत होत गेली.

आपला निसर्ग सुंदर भारत देश उत्तुंग हिमालय आणि अथांग दर्या यांनी संपन्न आहे पण या सागराची अनेक भली बुरी रूपं गेली तीस-पस्तीस वर्षं अनुभवलेल्या कॅप्टन वैभव दळवी यांनी लिहिलेलं समुद्रायन पुस्तक खूप गाजलं, माहितीजालत उपलब्ध असलेल्या त्यांच्या अनेक कविताही दळवींच्या प्रतिभेची चुणूक दाखवतात. अशा या दर्यावर्दी लेखक कवीला प्रत्यक्ष भेटण्याची आणि ऐकण्याची संधी आपल्याला चालून आली आहे.

'पु. ल. कट्टा'  उपक्रमांतर्गत “निळाईची गाज” हा खास कार्यक्रम उद्या म्हणजे शुक्रवारी, १० जुलैला रसिकांसाठी विनामूल्य सादर होणार आहे. संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत चालणार्‍या या कार्यक्रमाला आपण नक्की यायचं आहे कारण पाऊसही  निळाईची गाज ऐकायला उसंत घेणार असे म्हणाला आहे. कॅप्टन वैभव दळवी आपल्या कवितेत म्हणतात:

 

झेलला मी सागराचा वार ऐसा जीवघेणा,

काय होता भार त्याचा, हे तुम्हा कैसे कळावे?

धाडशी त्या नविकांचे शूर असे झुंजणे की;

पाहता ते वादळांनी थांबुनी मागे वळावे.

 

ती अनुभूती, ती गाज लेखकासोबत वाटून घ्यायची असेल तर नक्की याच!   





15 December, 2025

आत्माची भ्रमणगाथा

 


असे पाहतो जीवन त्याचे फिरत्या चाकावरी
किती पहा हे देश पाहिले धडकी भरते उरी
जरा विसावा नसतो त्याला उडतो तो अंबरी
आत्माची ही भ्रमणगाथा देशोदेशांतरी


जरा जाऊन येतो म्हणतो इतके का ते सोपे?
वळणा वळणा वरती बसले दडून असतील धोके
संकटांवरी स्वार होऊन ऐटीत येतो जातो
किती अनोखे देश नेत्री भरुनी येतो

दीडच दशकामध्ये त्याने पार केली शंभरी
नाही विसावा अजून म्हणतो जाईन देशांतरी
वायुपुत्र हनुमानच जणू हा हुंकार पुन्हा भरी
गड्यांनो... चला जाऊया देऊन हात पूला त्याच्या करी

नरेंद्र प्रभू
१५ डिसेंबर २०२५






13 December, 2025

वाङनिश्चयाचा दिन

 



हाच असे दीप हाच ध्रुवतारा
पाहते मी त्याला बसून माहेरा
वाङनिश्चयाचा दिन उगवला
गंध धुंद आणे मनीचा फुलोरा

किती आठवणी गोळा सभोवती
उगाच मनात दाटे पहा भीती
धकधक वाढे श्वास मागे पुढे
सखया सोडव तूच रे हे कोडे

वरूण वरून दिसे तसा नसे
सोडवू पाहते गुंततच जाते
अवचित झाला तोच प्राण सखा
अधिपती आला घेऊनिया सुखा

चल आता करू जीवन साजीरे
उधाण मनाला नाही थांबणारे
होऊ दे प्रीतीची बतसात आता 
सोयरीक होई पाहता पाहता

नरेंद्र प्रभू
१३ डिसेंबर २०२५

23 November, 2025

घन बरसू दे

 


धावत होती कालच दुडूदुडू असे वाटते

मनात उरले कधीच सरले असे वाटते

सोनपावले घेऊन आली क्षण सोन्याचे

तालावरती पदन्यास करी स्वछंदी नाचे

 

अशी अचानक लयीत येऊन जरा थबकली

वाळूसम ती कितीक वर्षे सरकून गेली

रंगमंच हा फिरतो आहे आयुष्याचा

जरा थांबना वेध घेऊ दे तुझ्या मनाचा

 

धृतलयीतच खेळ चालला तुझा असा हा

कधीच सरला काळ तुझा तो बालपणाचा

अशीच पडू दे  तालावरती तुझी पाऊले

घन बरसू दे तुझ्यावरी तो आनंदाचा

 

नरेंद्र प्रभू

११ ऑगष्ट २०२५


13 November, 2025

शुक्र लागला हसावयाला

अशीच अवचित सांज रंगली 

नभ काजळी दूर जाहले

रक्त लालीमा घेऊन भवती 

क्षितिज आता नटून आले


ती सांज धरेवर उतरू पाहे 

चंदेरी अंगरखां लेऊन

टिपूर चांदणे सभोवताली 

सरोवराचा नीलम दर्पण


संध्याराणी येईल आता 

सखा सोबती असेल काहो?

मिलन त्यांचे होईल की ती 

लपून राहील दूर पहा हो !


सगे सोयरे आतुर झाले

कळ्या सभोवती फुलून आल्या 

सहवासही त्यांचा खुलूदे 

शुक्र लागला हसावयाला 


नरेंद्र प्रभू 

५ नोव्हेंबर २०२५

26 September, 2025

छत्तीसगढ : भाग ९ - बस्तरचा दसरा महोत्सव


रथाचं चाक आकार घेताना

७५ दिवस चालणारा बस्तर दसरा बस्तरचा दसरा महोत्सव हा जगातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की या अनोख्या उत्सवाची सुरुवात १३ व्या शतकात बस्तरचे चौथे राजा राजा पुरुषोत्तम देव यांच्या कारकिर्दीत झाली. दसरा उत्सव स्थानिक देवतांचा आणि देवी दंतेश्वरीचा उपासना सन्मान सोहळा म्हणून साजरा केला जातो. येथील लोक भगवान रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा करतात आणि स्थानिक देवी माँ दंतेश्वरीची पूजा करून तिची सेवा करतात. काही आदिवासी समुदाय निसर्गाने प्रेरित होऊन त्यांच्या देवतांची त्यांच्या असंख्य रूपांची पूजा करतात. बस्तर दसऱ्याची तयारी जुलैच्या अखेरीस येणाऱ्या श्रावण महिन्यातील मावळत्या चंद्रापासून किंवा कृष्ण पक्षापासून सुरू होते आणि हा उत्सव अश्विनच्या तेजस्वी पंधरवड्यापासून (ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान) १३ व्या दिवसापर्यंत चालू राहतो. बस्तरच्या राजघराण्याद्वारे हा उत्सव आयोजित केला जातो. जगदलपूरचे रस्ते उत्साहाने आणि उत्साहाने भरलेले असतात आणि लोक पारंपारिक पोशाख परिधान करून, नाचत आणि ढोलकी वाजवत त्या समाविष्ट होतात. बस्तरच्या अनेक गावांमधून आलेले सुतार दरवर्षी रथ तयार करतात. पुरीच्या जगन्नाथाच्याच प्रमाणे हा उत्सव आणि रथ साजरा केला जातो. सुंदर सजवलेला एक भव्य दुमजली रथ ४०० हून अधिक लोक रस्त्यावरून खेचत नेतात. उत्सवाचे शेवटचे १० दिवस प्रेक्षणीय असतात, ज्यामध्ये असंख्य आदिवासी विधी केले जातात, ज्याचा शेवट पुष्प रथ परिक्रमा आणि भितर रैनीमध्ये होतो.

रथ
आताच्या काळात अनेक उत्सव शहरी आणि आधुनिक  पद्धती स्वीकारत असताना मात्र हा उत्सव धार्मिकदृष्ट्या आदिवासी रीतिरिवाजांचे पालन करतो आणि त्यांची शुद्धता आणि पारंपारीक रिती रिवाजा प्रमाणे साजरा होतो. 
देवतांचे मुखवटे 



25 September, 2025

छत्तीसगढ : भाग ८ - मदारकोंटा गुहा


मदारकोंटा गुहा 

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील जगदलपूरजवळील मदारकोंटा ही एक नैसर्गिक चुनखडीची गुहा आहे, जगदलपूरजवळील घनदाट जंगलात लपलेली ही गुहा साहसी पर्यटनासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. ही गुहा नैसर्गिक सौंदर्यात निसर्गरम्य हायकिंग आणि शांत विश्रांतीचा एक अनोखा अनुभव देते, ज्यामुळे ती निसर्गप्रेमी आणि साहसी शोधकांसाठी एक आदर्श ठिकाण बनले आहे.  प्रथम दर्शनी हे ठिकाण अवघड वाटेवरचं वाटलं तरी त्या ठिकाणी गेल्यावर केलेल्या श्रमाचं चीज झालं असं वाटतं.

मंदारकोंटा गावाच्या नावावरून या गुहेचे नाव मंदारकोंटा ठेवण्यात आले आहे. गुहेत पोहोचण्यासाठी तुम्हाला अरुंद मार्गांमधून जावे लागते. गुहेच्या आत चुनखडीत गळती, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याच्या रासायनिक अभिक्रियेमुळे स्लेटमाइट आणि स्लेटराइटचे काही खांब तयार झाले आहेत. गुहेच्या सौंदर्यात भर घालणारे हे खांब चमकदार आणि विविध आकारात आहेत.



प्रमुख वैशिष्ट्ये:

स्थान: जगदलपूरपासून सुमारे २६ किलोमीटर अंतरावर मदारकोंटा गावाजवळील घनदाट जंगलात स्थित आहे.

निसर्ग: या नैसर्गिक चुनखडीच्या गुहा आहेत.

अनुभव: निसर्गरम्य हायकिंग, पर्यावरणपूरक निवास आणि चित्तथरारक दृश्यांसह खडकाळ अन्वेषण आणि शांतता.

पर्यटन: बस्तरच्या वन्य सौंदर्यात लपलेले रत्न.

पर्यटन: मार्गदर्शित गुहा टूर उपलब्ध आहे.

हायकिंग: गुहेभोवतीचे जंगल हायकिंगच्या संधी देते.

निसर्ग प्रेमींसाठी: हे निसर्गप्रेमी आणि साहसी शोधकांसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे.











क्रमश:

नरेंद्र प्रभू


छत्तीसगढ : भाग ७ - धबधब्यांचं बस्तर

 

चित्रकोट धबधबा

सह्याद्री सारख्या डोंगर-दर्‍या नसल्या तरी बस्तरच्या तुलनेने सपाट असलेल्या प्रदेशात धबधब्यांचं साम्राज्य आहे. चित्रकोट, तमडा घुमर, मेंद्री घुमर, तीरथगड यासारखे धबधबे  किती वेळ न्याहाळत बसलं तरी मनाचं समाधान होत नाही. सपाट भागावरून वाहत येणार्‍या नद्या अचानक खचलेल्या भागात धबधब्यांचं रुप घेतात , मनाला मोहवतात आणि जल प्रवाह बनून पुन्हा संथ गतीने वाहू लागतात.
 
चित्रकोट धबधबा हा भारतातील छत्तीसग राज्यातील बस्तर जिल्ह्यामधील इंद्रावती नदीवर स्थित एक सुंदर धबधबा आहे. या धबधब्याची उंची ९० फूट आहे. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात तो  लाल रंग घेतो, तर उन्हाळ्याच्या चांदण्या रात्री तो पूर्णपणे पांढरा दिसतो.

जगदलपूरपासून ४० किमी आणि रायपूरपासून २७३ किमी अंतरावर असलेला हा धबधबा छत्तीसगडमधील सर्वात मोठा, रुंद आणि सर्वाधिक वाहणारा धबधबा आहे. हा बस्तर विभागातील सर्वात प्रमुख धबधबा मानला जातो. जगदलपूरच्या जवळ असल्याने, याला एक प्रमुख पिकनिक स्पॉट म्हणूनही प्रसिद्धी मिळाली आहे. घोड्याच्या नालाच्या आकाराच्या तोंडामुळे, हा जल धबधबा भारताचा नायगारा म्हणूनही ओळखला जातो. चित्रकोट धबधबा खूप सुंदर आहे आणि पर्यटकांचा आवडता धबधबा आहे. दाट झाडे आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये वसलेला, या धबधब्यातून येणारा विस्तीर्ण पाण्याचा प्रपात पर्यटकांना मोहित करतो.

"इंडियन नायगारा" म्हणून प्रसिद्ध असलेला चित्रकोट धबधबा प्रत्येक ऋतूत पाहण्यासारखा असतो, परंतु पावसाळ्यात तो पाहणे अधिकच रोमांचक असते. पावसाळ्यात त्याची रुंदी १५० मीटरपर्यंत पोहोचते. रात्रीच्या शांततेत, धबधब्याचा आवाज ३ ते ४ किलोमीटर अंतरावरून ऐकू येतो. पावसाळ्यात उंचावरून येणाऱ्या प्रचंड पाण्याच्या गर्जना एक रोमांच आणि विस्मय निर्माण करतात. पावसाळ्यात या धबधब्यांचे सौंदर्य खूप वाढते. जुलै-ऑक्टोबर हा पर्यटकांसाठी भेट देण्याचा आदर्श काळ आहे. चित्रकोट धबधब्याच्या सभोवतालची घनदाट जंगले त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर घालतात. रात्रीच्या वेळी, हा परिसर पूर्णपणे प्रकाशित होतो, ज्यामुळे पर्यटक धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचे सौंदर्य पाहू शकतात. वेगवेगळ्या वेळी, या धबधब्यातून किमान तीन आणि सात प्रवाह पडतात.

तमडा घुमर

तमडा घुमर: बस्तर हे त्याच्या अफाट नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. चित्रकोटला जाताना मारडूम जवळ, तमडा घुमर हा बारमाही धबधबा आहे. हा धबधबा इंद्रावती नदी पात्रात थेट १०० फूट उंचीवरून पडतो. सर्व मोठ्या आणि आश्चर्यकारक धबधब्यांप्रमाणे, पावसाळ्यात, हिरवळ आणि उन्हाळ्यातील ढग त्याचे सौंदर्य वाढवतात. या परिसरात मोरांच्या उपस्थितीमुळे, या धबधब्याला स्थानिक लोक मयूर घुमर म्हणूनही ओळखतात.  

चित्रधारा, तमडा घुमर आणि मेंद्री  घुमर हे चित्रकोट धबधब्याकडे जाण्याचा मार्ग अधिक आल्हाददायक आणि आनंददायी बनवतात. तामरा घुमर धबधबा जगदलपूरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. तो चित्रकोट आणि मेंद्री  घुमर धबधब्याच्या अगदी जवळ आहे. धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेते आहेत. चित्रकोट आणि तीरथगड धबधब्यांप्रमाणे, तामरा घुमर धबधबा हे देखील चित्रकोट धबधब्यांजवळ एक आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण आहे.
मेंद्री घुमर

मेंद्री घुमर धबधबा हा चित्रकोट धबधब्याच्या मार्गावर एक सुंदर हंगामी धबधबा आहे. "धुक्याची दरी" म्हणून प्रसिद्ध असलेले मेंद्री घुमर एक सुंदर दरी व्यापते. १२५-१५० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या हिरव्या दरीत ते शांतपणे आपले अस्तित्व दर्शवते. वरून घनदाट जंगलाकडे पाहिल्यास मनात शांततेची भावना निर्माण होते.
मेंद्री घुमर धबधब्याचे निसर्गरम्य सौंदर्य आणि रिमझिम पाऊस हा एक मनमोहक अनुभव असतो. चित्रधारा, तामडा घुमर आणि मेंद्री घुमर धबधबे चित्रकोट धबधब्याकडे जाण्याचा प्रवास आणखी आनंददायी आणि मनाला प्रसन्न बनवतात.
तीरथगड जलप्रपात

तीरथगड जलप्रपात:  जगदलपूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेला हा मनमोहक धबधबा पर्यटकांची मने जिंकतो. पर्यटक त्याच्या मनमोहक सौंदर्यात इतके हरवून जातात की त्यांना येथून निघून जावेसे वाटत नाही. मुंगबहार नदीवर वसलेला हा धबधबा चंद्रकोरी आकाराच्या टेकडीवरून ३०० फूट खाली पायऱ्यांसारख्या नैसर्गिक रचनांवर पओसंडून वहात असतो. पडणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणारा दुधाळ फेस आणि पाण्याच्या थेंबांचा नैसर्गिक कारंजे पर्यटकांना हळुवारपणे भिजवतात. लाखो वर्षांपूर्वी, भूकंपामुळे नदीच्या खालच्या बाजूचे खडक कोसळले आणि त्यामुळे तयार झालेल्या पायऱ्यांसारख्या दरीने हा मनमोहक धबधबा निर्माण केला असावा. 

चित्रकोट धबधबा








22 September, 2025

छत्तीसगढ : भाग ६ - गढ-धनोरा





गढ धानोरा हे गाव छत्तीसगच्या कोंडागाव जिल्ह्यात आहे. गावाच्या प्राचीनतेचे पहिले वर्णन १९०९ मध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटिश काळातील गॅझेटियरमध्ये आढळते. बस्तर राज्याचे तत्कालीन दिवाण राय बहादूर पांडा बैजनाथ यांनी व्यापक अभ्यास केला आणि त्याच्या पुरातत्वीय अवशेष आणि शिलालेखांसाठी साहित्य गोळा केले. गॅझेटियरमध्ये असे नमूद केले आहे की शहरात सुमारे वीस टाक्या आणि पंचवीस ढिगाऱ्यांचे अवशेष होते. कदाचित त्यांच्या खाली मंदिरे झाकली होती. एका ढिगाऱ्याचे उत्खनन करण्यात आले ज्यातून एक विशाल ६ फूट उंच शिवलिंग सापडले. उध्वस्त किल्ला असलेल्या जवळच्या टेकडीवर आणि आजूबाजूला असंख्य प्रतिमा विखुरलेल्या होत्या. त्याच वर्षी, हिरा लाल यांनी सिहवा येथील ११९१-९२ इसवी सनाचा एक शिलालेख प्रकाशित केला. त्यांचा असा विश्वास आहे की राजा कर्णाचे निवासस्थान गढ धानोरा येथे होते आणि त्यांचा मित्र राय बहादूर पांडा बैजनाथ यांना त्या ठिकाणी प्राचीन अवशेष सापडले होते. हिरालाल असेही नमूद करतात की गढ धानोराच्या स्थानिक परंपरेत राजा कर्णाचा उल्लेख आहे, ज्याने भूतकाळात या जागेवर राज्य केले होते. काही अभ्यासांमध्ये गावाचे आणि त्याच्या प्राचीनतेचे संदर्भ आढळले आहेत.

गावातील ढिगारे तीन गटांमध्ये विभागले गेले आहेत: १) विष्णू संकुल, २) बंजारीन संकुल आणि ३) गोबरहीन संकुल. उत्खननातून असे दिसून आले की मंदिराचे पाया आणि भिंती भाजलेल्या विटांनी बनवल्या होत्या. मंदिरांची रचना सोपी होती, ज्यामध्ये चौकोनी गर्भगृह आणि एक मंडप होता. मंडपाला खांब नव्हते. मूर्ती आणि गर्भगृहातील बांधकामासाठी दगड वापरला जात असे.

क्रमश:

नरेंद्र प्रभू

 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates